Tu Hi re majha Mitwa - 19 books and stories free download online pdf in Marathi

तू ही रे माझा मितवा - 19

#तू_ही_रे_माझा_मितवा

#भाग_19

कधी हिरवीपिवळी माळरानं,कधी सिमेंटचं जंगल,कधी वाहनांच्या गराड्यात तर कुठे मोकळा रस्ता,कधी ट्राफिक जॅमचा वैताग, घड्याळाचे काटे पुढे सरकत होते,रस्ता मागे पडत होता.उन्हं कलायला सुरुवात झाली होती.

“तुझी हरकत नसेल तर एक काम करायचं होतं?” कबीर म्हणाला.

“काय?”

“पुढे अर्धा तासावर सयगाव आहे ना तिथे मावशीचं फार्महाउस आहे, काही समान ठेवायचंय actually जातांनाच ठेवायचं होतं पण तेव्हा कंटाळा केला ,if you permit.जास्त वेळ लागणार नाही प्रॉमिस.”

“ माझी परमिशन का घेतोय? गाडी तुझी,लिफ्ट तू मला दिलीय, as you wish..”

“अरे एकदम मस्त फार्महाऊस आहे आणि तिथला केयर टेकर ‘टिकटॉक’ त्याने बनवलेला चहा म्हणजे एकदम भन्नाट! फ्रेश होऊ,चहा घेऊ आणि लगेच निघू.”

“टिकटॉक? असंही नाव असतं?” तिला हसू आलं.

“अरे ते तो दिवसभर व्हिडीओ बनवत असतो ना म्हणून.” त्यालाही हसू आवरलं नाही.

“ओके” तिने हसून मान डोलावली.

त्याने फोन करून चहा तयार ठेव अशी ऑर्डरच केली.

छोट्याश्या गावाच्या टोकाला ते टुमदार फार्महाउस होतं. हिरवीगार शेतं, पाटाचं पाणी आणि कमालीची शांतता.
ती खाली उतरून डोळ्यात ते हिरवं सौंदर्य साठवायला लागली.
ह्या हिरवळीचा ही एक वेगळा बाज असतो डोळ्यांना काय फील होतंय हे हृदयाला समजावून द्यायला त्या हिरवळीला रूप असतं तसा सुगंध ही असतो जो मनभरून श्वासात भिनला की ती आपल्यात उतरून आपली होऊन जाते.
क्षणभरात ती सगळं विसरली,हे जे समोर आहे तेच सत्य आहे बाकीचं जग विरघळूनच गेलं जणू तिच्यासाठी.
ती त्या खळखळणाऱ्या पाण्याकडे भान हरपून बघायला लागली,त्या लयबद्ध आवाजाने तिच्या मनावर वेगळंच गारुड केलं.

“टीकटॉक,चल सामान उतरवून घे. ” कबीरने डिक्की उघडली.

“कबीर दादा,ह्या कोण?” गोणी उचलतांना टिकटॉकने हळूच विचारलं.

“मैत्रीण आहे.”

“मैत्रीण आणि तुम्हाला?” टीकटॉक दात काढून हसला.कबीरने त्याच्याकडे एकटक बघत टीशर्टच्या स्लीव्स वर केल्या तसा ”फटके बसायचा” इशारा समजून तो जीभ चावत म्हणाला-

“सॉरी सॉरी...म्हणजे जेव्हा बघावं तेव्हा एकटेच फिरत असतात ना,म्हणून विचारलं.”

“बरं बरं,सामान ठेव आणि चहा तयार आहे ना?”

“तुम्ही आणि मॅडम फ्रेश व्हा, मस्त अदरक मारके चाय तयार आहे, व्हिडीओ बघायचा का चहा करतांनाचा शंभरावर लाईकं आलेत पाच मिनिटांत.” गर्वाने मोबाईल त्याच्या समोर आणत तो म्हणाला. कबीरचा रागीट चेहरा बघून त्याने जीभ चावली.

“बाहेरच आण रे , कट्ट्यावर बसतो जरा.” तो विहीर जवळच्या कट्ट्यावर विसावला.

“ओके दादा” म्हणून तो आत पळाला.

