Tu Hi re majha Mitwa - 25 books and stories free download online pdf in Marathi

तू ही रे माझा मितवा - 25

#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_२५

{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}

कोण बरोबर कोण जास्त बरोबर ...!

फक्त प्रश्नचिन्ह!

ह्या प्रश्नचिन्हाला थोडाही आवाज असता तर तो झाडावरून अलगद पडणाऱ्या फुलाच्या वेदनेचाच असता, इतकी नाजूक वेदना दोन्ही काळजात होती.

कोण बरोबर? कोण जास्त बरोबर?

त्याचे ही डोळे भरून आले होते,त्याने सावरलं. ती अजूनही रडत होती पण आज तो तिला अगदी सहज,प्रेमाने “stop crying”म्हणू शकत नव्हता,पण तिचं असं कोलमडून पडणं देखील त्याला सहन होत नव्हतं.
तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांना पुसायला पुढे झालेला हात त्याने जाणीवपूर्वक मागे घेतला.
’कबीर’ हे एकाच नाव त्याच्या डोक्यात फिरत होतं. ‘हे सगळं कदाचित खोटं असावं’ , वेडं मन ऐकायला तयार नव्हतं.धीर एकवटून तो म्हणाला-

“ये ऋतू...तू गंमत करतेय ना,हे कबीरवैगरे काहीतरी उगाच नाव घेऊन हं? ...नंतर हसून ‘स्टुपिड हे सगळं खोटं होतं’ असं म्हणणार,हो ना?”

“वेद हे सगळं तेवढंच खरं आहे जेवढी तुझी ‘मितवा’ खरी आहे,मी तीळतीळ तुटतेय,अस्वस्थ होतेय हे पाहूनही,समजत असूनही रेवा,जय आणि माझ्यामध्ये तू लिखाणासाठी सुरु ठेवलेला उंदरा-मांजराचा जेवढा खेळ खरा होता......Unfortunately कबीर ही तेवढाच खरा आहे,तुला सांगितलेली एक एक गोष्ट खरी आहे..”

डोळे पुसून असावं थांबवायचा वेडा प्रयत्न करत ती जडावलेल्या आवाजात म्हणाली.

‘खरं आहे?’त्याच्या कानांनी फक्त एवढच ऐकलं,असं कसं खरं असेल?’ तो सैरभैर झाला.

“How you dare Rutu ? How? तू सर्वस्वी माझी असतांना, माझ्या हसण्यावर,रूसण्यावर,ह्या खळ्यांवर जीवापाड प्रेम करत असतांना...तू , तू I mean ...you kissed him dam it?
ऋतू फक्त किसपर्यंत थांबलात की अजूनही पुढे काही आहे जे अजून काही दिवसांनी योग्य वेळ पाहून सांगशील? Engagementची एवढी घाई काही स्पेशल कारणासाठी होती का? इतके दिवस जय रेवा मला कानीकपाळी ओरडून हेच सांगत होते.मी मुर्खाने ऐकलं नाही. Tell me Rutu फक्त किस की is there something more ?”

त्याचे डोळे रागाने लाल झाले होते,एका हाताने तिचा चेहरा त्याच्याकडे हिसका देऊन ओढत तो म्हणाला.तिने त्याच्या हात जोरात झटकला.

“वेद....!” ती ओरडली.

तिचे ओठ संतापाने थरथरत होते.तो ही डोक्याला हात लावून,डोळे बंद करून मागे टेकून बसला.त्याच्या ह्या आरोपांनी ती गळून पडली. अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते.

“ऋतू look at me ….”

जरावेळाने दीर्घ श्वास घेत अधिकारवाणीने तो म्हणाला.
तिने तिरस्काराने त्याच्याकडे पाहिलं.त्याचा रडवेला चेहरा खूप काही बोलत होता.

