sutka part 7 books and stories free download online pdf in Marathi

सुटका पार्ट 7

रामा जेवण ठेऊन लगबगीने निघून ही गेला. मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात मी जेवण केलं. पण मोबाइललाला रेंज नाही आणि त्यात हा ही बाहेर गेला होता. त्या वातावरणात जरा भीतीची लहर उमटली.

“लोढू, तू बाहेर आहेस का?” फक्त रातकिडे किरकिरण्याचा आवाज येत होता. थकलेली असूनही मला झोप येईना म्हणून प्रवासात घेतलेलं पुस्तक वाचायला घेतलं. पण पुस्तकात माझं लक्ष लागेना. रातकिड्यांची कीरकिर आणि दूरवर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. रम्य वाटणार सगळं अचानक भयाण वाटायला लागलं. बाहेर काहीतरी आवाज झाला तस काळजात धस्स झालं.

“कोणी आहे का बाहेर?”

कुठलीच प्रतिक्रिया नाही. काय यार हा कुठे गेला.? किती काळोख आहे हा? एवढी मोठी खोली फक्त आवाज घुमतो इथे. मधून मधून वाटायला लागलं कुणी पाहतय आपल्याकडे. तोंडावर ब्लँकेट घेऊन देवाचं नाव घ्यायला सुरवात केली.

“कुठं गेला? येउ दे आता चांगला कोलते धरून. ओह गॉड. लवकर ये रे.” मनात नाना प्रकारच्या शंका यायला लागल्या, कोल्हेकुई ऐकायला अली तस पुन्हा धस्स झालं. खोलीचा दरवाजा पॅक केलेला होता तरीही मनात शंका यायला लागल्या. बाहेर कोणी लपले असेल तर. कोणी अचानक आलं तर काय करायचं? मी इथं आहे कोणाला माहीत पण नाही काही बरं वाईट झालं तर कोणाला माहीत सुद्धा होणार नाही. बापरे! काय काय विचार येऊन जातात डोक्यात.

“सुरे,” बाहेरून आवाज आला.

“तू आत ये आधी.” मी काहीशा रागाने म्हणाले.

तोंडाला येईल तशा शिव्या घातल्यावर मी विचारलं, “कुठे तडमडला होता मला एकटीला या भूत बंगल्यात सोडून?”

“ओह माफ करा मॅडम. मला काय माहीत एवढी घाबरंशील म्हणून.”

“उद्याच निघते मी परत जायला.”

“ओह सुरे चिडतेस काय? नाही पुन्हा असं नाही करणार. चूक झाली. घे समजून.”

“तस मी तुझंच काम करायला गेलो होतो.”

“माझं काम?”

“हो, उद्या कळेल तुला.” त्याने स्मित केले. “बरं, आता तू झोप बिंधास्त मी आहे काही लागलं तर हाक मार.”

“तू जाऊ नको कुठे. मी त्याचा हात घट्ट पकडला.”

“बरं झोपतो इथेच खाली. घाबरू नको मी आहे आणि इथे तसली काही भीती नाही.”

तो आल्यावर मला जरा शांतता वाटली, तो बेड च्या बाजूलाच शांतपणे पहुडला होता. मी एक कुशीवर होऊन त्याला न्याहाळत होते. सोबत डोक्यात बरेच विचार चालू होते. नकळत डोळा लागला.

सकाळचा अंगाला झोंबणारा थंडगार वरा अंगावर घेत खिडकीतून बाहेर पाहत होते. त्या कोवळ्या उन्हाची तिरीप अंगावर पडत होती जणू परसातली झाडं मंद वाऱ्या बरोबरं त्या कोवळ्या उन्हाशी मसलत करत होती. पक्षी किलकीलाट करत इकडून तिकडे बागडत होते. माझ्या अंगावरची साडी त्या मंद वाऱ्या बरोबरं फडफडत होती. वाऱ्यावर उडणारे केस सांभाळताना उडणारी तारांबळ कोणी तरी न्याहाळत होतं, वरवर उडणारा तो पदर, त्या थंड वाऱ्यात मानेवर उष्ण श्वास जाणवला. हवा हवासा. “सूर्वी.”

त्या आवाजाने सगळं काही स्तब्ध झालं. मागून हळूहळू घट्ट होणारी ती उबदार मिठी आणि हळू हळू कमरेवर फिरणारा हात. त्याने जणू घट्ट बांधून टाकले. किलबिलणारे ते पक्षी, मंद डुलणारी झाडं जणू काही क्षण स्तब्ध झाली, हळूहळू घट्ट होणारी मिठी त्यात मी विरघळून जाते असं वाटायला लागलं. मानेवर झालेला ओठांचा हलक्या स्पर्शानं मी शहारले, त्याच गरम मिठीत एक नवा संवाद चालू झाला. श्वासांची अस्वस्थता जाणवायला लागली की अचानक ती मिठी सैल झाली त्या जागी काळोख आणि एक भयंकर आवाजाने थरकाप उडाला.

रात्री कुत्रे ओरडण्याचा आवाज आला तशी मी दचकून जागी झाले. ते भयानक केकाटने अंगावर शहारे आले त्या आवाजाने मी दचकून जागी झाले.