जाडजूड कठडा असलेल्या विहिरीजवळ दगडाच्या हौदात काठोकाठ पाणी भरलेलं होतं. ऋतूने ओंजळ भरून पाणी घेऊन चेहरा धुतला,चुकून ओले झालेले केस जरा झटकले,घट्ट बांधलेली पोनी सोडून केस मोकळे केले आणि सैलसर बन बांधला .ती पुन्हा पुन्हा पाणी हाताने उडवून चेहऱ्यावर घेत होती,पाण्याशी खेळतांना तिचं रूप गोंडस वाटत होतं. थंडगार पाण्याने प्रवासाचा थकवा निघून गेला.गाडी चालवून कबीर ही थकला होता.त्यानेही ते थंडगार पाणी चेहऱ्यावर घेतलं.

शेतात थोडं पुढे सुंदर मचाण होतं,त्यावर खोपटं होतं.

“कबीर एक मिनिट मी त्या मचाणावर जाऊन बघू प्लिज ?” ती लहान मुलीच्या उत्सुकतेने म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता फुलपाखरासारखी बागडत निघालीसुद्धा.

“अरे सांभाळून” काळजीने तो ही मचाणाकडे निघाला.

“दादा चहा?” टीकटॉकने हाक दिली.

“इकडेच आण” तो ही जाता जाता म्हणाला.

शिडीवर उभं राहून त्याने ट्रे ऋतुकडे पास केला आणि तिच्या शेजारी येऊन बसला.

“दादा निवांत चहा घ्या तुम्ही. मी गाडी पुसून घेतो जरा” टिकटॉक गुणगुणत निघून गेला.

“वाव कबीर किती इंटरेस्टिंग आहे हे.मचाणावर चहा” ती तळहातांना होणारा कपाचा गरम स्पर्श फील करत म्हणाली.

समोर थोडी हिरवळ,कुठे काळ्याकरड्या मातीचे वाफे,पाटाच्या पाण्याने ओलसर झालेली जमीन, समोर दूरवर नजरेला बांध घालणारा टेकडीवजा एकच डोंगर आणि क्षितिजावर अलगद रेंगाळणारी संध्याकाळ, वेगळ्याच ,उगाच कातर करणाऱ्या रंगांची उधळण...! थव्याने उडणारी पाखरं,अगदी पोस्टर परफेक्ट संध्याकाळ!

अश्या वातावरणातला एकांत कबीरला नेहमीच हवा हवासा असायचा पण आज तो नसतांनाही त्याचं मन तृप्त होतं.
तर अश्या सावळ्या संध्याकाळच्या एकांतात ऋतूला काय हवंय हे ही नीटसं समजत नव्हतं.वेद्सोबत घालवलेली समुद्राकाठची संध्याकाळ धूसर का होतेय? तिचं हृदय जणू दुप्पट वेगानं धडधडत होतं.
ती चहा घेत क्षितिजावर नजर रोखून हरवून गेली होती.त्याने एक नजर चोरून तिच्याकडे पाहिलं.त्या सैलसर बनमधून हलकेच एक एक करून निसटणाऱ्या बटा,डोळ्यात समोरच्या संध्याकाळला एकदा हात लावून पहावं तिचा स्पर्श कसा असेल ही ओढ,मनात साचलेलं कातर काहीसं..!
ती जणू ह्या संध्याकाळचाच एक अविभाज्य हिस्सा असावी अशी एकरूप झाली होती.

’ह्या छोट्या छोट्या हट्टात लपलेलं बालिश मन,डोळ्यातली चंचलता,निरागसता अशीच राहायला हवी,झोकाळून जायला नको कधीही’ तिला असं स्थितप्रज्ञ बसलेलं बघून उगाच त्यांचा मनात विचार चमकून गेला पण त्याने स्वतःला सावरलं.
ह्या संध्याकाळला जर आवाज असता तर कुठली बंदिश तिने गायली असती ? त्याला उत्तर सापडलं..

“Hello..हरकत नसेल तर एक ५/६ मिनिटांच किशोरीताईचं “सहेला रे प्ले करू? ह्या वातावरणात ‘सहेला रे..’ म्हणजे लाईक समाधी ”

तिने मानेनेच होकार दिला.तिला समोरचं एकही दृष्य नजरेआड करावसं वाटत नव्हतं.

