Lockdown - 5 books and stories free download online pdf in Marathi

लॉकडाउन - हंपीकर नागेंद्र - भाग ५

एप्रिल महिन्याचे कडक ऊन अंगाची लाहीलाही करत होते. हंपी शहरातील, माफ करा विजयनगर साम्राज्याच्या राजधानीतील असंख्य पाषाण उन्हाने तप्त झाले होते. त्यांना बघण्यासाठी म्हणून कुणी आले नव्हते. आता त्यांना त्याची सवय झाली होती. इकडे नागेंद्र देखील घरात चिंतेत बसून होता. नागेंद्र, अठ्ठावीस वर्षांचा तरुण. आई मदयंती आणि वडील मंजूनाथ यांच्यासह नागेंद्र हंपीत रहात होता. ते मूळ कुठचे? हे मंजूनाथला देखील माहिती नव्हते. पण पोटापाण्यासाठी ते हंपीत वास्तव्याला होते, नागेंद्रला एक लहान भाऊ देखील होता, केशव नावाचा. तिथेच गंगावतीला इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. हंपीपासून गंगावती काही जास्त दूर होते असे नाही, पण हंपीला पर्यटकांची जास्त वर्दळ असल्याने केशव गंगावतीलाच भाड्याच्या खोलीवर राहायचा. तो देखील आता घरीच हंपीला आला होता. नागेंद्र एक गाईड होता. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि देहबोलीतील आत्मविश्वासामूळे पर्यटक लगेच त्याच्याकडे आकर्षित होत. वडील मंजूनाथ हंपी ते होसपेट रिक्षा चालवत. सकाळी विरुपाक्ष मंदिरात दर्शन घेऊन निघायचे ते रात्रीच यायचे. मदयंती सकाळपासून दुपारपर्यंत इडली, डोसे वगैरे नाश्ता बनवून विकायची. त्यांच्या घराच्या बाजूला त्यांनी दोन खोल्यादेखील बांधून घेतल्या होत्या. बॅकपॅकर लोकांसाठी म्हणून तो एक स्वस्तातला होम स्टे होता. थोडक्यात काय तर चारही बाजूंनी रोज थोडा-थोडा का होईना पैसा येत होता. केशवच्या शिक्षणासाठी तोच पैसा पाठवायचे. सर्वकाही सुरळीत चालले होते.

पण मध्येच माशी शिंकली आणि सर्वकाही स्तब्ध झाले. जग बंदच पडले जणू. कोरोना या नावानेच एवढी दहशत घातली होती की सर्व जग ठप्प झाले होते. जवळपास सर्व जगातच लॉकडाउन घोषित केले होते. जग तात्पुरते बंद पडले होते. पर्यटन व्यवसायावर सर्वांत मोठा घात झाला होता. हंपीस्थीत नागेंद्र आणि कुटुंबीय तथा सर्व हंपीवासीय एका मोठ्या विवंचनेतून जात होते. पर्यटक येणे बंद झाल्यामुळे यांचा जीवनप्रवास इथेच थांबतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पैसे असेपर्यंत ठीक होते, पण जसजसे दिवस लोटले जात होते तसतशी नागेंद्रची चिंता वाढत होती. केशवच्या शिक्षणाला लागणारा पैसा अचानकपणे बंद झाला होता. तो केव्हा सुरू होईल याची शाश्वती नव्हती. सगळ्यांना समजत होते, पण बोलत मात्र कुणीच नव्हते. बोलत होते ते फक्त डोळ्याने. मदयंती आणि मंजुनाथच्या चेहर्‍याकडे बघवले जात नव्हते. दिवसेंदिवस चिंता वाढत होती. केशव मात्र स्वतःला दोष देत दूषणं लाऊन घेत होता. अभ्यासाच्या नावाखाली तो एका कोपर्‍यात खिन्नपणे बसून रहात असे. घरातील असे वातावरण नागेंद्रकडून नाही बघवले जायचे. मग तो खिन्न आणि उदास मनाने बाहेर पडत असे तो रात्री जेवायलाच घरी येत असे. करण्यासारखे असे काहीच नव्हते. कोरोनारूपी अदृश्य अरि केव्हा आणि कसा वार करेल हे सांगता येत नव्हते. घराबाहेर पडलेला नागेंद्र मग वाट दिसेल तिकडे आणि पाय नेतील तिकडे जात असे. त्याला नवीन असे काहीच नव्हते. कारण तिथली एकूणएक शिळा त्याच्या परिचयाची होती. तोच तर त्यांची ओळख पर्यटकांना करून द्यायचा. हंपीमधील इतर कुटुंबांची स्थिती काही वेगळी नव्हती.

