Nabhantar - 6 books and stories free download online pdf in Marathi

नभांतर : भाग - 6

भाग – ६

----------------********----------------

“अहो, कॉफी घेणार का ? मी मला करणार आहे” .. सानिका त्याला विचारात होती. पण त्याचे लक्ष नव्हते. “काय हो, कसल्या विचारात आहे एवढ्या...” सानिकाने त्याला परत हटकले तसा तो “अम्म, काय म्हणालीस का ?” असे म्हणत आकाश भानावर आला. “मी म्हणाल कॉफी घेतोस का ? मला करणारच आहे.” सानिकाने त्याला पुन्हा विचारले. “हो हो कर, मी तुला सांगणारच होतो.” आकाश तिला म्हणाला. तशी ती गोड हसून आत कॉफी करण्यासाठी निघून गेली. आकाश तिचे हसणे डोळ्यात साठवून घेत होता..

----------------********----------------

कितीही नाही म्हटल तरी आकाश ला सनिकाची आठवण येतच होती. त्या दिवशी सुध्दा तो आपल्या क्लिनिक मध्ये बसलेला होता; तिचे निखळ हास्य आठवत होता.. जेंव्हा जेंव्हा ती अशी गोड हसून त्याच्याकडे बघायची तेंव्हा त्याला फक्त असे वाटायचे की हा वेळ इथेच थांबवा आणि आपण फक्त तिच्याकडे असे पाहतच राहावे. इतक्यात त्याच्याकडे एक पेशंट आल्याने त्याची तंद्री भंग पावली.

आकाशची स्वतःची प्रॅक्टिस सुरु होती त्याचप्रमाणे विविध सेवाभावी संस्थांशी तो जोडला गेला होता. समाजासाठी असणारे त्याचे कार्य वाखाणण्याजोगे होते. असाच एकदा एका संस्थेसोबत एका शहरात कॅम्प करत असताना अचानक त्याची भेट पल्लवीशी झाली. तीसुद्धा डॉक्टर म्हणून त्या कॅम्प साठी आली होती.

पल्लवी.. आकाश, अनु, सानिका यांच्या कंपू मध्ये असणारी आणखी एक मैत्रीण ! अनु आणि पल्लवी आधीपासून मैत्रीणी होत्या जस जशी अनु – आकाश – सानिका यांची मैत्री जुळली तशी आपोआप पल्लवी सुद्धा त्यात सामील झाली. नेमकेपणाने आपले मुद्दे मांडणारी, मोजकेच बोलणारी, सतत आपल्या विचारात हरवणारी पल्लवी जेंव्हा पासून या तिघांसोबत राहू लागली तशी ती सुद्धा मनसोक्त वागू लागली. आकाश ने शिक्षण पूर्ण झाल्यावर सगळ्यांशी असणारा संपर्क तोडून आपल्याच जगात वावरत होता, त्यानंतर तो आज पल्लवीला भेटत होता..

“पल्लवी तू... इकडे कुठे ? कित्ती वर्षांनी !” आकाश पल्लवीला हाक मारत म्हणाला.. “अरे आकाश तू.... तू सुद्धा आलास ? हो ना, कित्ती वर्षांनी भेटतोय. चल आपण बसून निवांत बोलू.” पल्लवी त्याला म्हणाली.

कॅम्प झाल्यावर दोघे एका कॅफे मध्ये गेले तिथे कॉफी घेता घेता यांच्या गप्पा रंगल्या. “काय रे काय करतोस सध्या ? कसा आहेस ? घराचे कसे आहेत ?” पल्लवीने त्याला विचारले. “मी क्लिनिक काढलाय अग, सगळे मस्त आहोत आम्ही.. तुझ कसं चालूय ? लग्न केलस कि नाही का ?” आकाश ने तिला विचारले. “काय रे इतक्या वर्षांनी भेटून सुद्धा तुझी मस्करीची सवय नाही गेली अजून ? लग्न होऊन आता वर्ष दीड वर्ष होईल बघ, अरे तुला कित्ती शोधलं पत्रिका देण्यासाठी, तुझा नंबर चेंज, घरचा पत्ता मला नाही माहिती, कित्ती जणांना विचारलं कुणलाच काही माहिती नाही, अचानक गायबच झालेलास तू.” पल्लवी त्याला म्हणाली. “अरे बापरे, म्हणजे मला लग्नाला न बोलावता तू लग्न केलस थांब मी सुद्धा नाही बोलावणार तुला माझ्या लग्नाला..” आकाश हसत म्हणाला. “बर बाबा नको बोलावूस.. बर ते सोड तुला अनु बद्दल काही कळलं काय रे ?" पल्लवी ने किंचित जड आवाजात आकाश ला विचारले. तिच्या बोलण्याचा सूर ओळखून आकाश सुद्धा गंभीर झाला. "अनु जशी तुझी मैत्रीण होती तशी ती माझी सुद्धा चांगली मैत्रीण होती. इंटर्नशिप च्या त्या शेवटच्या दिवसात काय झाले माहित नाही परंतु ती तेंव्हापासून मला टाळायला लागली होती. आधीच मी सानिकाच्या प्रसंगाच्या धक्क्यांतून सावरलो नव्हतो तितक्यात अणूचे असे विचित्र वागणे सुद्धा मला त्रासदायक वाटत होते. काळच याला औषध मानून मी तिला थोडा वेळ द्यायचा ठरवले, परंतु ती अधिकच लांब गेली. इकडे आमच्या घरी सुद्धा परिस्थिती थोडी अवघड होती - घराच्या काही अडचणीमुळे मला घरी लक्ष द्यावे लागले. त्यामुळे कॉलेज संपल्यावर माझा सर्वांशी असणारा संपर्क तुटला. त्यामुळे अनु आता कुठे आहे - काय करते हे माहित नाही." आकाश पल्लवीला सांगत होता. पल्लवीने शांतपाने सर्व ऐकून घेतले पण त्यावर ती काहीच बोलली नाही. विषय बदलत तिने आकाश ला विचारले, "तू सानिकाच्या संपर्कात आहेस का ? तिचे सध्या काय चालले आहे हे कळले का ?"

