Ti Ek Shaapita - 12 books and stories free download online pdf in Marathi

ती एक शापिता! - 12

ती एक शापिता!

(१२)

अशोक दहाव्या वर्गात शिकणारा एक युवक! वय झाले म्हणून त्याला युवक म्हणायचं नाही तर त्याची शरीरयष्टी एकदम कृश! नुसताच ताडासारखा वाढलेला. खायला भरपूर असूनही शरीर म्हणावे तसे भरलेच नव्हते. थोडेसे काम केले तरी त्याला धाप लागायची. अभ्यासात मात्र तो भलताच हुशार होता. त्याचे शिक्षक नेहमी म्हणायचे की, अशोक नक्कीच शाळेचे नाव काढणार आहे. मॅट्रिकला तो पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये येईल. त्याच्या प्रकृतीची काळजी असलेल्या सुबोध - सुहासिनीला त्याची अभ्यासातील प्रगती पाहून आनंद वाटत असे. पीयूष अशोकप्रमाणे हुशार नसला तरीही विविध स्पर्धांमध्ये तो बक्षिसे मिळवित असे.

आशा आठव्या वर्गात शिकत असली तरी वयाच्या मानाने बरीच थोराड वाटत असे. अभ्यासाची, कामाची चिंता न करता, भरपूर खाणेपिणे असल्यामुळे ती अंगाने चांगलीच भरली होती. रुपाने, सौंदर्याच्या बाबतीत ती सुहासिनीपेक्षा सरसच होती. गोरापान रंग, चाफेकळी नाक, डाळिंबी ओठ, विशाल नयन तिचे सौंदर्य खुलवत होते. वय वाढत होते पण वागणं बदलत नव्हतं, साधी कपबशी विसळणे तर दूर पण उचलून ठेवत नसे. ऑफिसचे काम सांभाळून सुहासिनी घरातील कामे करायची. सुबोध, अशोक तिला अधूनमधून मदत करायचे पण आशा काडीचीही मदत करायची नाही. त्यांच्या गल्लीत अमर नावाचा मुलगा राहत होता. त्याच्यासोबत आशाची विशेष मैत्री होती. अर्थात त्यांच्या मैत्रीकडे कुणी विशेष लक्ष दिले नाही कारण एक तर सुबोध-सुहासिनी आपापल्या कामात दंग असायचे आणि त्यांच्या दृष्टीने आशा अजून लहान होती. 'ती' समज येण्यासारखे तिचे वय नव्हते.

अशोकला काही दिवसांपासून लघवीचा त्रास होत होता. सुरुवातीला एक- एक दिवस लघवी होत नसे, लघवी होत असताना जळजळ होत असे. मधूनच सकाळी डोळ्यांवर सूज वाटत असे. ती गोष्ट लक्षात येताच सुहासिनीने सुबोधला सांगितले. एकेदिवशी सकाळी सुबोधने अशोकला जवळ बोलावून त्याचे निरीक्षण केले. त्याचे हातपाय, डोळे यावर सूज असल्याचे त्याला जाणवले. त्याने अशोकला विचारले,

"अशोक, तुला काही त्रास होतो का?"

"म..म..मला...." सुबोधच्या प्रश्नाने अशोक गडबडला.

"सांग. तुला काय त्रास होतोय?"

"मला लघवीचा त्रास होतो आहे. लघवी करताना जळजळ होते आणि.. आणि..."

"आणि काय होते बाळा?" सुहासिनीने विचारले.

"मला लघवी होत नाही."

"किती वेळ?"

"कधीकधी दिवसभरही होत नाही."

"काय? दिवसभर होत नाही?" सुबोधने विचारले.

"होय. आता तर तीन दिवस झाले..."

"बाप रे! हा त्रास किती दिवसांपासून आहे?"

"पाच-सहा महिने झाले असतील."

"अरे, मग सांगायचे ना. चल बरे, आपण डॉक्टरांकडे जाऊया." सुबोध म्हणाला. काही वेळातच ती तिघेही शहरातील एका चांगल्या डॉक्टरांसमोर बसले होते. डॉक्टरांनी अशोकला तपासले. काही प्रश्न विचारले. डॉक्टर म्हणाले,

"अशोकला काही दिवस दवाखान्यात ठेवावे लागेल."

"पण डॉक्टर, काय झाले आहे?"