रोज दिवसभर नागेंद्र हंपीत भटकायचा, त्याच्याच धुंदीत. पण नागेंद्र आता जी हंपी पहात होता, ती रोजपेक्षा वेगळी होती. एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीच्या सभोवताली असलेले भग्नावस्थेतले अवशेष बघताना त्याचे मन उद्विग्न होत होते. ही एक नवीन हंपी तो अनुभवत होता. काहीतरी केले पाहिजे, हे त्याला चांगल्या प्रकारे उमजत होते. पण काय केले पाहिजे हा एक विषण्ण प्रश्न त्याची पाठ सोडता सोडत नव्हता. चिंता ही त्याला जळू सारखी चिकटली होती. हातपाय कुठे तरी मारणे आवश्यक होते. नाहीतर बुडून मृत्यू निश्चित होता. तुंगभद्रेच्या काठी, हेमकूट पर्वताच्या माथ्यावर, अंजनेरी पर्वताच्या मारुती मंदिराच्या शेजारी बसून त्याने कितीतरी सकाळींच्या दुपारी आणि दुपारींच्या सायंकाळी केल्या होत्या.

एकदा रात्री जेवण झाल्यावर घरात सर्वजण निवांत बसले होते. केशव अभ्यास करत होता. बाजूलाच त्याची ढीगभर पुस्तके पडली होती. अचानक विजेचा झटका लागल्यासारखे झाले आणि नागेंद्र तसाच बाहेर आला. मनात विचारांचे थैमान सुरू झाले. त्याचे मन हंपीच्या प्रत्येक मंदिरातून फिरू लागले, एकेक शिळेवरून धडाधड उड्या मारू लागले. त्याने केशवला आवाज दिला. हातातले पुस्तक बाजूला ठेऊन केशव लगेचच बाहेर आला.

“केशव, परीक्षा तर रद्द झाल्या ना, मग कसला अभ्यास करतोस?”

“पुढच्या वर्षाचा.”

“बघ मला कळतय तुझ्या मनात काय सुरू आहे ते. काही अपराधी वाटून घेण्याची गरज नाहीये. फक्त मला मदत कर.”

“कसली मदत.”

“हंपीवर पुस्तक लिहितोय मी उद्यापासून. मी दिवसभरत जे लिहिलेलं असेल ते लॅपटॉपवर टाइप करून देत जा. आपण ई-बूक प्रकाशीत करू आणि त्यातूनच चरितार्थ भागवू.”

“ठीक आहे, नक्की. उद्यापासून सुरू.”

नागेंद्रने त्याची योजना घरात सांगितली. सर्वांना आवडली. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. नागेंद्रला आता कशाचीही उसंत नव्हती. विचारांच्या तंद्रीत त्याला रात्री धड झोप देखील आली नव्हती.

