Information, knowledge and wisdom books and stories free download online pdf in Marathi

माहिती, ज्ञान आणि शहाणपण

माहिती ,ज्ञान आणि शहाणपण ह्या दैनंदिन जीवनातील उपयुक्त आधुनिक संकल्पना स्पष्टतेसाठी, प्राचीन कथेचे मी केलेले आविष्करण हि सर्वथैव माझी वैयक्तिक अनुभूती , मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांना आधारभूत ठेवून केलेली आहे. ज्ञानी ,शहाण्या गुणिजनांनी आपल्याठायी असणाऱ्या ज्ञान आणि शहाणपणाची जोड देऊन, ही अपूर्ण कलाकृती मनीमानसी पूर्ण करावी , हा विनम्र अनुरोध.
निरागस बालमनावर गुरुकुलातील देवरूपी गुरूंचे संस्करण होत असे ,असा हा काळ . निः संग ऋषींचा ज्ञानरुपी सहवास लाभून , ज्ञानार्जनाचा समारोप करून शिष्य स्वगृही परतणार होते . ज्ञानी , अनेक प्रकारचे विषय आत्मसात केलेले , अनेक विद्यार्थी दीक्षादान समारोहात श्रेष्ठ शिष्याची उपाधी मिळविण्यासाठी तत्पर झाले. अग्रक्रमी असणाऱ्या तीन शिष्यां मध्ये स्पर्धा चुरशीची होणार हे नक्की होते.
पहिला शिष्य कुशाग्र बुद्धीचा . त्याची मेंदूची संग्रहण शक्ती तीव्र. दुसरा ज्ञानी,उत्तम सल्लागार. तिसरा अनुभवाने , कृतीने प्रश्नांची समस्येची उकल करण्यात निष्णात . या निर्णायक सभेत काही निष्कर्ष निघणार तोच ,आजूबाजूच्या वस्त्यांमधील काही नागरिक ऋषी आश्रमात येतात. अवर्षणग्रस्त ( पाऊस न पडल्याने ओढवणारा सुका दुष्काळ) त्या दीन गावकऱ्यांची मदत करण्यासाठी ऋषी त्या तीन शिष्याना आज्ञा देतात. राजाची मदत मिळण्यापूर्वी प्राथमिक सहाय्यता देण्याच्या त्यांच्या क्षमतेवरून श्रेष्ठत्व सिद्ध होणार असते. तिघेही काही दिवसांसाठी तीन गावांत रवाना होतात.
मध्यंतरी , लोकांकडून मुनी त्यांच्या प्रगतीच्या वार्ता एकत असतात. काही दिवसांनी तिघेही चेहऱ्यावर संतुष्टी घेऊन परततात. पहिल्या शिष्यास कार्यकथनाचा आदेश झाल्यावर, तो अत्यंत उत्कृष्टरित्या गावातील घर ,जनसंख्या , पाण्याचा वापर ,पाण्याचे स्त्रोत यांची चपखल माहिती देतो . ही माहिती राजाला उपाययोजना आणि आपत्ती निवारणासाठी उपयुक्त ठरली असती. त्याची तीव्र बुद्धी ,उत्तम माहिती संकलन पाहून गुरुसह सारेच अवाक होतात. दुसरा विद्यार्थी शेजारच्या गावात पाणवठे , नैसर्गिक जलस्त्रोत कोठे आहेत त्यांच्या वापरासाठी परवानगी कोण देऊ शकेल , याबद्दल गावकऱ्यांना समजावतो. दुरच्या जलसाठ्यामधून पाणी त्या गावी कसे वळविता येईल याचा आराखडा देऊन आलेला असतो. त्यानुसार ,प्रेरित झालेले गावकरी उपाययोजनेस कार्यान्वित करण्यास सज्ज होतात. तिसरा शिष्य ,गावापासून दूर असणाऱ्या बारमाही नदीपात्रामधून गावकऱ्यांना एकत्र करून श्रमदानाने कालवा खणून पाणी गावातील जलाशयात आणतो. प्राप्त माहिती आणि अर्जित ज्ञानाचा उत्तम परीचय देऊन प्रत्यक्ष कृती करून आपले शहाणपण त्याने सिद्ध केलेले असते .
त्याच्या गावातील लोकांचा अत्यानंद त्याला उत्तम शिष्य म्हणून घोषित करण्यास पुरेसा ठरतो.
