Santosh books and stories free download online pdf in Marathi

संतोस

' खणखणीत आवाजात दोन टाळ्या वाजवुन संतोषने उजवा हात पुढे पसरला. डाव्या हाताने उगाचच पदराला चाळा करत, तिचे ते बायकी नखरे चालू झाले. " ओय्य चिकने, ए मामा चल दे दे फटाकसे! भोत दिनो के बाद आयी मै. चल दे दे !" लालभडक बांगड्यानी भरलेला तो हात, नुसताच राकट आणि रुक्ष... स्त्रिपणाचा जरा ही लवलेश नाही. हात आपल्याच दिशेने येत आहे. " किधर किधर से आते है, भगवानने हात पॉव तो दिये है कमाके खाने को, यहा हमने क्या ठेका लेके रखा है सबका." तो घाणेरडा स्पर्श टाळण्यासाठी सुधावाण्याने काहीतरी कुरकुरत २ रुपयाच एक नाण तिच्याकडे भिरकावलं.'

" हु मामा! तुम भी नॉ... दो रुपयेसे क्या होता है रे ? अच्छा चल. टाटा." परत पदराशी चाळा करत , लटकत मुरडत ती पुढ्च्या दुकानाकडे वळली. पण दुकानदाराने तिच्या तोंडावरतीच शटर डाऊन केले होते. अजुन दोन-चार टपर्या आणि दुकाने ढुंडाळत, दोन तास रस्ता पायदळी तुडवत, तिने रेल्वे फाटकाचा रस्ता पकडला. आता चांगलीच काळोखी रात्र झाली होती.

" दोन...पाच...विस... दोन... दोन... दोन...पाच....दहा..., ....., ....,,.... कुल मिलाकर ८७ रुपया. " हातातले पैसे मोजत ती भरल्या आभाळाकडे बघु लागली. तसाच फुटपाथवर टाकुन दिलेला कडकडीत, अर्धमेला देह.

" आयेगा मजा अब बरसात का, तेरी-मेरी दिलकश मुलाकात का....लाल्ल्ल्ल ला ला लाला लाल्ल्ल्ल्ल....आ आआ आआआ."
" ओ संतोस इधर क्या करती रे ? चल तिल्ली बझार. उधर बडा गिर्‍काईक मिलेगा. थोडा मस्का लगानेका... बझार बडी तेजी मे है हा आजकल."

सलमाच्या आवाजाने संतोष फुटपाथवरुन उठली. आणि काहितरी अचानक आठवल्या सारख झपझप पावले टाकत, रेल्वे पुलाच्या बोळाकडे निघाली.

" कितनी बार बोला पर तू नही सुनेगी. मै तो चली." म्हणत सलमाही चुपचाप चालू पडली.

ती निघुन गेल्याची शहानिशा करुन संतोस ने पुन्हा चालायला सुरुवात केली. चार पडक्या-झडक्या अर्धवट बांधकामाच्या ईमारती मागे सोडुन तिने एक निसरडी जागा गाठली, आणि आजुबाजूचा कानोसा घेऊन एक कचरा कुंडीच्या इथे येऊन टेहळनी सुरु केली. अगदी भयान रात्र त्यात हे निर्जन ठिकाण, कोणी चिटपाखरु आसण्याची शक्यता कमीच... हे पाहुन तिने दोन ढेगांवर असणार्या एका खोपटाकडे धाव घेतली.

कररर्र असा पत्र्याचा कर्कश आवाज. खोपट कसले चारी बाजुला लहान मोठ्या आकाराचे आणि काळे-कुट्ट पडलेले पत्रे फक्त नावापुरतेच आधाराला उभे होते. आत दोन अ‍ॅल्युमीनीअमच्या काळपट ताटल्या आणि एक पितळी तांब्या. ठिकठिकाणी ठिगळ पडलेली एका मळक चटई. केसाचा गंगावन, हातातल्या भाराभर बांगड्या, गळ्या-कानातले भडक नकली दागीने तिने ओरबाडून काढले. तोंडावर सपासप पाण्याचा मारा करुन ती त्या पत्राच्या शेडला टेकली. बसल्याक्षणी तिने कापडे काढुन एक लुंगी आणि लाल बनीयान अंगात चढवली. आता 'ती' चा 'तो' झाला होता.
त्या हालचालीची चाहुल बाजुला झोपलेल्या दोन जिवांना लागली होती. उपाशी पोटाने झोपलेली ती दोन लहान लेकर आत्तापर्यंत उठली आणि संतोस ला बिलगली.... " बा आला...बा आला... बा मना भुक लागले रं... खायाला काय आनल ? दी ना!" संतोस ने येताना बरोबर आणलेलेल्या खाण्याच्या पुड्या त्यांच्या पुढे ठेवल्या. भुकेली मुले त्यावर तुटून पडली होती. पाच एक मिनिटांत सगळ्याचा फडश्या पडला, हे पाहुन संतोसच्या मनात एक विचार आला, " या अनाथ दोन जिवासाठी तर रोज टाळ्या वाजवत दारोदारी भटकतो मी. नाहितर भिक मागुन दिवसाला मिळणार्या पाच- दहा रुपयात मस्त जगत होतो."


बाजुला असलेल्या प्लॉस्टीकच्या भांडयातले पाणी घटाघटा पिऊन संतोस ने संतोषाने आपले डोळे मिटले.... उद्या परत 'तो' ची 'ती' होण्यासाठी.