satyanveshi manus books and stories free download online pdf in Marathi

सत्यान्वेषी माणूस

कवितासंग्रह

सत्यान्वेषी

माणूस

संजय विस्तारी येरणे.

भरारी प्रकाशन, नागपूर.

सत्यान्वेषी: संजय विस्तारी येरणे

Satyanweshi – Sanjay Vistari Yerne

Sanjayyerne 100@gmail.com

वार्ड नं 7 शिवाजी चैक, मु. पो. तह. नागभीड

जि. चंद्रपूर ४४१२०५

संपर्क : ९४०४१२१०९८

प्रकाशन

भरारी प्रकाशन,

सौ. संगीता संजय येरणे.

संपर्क : ९४२१७८३५२८

प्रकाशन दि. १ नोव्हेंबर २०२०.

मुखपृष्ठ: संगीता संजय येरणे

मुद्रकः यश इंटरप्रायजेस, गणेशपेठ, नागपूर.

अक्षर तपासणी: पुनाराम निकुरे. तळोधी (बा.)

टाईप सेटींग : काव्य ग्राफीक्स, नागभीड.

अनुक्रमणिका

१ बोटऱ्या...

२ तुझ्या तोंडाचा पट्टा...

३ बुद्ध उभा

४ बाबा...

५ अपमान

६ उपदेश

७ नग्नसत्य...

८ न्यायदान

९ गोलमगोल

१० हत्या

११ साने गुरूजी

१२ निखारे

१३ सत्याग्रह

१४ कामगारदिन चिरायु...........!

१५ आठवणी

१६ उद्ध्वस्त

१७ भविष्य

१८ फरक

१९ राज्यकर्ता

२० ठिगळ

२१ रंग

२२ थडगे

२३ एकांत

२४ पॅन्ट

२५ ब्रम्हास्त्र

२६ आक्रोश

२७ ऋतू

२८ जगणे जगायचे असते !

२९ धनुर्धर

३० स्वार्थ

३१ माझा मित्र

३२ तंत्रमंत्र

३३ भूक

३४ शत्रू

३५ महात्मा तुकाराम

३६ बायकांचे प्रश्न

३७ कडूसत्य

३८ भारता

३९ काया........

४० संवादिनी

४१ लोकशाही

४२ लढवय्या

४३ मातीतले प्रेम

४४ आनंदाचे क्षण

४५ आता माणुसकीचे दिवे लावू

मनोगत

‘सत्यान्वेषी’ कवितासंग्रह प्रकाशन करतांना, आनंद होत असला तरी पण मनाला वाचकांच्या अभिप्रायांची हुरहूर लागलेली आहे. तसे बघू जाता हा माझा स्वतंत्र प्रकाशित होणारा पहिलाच कवितासंग्रह होय आणि साहित्यक्षेत्रातील हे एकविसावे अपत्य आहे.

साहित्यलेखनाची सुरूवात कवितेने जरी झाली असली तरी पण प्रातिनिधिक संग्रह व एक चारोळी कवितासंग्रहाच्या पुढे मी जावू शकलो नाही. कवितारूपी अनंत भावना मनात रेंगाळत असतांनाही, मी कविता या प्रांताकडे फार दुर्लक्षच केले त्याला कारण म्हणजे कथा, कादंबरी, समीक्षा आदी प्रकारात सुरू असलेले लेखन हेच होते. पुढे अनेकदा कविता लिहिली पण ती स्वतःपुरतीच मर्यादित राहिली. अनेकदा माझ्या रसिक मित्रांनी मला स्वतंत्र कविता संग्रहाचा आग्रह केला पण प्रकाशन क्षेत्रातील अनंत अडचणी आणि या प्रकारात झालेली गर्दी यातून हिरमोड होत गेलेला आणि सहजच मी या प्रकारातून दूर राहू लागलो. पण आज या काव्यसंग्रहाने मी आपणासमोर येतो आहे.

सदर काव्यसंग्रहाच्या शीर्षकाप्रमाणेच मी त्याला न्याय देत, काही निवडक कवितां यात समाविष्ट केल्या आहेत. अगदी छोटेखानी असलेला हा कविता संग्रह आपल्या समाजातील अनंत वेदनांच्या, समस्यांचा, प्रश्नांचा पाढा वाचतांनाच त्यावर एक विचारप्रवर्तक बनून माणसाला माणूस बनण्याची दिशा देवू शकल्या तरी पुरे!

‘सत्यान्वेषी’ म्हणजेच सत्य विशद करणारा, शोधणारा. परंतु या संग्रहात शोषणकारी धर्माचे सत्य रूप मांडणारा, कुचकामी संकल्पनांच्या विरोधात बंड करून उठणारा असा एक माणूस मला दिसतो आहे. हा माणूस या संदर्भाने आपल्या मनातील भाव अगदी सत्यता पडताळून मांडतो, शोधतो आहे. होय! हाच माणूस मला समाजात वावरतांना कुठे ना कुठे प्रतिनिधित्व करीत असतांना दिसतो आहे. त्याचे अनंत रूप अनेक माणसांच्यारूपाने या समाजात वावरत असले तरी पण त्या माणसाला मिळणारा मानसन्मान हा मला तरी नगण्यच जाणवला आहे. मात्र हा ‘सत्यान्वेषी’ माणूस आपलं काम चोखपणे करीत कशाचीही तमा न बाळगता अनंत द्वेष व रागाला संकटाप्रमाणे झेलत सत्याची कास धरतांना दिसतो. तेव्हा मला त्यात परिपूर्णतः आलेली वाटते एवढी परिपक्वता असलेला माणूस बघून, आपणही त्याप्रमाणे परिपक्व व्हावे असे मला सहज वाटून जाणे आणि माझे हे वाटणेच, माझ्याशी निगडीत अनंत बांधवाला तेवढेच साहित्याच्या मार्गातून जुडलेल्या अनंत वाचक, रसिकालाही एक समंजसपणाची जाणीव जाणूनबुजून समोर आणून देण्याचा हा प्रयत्न म्हणजेच ही सत्यान्वेषी कविता होय.

