Nabhantar - 10 - last part books and stories free download online pdf in Marathi

नभांतर : भाग - १० (अंतिम)

भाग – 10

दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे प्रमाणे अनु आली ! सोबत मंदार सुद्धा होता. ते दोघेही एकमेकांबरोबर खूप छान दिसत होते. अर्थातच अनु आणि आकाश च्या आनंदाला पारावर राहिला नव्हता ! जरी आकाश बरा झाला होता तरी तो झोपूनच त्याच्याशी बोलत होता. इतक्या वर्षांनी सर्वांच्या मनातील मळभ दूर झाली होती. सर्वांची माने स्वच्छ झाली होती. आता उरले होते ते फक्त निखळ मैत्रीचे नाते ! तो संपूर्ण दिवस आकाश - अनु - सानिका एकमेकांसोबत खूप बोलत होते, कोणालाच वेळेचे - खाण्यापिण्याचे कशाचेच भान राहिले नव्हते. शेवटी रात्र होत आली तसे अनु व मंदार जायला निघाले.

आकाश ने सर्वाना येणाऱ्या १५ दिवसात त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आमंत्रित केले व सोबत एक आश्चर्याचा धक्का दिला - त्यांना दोघांना व पल्लवी व तिच्या नवऱ्याला त्याने आपल्यासोबत एका छोट्या ट्रिप साठी आमंत्रित केले जिथे तो आणि सानिका जाऊन राहिले होते त्या ठिकाणी. तिथेच लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरले. कुणीही अर्थातच आढेवेढे न घेता एकमताने यावर शिक्कामोर्तब केले !

ठरल्याप्रमाणे अनु, पल्लवी सुद्धा आपापल्या कुटुंबांबरोबर आले होते. त्यांना आकाश व सानिकाने शोधलेली ती निसर्गाच्या कुशीतील जागा फार आवडली ! इथे येताच सर्वाना एक जाणीव झाली ती म्हणजे शहरात राहून ते कसे निसर्गापासून दूर जातात ते ! यावेळेस इथे आल्यावर आकाश व सानिकाला तिथल्या एका व्यक्तीने ओळखले, "काय हो पाव्हणं, वळखलासा कि न्हाई ?" असे म्हणून त्याने चेहऱ्यावर आनंद दाखवत ओळख दाखवली. त्या दोघांनाही त्याचा चेहरा ओळखीचा वाटत होता पण तो कोण हेच आठवत नव्हते कसनुसं हसत ते वेळ मारून नेत होते. त्यांचा हा गोंधळ त्या माणसाच्या लक्षात आला त्यासरशी तो म्हणाला - अवो मी रामदास पाटील ! तुम्ही माझ्या हॉटेलात आला होता ना मागच्या वर्षी !! तुम्ही लक्षात राहण्याचे कारण म्हणजे असा पहिला माणूस मी बघितला होता की जो घरातून काहीही न ठरवता फिरायला बाहेर पडला होता ते पण बायकोला घेऊन ! आमची नाही बाबा एवढी हिम्मत होत !!" असे म्हणून तो खो खो हसत सुटला. त्याने तसे सांगितल्यावर आकाश व सानिकाला आठवले मागच्या वेळेस पाय मोकळे करायला म्हणून उतरलो होतो तेंव्हा यांच्याच हॉटेल मध्ये गेलो होते ते. त्यांना नंतर कळले की हे रिसॉर्ट पण त्यांचेच आहे म्हणून. त्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस आहे हे कळताच त्याने तर खूप काही काही व्यवस्था करून दिली. अनु व पल्लवी ने पुढाकार घेऊन संपूर्ण डेकोरेशन व त्या मेजवानीचे प्लॅनिंग केले. ठरविल्याप्रमाणे त्यांचा वाढदिवस पार पडला ! जेवणाचा बेत तर झक्कास झाला होता. त्यांना शहरात मिळत नाही म्हणून पाटील साहेबानी खास चुलीवरील जेवणाचा बेत आखला होता. सर्वानी जेवण करून थोडं निसर्गाच्या सोबतीत फिरून आले. सर्वानी पुन्हा एकदा मनसोक्त गप्पा मारल्या व शेवटी असे ठरले की दरवर्षी कोणी कितीही व्यस्त असो; या जागी सर्वानी नक्की भेटायचे ! आणि मैत्रीचे हे नाते जिवंत ठेवायचे. आता कोणालाही हे सुख हरवायचे नव्हते. हळू हळू सूर्यास्ताची वेळ जवळ वाढत गेल्याने थंडीचा कडाका वाढू लागला तसे सर्वजण उठून आपापल्या रूम कडे जाऊ लागले. पुन्हा एकदा सर्वानी त्या दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या व सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला.

आज आकाश आणि सानिकाच्या लग्नाचा वाढदिवस ! आणि आकाशने प्रॉमिस केल्याप्रमाणे तिला तो त्याच जागी पुन्हा घेऊन आला होता. आश्चर्यकारकरित्या तो आजारातून रिकव्हर झाला होता. सहा महिन्यांच्या बेडरेस्टचा सल्ला फाट्यावर मारून कुणाचही न ऐकता तो सानिकाला घेऊन इथे आला होता.

