Shodh Chandrashekharcha - 2 books and stories free download online pdf in Marathi

शोध चंद्रशेखरचा! - 2

शोध चंद्रशेखरचा!

२.----

सकाळी साडेपाच वाजता तिचा मोबाईल वाजला. कंट्रोल रूमचा नंबर होता.

" इन्स्पे.इरावती! बोला, इतक्या सकाळी काय काम निघालं?"

"गुड मॉर्निंग, मॅडम. मी राकेश बोलतोय. सॉरी टू डिस्टर्ब् यु. घाटात एक अपघात झालाय."

राकेश इराच्याच बॅचचा. आणि छान मित्र पण होता. त्याला प्रमोशन नव्हते मिळाले म्हणून, तो अजून तिला जूनियरच राहिला होता इतकेच. तरी तो टँलेन्टेड होता.

"अरे, यार, घाटात अपघात होतातच. मला का सकाळी, सकाळी त्रास देतोयस?"

" इरा, जरा जागी हो. खरे तर रात्रीच तुला फोन करणार होतो. पण तुझ्या नाईट ड्युटीवाल्या शिंदेकाकाला तिकडे पाठवलाय. तू त्याला फोन कर. तो सगळं सांगेल. सुपरिंटेंडन्ट जोग मला बोलावतोय, बाय!"

फोन कट झाला. हा राकेश धड कधीच काहि सांगत नाही! म्हणे शिंदेकाकाला फोन कर! इरावती बेड मधून उठली. तोंडावर गारपाण्याचे हबके मारून तिने झोप उडवली. गॅसवर चहा करून कपात ओतून घेतला. तो गरम चहाचा कप घेऊन ती बेडरूम जवळच्या, गॅलरीत असलेल्या वेताच्या खुर्चीत बसली. ऍक्सिडेंट नेहमीचेच. आणि शिंदेकाका सारखा सिनिअर माणूस गेला असताना, तिला फारसे काळजीचे कारण नव्हते. ते व्यवस्थित हॅन्डल करणार होते. मग राकेशन का अलर्ट केलं? करणं, तो गम्मत म्हणून फोन करणाऱ्यातला नव्हता. काहीतरी सिरीयस असणार. चहाचा पहिला घोट घेऊन, तिने मोबाईल उचलला आणि शिंदेंना डायल करणार तेव्हड्यात, त्यांचाच इनकमिंग वाजला.

"शिंदेकाका, आत्ताच राकेशचा निरोप मिळालाय. तुम्हाला फोन करणार तेव्हड्यात तुमच्यात फोन आला. काय झालाय?"

"मॅडम, रात्री कधीतरी, घाटात एका गाडीचा अपघात झालाय. कॉनर्रच्या झाडावर गाडी आदळली आहे. बॉनेट चेमटून गेलाय! गाडीत स्टियरिंग जवळ बरच रक्त साकळलेले दिसतंय!"

"जखमी कसे आहेत?"

"जखमीं, जवळपास दिसत नाही!"

इरावती एकदम सावध झाली. जखमी सापडत नाही!

"शिंदे, अपघाताची बातमी कशी लागली?"

"रात्री बाराच्या दरम्यान पेट्रोलिंग स्क्वाडला ती गाडी दिसली."

"त्यांना जखमी सापडले असतील, आणि त्यांनी त्या जखमींना हॉस्पिटॅलाइझ केलं असेल!"

"नाही! त्यांना कोणी जखमी सापडले नाहीत!"

"मग? मुडदे कोठे तरी पडले असतील!!"

"नाही मॅडम!"

हि काय भानगड आहे?

"बरे शिंदेकाका, आपल्या एरियात तो अपघात येत नाही. तुम्ही कशाला गेलात?"

"मॅडम, अहो गाडी पाससिंग आपल्या एरियातली आहे! गाडीचालवणारा जिता का मेला, सापडत नाही. मी राकेश सरांशी सविस्तर बोललो. ते म्हणाले काही लफडं झाले तर, केस आपल्यालाच ट्रान्सफर होणार! पहिल्या पासूनच आपल्याकडे घेतलेली बरी! म्हणून आलो!"

क्षणभर इरावतीने विचार केला. राकेशची दूरदृष्टी आणि शीदेंकाकाच्या अनुभवाने योग्य निर्णय घेतला होता.

"शिंदेकाका, सोबत कोण आहे तुमच्या?"

"शकील."

"ओके. मी निघतेच, तुम्ही तेथेच थांबा!" इरावतीने फोन कट केला. तिने सूपरिंटेंडेंट जोगांचा नंबर फिरवला. घटना थोडक्यात ब्रिफ केली. आणि केस आपल्याकडे घेत असल्याचे सूतवाच्य पण केले.