कदाचित ही कविता एक मनोरंजनाची आस देणारी नसेलही पण वैचारिक भूक भागवित आपणास एक गूढतेची दिशा उलगडण्यास लावित, अनंत जगण्यातील आनंदाचे क्षण देणारी नक्कीच ठरणार आहे. असे मला सहज वाटून गेल असले तरी ती माझी स्वतःची एक महत्त्वाकांक्षा आहे. हे सांगून मोकळे होतो.

आज काव्यप्रांतात अगदी दर्जेदार कवितासंग्रह, गझलसंग्रह यातून वैचारिकपणा येतो आहे. यात ही सत्यान्वेषी पुरून उरेल की काय माहीत नाही. पण मनाला एक आनंद याचकरिता की आपण या संग्रहाच्या रूपाने कवी म्हणून समोर येत आहोत...

या संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी प्रकाशन, मिळालेल्या अनंत सहकारी मित्रांचे तथा स्नेही बंधू पुनाराम निकुरे यांचे आभार मानत यातील काव्यरसग्रहणाला वाट मोकळी करून देतोय...

माझ्या साहित्य प्रवासातील दिग्दर्शक

स्मृतिशेष

बंडू गजानन कत्रोजवार

यांच्या स्मृतीस अर्पण

आपल्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत...

संजय येरणे.

१ बोटऱ्या...

एखाद्या ढिवराले

जाळ्यात सापडावा

बोटऱ्या

अगदी तसाच

माले सापडला धर्म.

माय म्हणते,

चाळणीनं चाळून घेतो

सूपानं पाखडून देतो

खळेगोटे आनं कचरा

कर्मकांडाच्या डस्टबीनमंधला.

मी मेणबत्ती घेवून

चाललो...

त्या तिकडं...

‘धर्माची विहीर नाय

विहार म्हणतेत त्याले

बुद्धही तिथेच न्हाले

बाबासाहेबही तिथंच पाणी प्याले’

पाह्यं त्या टपरीवरचे लोकं

फिदीफिदी हासतेत

चहा, कोल्ड्रींक्स पेत

वीस रूपयाची बिसलेरी

डोक्यावर शिंपडून नाचतेत.

‘माय,

तू डोक्यावर माठ घेवून ये...

या दुनियेलेच शुद्ध करून दे...

गोमूत्र नाही....

त्या चवदार तळ्याचं पाणी

शिंपून...’

ती म्हणाली,

‘फुल्यांची विहीर खोद रे अंगणात.’

म्या म्हणलं,

‘नाही वं माय

म्या पुढारी होवून

अगदूर विहारच बांधून घेतो.

जेथं भेटंल सनातनी

त्याच्या हातात बोटऱ्याच देतो....’

(बोटऱ्या - एक मासा प्रकार, तसेच हा शब्द झाडीबोलीत उपहासात्मक म्हणून वापरल्या जातो.बोटऱ्या सापडणे म्हणजेच आनंददायी कृती तर बोटऱ्या देणे वा निसटणे म्हणजेच दु:खदायक कृती त्यालाच पाडाव करण्याची कृती म्हणू शकतो.)

२ तुझ्या तोंडाचा पट्टा...

तुझ्या तोंडाचा पट्टा

तसाच सुरू राहू दे

मी मात्र सट्टा खेळणे बंद करणार नाही.

साहित्याच्या महापूरात मेलेला

एवढीच ती

मृत्यू प्रमाणपत्रावरील नोंद

कुठल्याही आजच्या साहित्यिकाला

तेवढीच मलाही पुरेशी...

मला तसा तुझा अभिमान आहे

कारण...

घरातला केरोसीन संपला असतांना,

सन्मानाच्या चार शिल्ड पेटवून

केलेला चहा

तुझ्या माहेरच्या लोकांना किती गोड भासला.

तू मात्र तेवढ्यापुरतीच आनंदित

चहाची समस्या सुटल्याने

मी मात्र मोदीसारखा....

सारखा साहित्य दौऱ्यावर

असे तू त्या पाहुण्यांना म्हणालीस

आजकाल हे सारखे माईकवर फेकत असतात

शब्द... साहित्यफैरी

बिनकामाच्या

(साहित्यानं पोट जगवता येतं?)

मला एवढेच ते बोल सलले, सखे!

खरं सांगू काय ?

मला काहीही म्हण

पण मोदीभाऊला साहित्यिक बिरूदावली लावल्याचे

कुणालाही आवडणार नाही

कारण हौसेखातर साहित्यावर सट्टा

कुठलेही राजकारण लावत नाही.

तू अशीच बोंबलत रहा

मी उशाशी साहित्य ठेवत

कायमचाच निजेन

मृत्यू नोंद तेवढी बघ

आणि पाहुण्यांनाही दाखव

या साहित्यानेच माणसं जगल्याचे

अनंत दाखले....

तुकाराम महाराजासारखे ...

३ बुद्ध उभा

घरातून शाळा बघा

की शाळेतून घर बघा

झोलबा पाटलाच्या वाड्यात

दिसतो मला विठ्ठल उभा.

वारीत चाललो सदा

टाळ कुटले कैकदा

तसाही शिरजोर पावसात

भेटतो मला बुद्ध उभा

४ बाबा...

बाबा,

आज संविधान दिन

तरीपण आम्ही का दीन ?

सांगा डाव कुणी जिंकला

अरेरे ! इन, मीन, साडेतीन

हल्ले कुणाचे, सल्ले कुणाचे?

साबण चोपडवितात रीन

फेसाला भुलू नकोस बळीराजा

भुकेला पाळेल का कुठला दिन?

५ अपमान

भोगे अपमान बहिष्कृत केले

छळून केली हत्या तुकारामा ।।

वेडे हे नसले वैदिक कसले

क्रूर व्यवस्थेने कापले बहुजना ।।

का धरतो पाय सोडूनिया माय

पुजतो सांजेला बाप हा देवाचा ।।

वैकुंठाची आस भक्त देवदास

कणसे खातांना फास पारध्याचा ।।

बीजाचे रोवणे पोटभर खाण्या

खारक बदाम सत्य नारायणा ।।

निर्मल जीवनी फेस काय कामी

शुद्ध मनी भाव देव्हाऱ्यात नाही ।।

पारध शुद्धता दंगल वैध्यता

मरतो मावळा पूर आसवांचा ।।

सांगे संत जगी फायदा कुणाचा

समजून घेतो कधी कोण आता ।।

फुकाच्या या बाता चिंधीचाच साप

जहरीली श्रद्धा भक्ता जन्मोजन्मी ।।

६ उपदेश

मदमस्त गुंगित

शांततेत निजलेल्या

गावाच्या भिंतीना

चांगलं म्हणू नकोस.