“I am sorry, माझा तोल सुटला बोलतांना,मला मान्यय माझ्या प्रेमाची सुरुवात माझ्या स्वार्थासाठी होती,माझ्या कथेच्या गरजेसाठी होतं पण प्रेम तर होतं ना यार ? तुझ्या-माझ्या विश्वात जर कुणी तिसरा प्रवेश करत असेल तर कुठेतरी कमतरता होती त्या प्रेमात.ती कमतरता तुझ्याबाजूने होती की माझ्याबाजूने याच्या खोलात जाणं व्यर्थ आहे आणि आता ते तेवढं महत्वाचं नाहीये कारण तो धागा तुटलाय....ऋतू खरं सांगतोय, मी नाही हे विसरून पुढे जाऊ शकणार की माझ्याशिवाय ही कुणी तुझ्या डोळ्यात तितक्याच प्रेमाने बघितलंय,तुला स्पर्श केलाय,माझी स्वीटकॉफी नकळत कुणीतरी चोरून घेतलीये....नाही विसरता येणार मला. माझी हार झालीय असं वाटतंय,मी नाही असं हरू शकत कुणा अनोळखी व्यक्तीकडून. प्रेमात माफ करायची क्षमता असायलाच हवी,मान्यय पण सॉरी माझ्याकडे ती नाहीये आणि का माफ करावं मी तुला? ऋतू हीच ती गोष्ट आहे “माच्युरीटी” जी मी expect करत होतो आणि तुझ्यात ती नाहीये. कुणाच्या एकदोन दिवसाच्या सहवासात जे होत्याचं नव्हतं व्हावं असं प्रेम नकोय मला आणि ऋतू ह्या न्यायाने रेवाचं माझ्यावरचं प्रेम खूप उजवं ठरतं जे मी आजपर्यंत नाकारत आलो.
ती जे काही चुकीचं वागत होती ते माझं प्रेम मिळवायला वागत होती आणि ते मी आजपर्यंत समजू शकलो नाही याचा खूप जास्त गिल्ट येतोय ह्या क्षणाला मला.”

त्याचा आवाज टिपेला गेला होता.

“ वेद तुझ्या परोक्ष झालेला एक एक क्षण त्या त्या भावनेशी प्रामाणिक राहून मी तुला सांगितला, कुठलीही गोष्ट लपवली नाहीये. ना ही माझे ‘वेद आणि निशांतसारखे’ प्रेमात दोन रूपं आहे, जे आहे ते आहे आणि ते मी तुला कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलंय.कदाचित तू कथा लिहण्याच्या,ती थ्रिलिंग, एक्सायटिंग करायच्या मोहात न पडता फक्त माझ्यावर प्रेम केलं असतं तर आज दृश्य काहीतरी वेगळं राहिलं असतं वेद पण आता जे घडून गेलं ते मला बदलता येणार नाहीये. ना ही मी,मला त्यावेळी काय वाटलं याविषयी खोटं बोलून आपलं नातं टिकवायचा प्रयत्न केला.
मला माहितीय मी तुला दुखावलंय आणि मच्युअर्ड वागावं कसं हे मला वाटतं ह्या जन्मात शक्य होणार नाही पण हो एक करता येईल माझ्यामुळे कुणाचं आयुष्य खराब होणार नाही याची काळजी घेता येईल आणि हो तू बरोबर बोललास रेवाचं प्रेम सगळ्याचबाबतीत उजवं ठरलं,खरंतर ही तिच्या प्रेमाची ताकद असावी.”

“प्लीज गैरसमज नको करून घेऊ पण ऋतुजा आपण ह्या वळणावरच थांबूया. कधीकधी चूक कुणाचीच नसते तरीही सगळं चुकीच होतं असतं त्यावेळी जरा थांबावं,वेळ जाऊ द्यावा विस्कटलेल्या तारा पाहिजे तिथे बरोबर जाऊन जुळतात आणि तीच आपली डेस्टिनी असते ....आपण वाट बघूया,येणारा काळ जे ठरवेल ते..पण आत्ता थांबूया. तुझं आयुष्य आहे तू निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेस..go with Kabir or whoever else I give damn !! ”

त्याने डोळे डोळे पुसले,उठून बाल्कनीचा दरवाजा धाडकन उघडला आणि बाहेर शून्यात बघत उभा राहिला.
ती उठली चेहऱ्यावर पाणी मारून तिने केस नीट केले,तिची पर्स,स्कार्फ उचलून तिने वेदला आवाज दिला-

“वेद मी निघतेय....."

