Aaghat - Ek Pramkatha - 29 books and stories free download online pdf in Marathi

आघात - एक प्रेम कथा - 29

आघात

एक प्रेम कथा

परशुराम माळी

(29)

काठावर का असे नापण आपण पास होईन. जगाच्या नजरेत असं अचानक बदनाम नाही होणार मी.अलिकडं असं अचानक काय झालं होतं हे माझं मलाच समजतचं नव्हत होणार, नापास होण्याइतकं आपण पेपर लिहिलेलं नाहीत. काठावर का असे ना पण आपण पास होईन. जगाच्या नजरेत असं अचानक बदनाम नाही होणार मी.अलिकडं असं अचानक काय झालं होतं हे माझं मलाच समजतचं नव्हतं. माझा स्वभाव चिडचिडा झाला होता. कोणीही काहीही सांगितलं, बोललं की मी चिडायचो. नको ते बोलायचो, पण खुद्द आजोबांच्याही बाबतीत तसं माझं व्हायला लागलं. मी कधीच आजोबांसमोर एक भ्र काढत नव्हता. पण त्यांच्यावरही चिडायचो, ओरडायचो. इतर वेळी सगळी सेवासुश्रुषा करणारा मी एक दिवस आजोबांची अंथरुणात लघवी झाली होती त्याचा मला तिटकारा वाटायला लागला. मी ते अंथरुण धुताना चिडायला लागलो. नको ते आजोबांना बोलायला लागलो. त्यावर आजोबा म्हणाले,

‘‘आरं, पोरा तुला कंटाळा आला आसलं तर बस जा. का उगाचंच चिडचिड करतोस?’’

‘‘आता कायमचाच कंटाळा आलाया, मला हे सगळं करायचं नको वाटतंय. सगळी घरभर घाण, कंटाळा आलाय जगण्याचा.’’

‘‘आरं, पोरा म्हातारपणात नकळत हुतयं त्यात आता आमचा काय दोष?’’

‘‘मग अन्न सोडून घाण कशी खात नाही तुम्ही?’’

असं बोलताच आजोबांच्या डोळयातून पाणी आलं.

‘‘पोरा, तू बारका हुतास तवा तू मुतायचास, हागायचास तवा आम्ही तुझा तिटकारा केला व्हयं रं? तुला आम्ही टाकून दिलं व्हयं रं?’’

‘‘मग द्यायचा हुतासा टाकून. कशाला माझा सांभाळ केलासा? ही आशी सेवा करून घ्यायला?’’

‘‘आरं, त्यो स्वार्थ आमच्या मनात आसता तर तुला मोठ मोठ्या आजारातनंपैसा खर्च करून जगविला आसतावं काय? एवढा पैसा खर्च करून तुला शिकविला आसतावं काय? तूच सांग.’’

‘‘हे बघा, पैसा खर्च केल्याचं मला सांगू नकोसा. महिन्याला पाच-दहा रूपयं दिलं म्हणजे लय मोठं काम केला नाहीसा. माझ्याबरोबरच्या असलेल्या पोरास्नी त्यांचं आई बाप शंभर शंभर रुपयं द्यायचं. पिशव्या भरून खायला आणायचं. भारी भारीतली कपडे घ्यायचं तसं तुम्ही काय घेतलया?’’

‘‘घेतलं आसतं भरपूर काय घेतलं आसतं पण तेवढी परिस्थिती नको काय पोरा आपली? तू तर बघतुयास नव्हं. म्हातारी राब राब राबायची. तुला मोठं करायलाच आम्हाला किती हाल सोसावं लागलं?’’

‘‘काही हाल सोसला नाहीत तुम्ही? मी बाहेर राहूनच शिकलो.’’

‘‘आरं पोरा बाहेर राहिला तर चार-पाच वर्षे हुतास. त्याच्या अगुदर तुला उभं कोण केलं? त्याच्या आगुदरचं शिक्षण कोण केलं रं पोरा?’’