सकाळी उजाडाण्याच्या आत तो घराबाहेर पडला. सोबत लिखाणाचे साहित्य, कॅमेरा आणि प्रफुल्लित मन घेऊन. विजयनगर साम्राज्याचे आराध्य दैवत असलेल्या उग्र नरसिंहाच्या दर्शनाने तथा आशीर्वादाने त्याने लिखाणाला श्री गणेशा केला. भग्नावस्थेत असलेल्या नरसिंहाच्या मुर्तीकडे कितीतरी वेळ तो एकटक पाहताच होता. सात तोंडी आदिशेषावर स्थानापन्न झालेल्या बावीस फूट उंचीच्या नरसिंहाच्या मांडीवर बसलेली लक्ष्मीची मूर्ती त्याला दिसू लागली. बाजूला पाडलेल्या लक्ष्मीदेवीच्या अवशेषातून त्याने मनोमन मूर्तीचे चित्र रेखाटले आणि मनातले बोल कागदावर उतरवू लागला. जवळच असलेल्या बडवलिंग मंदिराकडे तो वळला. तेथील ८६ वर्षांच्या कृष्णा भटांचे आशीर्वाद घेतले. त्यांना मंदिरविषयी खोलवर विचारले. त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द तो प्राणपणाने ऐकू लागला. कारण कृष्णा भट हे हंपीतील सर्वांत जेष्ठ व्यक्ती तथा पुजारी होते. दुपारच्या जेवणापर्यंत तो तिथेच बसून होता. मग त्याने विरुपाक्ष मंदिराकडे स्वारी वळवली. सांगम घराण्याच्या सूर्योदयाच्या आधीपासून ते सूर्यास्ता नंतर देखील ते मंदिर दिमखात उभे होते. कितीतरी पिढ्या पहिल्या असतील त्या मंदिराने. त्या मंदिराचा एकेक खांब नागेंद्रला त्याची कथा सांगू लागला. मूकपणेच. संगम घराण्याचे सुवर्णयुग पाहिलेली वास्तु होती ती. मंदिराच्या भिंतीवर असणार्‍या सैनिकांची कोरीव शिल्प त्याच्याशी संवाद साधू लागली. विविध प्राण्यांच्या शिकारींची शिल्पे तो बघू लागला. त्या प्राण्यांच्या चेहर्‍यावरील क्रूर भाव अनुभवू लागला. पटापट छायाचित्रे घेऊ लागला. त्या उंचच उंच गोपूरांसमोर बसून त्यांचीच कहाणी लिहू लागला. सायंकाळ झाली तेव्हा तो भानावर आला.

घरी आला तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर एक वेगळाच विलक्षण अनामिक आनंद होता. त्याचा असा हसरा चेहरा बघून सर्वांना बरे वाटले. जेवण झाल्यावर नागेंद्र आणि केशव सोबत बसले. नागेंद्रने दिवसभरात केलेले लिखाण केशव पटापट टाईप करून घेऊ लागला.

परत दुसर्‍या दिवशी नागेंद्र पहाटेच निघाला. एकतर लॉकडाउन असल्यामुळे हंपीमध्ये कुणीच नव्हते आणि त्यामुळे जो एकांत मिळत होता तो नागेंद्रसाठी अतिशय पोषक होता. त्यामुळे वेळ न दडवता तो विजय विठ्ठल मंदिरात आला. तिथल्या दगडी रथाला बघून थक्क झाला. रोज हाच रथ तो पर्यटकांना दाखवायचा. पण आज अशा एकांतात त्या अप्रतिम वास्तूला बघून त्याला भरून आले. सहजच त्याचा हात खिशात गेला. त्याने पन्नासची नोट काढली. मागील बाजूस तोच रथ होता. आळीपाळीने तो त्याच्या समोर असलेल्या रथाकडे आणि हातात असलेल्या कागदाच्या तुकड्यावर छापलेल्या रथा कडे पाहू लागला. रथाचे चित्र असलेल्या नोटेची किंमत पन्नास रुपये होती आणि खर्‍या रथाची.... ती अगणित होती. ती फक्त पैशाने मोजता येण्यासारखी मुळीच नव्हती. त्या अद्भुत शिल्पाचे वेगवेगळ्या बाजूंनी छायाचित्र घेऊन झाल्यावर तो मंदिरात गेला. इथे गाभारा आहे पण देव नाही, तो पंढरपूरला. तिथल्या अद्भुत स्तंभातून निघत असलेले सप्तसुर ऐकताना तो बेभान झाला होता. त्या देव नसलेल्या मंदिराची कहाणी लिहिताना त्याच्या मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ झाला होता. तिथून मग हजारा राम मंदिराकडे स्वारी वळली. इथे खांबच खांब होते. प्रत्येक खांबावर रामायण – महाभारत जीवंत करून ठेवले होते. हे मंदिर म्हणजे हंपीमधील शिपंचा मेरूमणीच आहे असे नागेंद्रला वाटले. मग तिथेच सायंकाळ झाली.

नागेंद्र घरी येताच केशवने त्याचे काम दाखवले. त्याने अतिशय चोखपणे त्याचे काम बजावले होते. परत रात्री तो कामाला लागला. इकडे नागेंद्रकडून स्वस्थ बसवले जात नव्हते. तो फक्त दिवस उजाडण्याची वाट बघत असायचा. कारण हंपी लॉकडाउनमुळे निर्मनुष्य आहे असे त्याला वाटतच नव्हते मुळी. किंबहुना तो या काळातच नव्हता, तो होता भूतकाळात. सम्राट कृष्णदेवरायांच्या काळात. त्यांच्या राज्यात.