दहा मिनिटात ती फ्रेश होऊन निघाली. सोबत ओव्हन मध्ये ठेवलेले चारसहा सँडविचेस फॉईल मध्ये गुंडाळून घेतले, आणि सोबत चहाचा थर्मास घेऊन ती घराबाहेर पडली. पोलीस व्हॅन शिंदे घेऊन गेले असणार. तिने पर्सनल बुलेट काढली. अंगावर जीनपॅन्ट, टीशर्ट जॅकेट, डोळ्याला गॉगल आणि हेल्मेट घालून, ती जेव्हा सुसाट वेगाने निघाली, तेव्हा पहाणाऱ्याची नजर तिच्यावर ठरत नव्हती! मॉर्निंग वॉकवाल्या, काही म्हाताऱ्याच्या माना दुखावल्या जाणार होत्या! कोपऱ्यावरील उडाणटप्पू टोळक्याच्या, दोन पल्सर तिला मिरर मध्ये फालो करताना दिसत होत्या! ती फक्त गालातल्या गालात हसली!

समोरची पोरगी कमालीच्या सफाईने, ती आवजड बुलेट रेस करत होती. पोट्टे इरेला पेटले. घाटाचा रस्ता अवघड वळणे, पावलो पावली धोका होता. तिला ओव्हरटेक करण्याच्या नादात एखाद कार्ट मरायचं! म्हणून इरावतीने स्पीड कमी केला. तीला, शिंदे व्हॅन समोर उभे असलेले दिसत होते. तिने बुलेट साईडला घेऊन उभी केली. मागच्या पल्सर पण थांबल्या. तिने हेल्मेट आणि डोळ्यावरला गॉगल काढला, आणि मागें वळून, त्या मजनूला खुणेने जवळ बोलावले. दोन बाइकवरल्या चार जणातला, एकजण पुढे निघाला. स्वतःच्या डोक्यावरच्या रंगीबेरंबगी झिपऱ्यातून बोट फिरवत, उन्मत्तपणे डुलतआला आणि इरावती समोर तंगड्या फाकवुन उभा राहिला. इरावतीने फाडकन त्याच्या कानसुलात लगावली! त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते आणि अनपेक्षित थूतरित बसल्याने चेहरा वेडावाकडा झाला. तो भेलकांडला. तीने त्याची कॉलर धरून त्याला उभा केला आणि दुसऱ्या गालात तितकीच जबरदस्त थोबाडीत मारली! मायला एक पोट्टी, आपला कचरा करतीयय आणि हे भाडखाऊ यार कुठे तडमडलेत? मदतीच्या अपेक्षेने त्याने आपल्या मित्राच्या जागेकडे नजर टाकली. ते तिघे बाईकवर बसून पोबारा करत होते! गांडू साले! आता तर या सालीला आपण एकटेच पाहून घेऊ! त्याने तिरीमिरी येऊन इरावतीवर झेप घेतली, इरावती दोन पावले मागे सरकून गर्रकन वळून, आपली ताठ केलेली, उजवी तंगडी त्याच्या छाताडावर मारली. कराटेचे शिक्षण तिने प्रदर्शन मांडण्यासाठी घेतलेले नव्हते. त्याचा वापर तिला करता येत होता! फूटभर उंच उडून, तो टग्या काट्यात पडला. हे 'प्रकरण' आपल्या आवाक्यातल नाही, हे त्याला कळून चुकले होते. आणि त्याहून महत्वाचे हातात दंडुका घेऊन एक पोलीस त्यांच्या दिशेने येत होता!

"तुला सोडणार नाही! बघून घेईल!" कसेबसे उठून उभा रहात, तो खुनशी आवाजात गुगुरला, आणि फाटलेल्या ओठाजवळचे रक्त मनगटाने पुसत पळून गेला.

"तुझा पत्ता दे, घरी येऊन तुला बडवते!" इरावतीने दमदार आवाजात त्याला समाज दिली.

"काय झालं मॅडम?" शिंदकाकानी जवळ आल्यावर विचारले.

"काही नाही! नेहमीच. रोडरोमिओ! आजची जिम चुकली होती. ती एक्सरसाइज येथे झाली, इतकेच! पण शिंदेकाका या केस मधून मोकळे झालोत की, या रंगीत बोकडांच्या विरोधात अभियान सुरु करायचंय!"

बोलत बोलत ते अपघाताच्या स्पॉट पर्यंत आले.

गाडीची अवस्था पाहून इरावतीच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती BMW २३० सेरीजची कार होती. आजच्या बाजारात साधारण तीस पस्तीस लाखाच्या घरात तिची किंमत होती! मुंबईची पाससिंग. अशी गाडी बाळगणारा हाय प्रोफाइल असणार होता! गाडीचे चारी दरवाजे तुटून, गाडी पासून वेगळे झाले होते. समोरचे दोन्ही चाके घनगळून खाली दरीतल्या झाडाच्या फांद्यावर अडकली होती. इरावतीने गाडीची आतून तपासणी केली. मागील सीटवर, रक्ताचे डाग किंवा इतर काही खुणा नव्हत्या. मागे बहुदा कोणीच नसावे. समोरच्या ड्रायव्हर सीटवर मात्र रक्ताचे बरेच डाग होते. ड्रायव्हरचे डोके स्टेयरिंगवर आपटले असावे. स्टियरिंगवर रक्ताच्या डोगासोबत काही केस चिकटलेले दिसत होते. डोक्याचे केस असावेत,असा तिने तर्क काढला. तो जागीच ठार झाला असावा. किंवा जबरदस्त जखमी तरी झाला असावा, हे स्पष्ट होते. अश्या अवस्थेत तो हालचाल करणे शक्य नव्हतं. मग गेला कोठे?