त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
पाठमोऱ्या वेदकडे आवडत्या पुस्तकाचं शेवटचं पान वाचून मिटावं त्या व्याकुळतेने बघत ती बाहेर पडली.
डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं,कुणीतरी म्हटलं होतं 'अश्रू म्हणजे ९९% फिलिंग्ज आणि एक टक्का फक्त पाणी' आज त्यात पाणी नव्हतच फक्त त्यांच्या प्रेमाचे एक एक क्षण होते जे हळूहळू तिच्या आणि त्याच्याही डोळ्यातून वाहून कोरडे होत होते.

********************

ऋतूचं अबोल झालेलं वागणं आता तनुप्रियासाठी नवीन नव्हतं. आज जास्त काहीतरी बिनसलेलं दिसतंय हे मात्र त्यांनी हेरलं पण त्याची कारणं माहित असतांना रोज रोज त्या गोष्टी नको म्हणून सारं शांततेत चालू होतं.

कुणाशीही काहीही न बोलता ती आतल्या रुममध्ये laptop घेऊन बसली.भरून येणारे डोळे पुसत,मनात येणाऱ्या असंख्य नव्याजुन्या विचारांमधून मार्ग काढत,कुठलीतरी अनामिक जिद्द ठेवून तिने त्या विस्कटलेल्या मनस्थितीत पहाटेपर्यंत बसून सलोनीने पाठवलेलं प्रपोझल भरून मेल केलं.
अंगात कणकण जाणवायला लागली,डोळे जडावलेल्या अवस्थेत तिला झोप लागली. काही तासांनी नेहमीप्रमाणे प्रिया तिला उठवायला गेली तेव्हा तिचं अंग चांगलच तापलेलं होतं.दोघींनी मिळून तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली.तिला त्या थंड स्पर्शाने जरा जाग आली.

“ऋत्या डोळे मिट झोपून रहा,अंग तापलंय तुझं आणि थोड्यावेळाने लिव्ह अप्प्लाय कर,आज जाऊ नको समजलं ना.” तनुने तिच्या केसांत प्रेमाने हात फिरवत म्हटलं.

“ हो आणि ब्रेकफास्ट करून tablet घे,संध्याकाळी डॉक्टरकडे जाऊया.”

“ऐक संध्याकाळी ताईला बोलावतेय,तुम्हीही या लवकर या मला बोलायचंय..” तिला त्या परिस्थितीतही हुंदका अनावर झाला.

“ये वेडू तू आराम कर आपण निवांत रात्री बोलू.”

तनु प्रिया ऑफिसला निघून गेल्या पण डोक्यात सतत ऋतूचाच विचार होता.ती संध्याकाळी काय बोलणार याचीच चिंता त्यांना दिवसभर सतावत होती.

*********

अभय ऑफिसमधून आला तेव्हा हॉलची हालत पाहून तो हबकलाच. फाडून फेकलेल्या कागदांनी पूर्ण हॉल भरलेला होता. टेबलावर पडलेल्या दोन बियर बॉटल पाहून त्याला आश्चर्य वाटलं. वेद तिथेच सोफ्यावर डोकं टेकून झोपला होता.
अभयने त्याला व्यवस्थित वर झोपवायचा प्रयत्न केला.
“Ved get up, are you dunked?”

“Bro, सगळं संपलं रे...”

