Nabhantar - 4 books and stories free download online pdf in Marathi

नभांतर : भाग - ४

भाग – ४

सहा सात वर्षापूर्वी.......

असाच तो गॅलरी मध्ये एकटाच बसला होता. तसा तो एकटाच असायचा. पण आज त्याला एकटेपणाची जाणीव होत होती. झालेले प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोरून जात होते आणि विशेषकरून त्यातील मन दुखवणारे प्रसंग तर हल्लीच्या मालिकांमध्ये जसे एका विशिष्ट प्रसंगी एकच शॉट ३ – ४ वेळा कॅमेराचा अँगल बदलून दाखवतात त्याप्रमाणे “ते” विशिष्ट प्रसंग २ – ३ वेळा त्याच मन त्याला दाखवत होत. तो खूप प्रयत्न करत होता हे सर्व विसरण्याच पण.. हा पण जिकडे येतो ना तिकडे सगळ पणाला लावायला लावतो.. पण त्याला ते विसरता येण अशक्य होतं. सानिका पुन्हा असं वागेल अस त्याला वाटल सुद्धा नव्हत, त्याला अस वाटत होत कि हे सर्व स्वप्नात घडतंय आणि जागे झाल्यावर हे अस काही नसणार आहे परंतु वाटण आणि असण यात आरशातील प्रतिबिंब आणि त्याच्या समोर असणारी वस्तू यामध्ये जेवढा फरक असतो तेवढाच तो होता. काश ये सपना हि होता... अशी फिल्मी ओळ स्वतःशीच म्हणून तो शेवटी उठला. रविवार असून दुपारपर्यंत चा वेळ यातच घालवलेला, आता राहिलेली कामे पटापट करायला हवीत म्हणून तो कामाला लागला पण यंत्रवतच त्याने ती उरकली त्याचे कशात लक्षच नव्हते. तो केवळ हा प्रसंग का घडला याची कारणीमिमांसा करण्यात गुंग होता. रात्री अंथरुणावर पडला पण झोप काही लागेना अर्थात हे विचारच कारणीभूत होते त्याला... आकाशच मन त्याला भूतकाळात नेऊ लागल... मानवी मनाचा स्वभावच असतो भूत आणि भविष्यात रमणे त्या न्यायाने आकाशसुद्धा रमला.

आकाश, एकुलता एक. लहानपणापासून एकटा राहण्याची त्याला सवय होती. म्हणजे तशी परिस्थितीनेच आणली होती. ना त्याला कोणी भाऊ ना कोणी बहीण, शिवाय ते ज्या सोसायटी मध्ये राहायचे तिथली मुले चांगली नसल्याने त्याची आई त्याला बाहेर सोडत नसे, न जाणे त्यांची वाईट सांगत लागून आपला मुलगा बिघडेल या भीतीने त्याला कधीच सोडले नाही.. घरच्या असणाऱ्या बेताच्या परिस्थितीमुळे त्याची आई नोकरी करत असे. पण जाताना ती आकाश ला घरी बंद करून जात असे, काळजावर दगड ठेऊन. तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आकाश किती लहान होता तेव्हा ६ वर्षाचा वगैरे असेल तेव्हापासून त्याला हि अशी एकटे राहण्याची सवय आहे. संध्याकाळी आई यायची तेव्हा मग त्याला बर वाटायचं, आई – आई करून तो तर तिला भंडावून सोडत असे. ती दमलेली माऊली त्याचे थोडे लाड करून मग रात्रीच्या स्वयंपाकाचे बघायची पण आकाश ला त्याची आई हवी असायची त्याला दिवसभराच्या गोष्टी सांगायच्या असायच्या, बाळ आपण नंतर बघू हं अस म्हणल कि त्याच्या सगळ्या गोष्टी मनातच विरून जायच्या. हिरमसून जायचे त्याचे मन. त्याला आई हवी असायची जेवण वगैरे नसेल तरी चालेल तरी तु बस आई पण शब्द मनातच विरायचे. रविवारी सुट्टीच्या दिवशी आई न्यायची बागेत तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असायचा, बिचारी ती माऊली त्यातच समाधान मानून घेत असे. पण वडिलांना तेवढे पण समाधान नशिबात नव्हते रविवारी ते स्वतःचा व्यवसाय करीत असत आणि इतर वेळी नोकरी. आकाश तसा समजूतदार होता. एखाद्याच्या आयुष्यात जर काही गोष्टी नशिबानेच दिल्या नसतील तर त्याला देवसुद्धा इतर गोष्टी भरभरून देतो त्याची परतफेड म्हणून. त्यानुसार आकाशला परिस्थितीने लवकर प्रौढपणा बहाल केला. हळू हळू त्याला समजू लागल होता कि आई बाबा एवढे कष्ट का करताहेत, मला अस एकट का रहाव लागत... सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्याला आपोआप मिळत होती, तोही हे स्वीकारत होता. त्याच वय होता फक्त ८ वर्षे ! त्याची बुद्धि चांगलीच तीष्ण होती. एकटे राहण्याच्या सवयीने तो स्वतःला गुंतवून घ्यायला शिकला होता. त्याला चित्रपट खूप आवडायचे एकही सिनेमा तो सोडत नसे. विशेषकरून गुप्तहेर प्रकारातील. तसेच त्याला वाचनाची प्रचंड आवड त्यामुळेच कदाचित एवढ्या लहान वयात सुद्धा बऱ्याच गोष्टी त्याला माहित असायच्या. शालेय प्रगती नेहमीच चढत्या क्रमात असायची. दहावीला तर बोर्डात सुद्धा आला होता. महाविद्यालयीन प्रगती सुद्धा चांगली होती, बारावीला विज्ञान शाखेत त्याने चांगले गुण मिळवले होते.. जीवशास्त्र हा त्याचा आवडता विषय होता त्यातूनच पुढे काहीतरी करायचे हा त्याचा निर्णय पक्का झालेला. त्यानुसारच मेडिकल ला त्याने प्रवेश घेतला होता.

