Tu Hi re majha Mitwa - 35 books and stories free download online pdf in Marathi

तू ही रे माझा मितवा - 35

#तू_ही_रे_माझा_मितवा...

#भाग_३५

#Countdown_begins--

{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}

नदीकडून येणारा थंड वारा,त्यात कुठल्याश्या रान फुलांचा मिसळलेला सुवास,रिसोर्टचे शांतपणे झगमगणारे दिवे आणि वर आकाशातले दिवे.
मघाशी केलेल्या वेंधळेपणासाठी स्वतःची मनातच खरडपट्टी काढत ती शांतपणे त्याच्यासोबत चालत होती.
बराचवेळ कुणीही बोललं नाही.चालत चालत ते वॉकवेच्या सुरवातीला पोहचले देखील,तरीही दोघे गप्पच.
आता जरा अंतरावर तिच्या टीमची कॅम्पफायरची तयारी चाललेली दिसत होती.

बसुया का?

शेजारी असलेला बेंच बघून ती म्हणाली.

“हरकत नाही.”.

तिच्यापासून बऱ्यापैकी अंतर ठेवून तो बसला.

“तूला काही बोलायचं होतं म्हटलास?”

“हो, म्हणजे खास काही नाही,इतक्या महिन्यांनी अचानक भेट झाली,असंच जरा बोलूया म्हणून आलो आणि हो तुझी एक इच्छा पण पूर्ण होईल,उद्या चेकआउट करतोय सो रूम शिफ्ट करता येईल तुला,क्युट सनसेट बघायला.”

उगाच आवाजात सहजता आणायचा आटोकाट प्रयत्न करत तो म्हणाला.
‘उद्या चेकआउट करतोय’ ह्या वाक्यासरशी काळजात खोल खोल काहीतरी तुटल्यासारखं ,दुखावल्यासारखं झालं.

“फक्त एका दिवसासाठी आला होतास.”

काळजातली नाजूक कळ त्याला न दिसू देण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली.

“तसचं काहीसं. अशक्य काहीतरी कामासाठी पाठवलं होतं,नाही जमणार सांगून परत जातोय.”

तो उगाच हसत म्हणाला.

ती मात्र प्रचंड हवालदिल झाली होती.मनाला खूप काहीतरी फील होतंय आणि ते सांगताही येत नाही,व्यक्त करता येत नाही तेव्हा डोळे ती जबाबदारी अगदी योग्य पार पडतात.तिचे डोळे पाणावले होते.

“अच्छा” कसबसं खाली बघतच ती बोलली.

“मग,इतक्या महिन्यांनी भेटली आहेस,कशी झाली एंगेजमेंट काही सांगशील की नाही आणि वेद कसाय? तो नाहीये ह्या टीममध्ये?”
मनावर खूप मोठ्ठा दगड ठेऊन तो बोलला.

“वेद..!! वेद ह्या टीममध्ये आणि माझ्या आयुष्यात दोघं ठिकाणी नाहीये. सहा महिन्यांपूर्वीच ब्रेकअप झालं.!!”

पाणावलेले डोळे आणि त्यावर न शोभणारं उसणं हसू तुटक तुटक जेवढं बोलता येईल तेवढं ती बोलत होती.

“ब्रेकअप? पण का?”

त्याचा विश्वासच बसला नाही.हसत्या खेळत्या ऋतूच्या डोळ्यातली उदासी,बैचेनी त्याला पहिल्या नजरेत समजली होती आणि हेच त्याचं कारण आहे असा कयास ही त्याने बांधला.

“ बरीच कारणं होती...कुठली कुठली सांगू?”

अजूनही त्याच्याकडे न बघताच ती बोलत होती.

“एक मिनिट, मेन कारण तो प्रवास..तर नाही ना? ऋतूजा माझ्यामुळे तुमच्यात काही गैरसमज...”

तो आता प्रचंड धास्तावला होता,ऋतूच्या ह्या परिस्थितीला नकळत आपण तर जबाबदार नाही ह्या विचाराने तो हवालदिल झाला.प्रचंड गिल्ट त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

“ब्रेकअपला त्या दोन व्यक्तींशिवाय कुणीही जबाबदार नसतं कबीर.बाकीच्या गोष्टी नाममात्र असतात.त्या दोघांना एकत्र राहायचं असेल तर ते कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहतात,वेगळं व्हायचंच असेल तर शुल्लक कारण ही पुरतं.”