सोफ्यावरून परत खाली बसत तो हलक्याश्या नशेत बरळला आणि तिथेच खाली झोपला.
अभयला एव्हाना कळून चुकलं होतं की ऋतू वेदमध्ये जे बिनसलं होतं ते आज काहीतरी निर्णायक वळणावर आलं आहे.
जरा ताकद लावून उठतं करून त्याने पुन्हा त्याला सोफ्यावर टाकलं. वेद शुद्धीवर आल्यावर नक्कीच काहीतरी अप्रिय ऐकायला लागणार ह्या विचारानेच तो बैचेन झाला.

************

“ऋतू are you ok?”

वेद आणि ऋतूमध्ये खूप जास्त बिनसलंय ह्या आशयाचा मेसेज तिला अभयकडून मिळाला होताच पण काय झालंय हे नेमकं अभयलादेखील त्याने सांगितलं नव्हतं.

रीमाताईला आलेलं बघून ऋतूला हायसं वाटलं,तिच्या चेहऱ्यावरची मरगळ जरा दूर झाली.

“ताई क्लिनिकमध्ये जाऊन आलोय, जरा ताप आला होता आता ठीक आहे ती.” तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत प्रिया म्हणाली.

“ऋत्या काय झालंय बाळा?” रीमाने तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला.

“तनु प्रिया तुम्ही ही येऊन बसा मला बोलायचं जरा.”

तिचा आवाज क्षीण झाला होता. तिच्याभोवती तिघीही येऊन बसल्या.

“ताई अगोदर तुला वाढदिवसाला काय झालं ते सांगते..”
ऋतूने कबीरच्या शेवटच्या भेटीपर्यंत जे झालं ते सगळं सविस्तर सांगितलं.रीमा गोंधळात पडली,तनुप्रिया नाराजीने ते सगळं ऐकत होत्या.

“ताई हे मी तुला सांगितलं नव्हतं आणि काल संध्याकाळी जे झालं ते तुम्हा तिघींना मला सागायचं आहे.”

तिने वेदची “मितवा” त्यामागची मिराकीची सगळी कहाणी अगोदर सविस्तर सांगितली. तिघीही ह्या वेगळ्याच विषयाने भांबावून गेल्या.
वेदचं लिखाणाचं ओब्सेशन इतकं जबरदस्त होतं ह्या विचाराने अगदी सून्न झाल्या.

“आणि तू कबीरबद्दल सांगितलं त्याला?” प्रियाने विचारलं.

“हो अगदी एक न एक क्षण जसा होता तसा त्याला सांगितला,त्यामागची प्रत्येक इमोशन सांगितली मला कुठलीच गोष्ट manipulate करून त्याला सांगायची नव्हती.”

“मग त्याची काय reaction होती?” तनुला अजूनही हे काय चालूये पुढे काय होणार ह्या विचारानेच टेन्शन येत होतं.

“ त्याने समजून घेतलं नाही आणि तशी अपेक्षा ही नव्हती खरतर मला , पण तो ’फक्त कीस की त्या पुढेही गेलात’ हे जेव्हा बोलला तेव्हा मात्र मी ह्या नात्यातल्या सगळ्या अपेक्षा सोडल्या.”

“म्हणजे?”

“ताई त्याने आमच्या नात्याला पूर्णविराम दिलाय, 'नाही विसरू शकत आणि माफ ही नाही करू शकत' म्हणतोय मला माझ्या त्या चुकीसाठी.” तिचा आवाज जडावला.

“आणि जाणूनबुजून तो जी चूक करत होता त्याचं काय? तुझ्या इमोशन्सचा पहिल्या दिवसापासून उपयोग करून घेत होता त्याचं काय?त्याच्या मनाप्रमाणे तुमच्या प्रेमाची गोष्ट लिहित होता त्याचं काय? त्यासाठी तू माफ केलंय त्याला?” प्रियाला राग अनावर झाला होता,scripted लव्ह स्टोरी कुणी कशी काय जगू शकतं हेच तिला कळत नव्हतं.

