Ardhantar - 10 books and stories free download online pdf in Marathi

अधांतर - १०

अधांतर-१०

हसरतो के धागो मे हर क्षण,
व्यथा का कण कण पिरोया करे।
शिव-शक्ती मे विभेद जहाँ,
वहां मेरा मनुहार कौन करे?


जस कळायला लागलं तेंव्हापासून 'मुलीच्या जातीने हे करू नये, ते करू नये, असं वागावं, तसं वागू नये' याच सूचना ऐकायला मिळाल्या...ठीक आहे, मुलींना वळण लावण्यासाठी या गोष्टी ही गरजेच्या आहेत, चांगले संस्कार घडावे त्यासाठी थोडा दबावही गरजेचा आहे, मुलींवरही आणि मुलांवरही...! पण आज पर्यंत मला एक गोष्ट कळली नाही की ही 'मुलीची जात' नेमकी असते काय? नाही म्हणजे, मुलांना आणि मुलींना तर देवाने (कदाचित देवीनेही) सारखंच बनवलं आहे ना! त्यांची मनं, त्यांची बुद्धी ही सारखीच असावी, कारण दोघेही मनुष्य प्राणी म्हणूनच जन्माला आले आहेत....मग थोडासा शारीरीक रचनेत बदल झाला म्हणून काय जातच वेगळी झाली का?? आणि अजून हास्यास्पद काय आहे माहीत आहे? जर असे प्रश्न विचारले तर उत्तर मिळतं 'मुलीच्या जातीने जास्त बोलू नये...' आहे ना खरंच हास्यास्पद.... कदाचित ती पीडा हास्यात बदलण्याच सामर्थ्य आणि सहनशीलताही देवाने मुलींनाच दिली असावी.....असो...जेंव्हा हे सगळे प्रश्न मला पडत होते तेंव्हा मी फक्त त्यांच्याकडे दुर्लक्ष करून विक्रम सोबत नवीन आयुष्य कसे असेल याची स्वप्न रंगवत होती...

लग्नाची तारीख जवळ येत होती, जवळपास महिनाच उरला असेल लग्नाला कदाचित, तेंव्हा विक्रम चार दिवसांनी रजा घेऊन घरी आला...मला ते माहीत नव्हतं, मागे जे काही घटना घडल्या आमच्यात तेंव्हापासून मी पुरेपुर काळजी घेत होती की माझ्याकडून अस काहीही घडू नये ज्यामुळे आमचं नातं खराब व्हावं आणि माझ्या घरच्यांना त्यात त्रास व्हावा...आणि माझ्या गप्प बसण्यामुळेच सगळं काही व्यवस्थित चालू होतं...विक्रमचं प्रेम ओसंडून वाहत होत माझ्यासाठी, अर्थातच, मी त्याच्या हातातली बाहुली जे झाली होती...त्यामुळेच सगळं काही व्यवस्थित होतं...

विक्रम मला भेटायला घरी आला, त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून झळकत होता, त्याच कारणही खास होतं... विक्रमच फेज-२ च ट्रेनिंग संपून त्याला भंडाऱ्याला पोस्टिंग मिळणार होती...म्हणजे त्याला घरापासून जास्त लांब राहायची गरज नव्हती, मलाही बरच वाटलं, कारण मलाही आता माझा माहेर जवळच झालं होत...त्या आनंदात तो मला बाहेर घेऊन जायला आला होता...त्याचा आनंद पाहून मलाही छान वाटत होतं....विक्रम मला आज रामटेक ला घेऊन गेला..माझी आवडती जागा, खूप शांतता असते तिथे त्यामुळे मीच बोलली... मंदिरात दर्शन घेऊन, थोडा वेळ तिथे बसून आम्ही घरी यायला निघालो, तर विक्रमने अचानक माझा हात पकडला आणि मला जवळ ओढत बोलला,
"नैना, थांब ना थोडं, जाऊयात आरामात घरी...तुला डोळेभरून पाहता यावं यासाठी तर घेऊन आलोय मी तुला..."

"हो..हो ना तर मग, सोबतच तर आहोत आपण..." मी स्वतःला त्याच्या हातातुन सोडवत बोलली,

"हो, सोबत आहोत, पण जवळ नाही...आज तुला खूप जवळ अनुभवायचय मला..." आणि पुन्हा एकदा त्याने माझ्या कमरेत हात घालून त्याच्याकडे ओढलं....