तुला फक्त कुत्र्याचं भुंकणं

ऐकू येत असलं तरीपण

उषःकालाची वाट पहात

निद्रिस्त झालेली गडी

रक्ताच्या धारोळ्यात केव्हा निजेल

याची गॅरंटी नाही.

तुला फक्त एकच धर्म

रामाचा की रहीमचा

चक्राचा की चंद्राचा

एवढंच हे विचारतील

तेव्हा मी माणूस आहे

माझही रक्त लाल आहे

असा उपदेश देऊ नकोस.

७ नग्नसत्य....

तू रेखाटलेलं नग्नसत्य...

एक दारिद्रयाचं चित्र

एक क्षणभंगुर सत्य

उघडं नागडं मूल

कळेवर घेऊन माता

परमेश्वराची वाट शोधत

रिमझिम पडणाऱ्या पावसात....

नयनातून अश्रू गाळीत

अर्धमेला होऊन कवेत

उपाशी रडणारं बाळ.

रस्त्यानं जाणाराचं लक्ष वेधायचं..

थंडीने कुडकुडणाऱ्या बाळाला

फाटक्या पदराने सावरत

पुढे-पुढे तशीच जात होती

स्मशानात दु:ख पुरण्यास....

आणि तू चित्रकार म्हणून

पुरस्कार स्वीकारत...

अगदी आनंदानं स्मित करीत मिरवित होतास..

माझं डोकं ठणकलं.....

‘भोसडीच्या.....’

८ न्यायदान

न्यायदान करतांना

काळे कोटही आंधळे बनलेत

न्यायदेवतेप्रमाणे

तराजूचं समतोल पारडं

वशिलेबाजाकडे झुकतच चाललं

अन्यायास न्याय मिळणा-या सूत्राची

निव्वळ वजाबाकी उरलीय

महात्म्या

कोर्टामध्ये टांगलेल्या फोटोतून बघतांना

सहन होतेय का तुला?

की,

‘जो हुआ अच्छा हुआ’

ह्या गीतासाराप्रमाणे

पापपुण्याचे धडे समजून

सारं काही योग्यच वाटतयं तुला

फक्त एवढच सांग!

९ गोलमगोल

उलटवून बघितली पानं

इतिहासाची

घडलेलं सारं काही

भयानक विद्रूप होतं

आता बघतोय आजचा भूगोल

भू कुठे दिसलीस नाही

सगळ गोल ......

गोलम-गोलच होतं

१० हत्या

रेल्वेचं धाडधाड करणार रूळ

पाण्याप्रमाणं मिळणारं औषध

तर सुताप्रमाणं लटका फासावर

जीव द्यायचंच तर तडफडत

मरायचं असूनसुद्धा भरघोस मरतांना वेदना

असहाय्य होताय ना तुम्हास!

मग त्वरित भेटा

एका सेकंदात आधुनिक संगणकाद्वारे हत्या

जीव जाण्याची उत्तम गॅरंटी

वेदना की सुई बोचल्याची जाणीव नाही

अगदी माफक दरात

सोबत आकटं, लाकडं, कपडे फ्री

भव्यसुट बेरोजगारी सुटेपावेतो

भ्रष्टाचारी मिटेपावेतो.

इथं हत्या करून मिळेल

अवश्य भेट दया

एकदाच करून बघा

सारी दुःख संपून सुखाचा शोध

मोक्ष प्राप्तीचे उत्तम साधन.

स्वर्गात कमी किमतीत अॅडमिशन

नंबर लावायची भानगड नाही

एकदाच करून बघा, अवश्य भेट दया

यम हत्या केंद्र... अटी लागू.....

११ साने गुरूजी

बरं झालं गुरूजी!

तुम्ही स्वतःच आत्महत्या केली

तुम्ही सहन करू शकले नसाल

स्वातंत्र्यानंतरही देशातली कालवाकालव

दीन, दुबळ्यांसाठी, समतेसाठी हक्काने लढलात

जगाला प्रेम अर्पावे म्हणून

आईच्या कुशीत रडलात

पण आत्म्यास अजूनही शांती नाही

बघा गुरूजी.....

तुमच्या एवढया सत्य आचरणानेही

कुणीही तुमच्या पायवाटेवर चालत नाही

पण गुरूजी...

तुमच्या चरणांची धूळ मस्तकी लावून

या देशात वावरणा-या असंख्य गुरूजींचे

शासनाने धिंडवडे काढलेत

समाजाने तर अवहेलनाच दिली

बरं झालं गुरूजी तुम्ही गेलात.

गुरूजी तुम्ही स्वर्गातून बघीतही असाल

पण आमच्यासाठी इंद्रदेवाजवळ

उपोषण करू नका

कारण तुम्ही चुकलात!

तुमच्यासारख्या बुद्धीमान माणसानं

डॉक्टर, इंजिनियर व्हायचं सोडून

गुरूजीचं जीवन पत्करलं

आता बहुतांशी लोक म्हणताहेत

‘नाही मिळत भीक तं मास्तरकी शिक’

आजचे मुलं डॉक्टर, इंजीनियर बनताहेत

पण गुरूजी होण्यास मन तयार नसतं

पण आम्ही तुमच्या मार्गावर चालण्याची

शपथ घेवून गुरूजी बनणार

सत्य कुठं लोप पावलयं

जागोजागी भ्रष्टाचार दिसतंय

तुमच्या पावलात असलेल्या धुळीएवढीच

जमीन शुद्ध राहलीय

गुरूजी, आम्ही सुद्धा तुमच्या आत्म्यास

शांती मिळावी म्हणून

तुमच्या जन्म-मृत्यू दिनानिमित्य

झोपेच्या गोळया खावून कायमचेच झोपणार...?

