Shodh Chandrashekharcha - 10 books and stories free download online pdf in Marathi

शोध चंद्रशेखरचा! - 10

शोध चंद्रशेखरचा!

१०---

माणिकने चंद्रशेखरला घेऊन जाणाऱ्या गाडीची पाठ सोडली नव्हती.घाट उतरून त्या तरुणाची गाडी जेथे थांबली, तेथे हॉस्पिटल नव्हते तर, एक दोनमजली बांगला होता! साला काय झमेला आहे? हा तरुण चंद्रशेखरला घेऊन या घरापाशी का आलाय? माणिकचे अनुमान चुकल्याने तो बेचैन झाला. त्या तरुणाने चंद्रशेखरला गाडीतून काढून गेटच्या पोलला टेकून ठेवले. पोलवरली कॉल बेल दाबून तो झटकन गाडीत बसून निघालाही! आता आपण काय करायचे? माणिकच्या नजरेसमोर, चंद्रशेखरला हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे होते! त्याने मागचा पुढचा विचार न करता, आपली गाडी बाजूला घेऊन थांबवली. झटक्यात दार उघडून, तो त्या गेट पर्यंत पोहंचला. त्याने चंद्रशेखरला खांद्यावर टाकले, तेव्हड्यात बंगल्याचे समोरचे दार उघडून म्हातारा मालक उभा! बंगल्या बाहेरचे सगळे लाईट त्या म्हाताऱ्याने लावले होते. समोर कोणी तरी रक्तबंबाळ माणसाला खांद्यावर घेऊन उभा असलेले पाहून, म्हाताऱ्याची कवळी गळून पडली होती!

"काका, माझा मित्र अपघातात जखमी झालाय! मी पोलिसांना घेऊन येतो, तो पर्यंत याला तुमच्या घरात घेता का?" माणिकने त्या म्हाताऱ्याला विचारले.

"नको! आहात तेथेच थांबा! मीच पोलिसांना फोन करतो!"

"कशाला त्रास घेता? मीच जातो याला घेऊन पोलिसात. जवळच तर पोलीस स्टेशन आहे!" लांब ढांगा टाकत माणिक, त्या घराच्या उजेडातून बाहेर पडला. म्हातारा, सुंठेवाचून खोकला गेला म्हणून समाधानाने घरात गेला.

माणिकने चंद्रशेखरला आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर टाकले. त्याची नाडी तपासली. ती बोटाना जाणवत नव्हती! मानेला उलट हात लावून पहिले, आणि त्याची खात्री झाली. चंद्रशेखर मेला होता! हे भलतंच झेंगट होऊन बसलं होत!

त्याने मोबाईल काढला, तो नेहमी ज्या फोनवर रिपोर्टींग करायचा त्या नंबरला रिंग केली. त्या पूर्वी कॉल रेकॉर्डिंग ऑन केले. तो तसे नेहमीच करायचा. कारण 'रिपोर्टींगवाला' कोण हे त्याला माहित नव्हते, मध्यस्था मार्फत हे काम मिळालं होत. अडचणीला हे रेकॉर्डिंग कामी येणार होत.

"मी माणिक!"

"इतक्या रात्री का फोन करतोस? काय असेल ते रिपोर्टींग सकाळी कर!"

"महत्वाचं आहे! चंद्रशेखरच्या गाडीला अपघात झालाय घाटात!"

"मग?" हे तर 'अपेक्षितच होत' अश्या टोन मध्ये त्याने विचारलं.

त्यानंतर माणिक बराचवेळ बोलत होता.

"आता या डेड बॉडीच काय करू?"

"तू आहेस तेथून समुद्र किती लांब आहे?"

"तीनशे किलोमीटर! मुंबईचाच!"

"बॉडी समुद्रात फेकून दे!"

"आ?"

"मग काय करणार? "

"नाय तुमि म्हणतांन तस! पर पाच हजार ज्यादा घिन!"

"बेकूफ! तुला फक्त नजर ठेवायला सांगितलं होत! हा नसता उद्योग तू केलास तूच निस्तर!" फोन कट झाला.

माणिकवेड्यासारखा फोनकडे पहात राहिला. खाया नै, पिया नै, खाली गिलास फोड्या! अशी त्याची गत झाली होती. मुडदा पोलिसात घेऊन जाणे म्हणजे, पोलीस टायरमध्ये घालणार! समुद्रात फेकायला जायचे म्हणजे, तीनशे किलोमीटर प्रवास होता! पण त्याला त्याच रस्त्याने परतायचे होते म्हणा. तिसरा पर्याय होता, तो वाटेत कोठे तरी बॉडी टाकून देणे! पंचेवीस तीस किलोमीटर गाडी बॉडी फेकून द्यायला, त्याची नजर जागा शोधात होती. समोर देशी दारूचं दुकान दिसलं. तल्लफ उसळली, गाडी साईडला घेऊन त्याने, एक नारंगीचा पॉईंट घेतला, दहा रुपयांचे फुटाणे घेतले. आणि पुन्हा गाडीत येऊन बसला. अर्धा तास तो, ती देशी 'नारंगी' अन फुटाणे खात बसला. मनातल्या मनात तो परिस्थितीचा आढावा घेत होता. थंडगार डोक्याने. त्या हलकट 'रिपोर्टींगवाल्याने' त्याला टांग मारली होती. त्याच काय करावं? हाच विचार त्याच्या मनात थैमान घालत होता.