“पण असं नेमकं काय झालं?तू माझ्याशी तेव्हाच का बोलली नाहीस ऋतुजा.”

“कसं बोलणार होते मी,तू स्टॅच्यु करून गेलेलास ना. कबीर तसंही मला आता प्रेम ह्या शब्दाचा प्रचंड तिटकारा आला आहे एवढच."

“ जर ह्या वेगळं होण्याचं कारण तो प्रवास असेल तर मी त्याला समजावून सांगतो की चूक माझी होती, मी तुमच्यासाठी आता काही करू शकतो का सांग ना,मी बोलू का त्याच्याशी?”

तिचं दुःख कसं कमी करता येईल याचा आणि फक्त याचाच विचार त्याच्या मनात होता.

“कबीर... Please dont ask me anything I may not answer याशिवाय दुसरं काही बोलायचं असेल तर थांबते.माझे फ्रेंड्स वाट बघताय.”

तिला काय बोलावं त्याला समजावून सांगावं की नाही ह्या वेगळ्याच विवंचनेत ती.

“पण ऋतुजा..”

“वेद मूव्हऑन झालाय,नवीन रिलेशनमध्ये आहे आणि ब्रेकअपनंतर मुंबईब्रान्चला जॉईन झाल्यावर माझेही किती न काय कॅज्युअल अफेयर झालेत,इनफॅक्ट चालू आहेत,नथिंग न्यू फॉर मी. अगदीच ओके आहे सगळं.”

ती बोलण्यात बळजबरीने बेजाबदार attitude आणायचा प्रयत्न करत होती जे साफ साफ दिसतही होतं.

तो तिच्याकडे बघतच राहिला.ती जे बोलत होती आणि तिचे डोळे जे बोलत होते त्यात कमालीचा विरोधाभास होता.एव्हाना दूरवर कॅम्पफायर भोवती सगळे जमायला सुरुवात झाली होती,ती तिथेच नजर खिळवून बसली होती,डोळ्यात येणारं पाणी शिताफीनं बोटाने हलकेच टिपत होती.

“तू हे जे काही मला सांगतेय ते मी खरं मानावं असं अशी तुझी इच्छा आहे का? हे डोळेच सांगताय किती दुखावली गेलीस ते. ”
तो जरा कोरडेपणाने म्हणाला.

“तू खरं मान की नको मानू I don’t care.. तू का ह्या गोष्टींचा विचार करतोय,उद्या असंही तुला जायचंच आहे ना,मग का माझ्या पर्सनल गोष्टींचा लोड घेतोय,माझे डोळे काय सांगतात ते समजायला काही कनेक्शन आहे का आपल्यात?.....chill yaar !!”

आवाजात शक्य तितकी बेफिकिरी आणत ती म्हणाली.तो उद्या जाणार ही गोष्ट तिला घायाळ करत होती आणि आता भावना लपवणं खूप कठीण झालं होतं तिच्यासाठी.

“ माझे टीममेट वाट बघत असतील...मी निघते”

त्याच्याकडे एकदाही न बघता ती निघून गेली. त्याच्यापासून एक एक पाउल दूर जातांना एक एक जन्मांच अंतर पडतंय ह्या विचाराने अश्रू आता कुठलाही आडपडदा न ठेवता वाहत होते.

तो तिला दूर जातांना बघत तिथेच बसून होता,मनात असंख्य विचार.

“नक्की काय झालंय ऋजाला? वेद दुरावल्याचं दुःख की अजून काही? इतकी सैरभैर इतकी विस्कटलेली का वाटतेय? डोळ्यातली ती निरागस चमक,अल्लड हसू कुठे विरून गेलं? ह्यावेळी मी तिला असं सोडून नाही जाऊ शकणार, ती नादान आहे,तिचा नसू दे आता प्रेमावर विश्वास पण माझं तर प्रेम आहे ना ह्या वेडूवर. तिच्या मनाची नेमकी सल काय आहे,कसलं अनामिक दुःख तिच्या डोळ्यात दिसतंय, हे वेदच्या दुराव्यातलं दुःख आहे की अजून काही लपवतेय हे जाणून घेतल्याशिवाय जाणार नाही,अजिबात नाही."

