Lockdown - 3 books and stories free download online pdf in Marathi

लॉकडाउन - दुर्मिळ प्रेतयात्रा - भाग ३

“आला कारे मेल?”

“नाही अजून.”

“आणि काही टेंशन नको घेऊस. निगेटिव्ह येईल.”

“मी नाही घेत रे टेंशन, मी तरुण आहे. मला नाही काही होणार.”

“मग कशाचा विचार करतोयस मघापासून?”

“काही नाही, बाबांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणजे झालं. त्यांचंच टेंशन आहे.”

“नको काळजी करू, होईल सर्व ठीक.”

“पण मी काय म्हणतो, काही गरज नव्हती ना बाहेर जायची. त्या फळ विक्रेत्याकडे किती लोकं येत असतील दिवसभरातून. मी बघितले आहे त्याला. तसाच बसलेला असतो लोटगाडीवर. विनामास्कचा, सैनीटायझर तर हा प्रकार काय आहे हे त्याला ठाऊक आहे की नाही काय माहीत. इतके निष्काळजी कसे होऊ शकतात लोकं. लॉकडाउनचे फक्त नियम शिथिल केले आहेत. तरी असे वागतात, लॉकडाउन संपल्यावर कसे वागतात काय माहीत. तरी मी घरात संगितले होते, काही आणायचे असल्यास मला संगत जा. पण आमचे ऐकते कोण? काही महीने फळं वगैरे नाही खाल्ली तर नाही चालत का?”

“ठीक आहे रे, तू उगाच चिडू नकोस.”

“चिडू नकोस काय म्हणतोस कुत्र्या मला, घातला ना जीव धोक्यात. तीन दिवसांपूर्वी बाबा मार्केटला गेले. रात्री उशिरा त्यांना थोडा ताप आल्यासारखे वाटू लागले. घरातील गोळ्या – औषधींनी ती रात्र काढली. सकाळी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. उगाच रिस्क नको म्हणून. डॉक्टरने देखील संगितले की काही काळजी करू नका म्हणून. इथपर्यंत सर्व ठीक होते.”

“मग कुठे बिघडले?”

“सांगतो ना, ज्या डॉक्टरकडे गेलो होतो, तो सहकुटुंब कोरोना बाधित असल्याचे ऐकले आणि काळजाचा ठोका चुकला माझ्या.”

“ऐकिव माहितीवर नको विश्वास ठेवत जाऊस.”

“अरे बाबा, तो संपूर्ण एरिया सील केला. पालिकेने तीन वेळा पंपाने सैनीटायझर फवारले. बाजूच्या काकांनी साक्षात डॉक्टरला फोन लावून खात्री करून घेतली. मग मी आणि बाबा लगेचच टेस्ट करण्यासाठी म्हणून गेलो. आमचे नशीब बलवत्तर म्हणून किट उपलब्ध होते. नाहीतर टेस्टिंग उद्यावर ढकलली गेली असती.”

“हे मात्र बरं झालं.”

“हो, आता तेच रिपोर्ट येण्याची वाट बघतोय. आजचा तिसरा दिवस आहे. आतापर्यंत यायला हवे होते.”

“येतील आणि निगेटिव्ह येतील. नाकी काळजी करूस. बरं मी ठेऊ का फोन? बराच वेळ झाला, जेवणासाठी खोळंबलेत सगळेजण.”

“ठीक, बोलूया आपण.”

जरा वेळ अवीशी बोलल्यावर बरे वाटले. आता तो एकच तर हक्काचा मित्र उरला होता. त्याच्याशी बोलल्यावर कसं हलकं वाटलं. तीन दिवसांपासून माझी अवस्था अगदी वाईट झाली होती. एवढी काळजी घेऊन सुद्धा आमच्यावर टेस्ट करण्याची पाळी येईल असे वाटले नव्हते. फळ खरेदीचे निमित्त झाले होते. घरात दिवसासुद्धा नीरव शांतता होती. आई-बाबा चेहर्‍यावरील चिंता लपवण्याचा वायफळ प्रयत्न करत होते. पण प्रत्येकवेळी तो प्रयत्न निष्फळ होत होता. घरातील वातावरण चांगले करण्याचा आई वेळोवेळी प्रयत्न करत होती, पण काही वेळाने ती देखील उदास होत होती. बाबांना रक्तदाबचा त्रास होता, त्यामुळे चिंता वाटणे साहजिकच होते. बाबांनी तर स्वतःला बेडरूम मध्ये सेल्फ क्वारांटाईन करून घेतले होते. मी बेडरूमच्या बंद दरवाज्यासमोर ठेवलेला जेवणाचा ताट देखील ते अर्ध्या तासाने ते उचलत. ते पाहून आमचा जीव पाणी पाणी होत होता.