त्याने नव्याने तंबाखूचा बार भरला! मागच्या सीटवर नजर टाकली. निवांत पडलेल्या चंद्रशेखरच्या बॉडीकडे पाहून हिणकस हसला. त्याच 'याक्कु दिमाख' कामाला लागला होता. साली, काय जिंगदगी असते एकेकाची? पैशात लोळला असणार, जिंदा असताना! अन आज? बेवारशी मड झालाय! जिंदा होता तवा करोडोचा मालक! साल, मरायला आपली काय हरकत नाय! हाय त्यातला पाच धा लाख, आपल्याला देऊन गेला असत्ता तर? सल्याच्या, मड्याला चंदनाच्या लाकडात जाळला असता! असल्या विचारा सरशी, त्याच टकूर ब्रेकमरल्यागत थांबलं. कारण या चंद्रशेखरच्या मुडद्याचे पैशे करता येणार होते! कशे?

या साठी त्याला थोडी सवड हवी होती. तो होता, त्या जागेपासून एक खाडीचा किनारा दोनशे चाळीस किलोमीटरवर होता. तेथे पीटर होता. पीटर, म्हणजे कामाचा माणूस. गोव्यातून माणिक आणि पीटर, गांज्याच्या स्मगलिंगच्या धाडीत, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन, सोबतच मुंबईला पळून आले होते. हल्ली पीटरची चालती होती. तो माश्याच्या पोटात 'माल'घालून, कुठं कुठं पाठवतोय. त्याच माशे साठवायचं, कोल्डस्टोरेजच भलं मोठं गोदाम पण आहे! आत तुम्ही म्हणाल त्याचा इथं काय संबंध? तर असं आहे कि, लवकरच हा मुडदा वास मारायला लागलं! त्याला पीटरच्या गोदामात ठेवायचा.गारेगार. रिपोर्टींगवाल्याला अजून एकदा पिळून पहायचा. कस? 'असं झटक के दामन!' करून जमत नसत रिपोर्टींगवाले! 'मी माणिक हाय!' माझा झटका जबर अस्तु! उद्या कळलंच म्हणा! त्याच बरोबर अजून हि एक फंडा होताच!

एकदा सगळं मनातल्या मनात ठरल्यावर, माणिकन समाधानानं आपल्या काटेरी टाकल्यावरून हात फिरवला. मग दोन्ही हातानं, एकदा करकर डोकं खाजवल. मग पुन्हा तंबाखूचा बार भरला. गाडी पीटरचा कोल्डस्टोरेजच्या दिशेने सोडली. टॉप गेयर मध्ये!

त्याला समोर कोल्डस्टोरेज दिसत होते, तेव्हा चांगलेच फटफटले होते!

०००

विकीचे डोके बधिर झाले होते. नसत्या भानगडीत तो अडकला होता. एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात तो गढून गेला होता. परिस्थिती त्याच्या विरोधात होती. एक तर त्याचे फिंगर प्रिंट्स गाडीत होते. ते पोलिसांना सापडले असती, तरी हरकत नव्हती. त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड नव्हते. त्यामुळे केवळ प्रिंटच्या आधारे पोलिसांना, त्याने नाव गाव समजणार नव्हते. खरा धोका होता तो, चंद्रशेखरचा. ज्या अर्थी पोलिसांना त्याचा ठाव ठिकाण सापडत नव्हते, त्या अर्थी आपण घरा पाशी त्याला सोडले तेव्हा, कोणीतरी त्याला लगेचच तेथून उचले होते! म्हणजे त्याच्या किंवा आपल्या मागावर कोणी तरी नक्कीच होत! आपला प्लॅन रँडम होता, आपला पाठलाग झाला नाही. पाठलाग होत होता तो चंद्रशेखरचा! दुसरे महत्वाचे होते ते, ज्याअर्थी चंद्रशेखर सापडला नाही त्या अर्थी तो आता जिवंत नसावा! कारण त्याची परिथिती अपघाताच्या वेळेसच नाजूक होती. आपला खंडणीचा निर्णय चुकीचाच होता, चंद्रशेखरला हॉस्पिटलाईझ करायला हवे होते! आता पाश्च्याताप होऊन काय उपयोग? आज ना उद्या चंद्रशेखरचा देह सापडणारच, आणि पोलीस मग आपल्याला पाताळातून सुद्धा हुडकून काढणार! ती इन्स्पे. इरावती भयानक बाई आहे, एक हि केस फाईल होऊ दिली नाही म्हणे तिने! हाती घेतलेल्या सगळ्या केसेस सॉल्व्ह केल्यात. आपण तिच्या तावडीत सापडलॊ तर, आपली खैर नाही! केवळ खंडणीसाठी, एखाद्या असह्य माणसाला वैद्यकीय मदतीपासून दूर ठेवणे, यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही! पोलीस काहीही चार्ज ठेवू शकतात. किडन्यांपिंग पासून ते खूना पर्यंत! बापरे! काही तरी करायला पाहिजे. पण काय?