"आताच निश्चित सांगता येणार नाही. साऱ्या तपासण्या करून मगच सांगता येईल. घाबरून जाऊ नका. शक्यता आहे, किडनीवर सूज आहे."

त्याचवेळी अशोकला दवाखान्यात शरीक करण्यात आले. साऱ्या तपासण्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सुबोधला बोलावले आणि म्हणाले,

"अशोकचे सारे अहवाल आले आहेत."

"डॉक्टर, काय आहेत अहवाल? त्याला काही आजार तर नाही ना?"

"दुर्दैवाने त्याची एक किडनी फेल झाली आहे."

"डॉक्टर, त्याचे वय..."

"आले लक्षात पण वयाशी काही संबंध नसतो."

"डॉक्टर, त्याच्या जीवाला काही धोका तर नाही ना?" अशोकने विचारले.

"तसा धोका नाही असे म्हणता येणार नाही. असा पेशंट जिवंत राहूही शकतो आणि केव्हाही..."

"नाही. डॉक्टर, नाही. असे म्हणू नका. काहीही उपाय करा पण..."

"मि. सुबोध, घाबरू नका. होईल, इलाज नक्कीच होईल. आपण शक्य तेवढे सारे प्रयत्न करु. त्याची किडनी बदलावी लागेल."

"मग बदला..."

"तेवढे सोपे नाही ते."

"लागू द्या. कितीही पैसा लागू द्या."

"प्रश्न तो नाही. पैसा देऊन विकत मिळणारी वस्तू नाही ती. कुणाच्या तरी शरीरातील किडनी काढून बसवावी लागेल."

"म.. म..मग माझी बसवा ना."

"तुमची जमणार नाही कारण तुम्ही अगोदरच अशक्त आहात त्यामुळे ती जिम्मेदारी..."

"डॉक्टर, माझ्या मुलाच्या जिवाचा प्रश्न आहे आणि तुम्ही जिम्मेदारी टाळत आहात."

"तसे नाही सुबोध. तुम्ही असे भावनाविवश होऊ नका. कुणीतरी दाता निश्चितच पुढे येईल."

"कोण येईल डॉक्टर? अहो, कुणी रुपयाचे नाणे दान करीत नाही. अशावेळी कुणी जिवंतपणी अवयव दान करणार आहे?"

"येईल. तुम्ही असे करा, वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्ही अशा माध्यमातून जाहिरात देण्यासाठी आमच्या व्यवस्थापकाला भेटा. ते करतील सारी व्यवस्था. काळजी करू नका. ही माझी पहिलीच केस नाही. यापूर्वीही अशा अनेक केसेस आलेल्या आहेत."

सुबोध लगेचच दवाखान्यातील व्यवस्थापकांना भेटला. दोघांनी मिळून जाहिरातीची व्यवस्था केली. अशोकच्या खोलीत सुबोध पोहोचला. अशोकला झोप लागली होती. सुबोधचा उतरलेला चेहरा पाहून सुहासिनीने काळजीने विचारले,

"काय झाले? काय म्हणाले डॉक्टर? तुमचा चेहरा असा का उतरलाय?"

"सारे अहवाल आले आहेत. अशोकची एक किडनी बदलावी लागणार आहे. त्यासाठी जाहिरात देऊन आलोय."

"अहो, ते का शक्य आहे? असे कोण पुढे येणार आहे?"

"तशी वाट पाहणेच आपल्या हातात आहे."

"अहो, पैशाची गरज असणाऱ्याला आपण भेटू. त्याच्या पाया पडून विनंती करु."

"बरोबर आहे, तुझे. पण असे भेटावे कुणाला?"

"भेटू. काहीही करु. वाटल्यास एक फलक गळ्यात अडकवून शहरात फेऱ्या मारू. दारोदार जाऊन भीक मागू..." सुहासिनी बोलत असताना त्यांचा डबा घेऊन आलेला पीयूष अचानक म्हणाला,

"काका, माझी किडनी चालेल का हो? डॉक्टरांना सांगा ना आपल्या अशोकला माझी किडनी बसवायला..." ते ऐकताच सुबोध-सुहासिनीच्या कोंडलेल्या भावनांना जणू वाट मिळाली.

"नाही रे बाळा, तुला लेकराला..."