“लोढू, कुठेयस?” मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात त्याच्या जागेकडे पाहिलं. तो तिथे नव्हता. ओह गॉड, पुन्हा भीतीने पोटात गोळा आला. हे काय होतंय? कुठे जातो कुठे? हा असा अधून मधून एकतर किती भयानक आहे ही जागा. मी पुन्हा त्याला चार पाच हाका मारून पहिल्या पण काही फरक पडला नाही. भीतीने घाम फुटला मधून मधून कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकू येत होती. मधूनच कुठूनतरी चिटपाखरू चिरकण्याचा आवाज कानांवर पडत होता. मी चादर घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला पण त्या भयानक वातावरणात झोप जणू कुठे गायबच झाली. मनात विचार आला उद्याच निघावं माघारी.

पडल्या पडल्या वाटत होतं की बाहेर कोणतरी आहे. कोणीतरी कुजबुजल्या सारखा भास होतं होता कदाचित तो असेल बाहेर बघून यावं का. तो असं ला तर त्याच्या सोबत थांबेल इथे तर मी भीतीनेच मरेन. थोडीशी हिम्मत करून मी त्या मोठ्याश्या दिवाणावरून उठले. लाकडी दरवाजा हळूच सारकरवून त्याच्या फटीतून बाहेर पाहू लागले. बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता. बाहेरचं काहीच नजरेस पडत नव्हतं, दूरवर अंगणात काहीसा उजेड दिसला. छोटीशी शेकोटी दिसत होती. लोढू, लोढू आहे का तो?

काहीतरी वेगळच वाटलं याचं असं अचानक भेटणं. या भयानक वाड्यात घेऊन येणं आणि अचानक असं मधून मधून गायब होणं, काहीस वेगळं वाटायला लागलं. याच्या मालकीचं घर तेही पूर्वजांनी बांधलेलं कसं? याचं असं बदलणं अचानक भेटणं सगळं कसं कोड्यात टाकणार होतं. माझ्या मनात जर गोंधळ व्हायला लागला सगळ्या गोष्टींचा. एवढ्या रात्री हा बाहेर काय करत असावा? मनात शंकेची पाल चुकचुकली.

सकाळी जाग आली ती त्याच्या आवाजाने, “ओ मॅडम उठा आता. सूर्य डोक्यावर आला.” त्याने माझ्या समोर वाफाळत्या चहाचा कप ठेवला. त्याला पाहून मी काहीशी दचकले. “अगं,असं काय भूत पहिल्या सारख दचकतेय? काहीतरी विचित्र स्वप्न पाहिलं वाटतं.

मी डोक्याला हात लावला. भयंकर डोकं दुखत होतं, “हो रे स्वप्नच पडलं होतं बहुतेक. विचित्र स्वप्न.”

“बरं बरं, असु दे , चल आवर लवकर आपण बाहेर जाणार आहोतं. तुला गाव दाखवतो अजून खूप ठिकाणं तुला दाखवायची आहेत.”

मी अरश्या समोर उभी राहून आवरतच होते की तो तयार होऊन आला. साधी खाकी पॅन्ट आणि दंडावर घट्ट चिकटलेला t shirt त्याच पिळदार शरीर त्या पोशाखात अजून सुंदर दिसत होतं. ओह… आणि क्षणार्धात नजर खिळली. लोढु एवढा आकर्षक कधी पासून झाला. माझं चंचल मन भिरभिरायला लागलं. क्षणभर वाटलं पळत जाऊन झटकन एक झप्पी मारावी. पण नंतर स्वतःला आवरलं. असं असभ्य वर्तन करणे बरे नाही. त्याला नाही आवडले तर. बरं वाटत नाही ते.

आज मात्र बाहेर जायला जशी स्वप्नात दिसत होती तशीच साडी नेसली. फिक्कट गुलाबी. बॅग भरताना मी काय विचाराने ती साडी आपल्या सोबत घेतलेली मला लक्षात येत नव्हतं, पण अचानकच सगळ्या कापड्यांकडे पाहून त्यात ती साडीच सगळ्यात सुंदर दिसायला लागली. “अरे एक ना आपण आज फोटो काढू ना मस्त. काल लक्षात नाही राहील. गावात नेटवर्क जरी नसलं तरी फोटो काढून ठेवायला हवे लेटपोस्ट अपलोड करता येतील. मी रात्रीच फोन चार्जिंगला लावून ठेवला होता.”

“बरं बरं, घे तुला काय घ्यायचं ते. मी बाहेर वाट बघतोय.” तो बाहेर गेल्यावर मी पुन्हा एकदा आरशात स्वतःवर नजर फिरवली. एव्हढीही काही वाईट नाही हा मी. हा तर साधा बघत पण नाही निट माझ्या कडे. नाहीतरी म्हणा मुलींचा हा प्रॉब्लेमच असं तो मुलाने बघितले तरी प्रॉब्लेम आणि नाही बघितले तरी प्रॉब्लेम. मी स्वतःशीच हसले.

“हा चल निघुया,” मी बाहेर येऊन त्याला निघण्याची खूण केली. पायी चालत आम्ही कच्च्या रस्त्याने पुढे निघालो. सुंदर माडाच्या रांगा पसरल्या होत्या.