Paisa books and stories free download online pdf in Marathi

पैसा

पैसा

मावसभाऊ व सद्या वन अधिकारी असलेल्या नागेशचे लग्न असल्यामुळे मालकाकडून सुट्टी घेवून गणेश आज लग्नासाठी निघाला होता.त्याचे म्हातारे आई-वडील दोघेही कालच पाहुण्याच्या घरी मुक्कामाला गेले होते. त्याला खरं तर पैशांच्या अडचणीमुळे लग्नाला जायचे नव्हते. पण नागेशने खूप वेळा फोन करून आग्रह केल्यामुळे त्याला लग्नाला जाणे भागच पडले.

त्याने आपला जवळचा मित्र सचिनकडून उसने पैसे घेवून आई-वडीलांना जाण्या-येण्यासाठी पैसे देवून स्वत:ला ड्रेस व ‍ नविन चप्पल विकत घेतली होती. आता त्याच्या जवळ फक्त तिकीटाचे येण्या जाण्याचे पैसे होते.तो लग्नस्थळाजवळ आला. लग्न एका मोठया मंगल कार्यालयामध्ये होतं. तो आपल्या आई-वडीलांना शोधून त्यांच्याजवळ गेला. इतर पाहुणे उंची पोशाख घालून रुबाबात आलेले दिसत होते. गणेशचे आई-वडील मात्र साध्या कपडयात एका बाजूला बसलेले होते. त्यांच्याजवळ कोणीच नव्हते. तो त्यांच्याजवळ गेला. त्याला पाहताच त्याची आई बोलली,

"काही खाल्लस का माय? लगीन जरा उशीराच लागन असं वाटतंय, तवा काही तरी खावून घे."

उपाशी असतानाही त्याने आपल्या आईला नाश्ता केल्याचे सांगीतले.

तेवढयात त्याला त्याच्या मामाचे त्याच्याच वयाचे मुलं व इतर काही नातेवाईक दिसले. त्यांना पाहून तो त्यांच्याकडे गेला. ते सर्वजण व्यवस्थीत पोशाख घालून आले होते. गणेशचेही कपडे नविनच होते. पण हलक्या दर्जाचे होते. त्या सर्वांची एकमेकांशी चर्चा चालू होती. गणेशही कधी-कधी त्यांना बोलत होता. पण ते बळेबळेच त्याचीशी बोलत होते.त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत होते. गणेशच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याला त्या गोष्टींचे खूप वाईट वाटले. लहाणपणी आपण मामाच्या गावाला गेल्यावर मामाची, मावशीची मुलं आपल्यासोबत किती खेळायची? आपल्या सोबत आपुलकीने रहायची. आज हे सर्वजण उच्च शिक्षित आहेत.मला घरच्या परिस्थितीमुळे व अडचणीमुळे शिकता आले नाही. मी यांना काही मागत आहे का?फक्त खूप दिवसांनी भेटल्यामुळे बोलण्याचा प्रयत्न केला तर मी गरीब असल्यामुळे यांनी मला दुर्लक्षीत केले.या विचाराने तो खूप निराश झाला.त्यानंतर जो-जो पाहुणा भेटेल त्याने गणेशला पाहून न पाहिल्यासारखे केले.याचे त्याला खूप दु:ख झाले. त्याने आपल्या आई-वडीलांकडे पाहिले. त्यांना पण पाहुणे दुर्लक्षीत करत होते. ते कोणीतरी अनोळखी माणसं आहेत असा इतर लोक त्यांच्याशी व्यवहार करत होते. आपल्या आई-वडीलांचा होत असलेला अपमान पाहून त्याच्या डोळयात पाणी आले. लग्न सोडून परत जावे असा विचार त्याच्या मनात आला.तेवढयात त्याला कोणीतरी हाक मारली.त्याने आवाजाच्या दिशने पाहिले. तो आजचा नवरदेव म्हणजेच त्याचा मावसभाऊ नागेश होता.गणेशने डोळयातील अश्रु मोठया मुश्कीलीने लपवले व तो त्याच्याकडे गेला. गणेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याने आपल्या मित्रांना हा माझा मावसभाऊ गणेश म्हणून त्याची ओळख करून दिली. नागेशच्या प्रेमळ वागण्याने गणेशचा ऊर भरून आला. लग्न झाल्यानंतरही त्याने गणेशच्या आई-वडीलांना सोबत घेवून फोटो काढले.लग्न पार पडले. नागेशची परवानगी घेवून गणेश जायला निघाला. बाहेर आल्यावर त्याने आपल्या चप्पलची शोधाशोध केली. पण त्याची चप्पल कोणीतरी घेवून गेले होते. चप्पल हरवल्यामुळे त्याला खूप वाईट वाटले. कारण कालच त्याने उसने पैसे घेवून चप्पल विकत घेतली होती.आता त्याच्याजवळ फक्त तिकीटापुरतेच पैसे शिल्लक होते. त्यामुळे तो तसाच अनवाणी निघाला.