"काका, काही होत नाही हो. आम्ही दोघे मित्र आहोत. भाऊ आहोत. कालच मराठीचा धडा शिकवताना आमचे सर म्हणाले की, संकटसमयी मदत करतो तोच खरा मित्र."

"नाही, राजा नाही. तू.. तू.. नको. एक लेकरू अगोदरच संकटात आहे. आणखी तुला संकटात टाकायला नको..." म्हणणाऱ्या सुबोधला एकदम गलबलून आले तो पटकन बाहेर गेला तसे सुहाने डोळ्याला पदर लावला...

त्याच सायंकाळी 'किडनी दान करण्याची' टेप वाजवत एक रिक्षा शहरात फिरु लागला. लोक रिक्षेभोवती जमत, ऐकत आणि पुढे जात. कुणाचीही पावलं दवाखान्याकडे नव्हती वळत. दवाखान्यातील परिस्थिती अतिशय गंभीर होती. सुहासिनी, आशा अशोकजवळ बसून होत्या. सुबोधचे सारखे आत-बाहेर चालू होते. बाहेर कुणाची चाहूल लागली की तो लगबगीने बाहेर यायचा. येणारास न्याहाळत असे. परंतु येणारा दाता नाही हे लक्षात येताच तो निराश होत असे. वाट पाहताना तो डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला,

"डॉक्टर... डॉक्टर.."

"काय झाले? कुणी तयार झाले का?"

"नाही. डॉक्टर, नाही. कुणी तयार होईल असे वाटत नाही. डॉक्टर, काही तरी करा ना. माझ्या अशोकला वाचवा हो. कुठेही अगदी परदेशात मिळत असेल तर मागवून घ्या. हवा तेवढा पैसा लागू द्या. डॉक्टर एकुलता एक .."

"असे भावनेच्या आहारी जाऊ नका. आपले प्रयत्न सुरू आहेत ना मग काळजी नको."

"आपले प्रयत्न वांझोटे ठरत आहेत. कुणी येणार नाही. डॉक्टर, माझे ऐका. माझी किडनी..."

"ते जमलं असतं तर मी वाट पाहिली असती का? या तुम्ही." डॉक्टर म्हणाले. सुबोध सर्वस्व हरवल्यागत् बाहेर आला. अशोकच्या खोलीत जायची त्याची हिंमत झाली नाही. तो दवाखान्यातील एका बेंचवर बसून राहिला...

"साहेब, साहेब, चला लवकर. किडनी देणारा माणूस भेटला..." त्या नोकराचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सुबोध धावतच डॉक्टरांच्या खोलीत पोहोचला. नवसंजीवनी लाभलेल्या सुबोधला पाहताच डॉक्टर म्हणाले,

"या. या. मी म्हणालो होतो. तिथे देर असेल पण अंधेर नाही. हे जोशी. शिक्षक आहेत. आपल्या अशोकला किडनी द्यायला तयार आहेत.."

"ज.. जोशीसर, तुमचे उपकार..."असे म्हणत सुबोध त्यांच्या पायाच्या दिशेने वाकला. त्याला मध्येच उठवून खुर्चीवर बसवले. तसे सुबोधने डॉक्टरांना विचारले,

"डॉक्टर, ह्यांची पैशाची..."

"तसे काही नाही. घरची परिस्थिती उत्तम आहे. एक सत्कृत्य करायची संधी मिळतेय म्हणून.. ते जाऊ द्या. आता कामाला लागले पाहिजे. सिस्टर..."असे म्हणत डॉक्टर कामाला लागले. जोशींच्या आवश्यक त्या सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्या. सारे अहवाल व्यवस्थित आले...

काही दिवसातच एकेदिवशी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टर बाहेर आले. बाहेर सारे चिंताक्रांत अवस्थेत उभे होते. सुबोध लगबगीने पुढे झाला. डॉक्टर म्हणाले,

"घाबरू नका. सारे सुरळीत पार पडले आहे. अशोक आणि जोशी दोघेही उत्तम आहेत. काळजीचे कारण नाही.

"डॉक्टर..."

"नाही. असे भावनाविवश होऊन चालणार नाही. सारे व्यवस्थित झाले असताना अश्रू कशासाठी? आलो मी..." असे म्हणत डॉक्टर निघून गेले....

शस्त्रक्रियेनंतरचा चौथा दिवस! सुबोध डॉक्टरांच्या खोलीत गेला. त्याला पाहताच डॉक्टर म्हणाले, "या. बोला. काय म्हणता?"