“नाही ग, ज्यांना माझ्याशी संबंध नको आहेत त्यांच्याशी मी परत का बोलायला जाऊ, मी विषयच सोडून दिलाय तो.. जाऊ दे ना आपण दुसर काहीतरी बोलू.” आकाश थोडसं तिच्या अशा विषय बदल्याने आश्चर्यचकित होऊन म्हणाला. कारण त्याला अनु व पल्लवी किती एकमेकांजवळ होत्या हे माहित होते.

“नाही आकाश, मला काही गोष्टी नंतर समजल्या आहेत त्या तुला सुद्धा समजायला हव्यात, नाहीतर तिच्यावर अन्याय केल्यासारखा होईल.” पल्लवी त्याला म्हणाली.

“अन्याय ! असे मोठे मोठे शब्द प्लीज वापरू नकोस. आम्ही कशाला करू अन्याय, तिनेच घोर अन्याय केला होता आमच्यावर. आणि काय आहे काय तुझ्याकडे अशी माहिती.. ज्याने तूसुद्धा तिच्या बाजूने झालीस ?” आकाश तिला म्हणाला.

“ऐक माझ्याकडे खूपच महत्वाची माहिती आहे, बहुतेक देवाच्याच मनात असेल आपण असे भेटणे. तुझ्याशी ती तुसडेपणाने वागायची म्हणून मी सुद्धा तिचा तिरस्कार करायचे. ती शेवटचे वर्ष झाल्यावर तिच्या शहरी निघून गेली. आपल्याला वाटल कि तिला सगळे संबंध तोडायचे आहेत, खूप उद्धटपणाच वागण वाटल आपल्याला तिचं. परंतु खरी परिस्थिती वेगळीच होती. तिच्या आईला स्वादुपिंडाचा कॅन्सर झाला होता आणि हे थर्ड स्टेजला डिटेक्ट झाला. त्यावेळी आपली फायनल होती. ती घरी गेलेली परीक्षेच्या आधी म्हणून तुला ती तेंव्हा भेटली नव्हती. आईची सेवा करून राहिलेल्या वेळात तिने अभ्यास केला आणि तरीही तिला चांगले मार्क्स पडले. त्या घरच्या टेंशनमुळे तुझ्याशी नीट वागत नव्हती. नंतर दोन वर्षात गेली आई तिची, तिचा आधारच निघून गेला. खूप निराशेत होती ती सहा महिने. पण शेवटी तिला सावराव लागल कारण तिचे बाबा निवृत्त होते त्यामुळे घरखर्चाचा भार तिच्यावर होता. एका हॉस्पिटल मध्ये रेसिडेंट डॉक्टर म्हणून ती नोकरी करत होती. त्यात तिचे कसं बस चालायचं. पगार बेताचाच होता. संकट काय एकटी येत नसतात येताना ती भरभरून एकावर एक फ्री अशा ऑफर घेऊन येतात त्याप्रमाणे तिथला सिनियर डॉक्टर तिच्या मागे लागला होता. कायम तिच्याशी लगट करायला बघायचा म्हणे, एकदा दोनदा तिने ताकीत करूनसुद्धा त्याने आपले वागणे बदलले नाही. शेवटी सहन न होऊन तिने नोकरी सोडली. परंतु त्याचा राग मनात धरून त्याने तिच्या विरुध्द तिला तिथून गेल्यावर कुठेही नोकरी मिळणार नाही असे कारस्थान केले. शेवटी घरातच एक छोटासा दवाखाना ती सध्या चालवतेय. खूप हालअपेष्टात ती जगत आहे. मुख्य म्हणजे ती तुझ्यावर अजूनही प्रेम करते !” पल्लवी आकाश ला म्हणाली.

आकाश तिचं ऐकून भारावून गेला.. त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आले ते ऐकताना.. “ती अजूनही माझ्यावर....” त्याला वाक्य सुद्धा पूर करता येत नव्हत. “अरे हो, जरी तुला ती तेंव्हा काही बोलली नव्हती.. तरी पहिल्यापासून तिचे तुझ्यावर प्रेम होते. अगदी तुम्ही मित्र बनण्याच्या आधी सुद्धा !” पल्लवी त्याला म्हणाली. “मग अस जर होतं तर मला आधी का नाही बोलली ती ? का ते प्रसंग घडले तेंव्हा ?” आकाश तिला विचारात होता. आता करुणेची जागा रागाने घेतली होती. “हे बघ, तुझा राग मी समजू शकते, पण मला काय वाटत कि एकदा तू तिला भेट आणि दोघंही तुम्ही एकमेकांशी बोला सविस्तरपणे एकमेकांच्या शंका दूर करा. भांडा, मारा, शिव्या घाला एकमेकांना पण जा भेट जा तिला.” पल्लवीने आकाशला सल्ला दिला. पल्लवीच्या बोलण्याचा तो विचार करत होता आपल्याच तंद्रीत हरवून. पल्लवी त्याला म्हणाली, “कॉफी घे गार होतेय बघ...”

क्रमशः


सदर कथानक हे पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


- ©डॉ. प्रथमेश कोटगी

(सदर कथेचे पूर्ण हक्क हे लेखकास्वाधीन असून यातील अंशतः किंवा पूर्ण भागाचे पुनः प्रकाशन करायचे असल्यास वा चित्रीकरण करायचे असल्यास लेखकाची तशी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)