किशोरीताईचे आर्त,धीरगंभीर पण तेवढेच सुखावणारे सूर त्या वातावरणात एकरूप झाले.त्या हवेत बंदिशचे शब्द मिसळून गेले आणि श्वासात भिनायला लागले.हे सूर जणू ह्या वातावरणात आधीपासूनच होते.अमूर्त असे!

“सहेला रे...,हा शब्दच किती सुंदर वाटतोय,हे सुरांनो...चा सांगितला तसा ह्या बंदिशचा देखील अर्थ माहित असेल न तुला,काय आहे ही बंदिश?”

तिची नजर अजूनही समोर होती.तो स्वर्गीय आवाज तिच्या भावनांचं पार्श्वसंगीत कधी झालं ते तिला कळलंच नाही.

सहेला रे...!!

आ मिल गाये

सप्तसुरन के भेद सुनाये

जनम-जनम को संग न भुले;

अब के मिले सो बिछड ना जाये |

सहेला रे..!”

त्याचा दमदार आवाज हळुवार केव्हा झाला त्यालाही कळलं नाही.फक्त त्याचा लयबद्ध श्वासोच्छवास तिला जाणवला.

“सहेला म्हणजे मैत्रीण?” तिने ही त्याच्या श्वासांची लय पकडत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.

संध्याकाळची सावळभूल,मनात भावनांची सरमिसळ स्वप्न,भास आणि सत्य ह्याच्या समेवर कुठेतरी ती उभी होती, अर्धवट,अनवट जाणीवा ...काहीच पूर्ण नाही सगळा गुंता.

“ सहेला....म्हणजे मित्र-मैत्रीण,प्रियकर-प्रेयसी तर आहेच पण सहेला ते हरएक स्वप्नदेखील आहे जे आपल्याला या क्षणी सत्यात उतरायला पाहिजे असं वाटतं.हवी असणारी ती व्यक्ती, जी आपल्यासाठी ह्या जगात आहे आणि तिला ह्याची जाणदेखील नाही...ती ट्वीनसोल व्यक्ती म्हणजे सहेला. त्यांना आयुष्याचं गाणं एकत्र गायचंय..”

“तो ट्वीनसोल ओळखायला चुकलो तर?” ती त्या बंदिशीत कैद झाली. तिचे डोळे भरून आले,त्याच्या बोटांमध्ये तिची बोटं अलगद गुंफली गेली.त्या सुखवणाऱ्या स्पर्शात काळजी होती,सहजता होती आणि मी सोबत आहे हा विश्वास होता.

“सहेला ओळखायला कधीच चूक होत नाही,डोळे उघडे असतांना कदाचित तो समोर नसेल पण बंद पापण्याच्या आड नेहमी असतो तो ” तो शांतपणे म्हणाला.

“पुढे..?” तिने जाणत्या उत्सुकतेने विचारलं.

त्याचा चेहरा शांत होता नी डोळे जणू ती बंदिश गात होते, तिच्यासोबत घालवलेले क्षण फुलपाखरासारखे बोटांवर रंग सोडून नाहीसे होणार आहे त्याने स्वतःला समजवायचा प्रयत्न केला पण शब्दांचं न मनाचं बिनसलं.... तो तिच्याकडे वळला,तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला-

“पुढे ती किंवा तो म्हणतोय की आता पुढचा प्रवास आपण सोबत करायचाय,आपण भेटलोच यासाठी आहे की आता वेगळं व्हायचं नाहीये. आता तुझ्यापासून दूर गेलो ना तर श्वास घेईल कदाचित पण जगणं मात्र थांबून जाईल.मला नकळत प्रेम करायचं शिकवून तू कुठल्या क्षणाला माझं आयुष्य झाली ते कळलंच नाही,तेव्हा आता सोडून जाऊ नको.ह्या सात सुरात लपलेला अव्यक्त अर्थ समजून घे. ह्या एका क्षणात पूर्ण आयुष्य जगू दे आणि आयुष्यातला हा क्षण जगण्याचं कारण म्हणून असाच राहू दे.”

