Emotional intelligence books and stories free download online pdf in Marathi

भावनिक बुद्धिमत्ता

मध्यमवर्गीय बंटी पदवीदान समारभातून सुवर्ण पदक ,नव्या डिग्रीचा कागद आणि मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास घेवून बाहेर पडतो .कुुशाग्र बुुद्धिमत्ता लाभलेेल्या बंटी कडूूून सर्वांच्या खूप अपेक्षा असतात .बंटी पैसा ,नाव, यश मिळवणार ,अशी सर्वांची खात्री असते .झालेही तसेच .त्याची गुणवत्ता पाहून मोठया कंपनी मधून जॉब ऑफर येते .मुलाखतीच्या रांगेत दिखाऊ ,आणि बढाई खोर उमेदवारांच्या गप्पा ऐकून बंटीचा आत्मविश्वास आणि हातातील फाईल दोन्ही गळून पडतात.
पदक, डिग्रीची फाईल आणि बंटी सर्वांवर काजळी चढत आहे ,असे पाहून त्याचे वडील चार -दोन ठिकाणी शब्द टाकून ओळखीत चिकटवतात. इतर सहकाऱ्यांच्या वाउचर आणि बिलामधील दोष आणि त्यामागची अश्रू आणणारी कारणे, यांचा मेळ न घालता आल्यामुळे बंटीची बॅलन्स शीट आणि जीवनाचा हिशोब चुकतो . भावूक कारणे देऊन उशिरा आलेल्यांमुळे हजेरी पुस्तकही बिघडते.
बंटीची आता out door म्हणजे कारखान्यात रवानगी होते. तेथील कामगारांची दुःखे ऐकून हललेला बंटी मजदूर- मालक सभेत जोरदार भाषण ठोकतो . दुसऱ्या दिवशी कामावर निघण्याआधी शिपायकरवी एक लखोटा बंटीच्या हातात पडतो.
बंटीला आईचे दागिने विकून नवीन व्यवसाय सुरू करून दिला जातो. मालाच्या डिलिव्हरीनंतर पैशांच्या वसुलीला गेलेला बंटी, घशात आवंढा घेऊन परत येतो. या साऱ्या संघर्षात सकारात्मक बाब म्हणजे शेजारची निमा .भावना व्यक्त करण्याचे त्याचे विश्वासाचे ठिकाण .तिच्या डोळ्यांत पाणी नको म्हणून तिच्या हौसेखातर साखरपुड्यात बंटी कर्ज काढून हिऱ्याची अंगठी देतो .
बाजारातून उचललेला कच्चा मालाच्या पैशांच्या वसुलीसाठी , देणेकरी एकत्र मिळून बंटीच्या व्यवसायाला टाळे लावतात .
बंटी खचून घरी येतो. घरी आल्यावर समजते की , निमा त्याची बुडती नौका सोडून पैलतीरी गेली आहे .दुःखाने खचून तो खाली कोसळतो .
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनांचा त्याग नव्हे. भावना निरुपयोगी, त्याज्य मुळीच नाहीत. त्यांच्या अभावी मनुष्य पाषाणवत, यंत्रवत होईल. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनांचे नियंत्रण, इतरांच्या भावनांशी समायोजन adjustment, त्यांचे उचित प्रकटीकरण होय.
उत्तम बुध्यांक IQ असणाऱ्या व्यक्ती ,व्यावहारिक जीवनात भावनिक होऊन निर्णय घेतल्याने अपयशी ठरू शकतात. संवेदनशील असणे वाईट नाही .फक्त भावनांवर योग्य नियंत्रण असणे आवश्यक आहे. भावूक होऊन निर्णय घेण्यापेक्षा बुद्धी आणि अनुभूतीस प्राधान्य द्यावे .यादृष्टीने व्यापक असणारी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना संक्षिप्त स्वरूपात मी मांडत आहे. सदर स्तंभलेखन ही माझी वैयक्तिक अभिव्यक्ती असून, संकल्पना मांडणी ही माझ्या आकलनशक्ती नुसार केलेली आहे .मी मनोवैज्ञानिक नाही ,तेवढी प्रतिभाही मज पामराजवळ नाही .माझे मत सर्वांना स्वीकार्य व्हावे ,असा माझा दुराग्रहही नाही. केवळ मानसशास्त्रीय संकल्पना सर्वदूर पसराव्यात हाच उद्देश आहे.