आपल्या स्वभावानुसार आतापर्यंत आकाश ने खूप कमी मित्र बनवले होते. पण जे बनवले होते ते विचार करूनच त्यामुळे त्यांच्याशी त्याची घट्ट मैत्री होती. त्याचे तसे चारच मित्र होते जे त्याच्यासोबत शाळेत होते. एक मात्र होते कि आकाश मुलींशी बोलायला फार बुजायचा. त्याला कारण पण तशीच होती लहान पणापासून कुणामध्ये मिसळत नसल्याने त्याने आत्तापर्यंत एकही मुलीशी मैत्री केली नव्हती. अकरावी बारावी अशा कॉलेज काळात मुलींशी बोलण्याचे जे प्रसंग आले ते त्याने लांबूनच हाताळले व ४ हात लांब राहणे पसंद केले. कदाचित त्याला त्याच्या विचारांशी जुळणारी एखादी मुलगी अजून भेटली नसावी... त्यामुळे आत्तापर्यंत आकाशला ते चार मित्र सोडून जवळच अस कोणी नव्हत.

मेडिकलसाठी त्याची निवड दुसऱ्या शहरातील कॉलेज मध्ये झालेली असल्याने त्याला त्याचे शहर सोडून दुसऱ्या शहरात यावे लागले होते. त्यामुळे आधीच एकलकोंडा असणारा आकाश त्या नवीन वातावरणामुळे अधिकच स्वतःपुरते राहणे पसंद करू लागला. अशातच त्याचे एका मुलीशी फार जुळले ते म्हणजे सानिकाशी, खरतर हि नवलाईची गोष्ट होती पण कॉलेज मध्ये जर्नल्स, नोटस साठी एकमेकांची मदत घ्यावी लागत असल्याने या दोघांचे आपापसात फारच जुळले. सानिका, हीच सानिका जिचा आकाश आज विचार करत होता. त्याला झोप सुद्धा लागत नव्हती. नकळत तो होणाऱ्या त्रासाला विसरण्यासाठी भूतकाळात रमत होता...

सुरवातीपासून सारे काही आठवत होता कसे ते भेटले कसे त्यांचे नाते निर्माण झाले...

