Aaghat - Ek Pramkatha - 25 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 25

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(25)

दुसऱ्या दिवशी सुमैया भेटलो. ती भेटताच तिचा पहिला प्रश्न होता,

‘‘काय झालं मिळाली काय रुम?’’

‘‘हो मिळाली.’’

‘‘किती भाडे म्हणतात?’’

‘‘दीडशे रुपये.’’

‘‘कुठे मिळाली?’’

‘‘रविवार पेठेत साळुंखेंच्या अपार्टमेंटच्या पाठीमागे त्यांच्याच मालकीची एक खोली आहे तिथे.’’

‘‘मग पैशाचं काय केलंस?’’

‘‘शंभर रुपये दिले नंतर पन्नास रुपये देण्याच्या अटीवर.’’

‘‘पाण्याची आणि बाथरुमची वगैरे सोय आहे काय?’’

‘‘हो आहे.’’

‘‘दुसरी काही अडचण?”

‘‘तू असल्यावर कसली आली अडचण?’’

‘‘बरं ठीक आहे. हे घे पन्नास रुपये देऊन टाक घरमालकाला आणि हो विसरलेच बघ, हे चारशे रुपये घे आणि महिन्याभराचं जेवणाचं फिक्स करून टाक कोणत्याही खानावळीत. आता पुन्हा मला तुला लवकर भेटता येणार नाही. खूपच काही अडचण असली तरच मला भेट अन्यथा थोडे दिवस आपले भेटणं बंद ठेवूया. कारण परीक्षा जवळ येत आहे. तुझ्यासाठी ही महत्त्वाची परीक्षा आहे, तशी माझ्यासाठी.’’

‘‘थोडे दिवस मला तुझा विरह सोसावा लागणार. परीक्षा झाल्यानंतर मग कायमचे आहोतच ना आपण. मी जाते. तब्येतीची काळजी घे. अभ्यास चांगला कर.’’

‘‘तुझ्या प्रेमात इतका पागल झालोय की अभ्यासच होत नाही माझा.’’

‘‘थोडे दिवस सहन कर. त्यानंतर आयुष्यच काढायचं आहे आपल्याला एकत्र.’’

या झगमगाटात आजीआजोबांना आपण विसरून गेलो होतो. मीही ठरविलं अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचं. पण अभ्यास कुठला होतोय. पुस्तक समोर घेतलं की पुस्तकात तिचा चेहरा समोर दिसायचा. मग मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं. मला जसं होतंय तसंच तिलाही का होत नसेल. ती मात्र अभ्यासाची काळजी करते, मन लावून अभ्यास करते. दुसरा, तिसरा नंबर येणारी माझ्या प्रेमात पडल्यापासून पहिला नंबर मिळविते, पण आपण मात्र पहिल्या नंबरवरून नापास होणाऱ्यांच्या यादीत जाऊन बसलोय. काय जादू असते या मुलींची!

सुमैयानं तरी मला भेटू नकोस म्हणून सांगितलं होतं, पण पुन्हा एक अडचण आली की त्यामुळे तिला नाइलाजाने भेटावं लागले.

‘‘आणखीन काय काम काढलंस?’’

‘‘पैशाशिवाय आणखीन काय असणार? परीक्षेचे फॉर्म भरायचे आहेत, हे तर तुला माहीतच आहे. त्यासाठी २५० रुपये लागणार.’’

‘‘पण प्रशांत, कॉलेज तुला मदत करीत होते ना? गरीब विद्यार्थी म्हणून.’’

‘‘होय, मदत करत होते. या संदर्भात मी वर्गशिक्षकांनाही भेटलो, पण प्राचार्यांनी माफी फी भरायची नाही असा आदेश दिलेला आहे.’’

‘‘का पण तुझ्या बाबतीतच का असे? काय कारण?’’

‘‘शेवटी काय कारण असणार. माझी ही भरकटलेली अवस्था, अभ्यासातील अधोगती आणि तुझं आणि माझं प्रेमप्रकरण या कारणां मुळेच मला इथून पुढं मदत करायची नाही असं ठरविलंय.’’