*****************

गोल रिंगणाच्या मध्यभागी शेकोटी होती,आजूबाजूला बैठक घातलेली होती. गप्पागोष्टीनां उधाण आलेलं.डोळे कोरडे करून ,शांतपणे ऋतू मोनाजवळ येऊन बसली.
खरंतर ती तिथे असूनही नसल्यासारखी होती.मोनाने सूचक नजरेने रीशीकडे बघितलं,काजलला तर अजूनही विश्वास बसत नव्हता,कधी एकदा दोघांना सोबत बघतेय असं तिला वाटत होतं
.
“बच्चा तो खडूस नाही म्हटला रूम शिफ्ट करायचं म्हणून नाराज आहेस का? ”
ऋतूला असं शांत बसलेलं पाहून रीशीने साळसूदपणे विचारलं.

“अरे नाही , असं काही नाही”

“अच्छा,पण काहीही म्हणा खूप हँडसम आहे तो बंदा...”
रिशीची नौटंकी चालू होती.

“अरे रिशी,आपल्या ऋतूचा friend आहे तो.”
मोनाने त्यात भर टाकली.

“काय? तू ओळखते त्याला?”
पहिल्यांदा ऐकल्यासारखं रिशी म्हणाला.

“हो ,म्हणजे मित्र आहे माझा”

तिचा उत्तरं द्यायचाही मूड नव्हता.

“स्कूल फ्रेंड?”
काजलने ही खेचण्यात सहभाग नोंदवला.

“नाही.”

“मग कॉलेजफ्रेंड? कलीग ?नेबरफ्रेंड?” रीशीने ड्रामा पुढे नेला.

“नाही” ती वैतागली.

“मग?”

“अशीच ओळख झाली मग मैत्री..”

“मग?” काजल सूचकपणे म्हणाली.

“मग काय?” ऋतूला त्यांच्या प्रश्नांची शंका आली.

“नाही गं बच्चा,मग पुढे काय झालं? तू तर कधी बोलली नाही त्याच्याबद्दल?”

“काजल अगदी कॅज्युअल मैत्री आहे,सोड ना.”

तिने त्यांना टाळलं,उद्या तो निघून जाणार हाच एक विचार तिच्या मनात चालू होता आणि त्यामुळे तिचं कशात लक्ष लागत नव्हतं.

“ओके बाबा चिडू नको,आमची मघाशीच ओळख झालीय.”
रिशी तिचे गाल ओढत म्हणाला.

एकदा त्या तिघांकडे नाराजीने बघत शांत बसून राहिली,काही बोलायचा,वाद घालायचा तिचा अजिबात मूड नव्हता.

“रिशी आज काय विशेष असणार आहे कॅम्फायरमध्ये?”

तिचा उदास चेहरा बघून मोनाने हळूच विषय चेंज केला.

“आज नरेशचं पोएम रिसायटेशन आहे. दुष्यंतकुमारजींच्या कविता काय गातो तो,चुमेश्वरी एकदम. ”

रिशी आनंदाने बोलला.

नरेशचं रिसायटेशन म्हणजे वेगळ्याच जगाची अनुभूती होती.सगळे अगदी उत्सुक होते.

रूमवर परत जायला म्हणून कबीर निघाला होता तसं रीशीने मोठ्याने आवाज देत त्याला बोलावलं.

त्याने इशाऱ्यानेच नाही म्हटलं तसं रिशी स्वतः उठून त्याच्याकडे गेला आणि आग्रह करत त्याला घेऊन आला.

ऋतू नजरेच्या टप्प्यात असेल अशी जागा पाहून रिशीने त्याला बसवलं आणि स्वतःही त्याच्यासोबत बसला.
कबीरला समोर बसलेलं पाहून ती कमालीची अस्वस्थ झाली.

“ओह्ह माय गॉड! हा मिस्टर किलर असा समोर बसलेला असतांना माझं लक्ष कवितेपेक्षा ह्याच्याकडेच असणार आता...काही दिवसांनी गव्हर्नमेंट पैसे कमवायला ह्याच्याकडे बघायचा पण tax लावेल असं वाटतंय.”
मोना हळूच म्हणाली.

“मोना मी जाते मला कंटाळा आलाय.”
ती रागात मोनाच्या कानात म्हणाली आणि मोनाच्या हातातून चावी ओढली.