सकाळपासून मी मेल चेक करत होतो. पण रिपोर्ट्स काही आले नव्हते. अस्वस्थता क्षणाक्षणाला वाढत होती. दुपार झाली तसा माझा थोडा डोळा लागला. पंधराएक मिनिटं झाले असतील तोच मोबाइलवर मेसेज टोन ऐकू आली आणि काळजात धस्स झाले. मी पटकन मोबाइल हातात घेतला. सकाळपासून ज्याची चातकासारखी वाट पाहत होतो, तो मेल आला होता. मी श्वास रोखून मेल ओपन केला. त्यात दोन फाइल्स होत्या, त्या डाउनलोड केल्या. आधी बाबांचा रिपोर्ट उघडला. तो पॉसिटीव्ह होता. काळजवर दगड ठेऊन मी माझा रिपोर्ट उघडला. तोसुद्धा पॉसिटीव्ह होता. मी मट्कन खाली बसलो. अंगातले सगळे त्राण नाहीसे झाले. समोरील सारे जग माझ्याभोवती फिरू लागले. मला अशा अवस्थेत बघताच आई आली. ती मला हात लावून विचारणार तोच मी किंचाळलो, “आई, दूर हो. मला कोरोना झालाय. मला हात लावू नकोस.”

माझे हे ओरडणे ऐकून बाबांनी रूमचा दरवाजा उघडला. मला अतिशय हताश झालेल्या अवस्थेत खाली बसलेला बघून ते समजायचे ते समजले. बाबा रूमच्या बाहेर पाऊल टाकणार तोच मी परत किंचाळलो,

“थांबा तिथेच, तुम्हीपण पॉसिटीव्ह आहात.”

माझे हे काट्यासारखे बोचणारे शब्द ऐकून बाबा जागच्या जागी थबकले. आई हताश होऊन आळीपाळीने आमच्याकडे पाहू लागली. मला तर काय करावे हेच समजत नव्हते. आता धीर देणारा मीच होतो.

“मी फोन करतो हॉस्पिटलला, काळजी नका करू. आम्ही दोघेही बरे होऊ आई. तू चिंता नको करूस. काहीही होणार नाही. कदाचित तुला देखील काही दिवस क्वारांटाईन करून ठेवतील. तू सोबत पुस्तकं घेऊन जा वाचायला.”

“पण तुम्ही दोघं तिकडे मरणाशी झुंज देत असताना माझे पुस्तकात मन रमेल का?”

मग काही वेळ आम्ही तिघेही शांत आणि सुन्न होऊन बसलो होतो. सुमारे अर्ध्या तासाने दारावरची बेल वाजली तेव्हा आम्ही भानावर आलो. दार उघडले तेव्हा समोर शासकीय रुग्णालयातले कर्मचारी होते. मला आलेले रिपोर्ट्स त्यांना देखील पाठवण्यात आलेले होते. बाहेर एक पोलिस गाडी आणि अग्निशामक दलाची मोठी गाडी होती. कर्मचारी पिपीई किट घालूनच आले होते. त्यांनी आमचे रिपोर्ट्स दाखवले आणि ते योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तींकडे आले असल्याची खातरजमा करून घेतली. सोबत आम्हाला काहीच होणार नाही, आपण मिळून या महामारीला तोंड देऊ असे आश्वासित केले. आम्हाला थोडा धीर आला. आईला देखील ते क्वारांटाईन करणार होते आणि आम्हाला शासकीय रुग्णालयात घेऊन जाणार होते. आता मी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जयला तयार होतो. कारण साक्षात मृत्यू समोर ठाकला होता.

रुग्णवाहिका तयारच होती. आम्ही खिन्न मनाने घराबाहेर पडलो. आजूबाजूचे सर्व लोकं आम्हाला एका वेगळ्या नजरेने बघत होते. या नजरेत सहानुभूती मुळीच नव्हती. एक वेगळीच भावना होती. तिरस्काराची आणि हिनतेची. आज आमच्यावर एवढे संकट आले होते तेव्हा धीर देणारे दोन शब्द कुणीच बोलले नाही. सगळेजण मूग गिळल्यासारखे गप्प होते. बोलणं नाही निदान तशी आत्मविश्वास, धीर, प्रेम देणारी नजर देखील नव्हती. यांच्या संकटाच्या वेळेस आम्ही मागचा पुढचा विचार न करताच मदत करायची आणि आमच्यावर संकट आले तेव्हा हे प्रेमाचे दोन शब्द देखील बोलायला तयार नाहीत. चार लोकांचे हे आत्मविश्वासाने भरलेले शब्द मनाला कितीतरी ऊर्जा देत असतात. पण ठीक आहे, वेळ प्रत्येकावर येत असते. यांच्यावर असा प्रसंग येणार नाही हे कुणी संगितले होते. पण आज यांच्या वागण्यात जो उद्दामपणा होता तो खचितच चांगला नव्हता आणि याची फार मोठी किंमत यांना चुकवावी लागणार होती.