१२ निखारे

हवेच्या झोकासोबत उडणा-या ज्वाला

जखमेवर मीठ चोळल्यागत

फेकलेल्या मिठाचे निखारे

त्वेषाने पेटून उटत होती.

गिधाडाने जनावरास झोंबल्यागत

मेलेल्या देहाला झोंबीत

त्यांना तरी कुठं माहीत?

हे शरीर जिवंत असतांनाही

मेलेलच होतं

आता तर गेलेलंच

कित्येक नक्षत्रे अंतराळातील तारे बघून

कोरडे घसे, ओरडणारे पोट

निजलेलं असतांना, स्मशानात

सांगते आहे

आता तरी थांबवा

सूर्यास्त.....

१३ सत्याग्रह

भूक लागली तरी

हवेचा गारवा खात

सूर्याची किरणे बघत

आकाशाला आलिंगन देत

जात होतास पुढे-पुढे

दांडीयात्रेत.....

मूठभर कलदार उचलून

म्हणालास मी सत्याग्रह केला

मिठाचा......

सारं हिदुस्थान एकमुखानं

तुझं जयजयकार करतोय

आता एकविसाव्या शतकात

मीही असाच जाईन पुढे-पुढे

टाकसाळीत.....

मूठभर कलदार उचलून

म्हणेन मी सत्याग्रह केला

भ्रष्टाचाराचा.....

सारं हिंदुस्थान भ्रष्टाचारमुक्त

आणि जयजयकार करतील गरीबं,

शोषणशाही बंद झाल्याची.....

१४ कामगारदिन चिरायु...........!

एक मे कामगार दिनानिमित्य

बालपणी स्वातंत्र्य दिनी

जसं पहाटेच उठून

शाळेत जायचा

अगदी तसाच

प्रातःस्नान आटोपून

फाटक्या कपडयाच्या ढिगा-यातून

अंगरखा काढीत जणू

किरणाच्या शलाका अंगावर मिरवत

फाटक्या पादत्राणाने तसाच

चालत राहिला....

कारखान्यासमोर जात

महाराष्ट्रदिनी फडकलेला तिरंगा

लहरतांना

आयुष्यही असंच लहरत

हवेच्या झोकात

वाऱ्याच्या दिशेने

समोरून येणारी कार

काळयाकुट्ट बुटपालिशने

चमकणारा मालक

हसतच आत आला

कॅबिनात जावून

दोनचार पेपरवर साईन मारलं

आणि काय ध्यानात आलं?

रामजाने!

कारखान्यातिल कामगारास

कामावरून कमी केलं

तो कामगार

फॅक्टरीच्या दारातून घरी जातांना

तिरंग्याकडे बघतच राहिला

आयुष्याच्या संदर्भात

तो हळूच पुटपुटला

‘कामगारदिन चिरायु होवो!’

१५ आठवणी

पाऊलवाटा मिरवतांना

वाहणार नदीचं पात्र

दाटून येतात गडद भाव

पुलंकित होवून जिव्हाळ्याने

बहरलेली हिरवीगार पालवी

आठवते त्या नदीकिनारी

तर केव्हा

गळलेली पालवी बघून

खिन्न उदास मनाला आठवतात

अंतरंगात दडलेल्या वेदना

तेव्हा पाझरलेल्या अश्रूचे थेंब

वलये साकारीत पात्रात विलीन होतात

आठवणी

कुंतीने दुःख पुरल्यागत....

१६ उद्ध्वस्त

हातात हात घालून

सुख-दुःख झेलतांना

आंब्यास मोहोर यावं

बाभळीस बहर यावं

सोनपिवळया फुलांचा गंध

आसमंतात प्रेमागत पसरावं

तुझ्या वेणीवर माळलेला गजरा

नव्हे तो गंध

माहीतेय तुला, आठवते मला

म्हणूनच की काय?

मी तुझ्यात धुंद

पण आता तू आणि मी

हातात रायफल घेवून

स्वतःचेच रक्षण करतोय

का?

तुझ्यात आणि माझ्यात

महायुद्ध पेटलं तर

मुश्किल असेल तह करणं

बस ! एक अणुबॉम्ब

सारं काही उद्ध्वस्त.....

१७ भविष्य

एकदा भविष्यवाल्यास

हात दाखविलं

म्हणे, तुमचं भाग्य थोर आहे

हाताची भाग्यरेषाच सांगित आहे

तेव्हापासून नोकरीकरिता

डिग्री घेवून फिरतोय

रस्ते झिजून गेले

बरं झालं!

माझ्या पायात पादत्राणे होती

पण माझे पायही थकलेत

आता वावरामध्ये राबणारा बापही थकला

दारिद्रयमय उपवास पडतिल

म्हणून गेलो वावरात

काळ्या ढेकलाची चव चाखायला

देहातून रक्ताप्रमाणं निघणाऱ्या

घामाची कहाणी काय सांगू?

हातातील खन्ती, पावडयांशी लढतांना

तळहाताच्या रेषा केव्हाच मिटल्यात!

१८ फरक

हुस्नमालिका तुझी याद जडली नि

अंतरीचा ठाव उरात दाटून येताच

औरंगजेबाच्या कैदेतिल झरोख्यातून

यमुनातिरी ऐटित उभ्या असलेल्या

पांढ-या आरस्पाणी ताजमहालाकडे

तुझ्या मूर्तीमंत सौदर्याचं लेणं समजून

अंधारमय वाटेवर टवकारून बघतो

तुझ्या खुबसुरत कबरीकडे

आणि सिंहासनाची शोभा वाढवणाऱ्या

औरंगजेब या बदसुरत बच्च्यात

कितपत फरक आहे ते

कारण

दोघासही जन्म देणारा

तो एकच शहाजहान!

१९ राज्यकर्ता

प्रत्येक देवळात असते

एक घंटा

मिणमिणती सांजवात

अगरबत्ती किंवा धुपारा

गुलाल, बुक्का, शेंदूर, कापूर

कळसाच्या खोबणित असते मूर्ती

बघते राज्यातिल कृष्णधवल कीर्ती

भिकारडी मन, लांचनास्पद जीनं

भोगणा-यास दाखवतो

मस्तकी भगवा टिळा

मी पणाचा सोंगट हिरा

राज्यकर्ता.........