आता तो घरी आला होता. रात्र झाली होती. त्याचे आई-वडील आजही नागेशच्याच घरी राहीले होते. गणेश त्यांना येताना घेवून येणार होता. पण नागेशने खूपच आग्रह केल्यामुळे त्याने त्यांना तिकडे ठेवले होते. रात्री न जेवता तो वरील पत्र्याकडे पाहत विचारात गढून गेला.लहाणपणापासून त्याने गरीबी पाहिली होती. पण त्याचे त्याला एवढे काही वाटले नव्हते. कारण त्याच्या अपेक्षाही मोठया नव्हत्या. आहे त्याच्यामध्ये समाधान मानून जगणे त्याला पसंद होते. पण काही दिवसांपासून त्याला पैसा जवळ नसल्यामुळे लोकांकडून मिळालेल्या वागणुकीने विचार करायला भाग पाडलं होतं. त्याच्या काही जवळच्या ‍मित्रांकडूनही त्याला दुजेभावाची वागणूक मिळत होती. काही मित्र त्याचा फक्त कामापुरता वापर करत होते. शारिरीक काही काम असेल तर त्याला गोड बोलून त्याच्याकडून काम करून घेत होते. फक्त एक-दोन जीवाभावाचे मित्रच त्याला नेहमी साथ देत असत.

तो एका कपडयाच्या दुकानावर कामाला होता. त्याला सात हजार रु. महिन्याला पगार होता.त्या सात हजारांमध्ये घरखर्च,आई-वडीलांचा दवाखाना, स्वत:चा खर्च एवढं त्याला भागवावं लागत होतं. आई-वडील थकलेले असल्याने त्यांच्याकडून काही कमाईची अपेक्षाच नव्हती. जे काही करायचं ते त्याला एकटयालाच करावं लागणार होतं. त्याला माळरानावर दीड एकर कोरडवाहू शेत होतं.त्यामध्ये त्याचं काहीच होऊ शकत नव्हतं. एखादा व्यावसाय करावा तर जवळ पैसे नव्हते. त्यामुळे त्याला स्वत:चा भविष्यकाळ खूप अवघड वाटु लागला.

