Tu Hi re majha Mitwa - 30 books and stories free download online pdf in Marathi

तू ही रे माझा मितवा - 30

#तू_ही_रे_माझा_मितवा...
#भाग_३०

{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}

मरीन ड्राईव्हचं जिवंत वातावरण,संध्याकाळ,ट्राफिकच्या आवाजात मिसळू पाहणारी समुद्राची गाज.बराच वेळ ती काहीच बोलली नाही.

मग अथांग पसरलेल्या समुद्रावरून जराही नजर न वळवता ती म्हणाली-
“त्याला समुद्र खूप आवडतो,समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर जीव ओवाळून टाकायला येतात असं तो म्हणायचा.’cafune’,त्याचा आवडता शब्द,तुझ्या हातावरच्या मेहंदीची ग्यारेंटी देतो पण लिपस्टिकची नाही असं बिनधास्त बोलायचा...त्याच्या गालावरच्या डिंपलने मला एका गोड स्वप्नांत बांधून ठेवलं होतं आणि मग अचानक जाग आली आणि त्या स्वप्नांचे मोजता येणार नाही इतके तुकडे झाले.”

“ओके, I was right,प्यार-व्यार का मामला है.चल मला ते स्वप्न पूर्ण ऐकायचंय ज्याच्या तुकड्यावर चालून रोज नवी जखम करून घेतेय...”

ऋतू क्षीणपणे हसली.
तिने मोनापुढे पुन्हा सगळा पट आहे तसा उलगडून सांगितला.
ते सगळं ऐकून मोना अगदी स्तब्ध झाली ,तिची अगतिकता,थोडंस अबोल असणं, उदासीन चेहरा ह्यामगचं कारण तसं गुंतागुंतीच होतंच पण तिनेही तोच प्रश्न केला जो तिला सगळ्यांनी केला होता-

“why not Kabir then ?”

पण तिचंही उत्तर ठरलेलं होतं-

“कबीरचा ह्यात काहीच सबंध नाहीये मोना,आमचे आयुष्य वेगळे आहेत.”

जेवण करून होस्टेलवर पोहचेपर्यंत मोना आणि ऋतूचे सवाल जवाब चालूच होते.
अगदी तटस्थपणे तिला तिच्या डायलेमामधून बाहेर काढायचा बराच प्रयत्न मोनाने केला होता.

“ऋतुजा तू कितीही नाही म्हण पण तरीही मला का असं वाटतंय की तू आणि कबीर एकमेकांच्या प्रेमात आहात?”

“मोना..प्लीज असं नाहीये, तो स्वतः बोलून गेलाय जातांना की हे प्रेम नाहीये.”

“आणि तू ऐकलस? तू रिलेशनशिपमध्ये आहे हे माहित होतं म्हणून बोलला असेल आणि हे फार obvious आहे. तो तुला कन्फ्युजनमध्ये टाकून कसा जाऊ शकला असता म्हणून तो असं बोलला असेल,think that way.”

“मोना,एव्हाना तो मला विसरला ही असेल,त्याचं काम त्याच्यासाठी जास्त महत्वाचं होतं.”

“आणि तू? तुझं आहे त्याच्यावर प्रेम?”

“ सगळ्या प्रश्नांना उत्तर नसतं मोना.काही प्रश्नांचं आयुष्य Question mark पर्यंतच असतं.मला आता कुणीच नकोय आयुष्यात.मी आता फक्त छान काम करणार.मोना आज रिशीचं प्रकरण झाल्यावर मी जरावेळ मिकासोबत होते,मला मिकाने खूप छान समजावून सांगितलं,स्वतःला चांगल्याप्रकारे exploreकसं करू शकते हे सुद्धा सांगितलं. यार,she is damn talented ”

“ बरं,whatever . यार आता ठरलंय ना तुझं की काम,काम आणि फक्त काम करणार मग सोड आता दोघांचा विषय.जिंदगी है,चलताय यार.तिकडे तो वेद नव्या रिलेशनमध्ये खुश असेल,आता नसला तरी होईल हळूहळू,वेळ आणि सहवास मागचं सगळं विसरायला लावतात.सो चिल! आणि कबीरबद्दल तर तुला काही फिलिंग्स नाहीये म्हणतेय मग झालं तर...! का इतका राडा हवाय लाईफमध्ये? हे बघ प्रत्येक bad phase expiry date सोबत येते इतकं सिम्पल आहे सगळं. उद्यापासून मला कामावर फूलऑन कॉन्सनट्रेशन हवंय आणि रूमवर आता no more रोना धोना.प्रॉमिस?”