‘‘हे बघ आजा मला मोठं केलं म्हणजे काय फार मोठं काम केलं नाही तुम्ही. तुम्हालाही कुणाचा आधार नव्हता म्हणून आधार ही स्वार्थी भावना ठेवून जतन केलं तुम्ही.’’

‘‘आरं, पण आज आसं काय बोलतोस हे? तुला कुनी शिकवलं?”

‘‘मला कुणी शिकवलं नाही. मला आता या जगण्याचा वैताग आलाय.’’

‘‘मग तू काय करणार हायस ते तर सांग.’’

‘‘मला या खेड्यात राहायचं नाही. मी कोल्हापूरला जाणार हाय. तिथंच काय तर कामधंदा बघून तिथंच राहायचं म्हणतुया.”

‘‘आरं, मग मी कुठं जाऊ रे पोरा? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार हाय? मला पण ने तुझ्याबरोबर? मला आसं एकट्याला सोडून जाऊ नगोस.’’आजोबा काकुळतीला येऊन मला विनंत्या करीत होते.

‘‘तुम्हाला आणि कुठं नेऊ त्या शहराच्या ठिकाणी. आगुदर माझं पोटंभरायचं मुश्किल! तुम्ही इथंच राहावा, मी चार-आठ दिवसानं येऊन चार पैसं द्यून जाईन.’’

‘‘नको रे परसु तुझ्या पडतो, मला असं एकट्याला सोडून जावू नकोस. मी मरून जाईन रं आसं करू नगोस. पोरा तुला कामधंदा करायचा हाय तर बघ हीतचं कुठेतरी. पण कायमचंच जावू नकोस रे कुठं तू!’’

‘‘मला नाही जमणार इथं काम करायला.’’

‘‘आरं पण माझं काय रे पोरा.”

‘‘तुमचं तुम्हीच बघा आता. माझ्या आयुष्याचं माझं मला बघायला नगो काय? तुमचं हित हाय काय, मी तुमची सेवा करत राह्याला? दोन खोल्या त्याही पडक्या, शेती ती ही अर्धा एक गुंठा तीही बिनपाण्याची. काय मिळायचं हाय तुमचं, तुमची सेवा करून?’’

‘‘आरं, तुला सांभाळ करताना आम्ही ह्यो इचार केला व्हता व्हयं रे?’’

‘‘हे बघा, मला पुढलं काय बोलू नगोसा. मी जाणार म्हणजे जाणारचं.’’

आज अचानक मला काय झालं होतं कोणास ठाऊक? मी आज आजोबांना नको ते बोलून गेलो होतो. आजपर्यंत आजोबांसमोर वर मान करून उभा न राहणारा मी, एवढं बोलायचं धाडस कसं झालं होतं. मला कोणास ठाऊक? आजोबांना सुखी आनंदित ठेवायची स्वप्न पाहणारा मी आज आजोबांना इतकं वाईट बोलून गेलो होतो की, त्यांची माझ्याबद्दलची सुखी स्वप्नं उद्‌ध्वस्त झाली होती. आशाआकांक्षा जळून गेल्या होत्या. नंतर मनाला खूप वाईट वाटलं.आपण आजोबांना असं बोलायला नको होतं. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांना डिवचायला नको होतं. फार मोठी चूक केली होती आणि हे सगळं सुमैयाची ओढ, आतुरता, तिचा विरह सहन न होण्याचं कारण तिच्याकडे जाण्याची माझी घाई यामुळेच मी आजोबांना तोडून बोललो होतो, कारण तर सांगत होतो कामधंद्यांचं पण मला तर जायचं होतं तिला भेटायला, पळून जाऊन लग्न करायचं होतं, संसार करायचा होता, अडचण वाटत होती माझ्या आजोबांची. म्हणून मी आजोबांवर चिडायचो, ओरडायचो, नको नको ते बोलायचो. खरं तर पूर्वीपासूनच आजोबांना वावगं पत्करायचं नाही. त्यांचा स्वभाव कडक आणि शिस्तही कडक होती. म्हणून मला वाटायचं, हे आमचं प्रेम प्रकरण समजल्यावर ते विरोध करतील. पण त्यांच्यातला तो कडकपणा आता वयोमानानुसार ढासळला होता. करारी बाण्याचे सडेतोड वृत्तीचे आजोबा आज मात्र शांत होते. डोळे खोल गेले होते. अपराध्यासारखा चेहरा करून दु:ख गिळून बसले होते. मी नको नको ते बोलत होतो. शब्दांचे घाव वरून घालत होतो. पण ते शांत होते. शांत असण्याचं कारण दुसरं तिसरं नव्हतं तर त्यांची मजबूरी होती. हातपाय असूनसुद्धा ते लुळेपांगळे झाले होते. त्यांना आता काहीच करता येत नव्हते. आणि त्यांच्या याच असाह्यतेचा फायदा मी घेत होतो.