सकाळी तो एका निश्चीत ध्येयाने प्रेरीत होवून जागा झाला. जे लोक यशस्वी होतात. त्यांचे पैसा कमवण्याचे स्त्रोत, मार्ग वेगवेगळे असतात हे त्याने कोठेतरी ऐकले, वाचले होते. काही लोक आठ तासात दोनशे रु.कमवतात तर काही लोक तेवढयाच वेळेत दहा हजार रु.कमवतात. मग आपण का नाही कमवू शकत? या विचाराने तो झपाटून निघाला. सुरुवातीला त्याला काम करण्याची लाज वाटायची त्यावेळी त्याची आई त्याला म्हणायची, "कामाची लाज बाळगु नये. आपण उपाशी मरायला लागल्यावर आपल्या कोणी खायला आयतं आणून देणार हाई का? कष्टानं माणूस झिजतो पण मरत नाही." हे त्याच्या अडाणी आईचे प्रेरणादायी शब्द त्याला आणखी प्रेरणा देवून गेले. आपल्याला आपल्यासाठी नाही पण आपल्या आई-वडीलांच्या सुखासाठी तरी पैसा कमावला पाहिजे या विचाराने त्याला आणखी बळ दिले. पैसा सर्वस्व नसला तरी पैशाशिवाय कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. अमाप पैसा जवळ नसला तरी चालेल पण माणसाला आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करून समाधानाने जगता आले पाहिजे इतका तरी पैसा जवळ असावा हे ही त्याच्या लक्षात आलं.आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याने स्वत:ला एक ठराविक वेळ दिला. आणि त्या वेळेत ध्येयसिद्धी झालीच पाहिजे या निश्चयाने तो योजनाबद्ध कार्यक्रम आखून कामाला लागला.

. आता तो रोज सकाळी लवकर उठून सकाळी आठ वाजेपर्यंत पेपर वाटत होता.पेपर वाटण्याचे काम झाल्यावर तो जेवण करून दुकानावर जायचा.दिवसभर दुकानावर काम करून तो रात्री बसस्टँड शेजारी अंडापावचा गाडा लावायचा. पहिल्यांदा तो एका महिण्यात सात हजार रु. कमावत होता. आता तो महिन्याकाठी पंधरा हजार रु.कमावू लागला. आता आलेल्या पैशातील काही पैसे बचत करत त्याने बसस्टँडच्या बाजूला चहाचं हॉटेल चालू केलं. हॉटेलच्या व्यावसायामध्ये उतरल्यानंतर स्वत:ला शंभर टक्के झोकून देवून व इतरांपेक्षा चहाचा चांगला दर्जा देवून ग्राहकाला स्वत:कडे आकर्षीत करण्यात तो यशस्वी झाला. काही दिवसांपुर्वी तो दुसऱ्याच्या दुकानावर कामाला होता.आज त्याच्या हॉटेलमध्ये दुसरी दोन मुले कामाला येत होती. बघता-बघता त्याने हॉटेलच्या व्यावसायामध्ये चांगला जम बसवला. बाजूलाच पान टपरी चालू केली. त्याच्या पानांची चव भल्या-भल्यांना त्याच्या पान टपरीकडे खेचू लागली. आता त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे काही मित्रही त्याच्या जवळ येऊ लागले. पाहुण्यांच्याही चकरा त्याच्याकडे वाढल्या.त्याचे आई-वडीलही खूप खुष झाले. ज्या आई-वडीलांनी आयुष्यभर दुसऱ्यांची चाकरी केली होती. ज्यांनी दारीद्रयाच्या कळा सोसल्या होत्या. आज त्यांना सुखाचे दिवस आले होते. आपल्या आई-वडीलांचा आनंद पाहून गणेशलाही खूप आनंद झाला होता.

दारिद्रय आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कष्ट करून मोठं होता येतं व आपला स्वाभिमान कोठेही गहाण न ठेवता कष्ट करून जिद्दीने यशस्वी होता येतं. हे वाक्य त्याने खरं करून दाखवलं होतं. आता कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेल्यावर त्याला लोक मान देत होते. त्याच्याशी आपणहून बोलत होते. हा मान आपल्याला नाही तर आपल्याजवळ असलेल्या पैशांमुळे आपल्याला मिळत आहे. याची त्याला पूर्ण खात्री होती. खरंच पैसा सर्वस्व नसलं तरी पैशाशिवायही कोणतीच गोष्ट होत नाही हे त्याला कळून चुकलं होतं. आणि आता बघता-बघता तो गण्याचा गणेश शेठ झाला होता.याचे कारण फक्त पैसाच होता..........