“Yes..!!”

भूतकाळातल्या चुका,घटना कितीही डोकं फोडलं तरी दुरुस्त होत नसतात पण त्याने वर्तमानकाळही खराब होऊन चुकांमध्ये नवनवीन भर पडत जाते.त्यामुळे त्या चुकांकडे किती दिवस बघत, कुढत जगत राहायचं हे ज्याला लवकर समजतं तो पुन्हा अश्या चुका होणार नाही याची काळजी नक्की घेतो.
ह्या नवीन प्रोजेक्टमध्ये अगदी झोकून काम करायचं ही नवी उमेद घेऊनच नवीन दिवस उगवला होता.अजून एक नवीन प्रॉमिस तिने स्वतःशी केलं होतं.ते म्हणजे डायरीतून कबीरशी बोलायचं. करिअरच्या ह्या टप्प्यावर तिला समजून घेणारा,मार्गदर्शन करणारा तिचा मितवा तिला हवा होता.

****************

आज तीन दिवसांनंतर तिने घाबरतच नवीन रिपोर्ट रीशीच्या हातात दिला. त्याच्या शेजारी काजलही बसली होती.
त्याची नजर पेपरवरून फिरत होती तसं तिला अजूनच धडधडत होतं.
“What is this? From where you get all that inputs?”

रिशी जरा वरच्या पट्टीत बोलला तसे तिचे हात थरथरायला लागले. काजलनेही पेपर्सवरून नजर फिरवली.

“रिशी ते ...I mean”
पुन्हा एकदा आपण कामात फेल ठरलो ह्या विचारानेच ती गळाली. तिचे डोळे पाणावले होते.

“काजल बघितला ना हा रिपोर्ट? काय वाटतंय तुला?”

रिशीने तिच्याकडे बघून डोळे मिचकावले.तिला समजलं काय बोलायचंय ते.

“रिशी,काय बोलू आता, ह्या अश्या रिसर्च आयडिया असल्या तर ...”

तिचं बोलणं मधूनच थांबवत तो उठला ,ऋतूच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत तो म्हणाला.

“अश्या रिसर्च आयडिया असल्या तर हा प्रोजेक्ट किती युनिक होईल याचा विचार कर.”

तिच्याकडे बघून तो मोठ्याने हसला.ऋतुला आनंदाने उड्या मारव्या वाटत होत्या.

“सॉरी डियर त्या दिवशी जरा जास्त ओरडलो मी.पण बघ हा असा रिपोर्ट बनवला असतास का तू? ह्याला म्हणतात रिसर्च.मागचा रिपोर्ट म्हणजे फक्त डेटा काम्पाईल केला होतास.”

त्याच्या ह्या बोलण्याने तिचा कॉन्फिडन्स अजूनच वाढला.

“काजल शायद अपना ये noob बच्चा जल्दी pro बनेगा.”

“Yes rutuja, these are fantastic hook points, very good .” काजल कौतुकाने म्हणाली.

ऋतूच्या चेहऱ्यावर आज खूप दिवसांनी इतकी प्रसन्नता आली होती.

“बच्चे, इतमे खुश नही होना है.समझे ना?अभी बहोत काम बाकी है.now prepare separate data set for these hook points. काजल आजपासून आपण रोज एक पॉईंट घेऊन कॅम्पेन बनवूया.”

“Yes, well done dear,ही ऋतुजा शोधत होतो आम्ही तू इथे आल्यापासून....”

“हो अगदीच,पण आता ही रिदम सोडायची नाही, छडी बसल्यावर सुधारली पोरगी.काजल ये बच्चे पे ध्यान रखना.”

तो दिलखुलास हसत म्हणाला.

“रिशी डु यू नो समथिंग, पुरी टीम के बॉईज का ध्यान है बच्चे पे.”

रीशीकडे बघून विंक करत ती म्हणाली.

“काय सांगतेस?”

“तर काय, रोज एक ना एक तरी विचारत असतो मला,is she single?”

ऋतुजा आता अवघडून उभी होती,तिला काय बोलावं हेच समजत नव्हतं.

