Malva books and stories free download online pdf in Marathi

माळवं

माळवं

आज रविवार होता. डयुटीला सुट्टी असली तरी घरातली बरीचशी कामे करावी लागत होती. त्यात आज गावचा बाजार होता. अमितला माळवं आणण्यासाठी बाजारात जाण्याचा खुप कंटाळा आला होता. पण आईनं सकाळपासूनच त्याच्या मागे बाजार करुन ये, म्हणून भूणभूण लावली होती.दुपारचे दोन वाजले होते. अमित नाराजीनेच बाजारात आला. मो माळव्याच्या आळया फिरुन माळवं घेवू लागला.तितक्यात त्याला माळव्याच्या चौथ्या अळीला एक सतरा-अठरा वर्षाची गोरीपान मुलगी माळवं विकताना दिसली. एखाद्या चित्रपटातील नटीलाही लाजवेल असं सौंदर्य होतं तिचं. त्याला आश्चर्य वाटलं. जी मुलगी फुलांच्या पाकळयात अलगद जपून ठेवावी इतकी नाजूक,सुंदर आणी कोमल होती ती अशा रणरणत्या उन्हात माळवं विकत बसली होती.

तिच्या जवळ टमाटे आणी बटाटे असं माळवं होतं. ते अमितने आधीच घेतले होते. तरी ते तसेच पिशवीत सारुन तो तिच्याकडे गेला.

त्यानं तिला विचारलं, “बटाटे किती रु.किलो आहेत?”

ती म्हणाली, “पंधरा रु. किलो आहेत.”

त्यानं एक किलो बटाटे घेवून तिला वीस रुपयांची नोट दिली. तिच्याकडे पाच रु.चिल्लर नव्हते.

तो म्हणाला, “राहु दे. पुढल्या वेळेस दे.”

त्यानं पिशवी उचलली, उन्हाचा पारा भलताच चढला होता. तो माळव्याच्या आणखी एक-दोन आळया फिरून माळवं घेवून रवीच्या पालातल्या चहाच्या हॉटेलमध्ये जावून बसला.रवीच्या हॉटेलमधून थोडयाच अंतरावर ती मुलगी बसली होती. तेथून ती अमितला स्पष्ट दिसत होती. रवी अमितच्या गल्लीतला होतकरु मुलगा होता. तो बाजार दिवशी हॉटेल चालवून इतर दिवशी कॉलेजपण करत होता. रवीचं रसवंती आणी चहाचं हॉटेल होतं. काही लोक उसाचा थंडगार रस पित होते. तर काही लोक उन्हामध्ये चहा पिल्यानं ऊन उतरतं, म्हणून चहा पित होते. रवीनं थंडगार ऊसाचा रस अमितला दिला.

अमितने रविला विचारलं, “अरे, ती मुलगी माळवं घेवून विकायला बसली आहे, ती कोण आहे?”

त्यावर रवीने तिच्याकडे पाहिले, आणी तो म्हणाला,

“ती होय, तिचं नाव अंजली. माझ्याच कॉलेजमध्ये आहे. खुप हुशार आहे ती.”

अमितने परत विचारलं, “कोणत्या गावची आहे ती? मी यापुर्वी पाहिलं नाही तिला.”

तो म्हणाला, “ती हाटकरवाडीची आहे. आधी तिचे वडील माळवं विकायला यायचे. एक महिन्यांपुर्वीच ते वारले,तिची आईपण अपंग आहे त्यामुळे तीच येते आता माळवं विकायला.”

तिच्या परिस्थितीबद्दल ऐकून आणी तिच्याकडे पाहून अमितला तिची खुप किव आली. इतकी वाईट परिस्थिती असतानाही ती जिद्द न हरता, संघर्ष करते. हे पाहून आणी तिचं सौंदर्य पाहून अमित नकळतपणे तिच्या प्रेमात पडला.