त्याने कृष्णदेवरायांचा महाल बघितला. तिथे त्याला राजकावी तेनाली रामन भेटला. त्याच्या हजरजबाबीपणाने तो आश्चर्यचकित झाला. महाराजांच्या महालात तो एखाद्या लहान मुलांसारखा बागडू लागला. तिथे सर्वजण होते. राजा, राणी, राजकावी, सेनापती, सेना, अगदी सर्वजण. इथे त्याला अडवणारे असे कुणीच नव्हते. महालाबाहेरील सती चौथरा पाहताना मात्र त्याला अश्रु अनावर झाले होते. मग कितीतरी वेळ तो उद्विग्नपणे त्या भग्न वास्तूकडे बघत बसला. हंपी बाजारच्या मधून जाताना त्याने विजयनगर काळातला बाजार पहिला. तिथे त्याला हिरे, माणकांचे ढीग लागलेले दिसले. अशी अत्युच्च श्रीमंती त्याने पहिल्यांदाच अनुभवली.

असेच एकामागून एक दिवस उलटत गेले. आता हा त्याचा रोजचा दिनक्रमच झाला. सकाळी निघायचे, प्रत्येकवेळी एक नवीन हंपी अनुभवाची, तिला कागदावर उतरवायची. विद्यारण्य स्वामींचा आश्रम, मतांगा टेकडी, हेमकूट पर्वताचा माथा हे सर्व त्याने लिहून काढले.आता त्याने नवीनच सुरू केले. रोज सायंकाळी तुंगभद्रेच्या काठी जाऊन चिंतन, मनन करू लागला. खडकाळ टेकड्यांच्यामधून वाहणार्‍या तुंगभद्रेच्या काठी असलेल्या शिळा गतवैभवची साक्ष देत होत्या.

यथावकाश महिनाभर खपून दोघं भावांनी मिळून इंग्रजीमध्ये पुस्तक बनवले. त्यात सर्व हंपी समवलेली होती. अप्रतिम छायाचित्रे, तशीच शब्दरचना यामुळे पुस्तक गाजेल असा आत्मविश्वास त्या परिवाराला आपसूकच निर्माण झाला. मग प्रूफ रीडिंग वगैरे झाल्यावर ऑनलाईन विक्रीसाठी म्हणून पुस्तक आपलोड केले. अल्पावधीतच पुस्तकाला अप्रतिम प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने पुस्तक डाउनलोड झाले. अभिनंदन आणि अभिप्रायाचे फोन अविरतपणे सुरू झाले. इतके की नागेंद्रला उसंत मिळेनासी झाली.

मध्येच त्याला एक नवीन कल्पना सुचली. टूर पॅकेज डिझाईन करण्याची. मग काय, परत अंग झटकून नागेंद्र कामाला लागला. यात त्याने मंजूनाथ आणि मदयंतीची मदत घेतली. होसपेटहून पर्यटकांना आणण्यापासून त्यांचे जेवण, निवासाची व्यवस्था आणि हंपी दर्शन ते परत होसपेट पर्यंत पोहोचवणे इथपर्यंत कार्यक्रमाची आखणी झाली. घरचीच रिक्षा, सुगरण आई, घरातीलच दोन खोल्या आणि स्वतः एक निष्णात गाईड एवढं सगळं असल्यानंतर पॅकेज यशस्वी नाही झाले तर नवलच. या पॅकेजची सुरुवात त्याने डिसेंबर २०२१ पासून सुरुवात करण्याचे ठरवले आणि अहो आश्चर्यम. पुस्तकाप्रमाणेच हे पॅकेज देखील खूप यशस्वी झाले. काहींनी तर प्री-बुकिंग साठी संपर्क साधायला सुरुवात केली.

परत आनंदाचे दिवस सुरू झाले. दिवसागणती पुस्तकाचा खप वाढत होता आणि नागेंद्र त्या प्रत्येक शिळेला धन्यवाद देत कृतकृत्य होत होता. लॉकडाउनने त्याला एका सर्वसामान्य गाईड पासून प्रसिद्ध लेखक बनवले होते.