Aaii books and stories free download online pdf in Marathi

आई

आई

वैभवची नुकतीच बारावीची परीक्षा संपली होती.उन्हाळयाच्या सुट्टया असल्याने तो ‍दिवसभर मित्रांसोबत घराजवळयाच्या पिंपळाच्या झाडाच्या थंडगार सावलीमध्ये कॅरम खेळत बसायचा. किंवा क्रिकेट खेळायला जायचा. खेळण्यापुढे त्याला भुक लागलेली सुद्धा जाणवत नव्हती. त्याची आई त्याला जेवायला चल म्हणून थकून जायची. तरी तो जेवायलाही जायचा नाही. त्याचा दिवस-दिवस फक्त खेळण्यामध्ये जायचा.झोपेतही त्याला फक्त कॅरम व क्रिकेटचं दिसायचा. बारावीच्या परीक्षा पुर्वी त्याने खूप अभ्यास केला होता.त्यामुळे त्याच्या आईला वाटायचे सुट्टया आहेत तोवर खेळेल नंतर निकाल लागल्यावर परत अभ्यासात गुंतून जाईल.नंतर कुठे खेळायला वेळ भेटेल त्यामुळे ती काही बोलत नव्हती. पण आता त्याचे कॅरम खेळणे प्रमाणापेक्षा जास्त झाले होते. एके दिवशी त्याचे वडील सुट्टी असल्याने घरीच होते. वैभव आजही खेळायला गेला होता. वैभव दिवसभर घरी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी वैभव कोठे गेला म्हणून त्याच्या आईला विचारले. तेव्हा त्याच्या आईने त्यांना वैभव नुसता खेळायला जातो. खेळण्यापुढे त्याला जेवणाचं पण भान राहत नसल्याचे सांगीतले.

वैभव दिवस मावळता घरी आला. त्याने थंड पाण्याने स्वच्छ हातपाय व चेहरा धुतला. त्याच्या वडीलांनी त्याला फ्रेश होवू दिले. व नंतर खेळण्यावरून त्याला चांगलेच धारेवर धरत झापले.आपल्या आईनेच वडीलांना आपल्याबद्दल चाडया सांगीतल्याचा राग त्याचा मनामध्ये आला. पण वडीलांसमोर तो आईला काहीच बोलला नाही.

दुसऱ्या दिवशी त्याचे वडील डयुटीला गेले. त्याच्या आईने त्याला जेवायला वाढले होते. वैभवचा राग आता उफाळून बाहेर आला. तो आईला म्हणाला,

"तु माझ्या चाडया पप्पांना का सांगीतल्यास?"

त्यावर त्याची आई त्याला समजावत म्हणाली, " तुझ्या चांगल्यासाठीच सांगीतले. तु जेवणही वेळेवेर करत नाहीस. मग त्याचा परिणाम तुझ्या आरोग्यावर होईल."

त्यावर तो रागातच बोलला, "मग तुला काय करायचे मला काही पण होवू दे. तुझी काय गरज होती पप्पांना सांगायची."

आता तो रागात आहे. त्याला आता सांगूनही तो ऐकणार नाही असा विचार करून त्याची आई धुणं धुवायला बाहेर गेली. आपल्याला आईने काहीच प्रतिसाद दिला नाही. आपल्या आईला आपली काळजीच नाही असा विचार करून त्याने रागातच ताट फेकून दिले आणि तो रागं रागं बाहेर आला.त्याने रागाच्या भरात बाहेर ठेवलेला पाण्याचा माठ फोडून टाकला. त्याचा राग आणखीही उतरला नव्हता. तेवढयात त्याला वाडयाच्या मातीच्या भिंतीमध्ये एक बिळ दिसले.त्या बिळामध्ये गांधण्यांनी पोळे केले होते. त्या बिळामधून एक-एक गांधीण ये-जा करत होती. वैभवने त्याचा राग त्यांच्यावर काढायला सुरुवात केली. त्याने बॅडमींटनच्या बॅटने एक-एक गांधीण मारायला सुरुवात केली.बघता-बघता त्याने अकरा-बारा गांधणी मारल्या.त्याची आई त्याला म्हणत होती "गांधणी मारु नको, चावतील." पण तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन गांधणी मारतच होता.

आता पर्यंत त्याने बऱ्याच गांधणी मारल्या होत्या. अचानक काही गांधीण चवताळल्या. आणि सात-आठ गांधीण त्याच्यावर तुटुन पडल्या. त्या गांधीण त्याचा चावा घेऊ लागल्या. तो मोठमोठयाने ओरडत घरात पळाला. त्याच्या डोक्यात, कानाला, तोंडाला गांधीण चावल्या होत्या.त्याची आई धुणे धुत होती.तिने त्याच्याकडे पाहीले. आपल्या मुलाला गांधीण चावत आहेत हे पाहून तिने स्वत:ची पर्वा न करता हातानेच गांधीण बाजूला झाडल्या. त्याच्या अंगावरील गांधीण निघून गेल्या होत्या. कदाचित त्या चावणाऱ्या गांधणींनाही एका आईची ममता दिसली असेल. त्यामुळे त्याही निघून गेल्या.

आता वैभवचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. गांधीण चावलेल्या ‍ठिकाणी त्याला चांगलीच आग होत होती. त्याच्या आईने पटकन तुळशीतील माती आणली आणि त्याला चावलेल्या ‍ठिकाणी लावली. गांधीण त्याला चावल्या होत्या. पण वेदना मात्र त्याच्या आईला होत होत्या.

आपल्या लेकरावर संकट आल्यावर आई कोणत्याही संकटाला घाबरत नाही. मग ती त्यावेळी स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाही. त्यामुळेच आईला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान आहे.

याचा प्रत्यय त्याला त्यावेळी आला.

तात्पर्य:- आई ही देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. आईची सेवा केल्यावर आयुष्यात खरंच काही कमी पडत नाही. आई आहे तो पर्यंत तिला चांगलं जपलं पाहिजे.जिने आपल्याला लहाणाचं मोठं केलं हे जग दाखवलं. आपल्या सर्व आशा,आकांक्षांचा त्याग करून फक्त आपलं सुख पाहिलं त्या आईला दु:ख देवून कोणीच सुखी होवून शकत नाही. आपल्या लेकरावर संकट आल्यावर आई आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या लेकराला वाचवण्याचा प्रयत्न करते.त्यामुळे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आपल्या आईला आपल्या जीवाच्या पलीकडे जपणे. ज्याने मातृपितृक्ती केली त्याला इतर कोणत्याही देवाची सेवा करण्याची गरज नाही. जो आपल्या आई-वडीलांची सेवा करतो देवालाही तोच प्रिय असतो.