दोघेही पुन्हा हातात हात घेऊन त्याच रिसॉर्ट मधील आपल्या रूममध्ये एकमेकांजवळ बसले होते. “डोळे मिट” आकाश सानिकाला म्हणाला. “का रे ?” सानिका त्याला म्हणाली. “मिट तर खर, तुला एक सरप्राईज देतो.” आकाश तिला म्हणाला. तिने डोळे मिटले. “हात पुढे कर..” तिने हात पुढे केले. “आता उघड..” तिच्या हातावर एक वस्तू ठेवत आकाश म्हणाला. तिने डोळे उघडले आणि ती भारावून त्या वस्तूकडे पाहू लागली. “तुला कुठे मिळाल हे ?” सानिकाने त्याला विचारले. दोघे जेंव्हा पहिल्यांदा भेटले होते तेंव्हा आकाश ने भेट म्हणून तिला स्टीलच हृदयाचा आकार असणारे किचेन दिले होते. ते नंतर कुठेतरी हरवले होते. तिला ते खूप आवडले होते परंतु दुसर तसलं मिळालच नव्हत. आता अकस्मात आकाश कडून कुठून उगवलं याचच तिला आश्चर्य वाटल. “अनुकडे होत तिने दिल. एवढच नाही तर उघडून बघ ना ते...” अस म्हणत त्याने ते स्टील चे हृदय उघडले सुद्धा तर आत मध्ये दोघांचे स्केच काढलेले फोटो होते. “अनुने काढलंय ते स्केच !” दोघानांही ते खूप आवडलं. ती आता ते किचेन आपल्यापासून अजिबात दूर ठेवणार नव्हती. “तू सुद्धा डोळे मिट ना..” सानिका त्याला गोड बोलत म्हणाली. “अरे व्वा ! आज चक्क बायकोकडून गिफ्ट मिळणार का ? एवढ गोड बोलतेयस म्हणजे नक्कीच गोडच असणार ना गिफ्ट ?” आकाश तिला डोळा मारत विचारात होता. ती सुद्धा त्यावर लाजून म्हणाली, “चल, तुला दुसर काही सुचत कि नाही कधी... हे दुसर आहे मिट ना लवकर...” त्याने सुद्धा हसत डोळे मिटले. त्याने पुढे केलेले हात तिच्या पोटावर ठेवत ती म्हणाली “उघड आता !” त्याला तिला काय म्हणायचे आहे ते समजले ! त्याच्या तोंडून काहीही शब्द फुटेना, केवळ आनंदाची साक्ष देण्यासाठी डोळ्यातून अश्रू आले. त्याने आवेगाने तिला मिठी मारली. दोघेही निःशब्द झाले होते.

तिथून दिसणारा तो नयनरम्य सूर्यास्त पाहत दोघेही हातात हात घेऊन, सोबतीला एक चिमुकला जीव घेऊन एकमेकांजवळ बसले होते ते पुन्हा साथ न सोडण्यासाठीच !

समाप्त

सदर कथानक हे पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


- © डॉ. प्रथमेश कोटगी

(सदर कथेचे पूर्ण हक्क हे लेखकास्वाधीन असून यातील अंशतः किंवा पूर्ण भागाचे पुनः प्रकाशन करायचे असल्यास वा चित्रीकरण करायचे असल्यास लेखकाची तशी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)

थोडसं नभांतर विषयी -

सर्वाना मनःपूर्वक नमस्कार ! "नभांतर - प्रवास हरवण्यातून गवसण्याकडे..." हि कादंबरी आपण वाचलीत, त्याला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्व वाचकांचे आभार ! तसेच हि कादंबरी प्रकाशित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या बद्दल "टीम मातृभारती" चे सुद्धा खूप खूप आभार ! खरं तर मातृभारती संकेतस्थळावरील हि माझी पहिलीच कथा. याआधी मी एका वेगळ्या संकेतस्थळावर लिहीत होतो तिथेसुद्धा सर्वांचा पाठिंबा - प्रतिसाद छान मिळत होता परंतु काही तांत्रिक कारणाने तिथे लिहणे बंद झाले. आता इतक्या दिवसांनी मातृभारतीने ती संधी उपलब्ध करून दिली !

"नभांतर - प्रवास हरवण्यातून गवसण्याकडे..." ही कादंबरी आपल्याला नात्यांचे महत्व खासकरून मैत्रीचे नाते, मनुष्याच्या स्वभावाचे विविधांगी दर्शन करून देते. कुठे हि जास्त पाल्हाळ न लावता नेमकेपणाने काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो आपल्या सर्वाना हि कादंबरी नक्की आवडली असेल !

सदर कादंबरीमध्ये काही व्याकरणाच्या चुका व इतर चुका असल्यास मी आपली माफी मागतो; भविष्यात त्या नक्की सुधारण्याचा प्रयत्न कारेन. तसेच इतर मार्गदर्शनपर सूचनांचे सुद्धा स्वागत आहे. आपला अभिप्राय नक्की कळवा !

पुन्हा भेटू - एका नवीन कादंबरी सह !

- डॉ. प्रथमेश कोटगी