२० ठिगळ

आभाळ फाटल्यागत

रात्रंदिन पडणारा धो-धो पाऊस

बर्बाद शेतीतील सडलेल्या भाताची

किडलेली निगर्भार पालवी

जनावरही हुंगेणा

फाटकं लुगडं

पोराच्या पोटाची भडकलेली आग

विझविण्यास झाकलं

तेव्हा...

फाटलेल्या लुगड्याचं ठिगळ

आभाळागत फाटलं.

२१ रंग

रक्त एकाच रंगाचं असतं

सुविचार कुणास सांगू नका

धर्म जातीचं अवडंबर माजवणाऱ्या

कौरवांशित पुढा-यांनो, सावधान!

विज्ञान युगात अशक्य ते काय?

माणसाच्या रक्ताचं रंग

केव्हाही रंगीबेरंगी होईल

आणि आम्हाला माणुसकीत असलेला

माणूस ओळखणं सोपं जाईल.

२२ थडगे

वारूळाचे थडगे भासतात

प्रत्येकाची हृदये

सुन्नाट भकास कब्रस्थान

कुहीकुही केकाटण्याचा आवाज

अरूंद लांबट बोळातून

फिरणा-या काप-या सावल्या

म्यानातली चकाकती तलवार

आणि रक्ताचा शिंपडलेला सडा

आपल्याच मासावरील केसांना हुरहूर भरविते

दाराखिडक्यांच्या भोकातून

बघणारी डोळे

पाहतात भकास वाटेकडे

कुणीतरी येतय का?

फाटलेल्या वस्त्राला फाडण्यास

कुशीला जाळण्यास

हद्याचे ठोके चुकल्यागत भिरभिरते मन

स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा लुटारूपणा

गाडल्या गेला जमिनीत

अंधार तडफड हेच जीवन

हरवलेला माणूस

शोधतो माणुसपण

वाटेवर लाळ गाळून पळणारा

कुत्रा, बघताच

बंद असलेली कवाडे

भिरभिर बघतात

त्याप्रमाणं भुंकून बोलावतात त्याला

रक्षण करण्यास

मी सुद्धा शोधतोय

एक कुत्रा......

माझ्याच थडग्याचे रक्षण करायला.

२३ एकांत

निद्रिस्त थडग्यातील संत हवा आहे

मज एकांत हवा आहे

विटलेल्या मरगळ दुनियेचा

नकोसा हा गंध

पावलागणिक रेंगाळणारी धूळ

जनावरागत ओरडणारे

राजकारणात गजकरण ठरणारे

इथे भोंदू फिरताहेत..... सावधान !

समर्था, तुझ्याच अस्तित्वाचा मंत्र हवा आहे

मज एकांत हवा आहे.

बोलाचे बोल जुळुनी

केव्हा गुणाकारात वळती

इथे न कुणी कुणाचा

पैशात देव लोळती

नको गट बदलविणारे महंत

उदरातील फाटलेल्या आतडया

कावळयागत ओरडणे

गर्भश्रीमंत धुंदिच्या पावलात लोळणे

हॉजी, हॉजी, इथला मंत्र आहे

खबरदार!

शिवबा,

तुझ्या भवानीचा रूद्रावतार हवा आहे

मज एकांत हवा आहे.

२४ पॅन्ट

ढुगंणावरून लक्तरे

निघालेला पॅन्ट घालून

स्वातंत्र्यदिनी

स्वच्छ इस्त्री केलेल्या

नव्या करकरीत ध्वजास

सलामी देतांना...

मज विचार आला

ध्वजाप्रमाणं स्वच्छ करकरीत

पॅन्ट असता तर.....

२५ ब्रम्हास्त्र

नितिमत्तेने ढासळलेल्या पिढीत

घाबरून जावू नका

कलियुगातिल संसाररथाची चाके

कर्णाप्रमाणं सावरतांना

अर्धमानं लढणा-या जयाचं

प्रतिबिंब उघडून बघा.

आजही वर्षानुवर्षे तीच परंपरा

अंत:करणात रूढलीय

धर्मद्वेश, भेदाभेद, जातीकलह

हीच इथली सर्वश्रेष्ठ बुद्धी

असं समजून तुम्ही वागलात

तर राष्ट्रासोबत स्वतःलाही घडवाल

सत्याचं सत्ययुग येईल

सावधान व्हा!

कुणीतरी तपस्वी प्राप्त करेल

इथल्या द्रोणाचार्याकडून ब्रम्हास्त्र

धृतराष्ट्राच्या फसव्या डावाप्रमाणं

डाव साधणाऱ्यास म्हणेल

पार्थासारखा.....

कौरवंशाना कर नेस्तनाबूत

विचार करा!

तेव्हा नसेल ब्रम्हास्त्र

परत घ्यायला लावणारी कुंती....

२६ आक्रोश

जाती, धर्म, पंथाचं अवडंबर

लयलुट, बेबंदशाही, लोकशाही, नोकरशाही

कफल्लक मुर्दांड वस्ती

भ्रष्टाचार कुटिलता ते राजकारण

हिंसाचार अत्याचार ते गरिबी

मुत्यू आत्महत्या ते शेतकरी

सर्व प्रश्नावर तोडगा काढण्यास

सभेचं आयोजन ठरलं

बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन झालं

हातात माईक धरुन

स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा गाजावाजा झाला

सभाध्यक्ष उभे झाले

सर्व सुन्न शांत...........

एका शब्दात सांगतोय

हया देशावरच अनुबॉम्ब घाला

कुठली समस्या उरली

नंतर येऊन मला बोला !

२७ ऋतू

दारिद्रयाचा ऋतू सुरू झाला

नि देहाची हाड

पांढरीफक्कड हाडकी झालीत

तांबूस, गव्हाण, पांढरी कातडी

हळदीगत पिवळसर

पंडू झाल्यागत दिसली

तसे सगळे देह नव्हे!