“गप्प बस, पूर्ण टीम एन्जॉय करतेय,रूड वाटेल ते.आता थोड्यावेळापर्यंत तिथे गप्पा करत बसली होतीस ना,मग आताच काय झालं.” मोना दबक्या आवाजात तिच्यावर चिडत म्हणाली.

ती नाईलाजाने बसली.
समोर कबीर असल्याने क्षणांत दुप्पट होणारे तिचे हार्टबिट्स, त्याच्या असं पुन्हा अनपेक्षितपणे निघून जाण्याच्या भीतीने दाटलेलं दुःख, तिला स्वतःचीच हालत कळत नव्हती.

नरेशने तो सादर करत असलेल्या दुष्यंतकुमारांच्या कवितेचा परिचय दिला आणि त्याच्या जादुई आवाजात सुरुवात केली-

मै जिसे ओढता बिछाता हुं,वो गझल आपको सुनाता हुं.

एक जंगल है तेरे आंखो में,मै जहां राह भूल जाता हुं

“तू किसी रेल सी गुजरती है,मै किसी पूल सा थरथरता हुं!"

इतक्यावेळ तिच्याकडे एकदा ही बघायचं टाळत होता तो पण नरेशची ती ओळ अगदी थेट काळजात पोहचली-

‘तू किसी रेल सी गुजरती है,मै किसी पूल सा थरथरता हुं!’

शेकोटीच्या हलक्या पिवळ्या तांबूस प्रकाशात उजळलेला तिचा चेहरा, खांद्यावरच्या वेणीशी उगाच चाललेला तिचा चाळा,कानावर पडणाऱ्या ओळी शब्द विरहीत होतायेत,फक्त नाद ऐकू येतोय...!
तुझ्या डोळ्यात असंख्य प्रश्न,अबोल न सुटणारी कोडी आणि ह्या संमिश्र भावनांचं जंगल,त्यात मी न हरवलो तर नवल आहे.
सरळ चालतांना रस्ता हरवणं गुन्हा आहे पण तुझ्या डोळ्यातं हरवणं हा गोड गुन्हा असेल तर मी गुन्हेगारच बरा.
तू खूप साऱ्या अनुत्तरीत,अगम्य प्रश्नांनी जोडलेली,अस्ताव्यस्त भावनांनी काठोकाठ भरलेली एखाद्या रेलसारखी मालिका आहेस आणि जेव्हा जेव्हा मी तुला सामोरा जातो मी अंतर्बाह्य तुझ्या ह्या अनुत्तरीत प्रश्नांसोबत,तुझ्या धुंदीत रिव्हरबरेट होतो......मै किसी पूल सा थरथरता हुं!

त्याची नजर तिच्यावर खिळली असता तिला टाळणं म्हणजे आता तिच्यासाठी अशक्यातली गोष्ट होती.
"त्याच्या नजरेलाही तेच सांगायचंय जे मला ऐकायचंय?"

तिच्या मनात प्रश्नाचं काहूर,मनाची चलबिचल! का शांत झालेल्या माझ्या मनाला पुन्हा अस्थिर करून तू निघून जातोय,आपली सोबत शक्य नाही तर का पुन्हा पुन्हा समोर येतोय..?"

रडवेल्या डोळ्यांनीच एवढेच प्रश्न विचारून ती झटक्यात उठली आणि रूमकडे निघाली.

ती निघाली तसं मोना ही उठणार तेवढ्यात कबीरही रूमकडे निघाला.
रीशीने इशारा करून मोनाला खाली बसायला सांगितलं.
रिशी,काजल,मोना तिघंही गोड हसले.
ह्या दोन वेड्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचे उत्तरं शोधू द्यायचे एवढंच त्यांनी ठरवलं होतं.
नरेशची कविता वातावरणात रंग भरत होती...हळूहळू रंगत होती.

*******************

कबीरने तिला आवाज दिला पण ती थांबली नाही.

सरळ रुमकडे आली,तो ही तिच्यामागे होता.ती रडतेय एवढंच त्याला समजत होतं.ती तिच्या रूमसमोर आली आणि लॅच उघडायचा प्रयत्न करत होती.

“ऋतुजा,ऐक ना,काय झालं,तू का रडतेय? प्लीज यार काहीतरी सांग.”

पूर्ण पॅसेज सामसूम, शांत होता त्यात त्याचा दमदार आवाज जरा जास्तच मोठा वाटला.