"विक्रम...प्लिज, बाहेर आहोत आपण, बाबा वाट पाहत असतील, उशीर होईल जायला, सोडा ना प्लिज..." आज विक्रमचा जबरदस्तीचा स्पर्श, त्याची अशी लगट करणं मला खूप त्रास देत होते...मी खूप प्रयत्न करत होती पण माझी ताकत कमी पडत होती, मी आता सगळ्या शक्तीनिशी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला धक्का देऊन मी बाजूला झाली, आणि खूप जोरात ओरडली त्याच्यावर,
"विक्रम...प्लिज...काय घाणेरडा प्रकार आहे हा? तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही का? शी....किळस आली आज मला तुमच्या वागणुकीची...मला घरी जायचंय आताच्या आता...नाहीतर मी घरी फोन करून बाबांना बोलवून घेईल...." हे बोलत असतांना माझ्या डोळ्यांतून अश्रू तर वाहतच होते पण मी थरथर कापतही होती...आणि अश्यात विक्रम माझ्या उजव्या दंडाला पकडत बोलला,

"काय बोलली तू? माझी किळस आली तुला...मग कोण चांगलं वाटतं? तुझा तो मित्र? की माझ्या गैरहजरीत कोणी दुसरा शोधला आता? होणारी बायको आहेस माझी, लग्न होणार आहे आपलं थोड्या दिवसांत, थोडी जवळीकही तुला माझी सहन होतं नाही...."

"लग्न होणार आहे, झालं नाही आहे अजून...मी हे अजिबात सहन करून घेणार नाही...."

"हं... तुझं नशीब चांगलं आहे नैना की मी तुला मिळत आहे, नाहीतर माझ्यासाठी काही मुलींची कमी नाही, तुझी लायकीही नाही तुला माझ्यासारखा मुलगा मिळावा, पण काय आहे ना तुला त्याची किंमत नाही..."

आणि मी काही उत्तर देणार त्याआधी विक्रम माझा हात झटकून गाडीत जाऊन बसला...मला खुप काही सूनवावं वाटत होतं त्याला पण आवर घातला तोंडाला, कारण जर काही बोलली असती तर पुन्हा त्याच्या त्या धमक्या, त्याचं ते इमोशनल ब्लॅकमेल सुरू झाला असता की 'मी लग्न मोडतोय, मला नाही करायचं लग्न वैगरे वैगरे...' आणि कुठेतरी विक्रमला ही गोष्ट माहीत होती की मी आजची घटना घरी सांगणार नाही...सांगणारच नव्हती मी...कारण, तेच ते 'लाज'...पहिली गोष्ट तर घरी हे कसं सांगू? आणि दुसरी गोष्ट ही होती की जर सांगितलं आणि सगळ्यांना माहीत झालं तर विक्रम तर मुलगा आहे, त्यामुळे मुलगी म्हणून बदनाम होण्यासाठी पुरेपूर पात्रता माझ्याकडे होती...आणि त्यामुळे मी तो राग तसाच गिळला...
-----------------------------------------------------
घरी गेल्यावर मात्र मन कुठेच लागत नव्हतं, सारखे विक्रमचे शब्द आठवत होते की माझी लायकी नाही....खूपच निराश झाल्यासारखे वाटत होते, असं वाटत होतं मला फक्त एक संधी मिळावी मग सांगते मी सगळ्यांना माझी लायकी काय आहे ते, आणि या जर तर ची वाट पाहण्यातच मी स्वतःला हळूहळू दुःखाच्या वाटेवर नेत आहे हे मला कळत नव्हतं......पण त्यावेळेस मला हे माहीत नव्हतं की कोणी मला संधी देईल या प्रतीक्षेत राहिलं तर काहीच मिळणार नाही, मला जर काही बनायचं असेल तर संधी नुसतं शोधून चालणार नाही तर मला ती संधी बनवावी लागेल...पण दुर्दैवाने ही गोष्ट खूप उशिराने लक्षात आली माझ्या...