काही अस्सल भाजलेल्या कोंबड्यावर

चढलेल्या मासागत ताजी

बोकडाच्या उडणाऱ्या काळसर बुऱ्यागत

हसरी मोहक डौलदार

पण ह्यांना हया ऋतूची

झळही लागणार नाही

उलट रक्तही आटलं

मरतुकडी झालेली पेशी

हाडाचा सांगाडा तेवढा

खप्पाड, चिप्पाड दिसतोय

त्या बोकडाचं मास बघून

जर कुपोषित मनानं ठरवलं

बोकडाचं मास तिळून खावं

गिधाडाप्रमाणं...

तेव्हा दारिद्रयाचा ऋतू नक्की

बदलेल नाही का?

२८ जगणे जगायचे असते !

जगणे जगायचे असते

माय बापाच्या नशिबाची लक्तरे

गेंडयाच्या कातडीची ताकद

सागरगोटीने घासून उगाळून

डोक्सं थांबाव तसं!

मरी आल्यागत चेहरे

खोल विहिरीतील पाण्यागत गाल

बुबुळातील धुसरता

खोल-खोल डोळे

राबता-राबता जगण्याची आशा देतात

तसं डोळयाचं पूर

बापू लाथ मारुन पाणी काढ

माझे स्नायू ताठर होतात

जगणे जगायचे असते...

मेलो तरी बेहत्तर

दररोजचे मरणे, जगता, जगता

तुमचे नशीब पाहून झुरणे

माहे बी दिस निघल

खाईन पोटभर घास

शेळयामेंढयाच्या जागी कु़त्र्याचं मास

एक ठुस्सा वाटीभर रस्सा

मस्त झाला कोलड्यास

असं रायते दादा गरिबाचं ध्यास

जगणे जगायचे असते...

बाशिंग बांधून बोहल्यावर

चार दिवसात कमावलेले

उधार उसनवार कर्जात

इकडची टोपी तिकडं..

वरातीचं घोड, घोडयाची वरात

हिंदळत लग्नात नाचायचं असतं

जगणं जगायचं असतं.....

जगण्याच्या शर्यतीत,

शर्यतीतील अडथळे

मनसुबे, इरादे

गडी कोसळल्यागत नेस्तनाबूत होतात

दारुचा डोज लगाऊन

करोडो माणसं दररोज झोपतात

तेव्हा बायका, पोरबारं

शेतीवाडी, धंदा, नोकरी

बेरोजगारी, भ्रष्टाचार

यातले सगळे प्रश्न समस्या

रात्रभरासाठी संपतात

मीही झोपतो अगदी शांत

ओम शांती ओम....

जगणे जगायचे असते...

क्वचितच गर्भ जन्मतः सुखी

एखादाच गर्भ

झोपडीतून महालात रंगेल

अपवाद....

गर्भातच जगण्याचे संदर्भ

जगणे महाग आहे...

पैशासाठी जगणं की

जगण्यासाठी पैसा

पोटासाठी जगणं की

जगण्याकरिता पोट

कोणाले सांगतेस तत्त्वज्ञान बाप्पा!

मायासारखं जगून पाय

उपाशापोटी जगणाऱ्याची

संघटना काढून पाय

होय त्यायचा नेता

न मांड आमच्या मागण्या

काढ मोर्चे न कर संप

त्यायले बी खर्च येईल तं

घे घामाचे चार, दोन आणे

अडाण्याले काय समजते यातलं

शिकणा-याले कुठला आला अर्थ

जगणाऱ्याचं जगण असतं.

पैसेवाल्याचं जगणं असतं

पैसेवाल्याचं जग आहे

रंकाच्या झोपडीले, कुबेराचा शाप

लक्ष्मीचा ताप, शनिदेवाचा व्याप

सांग बाप्पा! जगणे जगायचे असते.

दुकानात जगणे विकत का भेटते?

अध्यात्म ते थोर नेत्याच्या

भाषणानं पोट भरुन पहा

जगणे स्वस्त.....

मी बी मस्त... तुमी बी मस्त....

तुमचंच खरं!

जगणे जगायचे असते...

२९ धनुर्धर

धनुर्धर नव्हता तेव्हा

पर्याय एकच होतं

अर्धगर्भज्ञानी अभिमन्यूनं

चक्रव्यूह भेदायचं

दोष कुणाचा?

आता आमुच्या पाठीशी नेहमी

धनुर्धर असतोच

चक्रव्यूह भेदण्यास

तुम्हीच ठरवा

पुढं.....

कुठली युद्धनिती वापरायची ती?

३० स्वार्थ

स्वार्थामुळे

माणुसकीचा झरा आटतो

उरात काहूर

जीवनात आठवणीचा पूर दाटतो

धो-धो वाहणाऱ्या पावसागत

रूदनाचा समुद्र पेटतो

असंतोषाचा उद्रेक

अणूचा विस्फोट

विध्वंस तन, मन, धनाचं

प्रत्येक वस्तीवर संजय भेटतो

आंधळया धृतराष्ट्रास सांगित फिरतो

अठरा दिवसाचं कुरूक्षेत्र

कौरव पुत्र तनाने पडला

पांडव पुत्र मनाने पडला

स्वार्थाने स्वार्थ जडला

कृष्णा सांग! पुन्हा गीता

पार्थ, कुठे नि कशात हरला.

३१ माझा मित्र

दोघेही मिळून प्रारब्धाची

कमान सजवतांना

माझं फाटलेलं ठिगळाचं पॅन्ट

मी तिथंच सोडून गेलो

बरीच वर्ष झालीत.....

माझं प्रारब्ध..... वळून बघतांना

माझ्या ढुंगणावरची लक्तरे

इथून तिथे घेऊन फिरणारा

माझा मित्र नशिबाशी झुंजून मेला

तेव्हा किळस आली मला स्वतःची

ह्या लोकशाहीतल्या गुलामगिरीत

इमान विकून अधिकाऱ्यांची

कुत्र्यागत हाडे खाल्ल्याची

नि राजकारण्यागत पादत्राणे पुसल्याची

बंडखोराला लुटल्याची

दारिद्रयात पांगलेल्या माझ्या आई-बहिणीची

मीच इज्जत लुटल्याची

माझा मित्र...... वळून बघतोय......

मी, त्याच्या सरणावर......