“ so madam, tell us –सिंगल आहात का? एक खूप छान प्रपोझल आहे,एकदम डिसेंट बंदा आहे.”

तिची ओकवर्ड सिच्युएशन पाहून मग रीशीच म्हणाला-

“काजल,बस कर.रुलायेगी क्या बच्चे को?”

तिघेही खळखळून हसायला लागले.तिला पुन्हा शाबासी देऊन रीशीने पुढंच काम समजावून सांगितलं.ती आज मनापासून आनंदी होती.

मन लावून केलेल्या कामाचं कौतुक एक नवीन उर्जा देतं, सकारात्मक बदल घडवून आणतं.

कौतुक ही देखील एक नशा असते,ती मिळवण्यासाठी सतत कष्ट करण्याची तयारी मात्र असायला हवी.

ह्या एका appreciation ने ऋतूला अजून एक पायरी पुढे जाऊन चांगलं काम करायची उर्जा देखील मिळाली होती. संपूर्ण टीम प्रोजेक्ट चांगल्याप्रकारे प्रेसेंट करायला मन लावून काम करत होती.ऋतूही वेगवेगळ्या सेक्शनसोबत काम करून आता नवीन ऑफिसमध्ये पूर्णपणे स्थिरावली होती.मिटिंग प्रेसेंटेशन,क्लायंट व्हिजीट,कॅम्पेन सेशन सगळ्यात ती समरसून काम करत होती.मोनाची देखील काम करायची पद्धत,पॅशन,प्रक्टिकल विचारसरणी यातून ती खूप काही शिकत होती.रूमवर आता प्रोजेक्टशिवाय दोघींना काही सुचत नव्हतं.
यांतही एक गोष्ट आठवणीने ऋतुजा करत होती ते म्हणजे तिच्या डायरीत रोज एक पत्र कबीरच्या नावाने लिहायचं.तो समोर नसतांनाही त्याच्यासोबत हे असं एकतर्फी प्रोजेक्ट डिस्कस करणं,आज ऑफिसमध्ये काय झालं ते सांगणं,कधी मन मोकळं करणं हे तिला आवडायचं.कबीरला तिने अश्याप्रकारे आयुष्याचा भाग बनवलं होतं.प्रत्यक्षपणे नसला तरी डायरीच्या ह्या पानांतून तो मितवा बनून तिच्यासोबत असणार होता..कायमचा.

***********

“यार काय मुली आहात तुम्ही, मला विकेंड सेलिब्रेट करूया म्हणून बोलावून घेतलं आणि स्वतः काम करताय.मागच्या आठवड्यात तनु-प्रियासोबत फिर फिर फिरलात तेव्हा वेळ होता आणि मी आले की काम काम काम... ”

रीमा लटका राग दाखवत म्हणाली.

“अगं ताई प्रोजेक्ट शेवटच्या टप्प्यात आहे,अचानक मिटिंग ठरली.मी म्हणत होते मोनाला की ताईला पुढच्या वीकेंडला बोलावू या पण हीच म्हटली ‘मी आहे फ्री,आम्ही एन्जॉय करू तू जा’ म्हणून तुला बोलावलं,त्यामुळे ह्या मोनाडार्लिंगला ओरड काय ओरडायचंय ते.रात्री भेटू मला उशीर झालाय”

घाईघाईने आवरून ऋतू बाहेर जायला निघाली.

“अरे ऋतूजा, जा तू. काळजी करू नको. मी आहे ताईसोबत आम्ही मजा करू,you go and attend the meeting.”
दोघींना घाईघाईने बाय करून ती गेली.

ती निघून गेल्याची पूर्ण खात्री करून मोनाने दरवाजा लावला.

“ताई,sorry ,sorry खूप सॉरी,मला माहित होतं ऋतू आज रूमवर असणार नाहीये म्हणून तुला बोलावून घेतलंय,फोनवर डिस्कस करण्यासारखं नव्हतं.तुला काहीतरी भारी गोष्ट सांगायचीय.”

मोनाचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

“काय झालंय? कुठली गोष्ट?”

रीमाने आश्चर्याने विचारलं.

“ताई आपण ऋतूला कबीरबद्दल जेव्हा केव्हा ही विचारलं तेव्हा ती काय सांगते की “I don’t know”त्याचा काही संबंध नाही,मी त्याचा कधी विचार करत नाही ब्ला ब्ला ब्ला... हो ना?”