आधुनिक माहिती ,तंत्रज्ञान युगात माहीती अद्ययावत असणे , ही काळाची गरज आहे. डेटा हीच सर्वार्थाने संपत्ती ठरू लागली आहे. परंतु केवळ या माहितीचे संग्रहण म्हणजे उन्नयन नव्हे . त्या माहितीवर जेव्हा मानवी बुद्धिचे संस्करण होते, तेव्हा तिची ज्ञानात परिपूर्ती होते. या ज्ञानाने माहितीचा आणि व्यक्तीचा ही बोधात्मक विकास होतो. आणि या ज्ञानाला जेव्हा जीवनानुभव, आत्मिक अवबोध यांचा संग लाभतो तेव्हा ते शहाणपण बनते. स्थलकालातीत असणारे शहाणपण आपले निर्णय ,निवड ,नाती , संप्रेषण यावर प्रभाव टाकते. आपल्या योग्य कृती, उक्ती आणि अभिव्यक्ती यावर शहाणपणाचा अंमल असतो . कुणी कितीही हितोपदेश केला , ज्ञानाचे डोस दिले तरी बव्हंशी शहाणपण हे अनुभवानेच प्राप्त होते. तो एक आंतरिक उपजत किंवा प्रयत्न प्राप्त गुण आहे . त्याचा उगम अतरंगी होतो आणि परिपोष अनुभवाने. सुप्त असे हे शहाणपण आपले यथार्थ चरित्र ,खरी ओळख प्रगट करते, प्रकाशमान करते. शहाणपणा मुळे ज्ञान फलीभूत होते. तत्वज्ञान, विज्ञान लाभकारी करण्यास शहाणपण सहाय्यभूत ठरते.
ज्ञान हे अध्ययन ,प्रशिक्षण याद्वारे प्राप्त होते. एखाद्याला खगोलशास्त्र , तंत्रज्ञान , इतिहास याबद्दल उचित सत्य ,तथ्य माहीत असणे म्हणजे तो त्या विषयाचा जाणकार अथवा ज्ञानी समजला जातो. इंटरनेट ,पुस्तके ,गुरू याद्वारे अधिकाधिक माहिती ज्ञात करून त्या विषयांचे ज्ञान वाढविता येते.
शहाणपण हे प्रामुख्याने अवलोकन, निरीक्षण, अनुभव यातून प्राप्त होते. शहाणपण हा व्यक्तीच्या बुद्धीकोशात असलेला आंतरिक, उपजत अथवा प्राप्त सद्गुण होय. व्यक्तीच्या वर्तनावर आणि निर्णयावर , व्यक्तीमत्त्वावर याचा परिणाम दिसून येतो . कोणत्याही संभ्रमाशिवाय , विचलनाशिवाय व्यक्ती परिस्थितीकडे पाहण्यास व हाताळण्यास सक्षम होते. भूतकाळातील चुकांमधून ,बऱ्या - वाईट अनुभवांवरून धडा घेऊन स्वतः ला उत्तमोत्तम हे शहाणपण बनविते.
माहिती म्हणजे ज्यावर ज्ञानाचे प्रक्रियाकरण झालेले नसते. सांकेतिक किंवा भाषिक व्यूह म्हणता येईल. माहिती ही ज्ञान वाढविण्यासाठी , अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असते. माहितीवर बुद्धीचे संस्करण होते , तेव्हा ते ज्ञानात परिवर्तित होते. माहितीचा सरळ अर्थ असला, तरीही बुद्धी नुसार त्याचे जेव्हा ज्ञानात रूपांतरण होते तेव्हा अर्थाचे अनेक पैलू प्रकाशित होतात .
ज्ञान म्हणजे सुव्यवस्थित केलेली प्रक्रियाकृत माहिती होय. जी अधिकाधिक संयुक्त आणि उपयुक्त असते. त्या ज्ञानाचे योग्य ठिकाणी उपयोजन हे शहाणपण. ज्ञान हा सैद्धांतिक तर शहाणपण हा आंतरिक घटक आहे . माहितीचा साठा अथवा ज्ञान फारसे नसले तरीही व्यक्तीकडे शहाणपण असू शकते. अंगीभूत गुणाने ते प्राप्त होते आणि अनुभवाने संवर्धन . ज्ञानावर बुद्धिचे अधिपत्य असते तर शहाणपणावर आत्म्याचे . ज्ञानप्राप्तीचे मार्ग मर्यादित होऊ शकतात म्हणूनच ज्ञान ही मर्यादित होऊ शकते . पण शहाणपण अमर्यादित आणि अबाधित राहते. ज्ञानाचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव असू शकतात पण शहाणपण हे उपकारकच असते. ते योग्य मार्गावर नेते.
अशा प्रकारे , माहिती ,ज्ञान आणि शहाणपण यांची बाह्य प्रस्तुती करतांना फलश्रुती स्वरूप माहिती , ज्ञान व शहाणपण सर्वांना अंतः प्राप्त होवो, अशी आशा करीत आहे. माझ्या अंजुली मात्र ज्ञानात शहाणपणाचे प्रसाद दान टाकण्याची , ज्ञानियांच्या राजाला(श्री ज्ञानेश्वर माऊली) केलेली सद्गगदित प्रार्थना हीच परिपूर्णतेची अनुभूती मानून मी , रिक्तमती पूर्णा भरून पावते.
© पूर्णा गंधर्व.