Nabhantar - 7 books and stories free download online pdf in Marathi

नभांतर : भाग - 7

भाग – 7

पल्लवीच्या बोलण्याचा आकाश विचार करत होता आपल्याच तंद्रीत हरवून. पल्लवी त्याला म्हणाली, “कॉफी घे गार होतेय बघ...”

----------------********----------------

“अरे ऐकतोयस ना... कॉफी घे ना गार होतेय.” सानिका त्याला त्याच्या विचारांमधून बाहेर काढत म्हणाली. “हो हो घेतो..” अस म्हणत आकाश ने कॉफीचा मग उचलला. कॉफीचा एक घोट त्याने घेतला... “व्वा, १ नं. उत्कृष्ट... सानिका, तुझ्या हातच्या कॉफीला अजूनही तीच चव आहे !” आकाश तिला म्हणाला. यावर “My Pleasure ! नशीब असल तरच मिळते हो अशी कॉफी !” सानिका त्याला टोमणा मारत म्हणाली. “खरय तुझ ! नशीब ! केवळ आणि केवळ नशीब आहे म्हणून तू मिळालीस मला आणि तुझी कॉफी पण !” आकाश जरा हळवा होत म्हणाला.. “काय रे असा का बोलतोयस ? काही झालय का ? माझ काही चुकलंय का ? सॉरी ना..” सानिका त्याच्या बाजूला बसत उजव्या हाताला मिठी मारत म्हणाली. त्याने उत्तरादाखल फक्त नकारार्थी मान हलवली. तिने त्याचा हात हातात घेतला, त्याच्या उजव्या खांद्यावर डोक ठेवलं आणि दोघंही समोरचे दृश्य बघण्यात हरवून गेले.

आकाश पुन्हा भूतकाळात पोहोचला..

----------------********----------------

पल्लवीला भेटल्यानंतर इतकी वर्ष मनाच्या एका कोपऱ्यात दाबून ठेवलेल्या सानिका विषयीच्या आठवणी एकदम उफाळून वर आल्या होत्या. कितीही काहीही झाल तरी ती त्याच्या आयुष्यातली पहिली मुलगी होती जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केले होते.

सानिकाला भेटण्यासाठी तो तिच्या गावी गेला. तिचे घर त्याला माहितच होते, तसा तो एकदा – दोनदा आला सुद्धा होता. घरी गेल्यावर तिचे बाबा त्याला भेटले. याआधी सुद्धा ते एकमेकांना भेटले होते. त्यांना तेंव्हा पूर्ण कल्पना होती की याचे सानिकावर प्रेम आहे म्हणून आणि यावर त्यांची काहीच हरकत नव्हती, कारण आकाश तसा चांगला मुलगा होता. आपल्या मुलीला जर इतका चांगला मुलगा मिळत असेल तर कोणत्या वडिलांना नको असणार ? फक्त त्यांचे म्हणणे इतकेच होते कि अभ्यास सोडून दुसरे कसलेच उद्योग करू नका, पहिला तुमचं शिक्षण होऊ दे. मग पुढ आयुष्यात तुम्ही दोघ असणारच आहात कि. त्याचं म्हणण आकाशलासुद्धा पटल होत. पण मध्येच सानिकाच्या वागण्याने सगळच संपल होत. आज आता इतक्या वर्षांनी तो कशासाठी आला होता याच उत्तर त्याच्याकडे नव्हतच, आणि तिचे बाबा सुद्धा अंदाज करू शकत नव्हते. त्यांनी त्याला आत बोलावून पाणी दिले, एका प्लेट मध्ये थोडासा चिवडा आणि बेसनाचे लाडू घेऊन आले. “म्हणजे अजूनही यांना मी लक्षात आहे तर” आकाश मनात म्हणाला. बेसनाचे लाडू आकाश ला खूप आवडतात हे त्यांना माहित होते म्हणूनच आता ते घेऊन आले होते.

“तर आकाश, इकडे कसं काय येण केलस ? वाट कशी चुकलास ?” बाबा त्याला विचारू लागले. “काही नाही, इकडून चाललो होतो.. आलो !” कसनुसा हसत आकाश म्हणाला. “अरे हे काय गार्डन आहे काय इकडून चाललो होतो आलो म्हणतोयस ते !” बाबा हसत, विनोद करत वातावरणातील अस्वस्थता दूर करत होते. तो सुद्धा हसला मोकळेपणाने त्यावर. “सानिका... ?” आकाश बाबांना विचारत होता. “ती क्लिनिक मध्ये आहे, इथेच खाली आहे बघ. जा भेटून ये तिला.. मग दुपारी आपण एकत्र जेऊ.” बाबा त्याला म्हणाले.