भेटल्यापासून पहिल्यांदा त्याने तिच्यावरची नजर हटवली नाही,तिची नजर रिती रिती होत शून्यात गेली, आर्ततेने गायलेले शब्द ती नकळत त्याच्या डोळ्यात केव्हा वाचायला लागली तिलाही कळलं नाही.
त्याने अनावधानाने हलकेच तिचे केस कानामागे सारले...तिचा प्रतिकार नाहीच आणि त्या क्षणाला अकल्पित अश्या भावनेने मंत्रमुग्ध झालेली ती अजिबात गोंधळलेली,बावरलेली नव्हती.ती फक्त होती.त्याच्यासोबत त्या क्षणात श्वासांच्या लयीत हळुवार बांधलेली !!

“...”तिच्या शब्दांनी प्रतिसाद देणं थांबवलं होतं.

“का आणि कसं माहित नाही पण तू आयुष्यभरासाठी हवी आहे.तुझं तुझ्यात ओसंडून वाहणारं बालपण जपावसं वाटतंय, माहितीय चुकीचं आहे,सगळं कळतंय पण तुझ्याही नकळत तुला चोरून काळजात लपवावसं वाटतंय..…असं ‘तो’ म्हणतोय.”

आता डोळे बोलून दमले,शब्दांनी माघार घेतली. आपसूक तिने डोळे मिटले, श्वासांनी जणू उखाणे घातले ...अवघड असे काहीतरी !

त्याने अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले.
अनोळखी होता तो? छे.. ! तिच्या डोळ्यांतुन दोन थेंब खाली आले.
श्वासांनी घातलेलं कोडं ओठांनी अलगद सोडवलं..चार ओळींची बंदिश त्याने अर्थासकट तिच्या ओठांवर लिहिली.

त्याची आणि तिची संध्याकाळ ओठांवर एक झाली.

मागे चालू असलेल्या गाण्यात एक शेवटचं आर्त आर्जव होत होतं-

“सहेला रे....आ मिल गाये.”

दुसऱ्या क्षणाला गाणं थांबलं तसे ते भानावर आले. ती त्याच्यापासून दूर झाली.गोंधळली ,शांततेत खाली उतरली.तो मात्र प्रचंड घाबरला. तिच्यामागे खाली उतरला.

“ऋतुजा लिसन...I am extremely ….” तो त्याच्या वागण्याने ओशाळला.तिला समजावण्याची केविलवाणी धडपड करू लागला.
“सॉरी म्हणू नको प्लीज.मीसुद्धा equally जबाबदार आहे,हे घडायला नको होतं कबीर ....! पण जे झालं ते म्युचुअल होतं.मला तुला दोष द्यायचा नाहीये.” त्याच्या नजरेला नजर द्यायचं धाडस तिच्यात उरलं नाही.

“ऋतुजा,it was just useless kiss. मी जे काही बोललो त्याला काहीच अर्थ नव्हता,ती बंदिश खूप जवळची आहे मला,माझं ओबसेशसन आहे तो ट्रॅक म्हणून असं झालं.... नाहीतर love game is big no no for me तुला तर माहितीय ना? २४ तास सुद्धा झाले नाही आपली ओळख होऊन,कदाचित मी त्या एकांताचा फायदा घेतला असेल I don’t know but it was casual , I am really very sorry.” त्याच्या कपाळावर घाम जमला होता.

“कबीर,मी कुठलंच explanation मागत नाहीये,प्लीज शांत हो.I know तुझ्याकडून desperation मध्ये झालं असेल आणि माझ्याकडून नकळतपणे,विषय इथेच संपवूया का? ” ती डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली.
“Ok, Ok तू रडू नको, हा क्षण आयुष्यात आलाच नाही असं समजूया,ओके...ग्रेट,रिलॅक्स !चिल!” तो उसनं अवसान आणून तिला आणि स्वतःला देखील समजावत म्हणाला.