यथावकाश आम्ही रुग्णालयात आलो. आम्हाला आमचे बेड्स दाखवण्यात आले. बाबा दुसर्‍या वार्ड मध्ये होते. हे रुग्णालाय म्हणजे अतिशय शासकीय होते. सकारात्मक ऊर्जेचा कुठेच लवलेश नव्हता. एखादा सामान्य आजार झाल्यासारखं इथले कर्मचारी वागत होते. त्यांनादेखील काय देणेघेणे होते म्हणा. पगार सुरू आहे ना, मग झालं. दिवस भरायचा आणि घरी जायच. इतकंच ते आतापर्यंत करत आले होते आणि पुढेही असच करणार होते. माझ्या आजूबाजूला जवळपास माझ्याच वयाचे समदुःखी रुग्ण होते. काही जिवाची आशा धरून अद्याप आशा ठेऊन होते. काही प्रफुल्लित मनाने लढत होते. काही निर्विकारपणे जे होईल त्याला सामोरे जायला मनाची तयारी करत होते. या असल्या वातावरणात राहण्यापेक्षा मी घरीच सेल्फ क्वारांटाईन झालो असतो तर निदान बरा तरी झालो असतो, असे माझ्या मनात येऊ लागले. कारण इथली परिस्थिती एखाद्या रूग्णाला जगवण्यापेक्षा मारण्यासाठीच पोषक होती असे म्हटल्यास त्यात नवल वाटण्याचे कारण नव्हते. आता आमच्यापैकी जे कुणी वाचणार होते, ते स्वतःच्या आत्मिक प्रेरणेने प्रेरित होऊन जगणार होते.

मी तसाच विचार करत बेडवर पडून होतो. सायंकाळची रात्र झाली तरी मी विचारांच्या गार्गेतून बाहेर आलो नव्हतो. शेवटी माझ्या बाजूच्याने मला हाक मारून भानावर आणले. जेवणाची वेळ झाली होती. जेवण वगैरे झाल्यावर आम्हाला काही औषधे दिली गेली. औषधे घेतल्यावर काही वेळातच झोप यायला लागली. पण एकदा बाबांना भेटून यावे या विचाराने मी रुग्णालयातल्या कर्मचार्‍यांना बाबा कुठे आहेत असे विचारले. दोन वेळा विचारल्यावर त्यांनी एकदा तुटकपणे उत्तर दिले, “आम्हाला काय माहीत?”

मग माझा थोडासा पारा चढला. मी जोरात बोलायला लागणार तोच मला आजूबाजूच्यांनी हटकले आणि शांत बसवले. मी परत शांतपणे बेडवर पडून राहिलो. औषधांमुळे झोप प्रचंड प्रमाणात येत होती पण बाबांना बघण्याची अनिवार इच्छा होत होती. मग मी रात्री उशिरा बाबांना भेटला जाण्याचं निर्धार करून झोपलो.

रात्री उशिरा जाग आली तेव्हा दोन वाजले होते. माझ्या वार्ड मधील सर्वजण शांतपणे निद्राधीन झाले होते. तो शासकीय कर्मचारी पेंगत होता. मी त्याच्यासमोरून वार्ड बाहेर पडलो तरी त्याला शुद्ध नव्हती. मी समोरच असणार्‍या बाबांच्या वार्डसमोर येताच मला तिथल्या कर्मचार्‍याने हटकले. मी त्याच्या बर्‍याच विनवण्या केल्यावर तो मला आत सोडण्यास तयार झाला. मी एक एक बेड शाधात बाबांच्या बेडजवळ आलो. बाबदेखील इतक्या रात्री जागे होते. मी त्यांच्या बेड जवळ गेलो तसे ते म्हणाले, “तू इकडे कसा? इतक्या रात्री?”

“होय बाबा, भेटायला आलो. कसं वाटते आता?”

“मी ठीक आहे. घशात थोडा त्रास होतोय. बस्स एवढचं. तू झोपला नाहीस अजून? तुला कसं वाटतय?”

“मी बरा आहे. सहजच भेटायला आलो होतो.”

“आईचा काही फोन वगैरे?”

“नाही, मी सकाळी करणार आहे. तुम्हीपण करा.”

“हो, करेन मीपण. तू जा आता बराच वेळ झाला. कुणाला समजलं तर आरोळ्या मारतील.”

“ठीक आहे. मी तुमच्या बाजूच्याच वार्डात आहे. काही त्रास वगैरे झाला तर सांगा आणि काळजी घ्या.”

मला उगाचच त्यांचे पाया पडावेसे वाटले. मी त्यांच्या पायाला हात लवताच त्यांना गहिवरून आले. मग मी काही न बोलताच खिन्न मनाने तिथून बाहेर पडलो. माझ्या जागेवर आलो आणि झोपण्याचा वायफळ प्रयत्न करू लागलो. आज कोरोनामुळे आमचे कुटुंब एका वेगळ्याच परिस्थितीला तोंड देत होते. एकदम वेगळ्या. असा आजार ज्याच्यावर काही उपचार नाहीत. जो एकदम जीवघेणा आहे. असे विचार करत असतानाचं पहाटे केव्हातरी मला झोप लागली.