चूक नसताना कोणासमोर झुकणं, आणि आपल्याच आयुष्याचे निर्णय आपल्याला न घेता येणं, यासारखं मोठं दुर्दैव नाही....असे कित्तीतरी असंख्य मरण मला विक्रमने दिले आहेत, की असं म्हणू , मी त्याला संधी दिली आहे ते दुःख देण्यास....हो, मीच दिल्या सगळ्या संधी त्याला, नाही विरोध करू शकली सुरुवातीलाच त्याला मी, आणि यामुळेच तो मला प्रत्येक गोष्टीत गृहीत धरून माझा अपमान करत राहिला....

मी त्यादिवशी विचार केलाच होता की काहीही झालं तरी मी हे सांगणार घरी पण माझ्या नशिबाला वेगळंच मंजूर होतं....आम्ही घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी माझ्या आईवडिलांना विक्रमच्या घरी बोलावणं आलं, मला भीती होती की कदाचित यावेळेस ही विक्रमने आमची गोष्ट घरापर्यंत नेली असेल तर....हा विचार करून मला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं, पण मी स्वतःला धीर देत होती की यावेळी चूक विक्रमची आहे हे मी ठणकावून सांगणार सगळ्यांना....मी माझी मानसीक तयारी केली होती तशी...आईबाबा घरी आले, चिंतेत होते... मला कळून चुकलं की नक्कीच काहीतरी झालंय, मी त्यांना चहा करून दिला आणि सगळं सांगायचं ठरवलं....
"बाबा....मला माहीत आहे माझ्या सासरी काय झालं ते..पण मी खर सांगते यावेळेस मी त्यांचं काहीच ऐकून घेणार नाही...."

"असं नाही बोलू शकत आपण नैना... ते मुलांकडचे लोकं... त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतील मला, उद्या लग्नात या छोट्या छोट्या गोष्टीवरून काही कमी जास्त झालं तर मी समाजात काय मान राहील माझा, मुलीचा बाप आहे मी..."

"बाबा ही छोटी गोष्ट नाही...कोणीच करत नाही असं, तुम्ही इतक्या सहजासहजी कस पचवलं याच विशेष वाटत आहे मला.." मी आश्चर्यने बोलली,

"सगळेच करतात, त्यात त्यांचं काय चुकलं...हे घेणं देणं तर सुरूच राहते लग्नात, पण जर थोडं आधी त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या असत्या तर मला पैसे मॅनेज करायला बरं झालं असतं...आता वेळेवर कसं सगळं होईल...."
आता मला थोडफार लक्षात येत होतं की इथे प्रश्न हुंड्याचा आहे...माझं आणि विक्रमच काय झालं हे तर कोणाला माहीतच नाही...

"कसल्या मागण्या आहेत त्यांच्या?"

"कार मागितली आहे त्यांनी, लग्नाचा एवढा खर्च त्यात ही दहा लाखांची भर....तुझा भाऊही अजुन शिकतच आहे, काही दुसरा मार्ग कळत नाही, एफडी तोडावी लागेल पण त्यातूनही एवढे मिळणार नाही....असो..करतो मी काहीतरी...माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे काही कमी नको राहायला.." असं बोलून बाबा तर निघून गेले पण माझ्या जन्मावरच प्रश्न उपस्थित करून गेले... मला वाटायला लागलं काय अस्तित्व आहे माझं? जर हेच प्राक्तन असेल माझं तर मी जन्म तरी का घेतला..? म्हणजे एक मुलगी लग्नाच्या वेळी तीच्या बापावर फक्त एक ओझं आहे....असं वाटत होतं मोडून टाकावं हे लग्न, पण ते शक्य नव्हतं...मी काय करू जेणेकरून बाबांचं थोडं टेन्शन कमी होईल असं वाटत होतं.... विक्रम..हो, विक्रमचं...त्याला बोलण्याचा विचार केला मी, पण एक भीतीही होती की आमच्यात जे झालं त्यावरुन विक्रम आधीच खूप चिडला आहे, माझं ऐकेल का तो...चलबिचल होती खूप मनात, आणि एक वाटतं होतं की नाही, अजिबात ही मी त्याला बोलणार नाही, कुठल्याही मदतीसाठी त्याच्याकडे भीक मागणार नाही...पण बाबांचा उतरलेला चेहरा आठवला आणि अचानक जागृत झालेल्या माझ्या स्वाभिमानाने तिथेच श्वास तोडला...मी खूप लाचारीने विक्रमला फोन केला, आणि काय विशेष म्हणजे त्याने लगेच माझा फोन उचलला ही...