एक शब्द ही न बोलता दोघे गाडीत बसले आणि गाडी पुण्याच्या दिशेने निघाली.
रात्रीवर चांदण्यांचा आणि ओठांच्या चुकीचा गुलाबी भार टाकून संध्याकाळ जड पावलांनी निघून गेली.
******

एक अर्ध्या तासात हा प्रवास संपणार होता सयगाव सोडल्यापासून दोघेही शांत होते,हो नाही सारख्या जुजबी शब्दांनी संवाद संपत होता.अवघ्या एक दोन क्षणांनी तिच्या मनात असंख्य प्रश्नाचं काहूर माजलं होतं.त्या शांततेवर ओरखडा पाडत तिचा मोबाईल वाजला,वेद होता.

“पोहचलीस?” आवाजात नेहमीची काळजी आणि प्रेम परत आल्यासारखं वाटलं.
“हम्म,अर्ध्यातासात रूमवर असेन.” येणारा हुंदका दाबत ती म्हणाली.

“उद्या अगदी पहाटेच निघतोय,संध्याकाळी भेटूया.तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय.” त्याचाही आवाज जड वाटत होता.
“लवकर ये” डोळे पुसत ती म्हणाली.
“मिस यु यार ,भेटू उद्या”
तिने फोन ठेवला.कबीरंचं मन अपराधीपणाच्या भावनेने जड झालं होतं.त्याला अजूनही त्या दोन क्षणांवर विश्वास बसत नव्हता. फक्त तिच्या रूमपर्यंतचा रस्ता विचारायला त्याने तिच्याकडे बघितलं,रडून तिचे डोळे अगदी लाल झाले होते.तिने त्याच्याकडे न बघताच कुठे ड्रॉप करायचय ते सांगितलं.मध्येच थांबून जेवण ही उरकण्यात आलं,तरीही ते शांत.

गाडी तिच्या सोसायटीजवळ थांबली.ती उतरणार तसं तो म्हणाला-
“ऋतुजा सॉलिड guilt येतोय.मला पॉसिबल असतं ना मी ते क्षण भूतकाळात जाऊन पुसून आलो असतो,मला तुझ्या मेमरीत असं वाईट प्रकारे राहायचं नाहीये,मी फायदा वैगर घेतला का तुझा? I mean मी काय करू सांग...त्या बोलण्याला काही अर्थ नव्हता ,प्लिज माफ करशील?” त्याची अस्वस्थता क्षणक्षण वाढत होती.

“कबीर,ऐक, सगळं तूच बोलणार आहेस का? माहितीय मला त्या बोलण्याला ,त्या सायंकाळला काहीच अर्थ नव्हता ते ...ओके ? खुश? मी पुन्हा सांगतेय it was mutual,मी देखील जबाबदार आहे,प्लीज विसरूया का?.” त्याच्याकडे बघायचं टाळत ती म्हणाली.

त्याने तिची bag काढून दिली.अगदी वरवर “Thanks ” म्हणत ती वळली.
जड मनाने तो गाडीत बसला, गाडी वळवली आणि भरधाव निघून गेला. तिने डबडबलेल्या डोळ्यांनी पुन्हा वळून बघितलं...डोळ्यात साचलेल्या अश्रूंनी समोरचं सगळं सगळं अस्पष्ट दिसत होतं.कानात मात्र किशोरीताईचा आर्त आवाज स्पष्ट साद घालत होता...

अबके मिले तो बिछड ना जाये

सहेला रे.....!!!

#क्रमशः

©हर्षदा

तुमच्यासाठी तुमची ड्रीम पोस्टर परफेक्ट संध्याकाळ कशी असेल ,जाणून घ्यायला नक्की आवडेल, बऱ्याच मैत्रीण सुंदर कमेंट्स लिहतात त्यांच्याकडून जाणून घ्यायला नक्की आवडेल....!

बाकी तुमचा आवडीचा प्रश्न मंडळी नेक्स्ट पार्ट कधी तर भेटूया उद्या ह्याच वेळी ह्याच पेजवर....!
(लवकरच 1k Like होणार पेजला ,So close so excited...!!)

🔍🔍🔍🔍कालचे भिंग सांभाळून ठेवलेय पार्ट कसा वाटला त्याच्या कमेंट्स शोधायला..☺️☺️