MAZYA LOVEMARRIAGECHI GOSHT - 20 books and stories free download online pdf in English

माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 20

२०

विरहाग्नी!

काकाने मला सगळ्या कामाला लावून माझा मामा केला. कामाचे काही नाही पण आधीच मर्यादित वेळात वै शी बोलू कधी आणि पुढे करावे तरी काय? रात्र थोडी सोंगे फार म्हणतात तसा आधीच वेळ थोडा आणि त्यात आता ती भेटणारही नाही विशेष. लग्न लागले की झटकन् उडून जाईल अमेरिकेत. नि मग तिचा काॅन्टॅक्टही नाही. आणि मी स्वत:ला ओळखून तर आहेच. मी काही जास्त हातपाय हलवणार नाही. मग पुढचे काय?

तिच्याशी बोलायला हवे. त्यासाठी ती भेटायला हवी. त्याकरता वेळ हवा. वेळ मिळाला तरी अर्थात पुढच्या दोन दिवसांत होणारे काम नाहीच ते. पण किमान एक आयडिया .. जो जिंदगी बदल दे.. तिच्या पर्यंत पोहोचवावी.. किंवा तसा किमान प्रयत्न तरी करावा मी. पण काकाच्या त्या आॅर्डरने सारे कठीण करून टाकले. काका मोठया मिलिटरी शिस्तीचा. त्याने माझ्याकडच्या कामाची एक टाइप्ड लिस्टच माझ्या हाती दिली. त्यात आज संध्याकाळ पासून लग्नानंतर रात्रीपर्यंत सारे काही वेळेवार नि क्रमाक्रमाने लिहिलेले. त्यात माझ्या वाटच्या कामांना हायलाईट करून ती लिस्ट मला दिलेली. त्यासाठी आजच मला हॉलवर कूच करावे लागेल.. तिकडे गाद्यांची सोय.. पाणी भरून ठेवणे.. उद्यासाठी जे लागणारे सामान त्यांच्या दुकानात जाऊन त्यांना आठवण करून देणे इत्यादि कामे आजसाठी. सगळी आज संध्याकाळीच करण्याची कामे. म्हणजे हळदी समारंभातून माझा पत्ता कट. ती कामे संपवून मग मोकळा होऊन गच्चीवर वै ला भेटावे म्हटले तर सरते शेवटी .. रात्री हॉलवरच झोपणे हे ही काम माझेच. म्हणजे संध्याकाळपासून ते आता लग्न लागेतोवर मी बिझीच राहणार. वै.. तिचे काय? मनातून मी रडवेला झालो पण सांगतो कुणाला. त्यातल्यात्यात आज सकाळी बऱ्यापैकी बोलणे झालेले याचाच आनंद. नाहीतरी तसा मी अल्पसंतुष्ट आहेच!

हळदीच्या समारंभाच्या वेळी मी घरात नव्हतोच. हॉलवरच्या कामांना निपटवणे हेच मुख्य काम. पण त्यात मला वै ची आठवण आल्यावाचून कशी राहिल? काही निमित्त काढून दोन तीनदा मी घरी फिरकलो. एकदा ती दिसली. पिवळ्या रंगाच्या कपड्यांत. मस्त. तिला पाहून घेतले नि परत फिरलो. तिनेही पाहिले मला. ती तसेच सुंदर हसली. मी ही न बोलता निघालो. घाई होतीच.. लगीनघाई आणि काय. त्यामुळे बोलायला वेळ नाही मिळाला. आता तिला मी टाळतोय असे न वाटो म्हणजे झाले.

मग रात्री जेवणाच्या वेळी घरी परत फेरी झाली. मोठया अपेक्षेने. पण परत काकाच्या तावडीत सापडलो. म्हणजे काकाने आग्रह करून आधीच जेवायला वाढायला लावले. बुरकुले मंडळी आपल्या खोलीत असावीत. मी वै ला शोधतोय नि दिन्याकाका जेवून लवकर जा म्हणून सांगतोय!

"मोदका, तू थकला असशील. पटकन् जेऊन घे. सगळ्यांसाठी थांबशील तर उशीर होईल तुला. आणि गाद्या मोजून घेतल्यास ना? बेडशीट्स स्वच्छ आहेत ना ते पाहून घे. नळाला पाणी सकाळी येईल ते लवकर उठून चेक कर. नाहीतर त्या हाॅलवाल्याच्या आॅफिसातून फोन कर.." काकाचे बोलणे संपत नव्हते नि मी जेवता जेवता "मेरी नजर ढुंढे तुझे" म्हणत एक एक घास गिळत होतो. जेवण होईतोवर तरी ती आली नाही समोर नि काकाच्या शिस्तीपुढे मी पण जास्त वेळ थांबू नाही शकलो.

परत आलो हाॅलवर. आता तिथे हाॅलवरच राहणारा एक काळा कुत्रा नि मी दोघेच उरलेलो. अजून रात्र झाली तसा माझा धीर खचला जणू. सगळी कामे संपल्यावर हाॅलवर कशाला झोपायला पाहिजे? पण काकाला प्रश्न नाही विचारता येत. त्यामुळे त्याची आॅर्डर पाळायलाच हवी. मी शेवटी तिथल्याच एका गादीवर अंग टाकले. विचार करायला लागलो.. आज ही गच्चीवर ती येईल का शोधत मला? खरेतर सारे माझ्या मनाचे खेळ आहेत की ती मला खरेच मिस करेल.. गॉड नोज.. तरीही अकरा वाजता मी बाईकवर टांग मारून घरी आलोच. बाय चान्स ती आली असेल तर.. गच्चीवर आलो.. सारी सामसूम. बुरकुल्याच्या खोलीत ही सामसूम. खाली येता येता हाक मागून आली.. मोदक!