तसा तो खाली आला, बाहेरचे दार नॉक केले आणि प्रतिक्रियेसाठी वाट पाहू लागला. “येस कम इन..” आतून परिचित आवाज कानी आला. धडधडत्या हृदयाने त्याने आत प्रवेश केला, आणि समोर खुर्चीवर बसलेली सानिका त्याच्या दृष्टीस पडली. ती अजूनही तशीच होती, सुंदर – देखणी फक्त बारीक झाली होती. डोळे थोडे खोल गेले होते. “ओहो डॉक्टरसाहेब इकडे कुठे वाट चुकलात ?” थोडासा आवाजात परकेपणा आणत ती म्हणाली. पण याचे लक्ष कुठे होते तिच्या बोलण्याकडे, तो आपला अजूनही तिच्याकडे बघतच होता. डोळ्यासमोर टिचकी वाजवल्यावर त्याची तंद्री भंग पावली. बोलायला कुठून सुरुवात करायची ते दोघांनाही कळत नव्हते. ती काहीतरी लिहायच्या बहाण्याने खाली बघू लागली, आणि तोसुद्धा इकडे तिकडे बघत वेळ मारून नेत होता. शेवटी बाबाच आले मदतीला, त्यांनी जेवायला बोलावले. तिघेही जेवायला बसले. तिच्या मनात खूप काही होत बोलायला, पण सुरुवात कशी करायची हेच मुळी तिला समजत नव्हत. बाबांनीच मग विषयाला डायरेक्ट हात घातला.. “आकाश तुझ लग्न झालय ?” ते ऐकताच आकाशचा घास घाशामध्येच अडकला आणि त्याला जोरदार ठसका लागला. सानिकाने लगेच त्याला पाण्याचा ग्लास दिला. त्याला काही कल्पनाच नव्हती कि बाबा अस काहीतरी विचारतील म्हणून. “नाही बाबा. अजून तरी नाही.” कसं बस शांत होत तो म्हणाला. “गुड, आमच्या सानू च पण झाल नाहीय. अरे तुम्ही दोघ बनलायचं एकमेकांसाठी. नाहीतर मला सांग अजूनही तुझ्या आठवणी मध्ये हि रात्र रात्रभर का रडत असते ? अजूनही तिने लग्न का नाही केल ? माझ काय आता फार आयुष्य आहे अस मला तरी वाटत नाही. त्यामुळे मरायच्या आधी मला कन्यादानाचे सौभाग्य तुम्ही दिलात तर बर होईल.” बाबा डोळ्यात पाणी आणत म्हणाले. ते बोलत असताना आकाश आश्चर्याने सानिकाकडे बघत होता तिच्यासुद्धा डोळ्यात पाणी आले होते. “बाबा या निर्वाणाच्या गोष्टी तुम्ही कशाला करताय ? तुम्हाला काही होणार नाही. मी आहे ना ? तुमची सानिका आहे ना ? आम्ही तुम्हाला काहीही होऊ देणार नाहीय. माझे सुद्धा सानिकावर अजूनही प्रेम आहे म्हणूनच मी अजून लग्न नाही केले. तिच्याशिवाय आयुष्यात मी इतर कोणत्याही मुलीचा विचार नाही करू शकत. ती निघून गेल्यानंतर मला खूप वाईट वाटले होते. मला इथल्या परिस्थिती बद्दल काहीच कल्पना नव्हती. नाहीतर मी नक्कीच आलो असतो. तिने संबंध तोडला म्हणून मी सुद्धा पुढकार नाही घेतला. खर तर इथेच चुकल माझ. पण झालेल्या गोष्टीला काही इलाज नाही. आता मात्र मी कोणतीही चूक पुन्हा करणार नाहीय आणि म्हणूनच मला जेंव्हा सगळ्या घटनांविषयी कळले तेंव्हा तडक मी इकडे आलो सानिकाला भेटण्यासाठी.” आकाशचे ऐकून बाबांना समाधान वाटले. पण आकाशला सानिकाच्या मनात काय सुरु आहे हे अजूनही समजत नव्हते.