"बोला मॅडम...काय काम काढलं? मला फोन करताना किळस तर नाही आली ना तुला...?" विक्रमच खोचक बोलणं...

"विक्रम प्लिज, मला बोलायचं आहे तुमच्याशी महत्त्वाच, आपण आपले मुद्दे सोडून नाही बोलू शकत का काही?"

"आपलं मुद्दे कशाला सोडते?? मलाच सोडून दे ना तू..."

"विक्रम, प्लिज, माझा तो अर्थ नव्हता, मला समजून घ्या ना, बोलायचं आहे महत्त्वाच मला...."

"तू समजून घेतले का मला?? होणाऱ्या बायको कडून थोडंस जवळ काय आलो तुझ्या तू तर माझ्या चरित्रावर प्रश्न केले...."

"मी काहीही प्रश्न केले नाही, फक्त माझी मर्जी नसताना तुम्ही मला हाथ लावला ते नाही आवडलं मला...हे आपण नंतरही बोलू शकतो ना, त्यासाठी मनापासून माफी मागते मी तुमची, आधी मला जे बोलायचं ते ऐकून तर घ्या...."

"माफी मागावी असे काम का करते मग तू? चल माफी मागितली म्हणून शांत होतो मी थोडा, बोल तुला काय बोलायचं आहे....."

वारंवार जर आपण नमती बाजू घेतली नातं टिकवण्यासाठी तर त्या नात्यात आपलीच किंमत राहत नाही, माझ्या बाबतीतही तेच झालं, मी नको त्या गोष्टींसाठीही विक्रम पुढे हाथ जोडले, आणि तो मला कमजोर समजत गेला...

मी विक्रमला त्याच्या घरच्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्याबद्दल बोलली, एवढा खर्च बाबांना नाही उचलता येणार हे सांगितल्यावर त्यानेही ते मान्य केलं आणि अस काहीही होणार नाही याची शाश्वती त्याने दिली...मला थोडं बर वाटलं की कमीतकमी विक्रमने काहीतरी सकारात्मकपणे विचार केला, आणि मी थोडी निवांत झाली...

दुसऱ्या दिवशी सकाळीच विक्रम आणि त्याचे आईबाबा घरी आले, त्यांना पाहून मला खात्री झाली की विक्रमने नक्कीच त्याच्या घरच्यांची समजून घातली...मला बर वाटलं की विक्रमने माझा विचार केला...मला पुन्हा वाटायला लागलं की विक्रम थोडा तामसी असला तरी मनाने काही वाईट नाही,

"एवढ्या सकाळी सकाळी येणं केलंत... काही काम होतं का? मला फोन केला असता, मीच आलो असतो ना.."
बाबा बोलले...

"हो थोडं बोलायचं होतं...आता लग्न म्हटलं की खर्च होणारचं, आणि त्यात हे घेणं देणं तर सुरूच असते, पद्धत आहे ती...पण जर तुम्हाला काही अडचण असेल आणि आपल्या मुलीसाठी एवढं ही करणं होत नसेल तर विचार करावा लागेल या लग्नाचा..." विक्रमच्या घरच्यांची धमकी बाबांना अस्वस्थ करून गेली

"अरे अस काय बोलताय तुम्ही, मी तर सगळं मान्यच केलं ना, अस नका बोलू काही तुम्ही, कालच तर सगळं ठरलं ना आपलं, मग आज अस अचानक का तुम्ही बोलताय?"

"हे पहा...आमचा विक्रम एवढा अधिकारी झाला, त्याला तर खूप श्रीमंत घरातुन मुली मिळत होत्या, घेण्या देण्याच्याही अडचणी नव्हत्या काही, पण आता त्याला तुमची नैनाच पसंत पडल्यावर आम्ही काही करू शकलो नाही, पण जगरीतीप्रमाने तर आपण चालयला हवंच ना..आणि तुम्ही नशीबवान आहे की आम्ही खूप काही मागितलं नाही, पण एवढही जमत नसेल तर कस चालायचं...शेवटी प्रश्न तुमच्या मुलीच्या भविष्याचा आहे..."