सगळ्यात प्रथम चंद्रशेखरच्या बॉडीचा शोध घेणे. म्हणजे मृत्यूचे कारण कळेल. आणि मग त्यासाठी आपण कसे जवाबदार नाहीत हे पटवून द्यावे लागणार होते! पण ते नन्तर, आधी चंद्रशेखरचा शोध!

०००

'भाई ' गंभीर होऊन, गांजा मिश्रित दर्जेदार तंबाखूचा हुक्का ओढत, निळ्याशार पर्सनल स्विमिंग पुलाजवळ बसला होता. या याकूब पठाणमुळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वात त्याच्यावर,नाचक्कीची वेळ आली होती. पोतंभर दिनार, या कामासाठी बिदागी मिळाली होती. पैसे महत्वाचा नव्हताच, अपयश जिंदगीभर बोचत राहिले असते. हल्ली हिंदुस्तानच्या गुप्तहेर संघटना, सायबर सेलवाले डोकेबाज झाले आहेत. इंटरनेट वापरून काहीही करणे शक्य नव्हते. महत्वाचे निरोप, माहिती, किंवा फतवे तेथील नेटवर्क पर्यंत, इतर मार्गानी पोहोचवावे लागत होते. पूर्वीसारखे पाकिस्थानातून, गुजरात कच्च गाठणे ही कठीण होते. अतिरेकी संघटनेने एक महत्वकांक्षी हल्ला हिंदुस्थानात नियोजित केला होता, आणि त्याची लाईन ऑफ ऍक्शन हिंदुस्थानातील टीमला पोहोच करण्याची जवाबदारी भाईने घेतली होती!

पूर्ण विचारा अंती, 'बक्षी' याचे नाव भाईने पक्के केले. थोडासाही माग न ठेवता, तात्काळ निर्णय घेऊन आपले टार्गेट सर करणारा, हा मोहरा होता.

भाईने मोबाईल उचलला.

"बक्षी को बुलव!"

सातव्या मिनिटाला, साडेपाच फुटी सामान्य चेहऱ्याचा बक्षी स्वामिंगपुलावर हजर झाला.

"बक्षी, ढाका या नेपाल पोहचो! चंद्रशेखर नामका इन्सान बम्बईमे है! उसके पासका 'अफगान लेदर' वाला पैसे रखनेका पाकीट, बम्बईमे 'हजरत' को मिल जाना चाहिये! अभि निकाल जावो!" इतके बोलून भाईने पुन्हा हुक्क्याची नळी तोंडात खुपसली!

"जी!"

हा एक शब्द सोडता, बाकी एक शब्दही न बोलता बक्षी भाईसमोरून हलला. भारतात जाणे त्याला नवीन नव्हते. पण यावेळेस बांगलादेश किंवा नेपाळ मधून जायचे होते. दिवसेंदिवस भारताची बॉर्डर क्रॉस करणे जिकरीचे होते. बॉर्डरवरले कॉन्टॅक्टस, नेहमीच सहकार्य करतील असे दिवस राहिले नव्हते. बरे काम चेन्नई, हैद्राबादला किंवा कलकत्याला असते तर, त्यातल्या त्यात सोपे होते. मुंबई म्हणजे कठीण. मुंबईसारख्या महानगरीत, हा चंद्रशेखर नामक जंतू हुडकायचा आणि त्याच्या पासून काय तर एक फडतूस मनीपर्स हस्तगत करायची! पण 'का?' असा सवाल, भाईला कधीच विचारायचा नसतो! फक्त 'जी!' म्हणचे असते. हे अनुभवाने त्याला माहित होते. पण 'हजरत' हे टोपणनावाचा माणूस, भारतात अत्यंत महत्वाच्या खात्यातील आसामी होती! म्हणजे हे प्रकरण गंभरच होते!

दोन तासांनी बक्षी नेपाळच्या फ्लाईट मध्ये बसला होता.

'बक्षी, आ रहा है!' मुंबईच्या अंडरवर्डमध्ये खळबळ माजली होती. बक्षी म्हणजे आगीचा डोंब! इतिहास हेच सांगत होता!

******