तिचाच आवाज! मी वळून मागे पाहिले.. कुणीच नव्हते. भास नुसता. होणार नाही तर काय. सदा तिचाच विचार केला तर तिचा भास होणारच ना.

काकाच्या हुकुमानुसार हॉलवर परत आलोच झोपायला. नाईलाजानेच. तिची आठवण काढत. विरहाग्नीत प्रेमी जीव जळतात म्हणे. म्हणजे तसे ऐकून होतो. चार दिवसापूर्वी आलो इथे तेव्हा साधा एकटा जीव होतो. त्याचा एकदम प्रेमी जीव झालो मी इतक्यात. कुठे तरी वाचलेले आठवले.. ये प्यार भी कितनी प्यारी चीज है! असणारच. तीनचार दिवसांत जगच बदलून गेले. आणि तेही वै अजून माझी आहे की नाही ते गुलदस्त्यातच असताना. ती हो म्हणाली की काय होईल? माझ्याकडे शी लव्हस मी.. लव्हस मी नॉट बघण्यासाठी पाकळ्या उखडून टाकायला गुलाबाचे फूल नव्हते. आता या विचारात रात्रभर तळमळणे आले. आज झोप येईल का? नींद क्यूं आती नहीं रातभर.. मला एक ऐकलेला शेर आठवला. आणि एकाएकी मी मनाशी म्हणालो, जुन्या जमान्यात ते तळमळणे वगैरे होत असेल.. किंवा ते तळमळून घेत असतील आपला जीव-बिव पण हे बदलून टाकू.. तळमळ कशाला.. त्यापेक्षा आठवण काढीत बसतो.. म्हणजे झोपतो! पण आठवणींनी झोप आली नाही तर.. तेही तळमळणेच.. च्यायला.. कुठूनही ते तळमळणे आलेच.. त्यापेक्षा मस्त गाणी म्हणत झोपू. कवितेचा नि माझा संबंध दुरूनही नव्हता आजवर. इथे आल्यावर केल्या त्या पहिल्या वहिल्या दोन कविता.

आज ही येतील शब्द ओठांवर तर जुळवून पाहीन काही शब्द.. आतून आले तर जुळतील सहज..

नजरेने पाहिले मी तरी

ही तर अस्मानीची परी..

भेटली ती मज सुंदरी

सुकांत चंद्रानन सोनसरी

अप्सरा सुंदरा ही जरी

वरमाला घेऊन उभी करी..

म्हणजे लागली नय्या पार

मोदका जस्ट डोन्ट वरी..

वा! जुळल्या ओळी.. अजून जुळतील.. पण त्यासाठी.. खरेखुरे काव्य जन्मण्यासाठी हवी ती प्रतिभा नाहीच माझ्याकडे हे मान्य करायला काय हरकत आहे.. त्यापेक्षा गाणी आठवत म्हणून बघतो.. म्हणता म्हणता पहिलेच गाणे आले ओठावर ते..

सोचा था प्यार हम ना करेंगे..

सूरत पे यार हम ना मरेंगे..

फिर भी किसी पे दिल आ गया..

किती खरेय हे.. म्हणजे गाण्यात काही ओढूनताणून बसवत नाहीत भावना! भाव आणि भावना! कालचा तिचा तो राग आठवला..

नाकाच्या शेंड्यावर

तुझ्या रागाचे गं घर ..

विसर विसर सारे राणी..

आता तू मला वर!

हे छान आहे! पण वै ला मराठी येत नाही.. आणि इंग्रजीत कविता जन्माला घालू इतके इंग्रजी मला येत नाही.. रागावण्यासाठी तरी ती दिसेल का.. ती रागावलीय..

तुम रूठी रहो.. मैं मनाता रहूं

इन अदाओं पे और क्या आता है..

विचार करता करता किती वेळ गेला कळले नाही.. उद्या काम भरपूर आहे.. वेळ कमी.. रात्र थोडी सोंगे फार.. वै तिकडे झोपली असेल की जागीच असेल.. आठवत कुठल्या इंग्लिश कविता? मी घड्याळात पाहिले.. अडीच वाजून गेलेत.. लवकर उठणे आहे उद्या.. पण उठणार तेव्हाच जर झोपलो तर.. आणि आलीच नाही झोप तर..

इब्तदायी इश्क में हम सारी रात जागे..

अल्ला जाने क्या होगा आगे..

मग विचार आला.. हा हिंदी सिनेमा असता तर? आता मी डोळे मिटले असते. मी झोपलोय..स्वप्नात ती धावत धावत येतेय.. जमाने के बंधन तोडकर. मग एखादे गाणं.. 'न जा छोडकर तुम मुझे तुझसे नहीं रह सकती जुदा .. छोड आई पीछे जमाना अब जमाने को विदा.. ' आम्ही हाथोंमें हाथ लेकर बसलोय.. किंवा मग मीच निघालोय इथून. बाईक धूम सोडलीय मी. घरी येतो मी. अंधारात मी बागेतल्या झाडावरून वै च्या खोलीच्या खिडकीतून आत शिरतो. ती जागी होतेय.. तू.. आता.. ? इथे कसा? मी म्हणतोय, 'बेकरार जिया मुझे खींच यहांपर लाया .. कौन है जो करेगा हमें जुदा .. सनम बेशक आए भी गर खुदा.'

स्वप्नातले स्वप्न पाहात स्वप्नातच कधीतरी झोप लागली मला.