“हो म्हणजे खरंतर पटत नाही तिचे हे उत्तरं, पण जबरदस्ती ‘ तू कबीरवर प्रेम करच’ असं कसं सांगणार तिला.”

“तेच तर ताई, ती कबीरवर प्रेम करते हे तिच्या डोळ्यात दिसतं. त्याचा विषय निघाला की तिची होणारी चलबिचल सगळं सांगते पण ती काही आपल्यासमोर मान्य करत नाही.हो ना?”

“अगं हो, बरोबर,पण तू आता का हे सगळं सांगतेय.”

रीमाला तिच्या बोलण्याचा अर्थ उमगत नव्हता.

“ताई..I am really very sorry मी एक वाईट काम केलंय पण त्यातून काहीतरी चांगलं होणार असं दिसतंय.”

“मोने,चल कोड्यात बोलू नको लवकर सांग.” आता मात्र रीमाचा पेशंस सुटला होता.

“ताई Thursday ला होस्टेलमध्ये प्रोग्राम होता,as usual आम्ही काम करून खूप थकलो होतो.थोडा विरंगुळा म्हणून रिक्रेयेशन हॉलला जाऊन बसलो,’सिंगिंग प्रोग्राम होता.’ आम्ही एन्जॉय करत होतो. शेवटी एक क्लासिकल काहीतरी गाणं होतं.मला ते क्लासिकल वैगरे झेपत नाही , मी निघूया का म्हणून ऋतूकडे पाहिलं तर ह्या मॅडम रडत होत्या!
ताई इथे आल्याच्या पहिल्याच महिन्यात तिला तिच्या कामावरून बोलणं बसलं होतं तेव्हाच तिने ठरवलं होतं की आता ह्या इमोशनल अत्याचाराला टाटा बाय बाय करायचं,तेव्हापासून ती इमोशनली इतकी विक पडलेली मी बघितलं नव्हतं.रोज जरा वेळ ती डायरी लिहिते मग झोपून जाते.परवा मात्र पहाटेपर्यंत लिहित बसलेली आणि तिथेच डोकं टेकून झोपली.मी लॅम्प बंद करायला उठले. तिचं डोकं डायरीवरून अलगद बाजूला केलं आणि मला डायरीत कबीर लिहलेलं दिसलं. मला राहवलं नाही, मग मागचे काही पानं चाळले तर प्रत्येक पानावर ‘कबीर’ !
मी तुला दाखवायला काही पानांचे फोटो काढलेय. सॉरी गं ताई.पण मला तुला एवढच प्रूव्ह करायचंय की कबीर तिच्या आयुष्याचा हिस्सा झालाय.हे कसं प्रेम आहे माहित नाही पण जे आहे ते खूप जास्त आहे.please let’s do something before it’s too late.तुला watsapp करतेय बघ, वाच.”

मोनाने मोबाईलमधून काही फोटो तिला पाठवले.
रिमाला जरा आश्चर्य वाटलं,दोन तीन पत्र होती.तिने उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली.

******

#Date_day- तू सोबत नसलेल्या दिवसांमधला असाच एक दिवस.

कबीर..!

मी क्रिनेटच्या हॅमोकवर बसून काही नोटस रिव्हाईज करत होते. क्रिनेटच्या मोठ्या ऐसपैस खिडकीतून ह्या अस्ताव्यस्त शहराचा जो तुकडा दिसतो ना तो खूप क्युटसा आहे.(I know तुला हसू आलं असेल क्युटसा म्हटल्याने,पण आहे!)

मला नेहमी वाटतं,हे ऑफिस सोडतांना हा खिडकीतून दिसणारा तुकडा दोन्ही हातांच्या कवेत घेऊन सोबत घेऊन जावा. बऱ्याचवेळा तिथे बसून अनुभवलेली सकाळ,कधी कधी दुपार ,अगदी रात्रीचं उशिरापर्यंत काम करतांना अनुभवलेली लाईट्सच्या ठिपक्यांची रांगोळी घाल्यासारखी रात्रसुद्धा युनिक वाटते त्या फ्रेममधून. अगदी फ्रेश water color केलेल्या कॅनव्हाससारखं जिवंत वाटतं सगळं.