“प्रिया तो लिहित होता पण खोटं काही नव्हतं ग त्यात.हो, जाणूनबुजून सिन्स,डायलॉग क्रियेट करत होता हे खरंय पण तरीही मी प्रेमात होते ना, माझं प्रेम तर scripted नव्हतं मग मी अशी का वागले हे त्याला सहन होत नाहीये आणि माझ्याकडे त्याचं समाधानकारक उत्तर आजही नाहीये.”

“यार याला काय अर्थय”

“तनु he is right मी चूक केलीय,मी नाहीये कुणाच्याच प्रेमाच्या लायक.”

“ऋतू शांत हो बरं,मी बोलू का वेदशी? रीमाचं ह्या सगळ्या प्रकरणाने डोकं चक्रावलं होतं.

“नाही ताई, मी ओळखते त्याला तो माझी चूक कधीच विसरणार नाही आणि त्यासाठी मला माफ देखील करणार नाही.त्याला ही त्याची हार वाटतेय आणि मी? मलादेखील काही गोष्टी विसरता येणार नाही,ती संध्याकाळ तर नाहीच नाही आणि त्या ओझ्यासकट पूर्वीसारखं सहज वागता ही येणार नाही.”
तिने निर्धाराने डोळे पुसले.

“काहीच गरज नाहीये ऋतू माफी मागायची.” तनु ठामपणे म्हणाली.

“एक मिनिट ..आणि कबीर? कबीरचं काय?” रीमाने ऋतूचे डोळे वाचायचा प्रयत्न करत म्हटलं.

“त्याचं काय? कबीरचा इथे प्रश्नच नाहीये ताई.” ती शक्य तितक्या ठामपणे म्हणाली.

“तुला नक्की कबीरविषयी काहीच वाटत नाही?म्हणजे प्रेम वैगरे?आणि त्याला? Are you sure तो तुझ्या प्रेमात नाहीये? त्या संध्याकाळी जे जे तो बोलला त्यात अजिबात प्रेम नव्हतं?”

प्रियाने शेवटी मनात असलेला प्रश्न तिला विचारूनच घेतला.

“प्रियु कबीर एक मोमेंट होता त्याचं अस्तित्व तेवढंच, मला काय वाटतं किंवा त्याच्या मनात काय होतं ह्या प्रश्नांना शून्य किंमत आहे.कबीर अर्धवट झोपेतल्या स्वप्नासारखा होता,ही अशी स्वप्न सत्यात नाही उतरत कधी.प्लीज कबीरचा ह्यात काही विषय नाहीये.तो त्याच्या कामात गुंतला देखील असेल.” डोळ्यातून वाहणारं पाणी पुन्हा पुन्हा पुसत ती म्हणाली.

“बरं मग पुढे काय?”

“माहित नाही ताई पण मुंबईब्रांचचा सहा महिन्याचा प्रॉजेक्ट आहे. त्याचं प्रोपोझल भरलंय काल. त्यात सिलेक्ट झाले तर १००% मुंबईला जाईन. तू मदत करायची आईबाबांची परमिशन काढायला आणि नाही झालं तर ‘the girl who cheated’ चा tagघेऊन काम करेन,what else.!! ”

“ऋतू यार आम्ही नाही तुला एकटीला कुठे जाऊ देणार, वेड्या तुला सांभाळता तरी येतं का स्वतःला?”

“तेच तर शिकायचंय ना. मच्युअर्ड व्हायचा प्रयत्न करते जरा, वेद म्हणतो रेवा मच्युअर्ड आहे,तिचं प्रेम खरं आहे.खरं प्रेम माच्युरीटीमध्येच तर असतं ना तनु.” ती तनुच्या कुशीत शिरून रडायला लागली.

तिघीही ऋतूला कितीतरी वेळ समजावत राहिल्या.एका गोड वळणावर सुरु झालेल्या छानश्या नात्याचा अकल्पित अश्या वळणावर शेवट झाला होता.
कोण बरोबर कोण जास्त बरोबर हा गुंता कधीकधी सुटतच नाही.
क्रमशः

Copyright©2019 हर्षदा

All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.