जेवण झाल्यावर “आपण जरा वॉक ला जाऊया का ? मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे.” सानिकाने आकाश ला विचारले. तसा त्याने होकार दिला. दोघंही वॉक ला बाहेर पडले व जवळच्याच एका गार्डन मध्ये येऊन बसले. “हम्म तर अजूनही तुझे प्रेम आहे माझ्यावर ?” सानिकाने त्याला विचारले. “हो आहे, आणि तुझे सुद्धा माझ्यावर आहे हे मला माहित आहे.” आकाश उत्तरला. “अजून सुद्धा सगळ्या गोष्टी तूच ठरवणार का ?” सानिका त्याला म्हणाली. “अस का म्हणतेयस ? जे काही म्हणायचं आहे ते स्पष्ट बोल, त्या वेळीच बोलली असतीस तर हि वेळ आज आलीच नसती.” आकाश सुद्धा थोड्या रुक्षेतेने म्हणाला. “ठीक आहे स्पष्टच बोलते, मला तुझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत..” सानिका त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. “हं, विचार..” तो सुद्धा तितक्याच दृढतेने म्हणाला. “माझ्याबद्दल इतर मुलांमध्ये तूच पसरवलेलस ना की मी नालायक मुलगी आहे, मला काही घरंदाजपणा नाहीय आणि मी फक्त मुलांचा फायदा घेते, स्वतःची कामे करून घेते... वगैरे वगैरे..”

“हट, मी कशाला असलं पसरवू तुझ्याविषयी, उलट मी जेंव्हा हे ऐकल तेंव्हा जो कोणी पसरवत होता त्यांना चांगलच दम दिला तेंव्हा या गोष्टी थांबल्या. पण मी एक गोष्ट खात्रीने सांगतो कि, तुला हा गैरसमज झाल्यावर माझ्याविषयी तू इतर मुला - मुलींमध्ये अस सांगितलस कि माझ मुलींशी वागण वाईट आहे. माझी नजर चांगली नसते. फक्त मुलींचा कसा फायदा घेता येईल हेच मी पाहत असतो आणि असले संस्कार आई – बाबांशिवाय कोण करणार दुसर. हे ऐकून मला इतका धक्का बसला होता कि मला काहीच सुचत नव्हत. मला पटतच नव्हत कि तू माझ्याविषयी अस काही बोलू शकतेस. पण दोघा तिघांकडून निश्चित करून घेतल्यावर दुर्दैवाने मला त्यावर विश्वास ठेवावा लागला. तरीसुद्धा मी तुझ्याशी बोलून हे सगळ सॉर्ट करणार होतो तुला मी मेसेज सुद्धा केलेला कि कॉलेज नंतर थांब म्हणून पण तू मला भेटण्याच टाळलस. इतक झाल्यावर माझ्या मनातूनच उतरलीस तू. पण परवा पल्लवी मला भेटली होती खूप वर्षांनी तिने मला तुझ्याविषयी सांगितलं सगळ, तिने मला तुला भेटण्यासाठी तयार केल.” आकाश तिला म्हणाला. आकाशचे बोलणे ऐकून सानिकाला धक्काच बसला होता कि तिच्या नावाने काय पराक्रम केले होते ते. म्हणजेच अनु सोबत जे घडले होते ते सुद्धा असेच गैरसमजातून घडले असणार आणि त्यामुळेच ती सुद्धा सर्वांपासून दूर झाली.

“मी खरच सांगते तुला कि स्वप्नात सुद्धा तुझ्याविषयी मी असा विचार करू शकत नाही. मला माहित नाही हे सगळ कुणी केल पण त्याने जे गैरसमज वाढले त्यात आपल नात संपुष्टात आल. सगळी माझीच चूक आहे, मी उगाच विश्वास ठेवला त्यावर एकदा जर का तुझ्याशी बोलले असते तर...” पुढे तिला बोलावेनाच. तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडून लागला. “अग शांत हो, रडू नको आता मी आलोय ना..” अस म्हणत आकाश तिच्या जवळ गेला तिचे डोळे पुसले. ती त्याच्या खांद्यावर डोक ठेवून मनसोक्त रडत होती. आज इतक्या वर्षानंतर मनातली सगळी मळभ दूर झाली होती.

पुढे मग लग्न होण्यासाठी किती वेळ लागतोय...

क्रमशः


सदर कथानक हे पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


- ©डॉ. प्रथमेश कोटगी

(सदर कथेचे पूर्ण हक्क हे लेखकास्वाधीन असून यातील अंशतः किंवा पूर्ण भागाचे पुनः प्रकाशन करायचे असल्यास वा चित्रीकरण करायचे असल्यास लेखकाची तशी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)