तो तिच्याकडे एकटक पाहत होता. रवी गिऱ्हाईक करत होता. तिची ती माळवं विकण्याची तळमळ तो पाहत होता.उन्हामुळे तिच्या चेहऱ्यावर घाम दिसु लागला होता. तिचा गोरापान चेहरा लालेलाल झाला होता. शेजारच्या माळव्यावाल्याच्या पालाची सावली आपल्या अंगावर येण्याची ती वाट पाहत होती. अजून बरंच माळवं विकायचं शिल्लक होतं. थोडयावेळानं गावातील विशी ओलांडली तरी आईबापाच्या जीवावर खाणारं, टवाळक्या करत फिरणारं टुकार पोरांचं टोळकं अमितला दिसलं. ते तीन-चार जण अंजूजवळ आले. माळवं घ्यायचं नसताना काहीही भाव मागून तिला परेशान करु लागले. तिची छेड काढू लागले. मध्येच फालतु विनोद करुन जोरजोरानं हसु लागले. त्यांच्या अशा वागण्यानं ती भेदरली. तेवढयात त्यातील एक जणाची नजर अमितकडे गेली. अमित त्यांच्याकडे रागानंच पाहत होता. त्यानं दुसऱ्यांना अमित इथं बसल्याचं इशाऱ्यानेच सांगीतलं. सर्वांनी अमितकडे पाहिलं,ते गपचुप निघून गेले. अमितचा पंचक्रोशीत चांगलाच दबदबा होता. चांगला घरंदाज आणी तालेवार माणूस होता तो. त्याच्या एका इशाऱ्यावर त्याच्या भावकीतील, गल्लीतील पोरं काही पण करायला तयार असत. म्हणूनच ते उनाड पोरांचं टोळकं मुकाट्याने निघून गेलं होतं. अमितला भिवूनच ते पोरं पळून गेले. हे अंजूच्याही लक्षात आलं होतं. सुर्य मावळतीला आला होता. तरी अमित तेथेच बसून होता. लोक आवराआवर करु लागले. अंजूनं पण आवरलं, तिच्या गावाकडील काही म्हाताऱ्या बाया व माणसं होती. त्या सगळयांमध्ये एक गाडी होती, त्यामध्ये बसून अंजू निघून गेली. दोघेही नजरेआड होईपर्यंत एकमेकांकडेच पाहत होती.

हप्ताभर पाहता न आल्यामुळं अमित बेचैन झाला होता. एकदाचा रविवार उजाडला. तो सकाळीच पिशवी घेवून रवीच्या हॉटेलमध्ये येवून बसला. तेवढयात अंजूच्या गावाकडील गाडी आली. अंजूला पाहताच त्याला खुप आनंद झाला. अंजूने माळव्याचं टोपलं खाली उतरवलं. आज तिच्याकडे लिंब आणी काकडी होती. तिनं दुकान लावलं. पाणी घेण्यासाठी ती कळशी घेवून रवीच्या हॉटेलकडे आली. तिनं अमितला हॉटेलमध्ये बसलेलं पाहिलं आणी ती गालातल्या गालात लाजून हसली. तिनं टाकीतलं पाणी घेतलं, ती परत आपल्या दुकानाकडे गेली. तिने काकडी व लिंबावर पाणी शिंपडलं. अमित तिला पाहत होता. तीही अमितकडेच पाहत होती. आणी तिच्या शेजारी माळवं विकण्यासाठी बसलेली एक म्हातारी त्या दोघांकडेही पाहत होती. हे जेव्हा दोघांच्याही लक्षात आलं, तेव्हा त्यांना चोरी पकडल्यासारखं झालं. तरीही म्हातारीची नजर चुकवून ते एकमेकांकडे पाहतच होते. तो रविवारही असाच एकमेकांकडे पाहण्यात गेला.

हप्ताभर पुन्हा अमित बेचैन झाला. आता या रविवारी तिच्याजवळ आपलं प्रेम व्यक्त करायचंच. असं ठरवूनच तो बाजारात येवून बसला. तिच्या गावाकडची गाडी आली, तिच्या शेजारची म्हातारी पण आली, पण अंजू आली नाही. तो दुपारपर्यंत तिची वाट पाहत बाजारात थांबला. पण ती आली नाही. त्याला तो रविवार आणी तेथुन पुढील हप्ता खुपच कठीण गेला. तो पुढच्या रविवारीही बाजारात लवकरच येवून थांबला. आजपण सगळे आले होते. पण ती आली नव्हती.

त्याने रविला विचारलं, “अरे, तुझ्या कॉलेजमधील ती मुलगी कशी आली नाही रे आज?”

त्यावर रवी म्हणाला, “ती कॉलेजलापण येत नाही आता.”

अमित विचारात पडला, असं काय घडलं असेल? ज्यामुळे ती बाजारात येत नाही. त्यानं हुशारीनं तिच्या शेजारी बसणाऱ्या म्हातारीला विचारलं, “काय आजी, आज तुमची शेजारीण आली नाही वाटतं.”

त्यावर ती म्हातारी म्हणाली, “कोण अंजू होय, आरं, तिचं लगीन झालं. पाहुणं आलं, पोराला पोरगी पसंद पडली. तिच्या आईनंपण पोरीचं चांगलं होतंय म्हणल्यावर लगेचच लग्नाला होकार दिला. पोरगं मोठा साहेब हाय जणु शहरात.”

अंजुचं लग्न झालेलं ऐकून अमितला खुप निराश वाटलं. तो एकांतात लांब तळयाकडे जावून बसला. थोडा वेळ विचार करुन तो मनाशीच म्हणाला, जाऊ द्या चांगलं झालं अंजुचं. फक्त तिच्या नवऱ्याने त्या नाजूक कळीला हळुवारपणानं जपावं, आणी आजपर्यंत तिनं भोगलेलं दु:ख तिला विसरायला भाग पाडून सुखात ठेवावं. तो परत बाजारात आला आणी माळवं करुन घरी गेला.