‘‘प्रशांत, मलाही घरातून पैसे मिळणं अवघड झालंय. घरातल्यांना संशय आल्यामुळे त्यांनी मला पॉकेटमनी द्यायचं बंद केलंय. परवा परवाच तुला मी दोन-तीनशे रुपये दिले एकदम. त्यावेळी वडिलांनी एवढे पैसे कुठे खर्च केलेस?

असं विचारलं. त्याचं उत्तर मला देता आले नाही. असे अचानक त्यांच्या प्रश्नाने मी पुरते गोंधळून गेले.तेव्हापासून त्यांना माझी शंका आली म्हणून मला त्यांनी पैसे देणे बंद केलंय. जून फॉर्म भरण्याची मुदत पाच ते सहा दिवस आहे. त्याच्या आत मी पैसे आणून देईन तुला.’’

‘‘सुमैया मला पैसे द्यायला तुला फारच अडचण वाटत असेल तर मी दुसऱ्या कोणाकडून तरी उसने मागून बघेन.’’

‘‘तू बघायचे तसे बघ कुठे मिळतात काय? मीही प्रयत्न करते, येते मी.’’

प्रत्येक वेळेला तिच्याजवळ पैसे मागणं योग्य वाटत नव्हतं. हे मलाही पटत होतं. मनाला थोडं खटकत होतं, पण करणार तरी काय? तिच्याशिवाय मला मदत करणारं कोणीच नव्हतं आणि आधार देणारंही. सगळे दुरावले होते. मग हात पसरणार कोणाकडे? आपली परिस्थिती ही अशी. पैसे मिळतील म्हणून सगळीकडे प्रयत्न करुन बघितले. पण एक पैसाही हाती आला नाही. मी सुमैयाला न बोलताच गप्प बसून राहिलो. मुदत संपत आली तरी फॉर्म आणि पैसे भरलेले नाहीत, हे तिच्या लक्षात आले असावे. मुदत संपण्याच्या अगोदर दोन दिवस माझ्या खोलीवर आली.

‘‘का सांगितलं नाहीस मला पैसे मिळाले नाहीत म्हणून? मला वाटले तुला पैसे मिळाले असतील. म्हणून तू माझ्याकडे आला नाहीस, पण मुदत संपत आली तरी फॉर्म भरण्याचं चिन्हं दिसेना म्हणून मला शंका आली तू फॉर्म न भरल्याची.’’

‘‘तुला घरी प्रॉब्लेम येईल म्हणून मी काही बोललो नाही. माझ्यामुळे तुला घरी बोलून घ्यावं लागतं.’’

‘‘अरे, तुझ्यासाठी आतापर्यंत इतकं केलंय आणि मी घरातल्यांच्या बोलण्याला घाबरेण काय? मी फक्त तुला एवढेच म्हटले होते की, घरात पैसे

द्यायचं बंद केलंय.पण ते एक-दोन दिवसांपुरतंच असतं. पुन्हा पैशाचा ओघ आपोआप सुरु होतो. मी तुला पैसे मागू नकोस असे बोलले नव्हते. मग तुला एवढा राग यायचं कारण काय?’’

‘‘राग वगैरे काही नाही सुमैय्या,पण...”

“पण काय?”

‘‘सारखे सारखे प्रत्येक कारणासाठी तुझ्याजवळ पैसे मागणं बरं वाटत नाही मला.’’

‘‘अरे, व्वा! आता तुझा स्वाभिमान जागा झाला वाटतं.’’

‘‘स्वाभिमानाचा प्रश्न नाही सुमैया. पण असं किती दिवस मी तुझ्याकडे पैसे मागत राहणार? तू सगळयांचा विरोध झुगारून नाही न म्हणता देत राहणार.’’

‘‘अरे असू दे रे खूप दिवस नाही, फक्त राहिले आता आहेत १५ ते २० दिवस. त्या काळात आपली परीक्षा होईल आणि मग आपण आझाद. मग तुलाही कुठेतरी काम मिळेल. आपण दोघेही मस्त मजेत आनंदाने राहूया. मग ना तुला माझ्याजवळ पैसे मागावे लागतील ना मला तुझ्याजवळ. जे असेल ते सार आपल्या दोघांच्या संसारासाठीच असेल.’’