कधी कधी वाटतं लहान मुल कसं त्याला आवडलेली छोटूली गोष्ट देखील अगदी शिगोशीग भरलेल्या उत्साहाने दाखवायला हात धरून घेऊन जातात तसं तुझा हात धरून ही खिडकी आणि त्यात फक्त मला दिसणारं हे चित्र माझ्या नजरेने तुला दाखवावं.
मग माझ्या डोक्यावर टपली मारून तू म्हणावं-

“वेडू आहेस एकदम.”

माझे हट्ट बालिश आहे पण तू पुरवशील अशी उगाच खात्री आहे मला.
तुला माहितीय आज दुपार अगदी ऐन भरात असतांना तिला भूल पाडून जरासं अंधारून आलं.तुला खोटं वाटेल पण मला ती दुपार चक्क घाबरल्यासारखी वाटली.कदाचित तिला वाटलं असेल हे काय झालं? कुठल्या क्षणांत मी ह्या पावसाला शरण गेले? काश हा भूल पडण्याचा,शरण जाण्याचा नेमका क्षण अलगदपणे पकडून कुठेतरी लपवता आला असता.
रिकाम्या उदास शांततेत तो क्षण पुन्हा पुन्हा काढून त्या क्षणांची जादू पुन्हा अनुभवाण्यात जी उत्सुकता आहे त्या उत्सुकतेवर मी आता पूर्ण आयुष्य काढू शकते.
मागे एकदा संध्याकाळी काम करून प्रचंड थकवा आलेला.काहीच सुचत नव्हतं, कॅफेटेरियात आम्ही कॉफ़ीमग घेऊन काही न बोलता शांत बसून होतो. रिशीने मग इस्किलारमधला एक उतारा वाचून दाखवला.त्यातला एका शब्दांत अजूनही मन गुंतून पडलंय.
हे शब्द वेचण्याचं वेड वेदमुळे लागलंय मला.आपल्या आयुष्यात येणारी ,त्याचा महत्वाचा भाग असणारी व्यक्ती आपल्याही नकळत आपल्यात काहीतरी त्याचं स्वतःच असं काहीतरी ठेवून जाते.हे वेड त्याचंच.
तर...इस्किलारमधल्या त्यातल्या एका शब्दाने मला हिप्नॉटाईज केलंय.

"ऍनिव्हीओला"

'ज्या क्षणाला द्राक्षांची मदिरा बनते अगदी तोच ,तोच जादुई क्षण'

कबीर, नेमके काय आयाम असतील रे ह्या क्षणाचे?
कसा व्यक्त होत असेल तो अधांतरी क्षण?हा क्षण भूल पडण्याचा आहे. शरण जाण्याचा आहे. त्या क्षणाच्या अलीकडील आयुष्य आणि पलीकडलं आयुष्य अगदी वेगळं असतं,अगदी बदलून जातं.

ही लख्ख दुपार ज्या क्षणाला पावसाला शरण गेली ,तो क्षण..ऍनिव्हीओला!

कुणाच्या प्रेमात पडण्याचा नेमका क्षण ..ऍनिव्हीओला!

रात्री चांदणं डोळ्यात साठवतांना कुणाची तरी आठवण यावी आणि त्या आठवणींना ठेचकाळून एखादा तारा निखळून यावा तो क्षण ..ऍनिव्हीओला!

कबीर तू कधी अनुभवलाय का रे .. ऍनिव्हीओला?

असो,

आता मध्यरात्र झालेली आहे.झोप येतेय पण तुझ्याशी आता सरळ उद्या रात्रीच बोलायला मिळेल म्हणून मी तिला दूर ढकलतेय, तर शेजारी मोनाच्या फोनमध्ये चालू असलेली गुलजार की नज्मेमधून मला गुलजार हळूच टोमणा मारताय-

“नींद आये तो सो भी जाया करो,
युं रातों में जागने से मेहबूब लौटा नही करते.”

खरंच की !!

त्यामुळे गुड नाईट.

आता मिटल्या डोळ्यांत ज्या क्षणी तुझं स्वप्न अलगदपणे उतरेल आणि माझं ब्लॅक अँड व्हाईट स्वप्न मोरपंखी होईल तो क्षण-
ऍनिव्हीओला!!

तुझीच ,

–मी

************

#क्रमशः

Copyright©2019 हर्षदा

All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.

इस्किलारबद्दल इंस्टावर👉👉

@soniways