क्षणात सारं उपकार विसरून सुमैयासाठी मी आज आजोबांना कायमचा काळजात घाव रुतून बसावा असं बोलून गेलो होतो. शेवटी तो असाह्य माणूस काय करणार होता? मला हात उगारु शकत नव्हता ना काही बोलू शकत नव्हता, म्हणून काय त्यांच्या असाह्यतेचा मी असा गैरफायदा घ्यायचा!

मी आजोबांना सोडून कोल्हापूरला जाणार आहे ही बातमी वाऱ्यासारखी गल्लीत, गावात पसरली. तश्या गल्लीतल्या बायका माझी समजून काढायला घरात यायला लागल्या. म्हणायच्या,

‘‘आरं, म्हातारा चार दिवस जिता हाय तोपर्यंत तरी ऱ्हा. मागणं म्हातारा मेल्यावर कुठं जायाचं हाय तिकडं जा. तुला कोण आडविणार नाही. आता या म्हाताऱ्याची सेवा, देखभाल कोण करायची? त्यांचं पोर काय ह्या म्हाताऱ्याला सांभाळणार नाही. पोटापाण्याचं हालं हुलं म्हाताऱ्याचं. आयुष्यभर कामधंदा सगळं करायचं हायंच की ! पण म्हातारा जिता हाय तवंर तर थांब. त्याची सेवा कर जराशी. म्हातारी माणसं काय आज हायतं आणि उद्या नाहीत. त्यास्नी दुखवू नये पोरा. जित हायति तवर सांभाळ करावा त्यांचा. नीट बघावं त्यांना. ती आपल्यातनं गेल्याशिवाय त्यांचं महत्त्व कळत नाही रं पोरा. जरा इचार करं.

तुझ्यासाठी म्हाताऱ्यानं लय हाल खालया. रक्ताचं पानी करून तुझा सांभाळ केलंया. ह्या म्हाताऱ्याला आसं वाऱ्यावर सोडून जाऊ नको. आचानक बरं नाही झालं, जास्तीबीस्ती झालं तर म्हाताऱ्याला दवाखान्याला कोण घेऊन जाणार? कशाला म्हाताऱ्याच्या जीवाशी खेळ खेळायला लागलायसं. असल्या या तुझ्या करणीनं म्हातारा मरून जाईल. तू शहरात राहिलेला तिथं रमल्याला ह्या खेड्यात तुला आता करमत नसलं पण लक्षात ठेवं, शहरातल्या लोकांच्यात जिव्हाळा,आपुलकी नसत्या, पण या खेड्यातल्या लोकांच्यातच माया-ममता, जिव्हाळा असतोच. जेवढा गोडवा खेड्यात आसतोया तेवढा शहरात नसतुया. त्या शहर गावाला भुलून आपलं रक्ताच्या माणूसाला या लाथाडू नकोस. पस्तावशील.’’

*****