"तसे विशेष काही नाही. परंतु.."

"बोला. काय असेल ते बिनधास्त विचारा. मनात काही ठेवू नका."

"अशोकला आता विशेष जपावे लागेल का?"

"नाही. तसे नाही. सामान्यपणे राहील..."

"पुढे म्हणजे शिक्षणात किंवा लग्न झाल्यावर त्याला काही त्रास तर होणार नाही ना?"

"आली तुमची शंका लक्षात आली. लग्न झाल्यावर त्याला कोणताही त्रास होणार नाही. सर्व सामान्य माणसाप्रमाणे त्याला वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येईल. अजून काही?" डॉक्टरांनी विचारले.

"नाही. डॉक्टर, खरेच तुमचे आभार मानावे..."

"अहो, उपकार मानायचेच असतील तर देवाचे आणि जोशीसरांचे माना." डॉक्टर म्हणाले...

योग्यवेळी डॉक्टरांनी परवानगी दिली आणि अशोकला घरी आणले. हळूहळू तो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घरातल्या घरात, गल्लीत फिरू लागला. काही दिवसांनंतर शाळेतही जाऊ लागला. पीयूष सातत्याने त्याच्याजवळ सावलीप्रमाणे राहत होता. त्याची काळजी घेत होता. दोघे भावाभावाप्रमाणे राहत होते. सुबोध-सुहासिनी दोघेही कार्यालयात जाऊ लागले. आशाचे नटणे- मुरडणे पुन्हा सुरू झाले. तिचे अमरच्या घरी जाणे-येणे वाढले. ती तासनतास त्याच्या घरी बसू लागली. अमरचे आईवडील म्हातारे होते. तो त्यांच्यासोबत घरीच असायचा. त्याला भाऊ-बहीण कुणीही नव्हते. एक-दोन वेळा सुहासिनीने आशाला अमरच्या घरी न जाण्याबद्दल समजावून सांगितले. त्यामुळे आशाने अमरच्या घरी जाणे कमी केले असले तरीही अमर आशाच्या घरी येऊन बसू लागला. परंतु सारे समोर असल्यामुळे त्या दोघांच्या बोलण्यावर मर्यादा येत असत.

त्या दिवशी सायंकाळी सुहासिनी कार्यालयातून घरी पोहोचली तेव्हा अमर सोफ्यावर बसला होता. विशेष म्हणजे आशा त्याला खेटून बसली होती. घरात कुणी नसताना अमरचे येणे आणि तसे बसणे हे पाहून सुहासिनीच्या कपाळाची शीर तडातडा उडू लागली. सुहासिनी आल्याचे पाहून अमर निघून गेला आणि आशाने टीव्ही लावला...

हळूहळू दिवस जात होते. मुलांच्या परीक्षा झाल्या. आजारापणामुळे अशोकची विशेष तयारी झाली नव्हती परंतु तो एकपाठी असल्यामुळे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची अपेक्षा होती. पीयूषही चांगले गुण घेऊन उत्तीर्ण होईल अशी खात्री होती. पीयूषची इच्छा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण करायची होती तर अशोकला कॉमर्स करण्याची इच्छा होती. त्याला बँकेची नोकरी आवडत असे.

सर्वांचे निकाल हाती आले. अपेक्षित नसले तरीही अशोकने चांगले गुण मिळविले होते. पीयूषला मात्र अपेक्षित गुण मिळाले असताना अमरच्या मैत्रीची परिणती आशा चक्क नापास होण्यात झाली होती. त्यामुळे सुबोध-सुहासिनीने तिचे शिक्षण बंद केले. वयाच्या मानाने तिचा शारीरिक विकास वेगाने होत होता त्यामुळे शाळेत वेगळा काही प्रकार घडू नये म्हणून तिची शाळा बंद करण्यात आली. मात्र आईवडिलांचा तो निर्णय आशाच्या चांगलाच पथ्यावर पडला. तिचे आणि अमरचे फावले. त्यांना उत्तम संधी मिळत गेली. कारण आशाचे आईबाबा कार्यालयात गेल्यानंतर आणि अशोक कॉलेजमध्ये गेल्यानंतर आशा एकटीच घरी असायची. अमरची दुपार आशाच्या सान्निध्यात रंगत असे..

*****