"हे बघा, माझ्या एकुलत्या एका मुलीसाठी मी काहीही करू शकतो, तुम्ही काही गैरसमज नका करुन घेऊ, आपलं जस ठरलं आहे तसेच होईल, एकदम निर्धास्त रहा तुम्ही..."

असं बोलल्यावर ते शांत झाले, आणि बाकीची बोलणी करून निघून गेले, पण हे सगळं होत असताना विक्रम मात्र काहीही बोलला नाही, मी खूप आशाभूत नजरेने त्याच्याकडे पाहत होती पण तो असा वागत होता जस त्याला काही घेणं देणं नाही...खूप हरल्यासारखं वाटत होतं, असं वाटत होतं, मुलगी म्हणून का जन्म घेतला याची खंत वाटत होती...,तेवढ्यात विक्रमचा फोन आला मला,

"नैना, काल खर तर खूप विचार केला मी, आणि मला वाटलं की माझ्या आईबाबांनी मला एवढं शिकवलं, मी एवढा ऑफिसर झालो मग त्यात त्यांनी थोड्या अपेक्षा ठेवल्या तर काय झालं? आणि तू पण तर याच घरात येणार आहेस ना, मग जे माझं ते तुझं असणारच, त्यामुळे मी माझ्या घरच्यांना विरोध नाही करू शकलो, जे जगरीत आहे ती चालायचीचं, आपण मोठ्यांचा मधात नको पडायला.."

किती सहजच बोलून गेला ना विक्रम की हे पध्दत आहे समाजाची... म्हणजे किती कमाल आहे ना, मुलं काय फक्त यासाठी शिकतात का की लग्नाच्या बाजारात त्यांना जास्तीत जास्त 'MRP' मिळावा? एकीकडे तर पुरुषप्रधान संस्कृतीचा एवढा अभिमान आहे समाजात, मग असा हुंडा मागताना पुरुषांचा 'मर्दपणा' आडवा येत नाही का? एकीकडे तर मुलं मोठमोठे अधिकारी बनणार, प्रशासन गाजवणार, हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या यावर निबंध लिहिणार आणि लग्नासाठी मुलगी पाहताना या गोष्टी विसरून स्वतःच्या पदाचा भाव लावणार? काय विटंबना आहे ही! असे कितीतरी उदाहरण आहेत आपल्या आजूबाजूला, मुलगा जर सॉफ्टवेअर मध्ये काम करत असेल आणि त्यातही जर परदेशात असेल तर त्याचे वेगळे भाव, कोणी जर स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी झाला असेल तर त्याचे वेगळे भाव, डॉक्टर असेल तर त्याचे वेगळे भाव....म्हणजे प्रत्येकाची इथे 'रेंज' ठरलेली आहे...अरे! जर एवढं शिकून आणि मोठ्या पदावर जाऊन तुमची मानसिकता छोटीच असेल तर ते शिक्षण काय चुलीत घालायचं का? असा तर पुरुषी अहंकार खूप भरलेला असतो, मग लग्न करून जर हुंड्यावरच तुमचा संसार चालवायचा असेल तर काय कामचा तो अभिमान? आणि यात जर सगळ्यात मोठी चूक असेल तर ती आहे नैना आणि तिच्या बाबांसारख्या लोकांची....फक्त लग्न मोडेल या भीतीने सगळ्या गोष्टी मान्य करणं हे कुठलं शहाणपन आहे? खंत वाटते की अश्या समाजात आपण राहतो...

आज हे सगळं बोलण्याचा काही फायदा वाटत नाही, कारण जेंव्हा विक्रम अश्या धमक्या द्यायचा मी पण फक्त लग्न मोडेल आणि बदनामी होईल या भीतीने सगळं सहन करत गेली...साखरपुडा मोडला तर चालेल पण एकदा लग्न होऊन जर तुटत असेल तर त्याचा मानसिक आणि सामाजिक त्रास काय असतो याची जाणीव मला आधी नव्हती....
----------------------------------------------–--------
क्रमशः


Share

NEW REALESED