‘‘खरं सांगू सुमैया.”

“काय? सांग ना.”

‘‘तू अशा आपल्या दोघांच्या सुखी संसाराच्या गोष्टी बोलायला लागलीस की खूप बरं वाटतं मनाला. जगाचा विरोध पत्करून आपण आपलं प्रेम अतुट ठेवलंय. एक ना एक दिवस आपलं प्रेम सच्चे आहे, हे जगाला दाखवून द्यायचंच. इर्षेवर आपण आपला संसार फुलवायचा. साऱ्यांनी आश्चर्य केलं पाहिजे. मग त्या संसारात माझे आजी-आजोबा सुखानं अखेरचा श्वास घेतील. आपला संसार बघून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळाळून निघालेला मला पाहायचा आहे. आपली मुलं आणि मुलांना खेळविणारे माझे आजी-आजोबा, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळणारी आपली मुले मला पाहायची आहेत.’’

‘‘अरे, प्रशांत कोणत्या स्वप्नात भटकत आहेत तू? पुरे कर ना आता आपल्या सुखी संसाराची तारीफ.”

‘‘पण सुमैया एक भितीही माझ्या मनाला सारखी वाटते.’’

‘‘कोणती रे?’’

‘‘तू मला अचानक सोडून तर जाणार नाहीस ना?’’

‘‘जीवनात कितीही वादळं आली तरीही मी तुला सोडून जाणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवं. अशी चिंता तू बाळगू नकोस. तुला सोडून जाणं म्हणजे

हे माझ्या कल्पनेच्या पलिकडलं आहे.’’

‘‘तू याच विचाराची शेवटपर्यंत रहावीस.’’

‘‘माझ्यावर विश्वास ठेव मी बदलणार नाही. मला उशीर होतोय. मी जाते. आता आपली पुन्हा भेट परीक्षा संपल्यानंतरच.’’

कॉलेज जीवनातल्या शेवटच्या वर्षातली शेवटची परीक्षा. आजपर्यंत कुठल्याच परीक्षेची धास्ती ना भिती वाटत नव्हती. सहजपणे आणि बिनधास्तपणे प्रत्येक परीक्षेला मी सामोरे जात होतो.परीक्षेत यश मिळवत होतो.

पण यावेळी मात्र परीक्षेची मोठी धास्ती आणि भिती वाटत होती. पेपर कसे असतील? कोणते प्रश्न पडतील? पेपर पूर्ण कव्हर होतील की नाही? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचं मनात काहूर उठत होतं. गेलेली सगळी शैक्षणिक वर्षे आपण खूप कष्ट घेतले. चांगले यश मिळविले. सगळयांची कौतुकाची थाप पाठीवर पडली. आणखीनच उमेद मिळाली. सगळयांचा आधार, प्रेरणा,प्रोत्साहनाच्या जोरावर प्रत्येक वर्षी जिद्दीत अभ्यास करत राहिलो. पण यावेळी मात्र त्याच्या उलट सगळी परिस्थिती होती. कुणाचा आधार ना पाठीवर प्रेमाची थाप होती ना कौतुकाचा वर्षाव होता. सगळयांच्या मनात माझ्याबद्दल राग होता, चिड होती. माझा आत्मविश्वास मी गमावून बसलो होतो.

वार्षिक परीक्षा आठ दिवसावर येऊन ठेपली होती. तोपर्यंत आजी आजारी असल्यां कॉलेजचा शिपाई मला सांगायला आला.

‘‘तुम्हाला कसं समजलं शिपाई मामा?’’

‘‘फोन आला होता. कोणीतरी तुमच्या शेजारच्या व्यक्तीने फोन केला होता. ताबडतोब येण्यास सांगितलेलं आहे. गंभीर आजारी आहेत तुमच्या आजी.’’

*****