"शिंदे काका, ड्रायव्हर गेला कोठे? कोण त्याला हलवला? तुम्ही पंचनामा वगैरे कटकटीतून मोकळे झालात कि मग, घाटाच्या अलीकडील गावात जाऊन चौकशी करा. सरकारी, खाजगी दवाखाने पालथे घाला. रात्री इमर्जन्सी मध्ये काही ऍडमिशन आहे का पहा. आणि हो तेथील पोलीस स्टेशन मध्ये काही सुगावा लागतो का तेही पहा. आणि शकील तू घाटाच्या पलीकडल्या गावात, हीच माहिती मिळवण्याचा प्रयत्न कर."

"मॅडम, एक शंका आहे विचारू का?"

"काय?"

"एखाद्या वेळेस गाडीच्या चाकासारखा ड्रॉयव्हरपण दरीत पडलातर नसेल?"

"नाही! ते शक्य नाही! कारण ड्रॉयव्हर सीटच्या बाजूला रास्ता आहे, दरी नाही!" शकीलने मुंडी हलवली. इरावतीने चौफेर नजर फिरवली. आणि तिच्या नजरेला काहीतरी खटकले. रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला काहीतरी चमकत होते! ती रस्ता ओलांडून रस्त्याच्या डोंगराकडे बाजूस आली. चमकणारी एक काचेची चापटी बाटली होती. नाईंटी एमएल दारूची बाटली! मातीत ओलसर ऑईलचे डाग पण होते. बरेचसे पावसाच्या पाण्याने वाहून गेले होते. सडकेवर अंधुक टायर घासल्याच्या खुणा होत्या. कोणीतरी जिवाच्या आकांताने गाडीला ब्रेक मारला होता! इतकेच नाही तर ती ब्रेक मारणारी गाडी बराचवेळ तेथे थांबली असावी. ती खाली वाकली आणि तिने तो तळहाताएव्हडा कपड्याचा तुकडा, काटेरी झुडपात अडकलेला उचलून घेतला. तो एका कोटाच्या बाहीचा तुकडा असावा. त्यावर बरेच रक्त सांडले होते! तिने शोधक नजर आसपास फिरवली, आणि तिला हवी असलेली एक प्लॅस्टिकचा पाऊच सापडला. त्यात तिने ऑईलचा डाग पडलेली माती भरून घेतली, अगदी चमच्याभर. लॅब मध्ये ते काय आहे याची खातरजमा करणे तिला महत्वाचे वाटत होते!

तिने कंट्रोलला फोन केला. गाडी टोचून करून घेऊन जाण्यास सांगितले. तसेच ती गाडी आहे त्या स्थितीत विशिष्ट ठिकाणी ठेवण्याची सूचना पण तिने दिली. का कोण जाणे काहीतरी अजून त्या गाडीत दडलेलं आहे असे तिला वाटत होते!

शिंदेकाकानी त्यांचे काम चोख केले होते. स्पॉटवरचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर आणि फिंगर प्रिंट्सची टीम पोहंचली होती. पंचनामा वगैरे गोष्टी उरकून, शिंदेकाका चौकशीसाठी गावात जाणार होते.

इरावतीने बुलेटच्या डिकीतून थर्मास आणि अल्युमिनियम फॉईल मध्ये गुंडाळलेले चार आम्लेट सँडविचेस काढली.

"शिंदेकाका, तुम्हाला डायबिटीज आहे. रात्री कधी आलात माहित नाही. हे खाऊन घ्या. अन हो शकीलला पण द्या! तोही तुमच्या सोबतच आलाय ना?"

इतकी काळजी घेणारा अधिकारी, शिंदेकाका, आपल्या सतरा वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच पाहत होते.

"अन, तुम्हाला?" शिंदेकाकानी विचारलं.

"मी जाताना काहीतरी खाईन. माझी काळजी करू नका. तुम्हाला अजून चार दोन तास थांबावं लागेल."

इरावती बाईकला किक मारून निघून गेली, त्या दिशेला शिंदेकाका पहात राहिले.

"चाचा, काय पाहतोस?" शेजारी उभ्या असलेल्या शकीलने विचारले.

"शकील, आज माझी राधा असती तर हिच्याच वयाची आणि अशीच असती!" शकीलला दिसले नाही असे त्यांना वाटले, पण शकीलने त्यांच्या डोळ्यातला ओलावा पहिला होता.

*****