पहिल्या वर्षाची पहिली टर्म संपेपर्यंत आकाशला सानिका माहित नव्हती. म्हणजे तस तो तिला रोज पहायचा पण आपल्या स्वभावामुळे कामापुरत काम ठेऊन इतरांप्रमाणे तिच्यापासून सुद्धा ४ हात लांब रहायचा. त्यामुळे तीच नाव सानिका आहे हे सुद्धा त्याला तेंव्हा माहित नव्हत. दुसऱ्या टर्म ला सानिका कोण हे त्याला समजले म्हणजे थोडक्यात सानिका हे कोणत्या देहाच नाव आहे हे कळाल इतकच. दुसऱ्या टर्म च्या viva च्या वेळी त्याची आणि सानिकाची ओळख झाली; त्याच काय झाल सानिका आणि हा एकाच बॅच मध्ये होते. तिचा नंबर ह्याच्या आधीचा त्यामुळे तिची viva पहिला असायची मग ती आली कि सगळ्यांबरोबर हा सुद्धा तिला विचारत असे काय विचारलं तुला ? एका विषयाच्या वेळी नेमक त्याला बर नसल्याने तो त्या विषयाचा अभ्यास करू शकला नव्हता मग गडी तसाच तणावात viva ला आलेला. चेहऱ्यावर स्पष्ट ताण दिसत होता. ती आली viva देऊन सगळ्यांनी मग तिला गराडा घालून आपल्या शंका मिटवून घेतल्या पण हा मात्र गप्प तोंड पडून कोपऱ्यात बसलेला दिसला. तिला पण आश्चर्य वाटल कि नेहमी व्यवस्थित अभ्यास करून चेहऱ्यावर आत्मविश्वास असणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर आज ताण का ? कुतूहलापोटी ती त्याच्याकडे गेली आणि विचारल, “काय रे काय झाल ? असा का बसला आहेस ? वाचायचं नाही का तुला ? आता दोघांनंतर येईल तुझा नंबर वाच लवकर” तो नुसतच नाही म्हणाला, त्याला कळेना कि हि स्वतःहून का बोलतेय माझ्याशी. मग मात्र तिला काय वाटल काय माहित तिने त्याला महत्वाचे प्रश्न सांगितले त्याची उत्तरे कशी द्यायची सांगितली.. थोडीफार तयारी करून घेतली फक्त १५ मिनटात. मग त्याचा नंबर आला, दैवयोगान जे तिने करवून घेतलं त्यातले काही प्रश्न विचारले त्यामुळे त्याला पास होण्यास काही आडकाठी नव्हती. हा जवळपास उड्या मारतच बाहेर आला बघतो तर ती होती समोर, गेली नव्हती.. “काय रे, कशी झाली viva ? मस्त गेली ना ?” “हो” अस यंत्रवत तो म्हणाला खर पण त्याच लक्षच नव्हत. तो तिच्याकडे बघत होता, हि थांबली चक्क माझ्यासाठी ? गेली नाही, दुसर कोण तरी असत तर उद्याच्या परीक्षेचा अभ्यास करायला केव्हाच निघून गेल असता. पण हि थांबली. त्याला तिच्याबद्दल आदर वाटला. तिथून जे काही त्याचं जमल ते पुढे मैत्री वाढतच गेली. दुसऱ्या वर्षात मात्र तो तिला म्हणाला कि न जाणे आपली हि अशी छान मैत्री जुळली, तुझा स्वभाव पण मला पटतो.. मला काय वाटत ना, देवाने लहानपणापासून मला एकटे ठेवलं, पण इतक्या वर्षांनंतर त्याने तुझ्या रूपाने एक छानशी मैत्रीण दिलीय. ते ऐकून सानिकाच्या डोळ्यात नकळत पाणी आले, ती त्याला म्हणाली, “माझ्या मनातील आनंद मी या क्षणाला कसा व्यक्त करू तेच समजत नाहीय.” अशा प्रकारे दोघांच मैत्रीच नात छान सुरु झाल. तो तिची खूप काळजी घ्यायचा. तिला काय हव नको ते बघायचा.