Daniel Goldman ," Emotional Intelligence is the capacity for recognizing our own feelings and those of others for motivating ourselves and managing emotions well in ourselves and in our relationships "
स्व भान :
स्वतः च्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याचा प्रयत्न करावा .कोणत्या प्रसंगी काय प्रतिक्रिया द्यावी , अथवा देऊ नये ,हे बुद्धी नुसार ठरवावे .कधी कधी प्रतिसाद हे प्रासंगिक किंवा क्षणिक असतात. पण त्या भावनेच्या भरात केलेली कृती ,उक्ती यांचे परिणाम दूरगामी आणि व्यापक असू शकतात .
भावनांचे प्रकटीकरण :
व्यक्त होणे ही गरज आहे. विशेषतः नकारात्मक भावनांचा निचरा होणे आवश्यक आहे. शाब्दिक आणि अशाब्दीक दोन्हीही प्रकारे भावनांची अभिव्यक्ती शक्य आहे . रोजनिशी /डायरी लिहिणे ,ध्यान साधनेत आत्म संवाद साधणे ,चित्रकला ,कविता ,संगीत आदी कलाविष्कारामधूनही मनातल्या कोंडलेल्या भावना व्यक्त करता येतात. नृत्य ,नाट्य ,शिल्प ,हे विभिन्न प्रकार म्हणजे भावना अभिव्यक्तीच आहेत .
शाब्दिक प्रकटीकरण करताना ,स्वतः वर आणि इतरांवरही त्याचा वाईट परिणाम होणार नाही; यासाठी भावनिक संयम ठेवावा .भावनांचा गैर वापर होणार नाही याचे भान राखावे .आपले शब्द योग्य असावेत भडक ,उत्तेजक शब्द , तीव्र शारीर भाषा टाळावी . सोशल मीडिया व जेथे प्रत्यक्ष जमाव आहे अशा ठिकाणी , "समूहमन " कार्यरत असते ,एकाचे अनुकरण दुसऱ्या द्वारे होऊ शकते वैचारिक संक्रमण तात्काळ घडते ,आशा ठिकाणी विवेक आणि भावना नियंत्रण करावे .जेथे भावना गुंतलेल्या असतात, अशा ( धर्म ,संस्कृती, प्रेम ,आदरणीय व्यक्ती ) संवेदनशील बाबतीत संयम व विवेक बाळगावा .भावनिक तोल ढळू देऊ नये.
नकारात्मक आणि सकारात्मक भावना :
परिस्थिती किंवा व्यक्तीचा संवेदनशीलपणे विचार करण्यात काही गैर नाही .फक्त भावनिक होऊन वाहून जाऊ नये . नकार ,अपयश ,न्यून ,तोटा हा जीवनाचा भाग आहेत. त्यावर रेंगाळत राहिल्याने व्यक्ती भावनेच्या आहारी जाते .त्याचा स्वीकार करून,मात करून पुढे जावे .वस्तूमध्ये ,व्यक्तीमध्ये अतिरिक्त भावना गुंतवून ठेवू नये .स्वतःला आणि समाजाला बाधक भावना ओळखून वेळीच त्याचे दमन करावे .हळवेपणा पेक्षा भावनिक तटस्थ राहून निर्णय घ्यावेत .काही मानसिक समस्या या भावनिक त्यामधून उत्पन्न झालेल्या असतात .
अशी ही मनोभावना त्याज्य ,निरुपयोगी अजिबात नाही. तिच्या अभावी मनुष्य संवेदनाहीन होईल. हे सुद्धा घातक आहे . सेवारुपी भावनांनी प्रेरित होऊन डॉ आंबेडकर , नेल्सन मंडेला ,बाबा आमटे, मदर तेरेसा, सावित्रीबाई फुले ,हे सारे पूजनिय बनले . वृद्ध, रोगी पाहून ,परदुःखाने भावविव्हल होऊन राजपुत्र सिद्धार्थ परमज्ञानी बुद्ध झाले .बुद्धी, ज्ञानावर त्यांनी विजय प्राप्त केला .अत्यंत उत्कृष्ट अशी महाकाव्ये ,नृत्य, संगीत आदी कलाविष्कार मनाच्या उच्चतम् भाव विभोर अवस्थेतच निर्माण झालेली आहेत .
म्हणून भावना आणि मनाला स्वैर भटकू न देता त्यांचे नियंत्रण ,सुव्यवस्थिकरण करावे . भावनांच्या सद्भावना कराव्यात , यशाचा आणि सुखाचा मार्ग सुकर होईल .
© पूर्णा गंधर्व