माझ्या ढुंगणावरची लक्तरे निघालेला पॅन्ट

घालून अखेर मेला

मी मात्र अमानुष?

३२ तंत्रमंत्र

मोठे मासे छोट्या मास्यांना गिळणं

खेकड्यांनी खेकड्याला ओढणं

शासकांनी मजूरावर अन्याय करणं

हे तर चालायचंच

विनोबांची मूलतत्त्वे

आपण तुडवत चालायचं

भावनांना गुदमरत जगणं

मात्र कठीण होईल

त्यावेळेस....

अन्याया विरूद्ध लढणाऱ्यांनो

इतिहासात लिहिलंय

संघर्ष करा

पुस्तकातील शब्द पुस्तकात

सोनेरी अक्षरांनी कोरलीत

तसेच राहू द्या

आजच्या जगाचं अनुभव सांगतोय

इथे प्रत्येक रक्ताचा थेंब

विकल्या गेलं आहे

सरड्याप्रमाणं रंग बदलणं

जुने झालं आहे

चापलुसी इथला तंत्र आहे

हॉजी, हॉजी इथला मंत्र आहे

अन्यथा

जीवनाचा अस्त

मेल्यावर पुतळा बनवणं स्वस्त....

३३ भूक

बाबा,

महाडच्या चवदार तळ्यावर

पाण्यासाठी

सत्याग्रह केलात

आज इथे बाबा.......

माणूस महागाईने मेला

भिकारी भुकेसाठी गेला

सांगा पुढाऱ्यांनो

तुमचा सत्याग्रह कुठे गेला ?

३४ शत्रू

तुझ्यातील लालसा

जोमाने पुढे येते

रस्त्यावरची काटे बाजूला सारत

तू सर्वोच्च झालास

तुझं दिग्विजय बघतोय

वाट मोकळी

मला हसू फुटतं

मी तुझ्या मागे सरळ येतो

माझ्या वाटेत काटे नाहीत.

तू मेल्यावर कोण ?

माझी लालसा

मी सत्तापिपासू

मीच सर्वोत्तम होणार !

३५ महात्मा तुकाराम

सोळाव्या शतकातील महात्म्या !

टाळ मृदुंग घेवून

हरिनामाचा गजर करीत

जात होतास पुढे-पुढे

धर्माच्या शुद्धीकरणासाठी....

माणुसकीच्या आधारस्तंभाला

खरा धर्म दाखविण्यास

शब्दाचं शस्त्र बनवून

झुगारलेस वेदविचार ....

सुडानं तुला ग्रासले

लेखनी बुडविली

गावबंदी, बहिष्कृतता, जप्ती

तुमच्यावर तुडविली

तेव्हाच तू उगारलेस

शस्त्र सत्याग्रहाचं ...

तुझ्या सत्याग्रहानं

जागृत झाले बहुजनविचार

आज अन्याया विरोधात

क्रांतीयोद्धे बनून, लढण्याची प्रेरणा

तुझ्याच मुळे महात्म्या !

आता एकविसाव्या शतकात

आपणही जावू पुढे-पुढे .....

३६ बायकांचे प्रश्न

ढोरायच्या गऱ्यात दावं

तसं बायकाच्या गऱ्यात

कारी गरसुली

मानसायनं बांधून

बायकायले जनावरासारखं केलं

कपाराले लाल मरवट

आनं भांगात लाल कुंकू

तिच्या नशिबाले रगताची

आठवण करून देते

हातामधल्या काचेच्या बांगड्या

फुटक्या नशिबावाणी

चुलीत मुलं-मुलीत रमत

तडतड फुटतात

तवा बायकांच्या समस्यावर

कोरट कचेऱ्यानं दिलासा देल्ला

आता नाई का बाई!

माणसायच्या प्रश्नांचा उहापोह

सुरू झाला आहे.

३७ कडूसत्य

तुमच्या संगती असतांना

माझं कडूसत्य बोलणं पाहून

बाजूला सारलत

म्हणून

मी कडूलिंबाचं झाड

अंगणात लावलं

मला फार बरं वाटतं

आता....

कडूलिंबाचं झाड

भरपूर ऑक्सिजन देतोय

तुम्हाला....

असं तुम्ही का म्हणता?

३८ भारता

कळत नाही बाबा, भारतात

राजकारणी तुझे कोण लागतात ?

चौकाचौकात माणसासारखे भुंकतात

(कु़त्र्यासारखे नव्हे बरे का?)

सत्तेत येताच दिसते सत्य

देशभक्तीचा नमुना, देश विकतात

फाटल्या आमुच्या ढुंगणावरची लक्तरे

उघडी करून हेच झाकतात.

आम्ही घेतो दगड उशाशी

मैफिलीत त्यांच्या, चांदण्या सजतात

हुतात्म्यांचे भूत उगीच नाही सतावत

देशद्रोही आमुच्या मातेवरच झोपतात

३९ काया........

सत्तेसाठी खुर्ची कुठे केव्हा सांडायची?

भिकारी रस्त्यावर भुकेसाठी भांडायची

माय बोतरीले न बाप वावर भोक

नशिबाचे कातडे चुलीमंदी छापायची

माहयं रडे सरण नदीत हाड सिरावाले

लुळी पांगळी काया खाटीक कापायची

कारले येलाले कधी का गोड लागले

सोना पांघरुन चिंध्या कुत्रे विकायची

छाटावाले आलो म्याबी तुमची डोकी

उठा! गरिबांनो दमात टोपी फेकायची.

४० संवादिनी

कालचा पाऊस म्हणजे

आसवाची धार होती

ढगामधला राग असा

शेतकऱ्याची हार होती

शासन आणि पाऊस एकच

यार! तुमची गरज फार होती.

झिरपतो घाम

त्याला अवकाळ म्हण

कोसळत्या आसवांना

जणू पावसाळा म्हण

साली, राबणाऱ्यांशीच फितूर दुनिया

बरसलाच नाही, त्याला दुष्काळ म्हण

खबर अशी वाऱ्यासारखी

इथे, तिथे दिसते हल्ली

चंद्र तारे लाजतील अशी

नशा भरली गल्लोगल्ली

आर्जव, आराधना मंदिरात अन

सत्यान्वेषीची उडवितात खिल्ली...