त्याला हे नात हरवायचं नव्हत. ते जपून ठेवायचं होत. त्यासाठी जेवढ करता येईल तेवढ तो करायचा. ती सुद्धा त्याची काळजी घ्यायची, त्याच्याकडून अभ्यास करवून घ्यायची. वेळ मिळाला तर त्याला घरच खायला मिळत नाही म्हणून स्वतः काही पदार्थ बनवून त्याला खाऊ घालायची, तिलासुद्धा असा प्रेमळ मित्र जपून ठेवायचा होता. दोघेही शिक्षणाच्या निमित्ताने घरापासून दूर होते त्यामुळे दोघ एकमेकांची काळजी घ्यायचे. अधून मधून भांडणे पण व्हायची. परंतु जेथे प्रेम असते तेथे कलह होतातच. भांडणानंतर पुन्हा अधिक दृढतेने ते नात फुलायचं. सगळ काही छान चालू होत पण... हा पण आयुष्यात अनेक वादळ निर्माण करतो. पण हल्ली सानिकाच्या वागण्यातला बदल त्याला समजत होता. तिच त्याला परक्याप्रमाणे वागवण, जास्त न बोलण, प्रत्येक गोष्टीत अपेक्षा ठेवण – सगळ तिच्या मताप्रमाणे घडायला हव नाहीतर भांडणे व्हायची, भांडणे तर पूर्वीप्रमाणे होतच होती पण त्यातील गंभीरता वाढत चालली होती. आता ती भांडणानंतर त्याच्याशी अबोला धरायची. इतका कि त्याला त्रास व्हावा, मग आपली चूक नसताना तोच नात टिकवण्यासाठी माफी मागायचा अगदी नाक घासायचा तिच्यापुढे. मग ती सुद्धा त्याला माफ केल्याचा आव आणायची. सगळ सहन करायचा तो त्याला कळत नव्हत कि पाणी कुठेतरी मुरतंय ते. अनेकदा तिला विचारल सुद्धा त्याने कि काय झालय ? ती फक्त काही नाही असाच सांगायची. नंतर नंतर ३ – ४ वेळा खूपच झाला हा प्रसंग. शेवटी तो म्हणाला तिला कि “मला काळजी वाटते तुझी, अस वागत राहिलीस तर पुढे खूप अवघड होईल, काय आहे ते सांग तरी आपण सोडवू जे असेल ते. पुन्हा अस होऊ देऊ नकोस नाहीतर मी सुद्धा बोलणार नाही मग, मला नाही सहन व्हायचं हे.” यावेळेस तिने माफी मागून पुन्हा अस न होण्याच सांगितलं. पण नंतर दोनदा असे प्रसंग झालेच. त्यातला पहिला होता तो त्याने दुर्लक्ष केल व पाहिल्याप्रमाणे तिला बोलत केल पण नंतर वागण्यातील तुटकपणा त्याच्या लक्षात येत होता.. ८ दिवसांपूर्वी पुन्हा अस झाल तेव्हा मात्र त्याचा संयम सुटला त्याने सुद्धा आपण बोलायला नको अस मनाशी ठरवलं. एक तर तो आजारी होता त्यात ती म्हणेल त्याप्रमाणे नाही वागल म्हणून नाराज होण हे कितपत बरोबर आहे अस आकाश ला वाटून गेल. बास पुन्हा नको हे आपल्याला, मी एकटा होतो तेच बर होत, का माझ्या मागे अस दुर्दैव लागल. जे हव ते कधी मिळालाच नाही, लहानपणी मागायचो तर परिस्थिती मुळे मिळत नव्हत आणि आता आताही परिस्थितीच कारणीभूत होती कुठे तरी एकंदरीत.. आकाश मानाने थोडा हळवा झाला, कसही झाल तरी तिला जिवलग मैत्रीण मानायचा तो तिला. अस नात तोडण त्याला त्रासदायक ठरत होत.

आज तरी खूपच त्रास झाला त्याला, इतके दिवस तो कस तर ढकलायचा, रोज ती दिसली कि त्रास व्हायचा, मुद्दाम तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करायचा पण ते तर होतच नव्हते. हे सगळ करण्यातच त्याची शक्ती खर्च व्हायची. आज त्याची मनाची उर्जा संपलीच जवळपास, आज त्याला काय तो एकदाचा निकाल लावायचा होता...

क्रमशः


सदर कथानक हे पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


- ©डॉ. प्रथमेश कोटगी

(सदर कथेचे पूर्ण हक्क हे लेखकास्वाधीन असून यातील अंशतः किंवा पूर्ण भागाचे पुनः प्रकाशन करायचे असल्यास वा चित्रीकरण करायचे असल्यास लेखकाची तशी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)