४१ लोकशाही

दावणीला बांधलेली गाय

दूध देते

पण

तिच्याजवळ वासरू असावाच लागतो

नाहीतर तिच्या लाथेत

सापडेल आपलेच मुस्काळ

मला नेमके काय सांगायचे आहे

हे समजले नसेलच मित्रानो,

प्रस्थापिताच्या विळख्यात

सापडलेल्या हिंदुत्वाच्या झाल्लरी

भगव्या डारा नि चड्डीच्या

जाळात गुंतलेली मने

अर्थात दावणीच ती

नाहीच समजले काय?

अरे! स्पष्ट बोलतो म्हटले तर

एका वाक्यात सांगतोय

इथे खरा इतिहास मांडायला बंदी आहे

आणि मांडलाच तर

वासरू पाळलेला असेल

मुस्काळ लाल झालेलं दिसेल

यालाच लोकशाही हे गोंडस नाव

पाव्हन तुमचं कुठलं गाव?

४२ लढवय्या

हजारो वर्षापासून

कुठले ना कुठलेतरी

घुबड

या वस्तीत घुसमटत आहेत

एखादा अस्त्र सोडून

उच्छाद मांडून जाताहेत

आणि आम्ही पिढ्यानपिढ्या

स्वसंरक्षणार्थ लढत आहोत

लढवय्ये बनून

खरेच या घुबडांनी कहर केला राव!

४३ मातीतले प्रेम

वेड लागावं म्हणून

नाही कुणी प्रेम करत

खरेतर वेडे व्हावे लागते प्रेमात

हा प्रेमाचा सिद्धांतच असतो

म्हणून मी सूर्याच्या आकारागत

विशाल भाकरीवर प्रेम करून

लाथ मारून पाणी काढीत

ओतत गेलो शेतात घाम

तेव्हा बैलाच्या हलणाऱ्या मानेची सूचकता

मला समजलीच नाही

मी टोचत गेलो तुतारी

निर्मळ भुकेच्या प्रेमास्तव.

सालं किती प्रेम करावे

या शेतीवर आणि मातीवर

तो सूर्य मुतला तेव्हा

रडवेला झालेला जीव

कारभारीण बघते ढगाकडे

वादळ घोंगावते

प्रेमाची भाषा बदलली

हे कसे कळेल मला?

घामाच्या रक्तधारा

ती टिपून घेते पदराने.

शेती पिकली नाही तरी चालेल

पाणी नसले तरी चालेल

कोपला निसर्ग तरी चालेल

भाव पडला तरी चालेल

पण धनी जपला पाहिजे

हेच तिचे खरे तत्त्वज्ञान....

स्वहत्या करणारे बघून तिचे प्रेम असेच

मुक्या बैलागत मन हलवून सांगणारे

तेव्हापासून आम्ही करतो प्रेम या मातीवर

तुमचीदुनिया बरी आहे हो!

कारण

तुमचे प्रेम हे छातीवर

तर आमचे प्रेम हे मातीवर

एवढाच काय तो तुमच्या आमच्या

सिद्धांतातील फरक........

४४ आनंदाचे क्षण

काही आनंदाचे क्षण

मरगळलेल्या जीवनातील

यातनावर मलमाचा लेप लावून येतात

तेव्हा हलकेसे बरे वाटते

आपणही त्या जखमावर

फुंकर मारून

वेदनेच्या आक्रोशाचा हुंदका

कमी करतोच ना

म्हणून काय सुकलेल्या जखमेच्या

खिपल्यावर फुंकर मारायची

वो साल दुसरा था, यह साल दुसरा है!

गझलेच्या मंथितार्थाला कवटाळत

पुन्हा उभे व्हावे वेदनेशी लढायला

गडकोटावर फडकवलेल्या

ध्वजाचा रंग मात्र शोधतो

घटनेच्या पानापानात

माझ्या आणि तुझ्याही वेदना

रंग रक्ताचा सारखाच होता

आणि तो शास्त्रज्ञ बनून

रक्ताचे रंग शोधतो आहे लॅब मध्ये

त्याला म्हटले

तू या प्रेताचे रंग शोध

अवाक् होऊन बघत हसतो तो

त्याला अनंत वेदना झाल्या

मी झेंडू बाम मलम

वेदनेवर चोळण्यास दिले

लगेच तो किंचाळला बॉम्ब बॉम्ब

सगळेच पसार

आता त्याच्याही वेदनांचे शास्त्र शोधतो

मी धर्माच्या अनंत ग्रंथात

रंग इथेच तयार होतात

वीजधर्जीने

आणि इतिहासातील बखरी हसतात माझेवर

हे युद्ध सत्तेसाठी होते

या करिता तर अट्टाहास मित्रा

शास्त्र आणि शस्त्राकडे बघण्यापेक्षा

शस्त्रक्रीयेकडे बघ........!

४५ आता माणुसकीचे दिवे लावू

तू कितीही दिवे लावलेस

तरी

झोपडीत पडणारा प्रकाश

बरोबरी करू शकत नाही

या श्रीमंत व्यवस्थेच्या उजेडाशी

आणि

जिला तू लक्ष्मी संबोधतेस

त्या मनधारनेला पुजल्याने

तुझ्या अप्रयत्न वादाचा अंकुर

फुलणार नाही एखाद्या रोपट्या प्रमाणे.

तरीपण....

तुझे चालू दे!

अरेच्च्या! खावाचे तेलही महागले

तेव्हा न मिळणारा राशण, घासलेट

तू संतापू नकोस

दिवाळे निघालेल्या माणसाला

शहाणपण सुचावे याकरिता

युगानुयुगे येत राहील...

तू फक्त विचाराची शिदोरी

तुझ्या अश्रूच्या तेलाने शिजवून घे

तोपावेतो......

देर है अंधेर नही...

पणती पेटवून घेतो

इथे लक्ष्मी नांदते

या नाटकाचे अंक मी पूर्ण करून घेतो

माणुसकीचे विचार देतो.

कुणी अक्षर रोवतो

कुणी शब्द पेरतो

कुणी रंग फवारतो

गड्यांनो,

मी विचारांचे बीज लावतो.

संजय येरणे.