ती मुसमुसतच दरवाजा उघडायचा प्रयत्न करत राहिली,
हात थरथरत होते,काय करतेय ते समजत नव्हतं.आता मात्र त्याने नाईलाजाने तिच्या हाताला धरून खेचत,त्याच दरवाजाला तिला पाठ टेकवून उभं केलं.

“काय झालंय ऋतुजा.मी प्रोग्रामला जॉईन झालेलं नाही आवडलं का तुला?”

ती अजूनही त्याच्याकडे न बघता बाजूला बघत होती.डोळे तसेच पाझरत होते.

क्षणभर त्याला वाटलं तिला असंच मिठीत घ्यावं आणि डोक्यावरून हात फिरवत शांत करावं..पण क्षणभरच!
तो भानावर आला.

“मी नाही थांबत प्रोग्रामला. जा तू एन्जॉय कर, मघाशी मी वेद्चा विषय काढल्याने दुखावली गेलीस ना,त्याची आठवण करून दिली मी नकळत तुला ...i am really very sorry for that.यार मी असाच मूर्ख आहे.”

आता मात्र तिला हुंदका अनावर झाला,तिच्या मनात काही तासांनी तो पुन्हा दुरावणार याचं दुःख असतांना तो तिला भलतीच सांत्वना देत होता.

तिचा राग अनावर झाला.नकळत त्याच्या खांद्याना घट्ट पकडून डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या अश्रूंना न थांबवता ती म्हणाली-

“हो,मूर्ख आहेस तू कबीर ....काहीच कळत नाही तुला.खडूस.”

तिचे रडवेले डोळे,गालांवरचे ओघळ,संतापाने थरथरणारे ओठ, वाढलेली श्वासांची गती आणि ती इतक्या जवळ... तो गुंग झाल्यासारखा बघतच राहिला.

“कळतंय ! तू मिस करतेय..ना ?”

तिचे डोळे पुसत तो हलकेच म्हणाला.

“इतके दिवस मिस करत होते आणि आता पुन्हा मिस करणार आहे.”
त्याचा हात झटकून,त्याला थोडं मागे ढकललं,दरवाजा उघडायचा पुन्हा प्रयत्न केला आणि उघडल्यावर आत जातांना त्याच्याकडे रागाने बघत “स्टुपिड !” एवढं बोलून तिने दरवाजा त्याच्या तोंडावर धाडकन बंद केला.
तिच्या वागण्याचा बोलण्याचा त्याला कुठेच ताळमेळ लागत नव्हता.

********************

रात्रभर ऋतुजाच्या फिलिंग्सचा विचार करून तो अजूनही कुठल्याही निर्णयाप्रत येत नव्हता,अगदी पहाटेच उठून तयार होऊन गॅलरीत शांत बसला होता- डोक्यात विचारांचं काहूर -

”तिला काल नेमकं काय म्हणायचं होतं? किती संदिग्धता होती तिच्या बोलण्यात,इतकी दुखावल्यासारखी का झाली आहे? ब्रेकअपमुळे की..अजून काही जे मला कळत नाहीये,
सहा महिन्यांपूर्वी एका मोमेंटला मी तिच्या आयुष्यात दाखल झालोय असं वाटलं होतं पण मग....मीच तर तिला समजावलं होतं की हे प्रेम नाहीये...पण ती खरंच समजली होती का? मी तिला सैरभैर करून निघून गेलो,वळून बघितलं ही नाही तिची काय परिस्थिती असेल,ती सावरली असेल की नाही..काही काही विचार केला नाही.मॉम कदाचित त्यावेळी योग्य बोलत होती की एकदा मनातलं बोलून जा म्हणजे ते परफेक्ट क्लोझर असेल पण आता तिच्याकडे प्रेम व्यक्त करणं कितपत योग्य ठरेल? ती नाराज झाली तर? तिच्या समस्या,मानसिक घुसमट अजून वाढली तर? नाही नको..तसं काही नसेल तर ती अजून डिस्टर्ब,कन्फ्युज होईल. त्यापेक्षा आहे तितके दिवस तिची सोबत,तिचं हसणं,राग,नखरे सगळं सगळं मनात समेटून आयुष्यभरासाठी सोबत घेऊन जाईन. तिच्या ह्या ब्रेकअपनंतरच्या परिस्थितीचा फायदा घेऊन माझं प्रेम नाही व्यक्त करू शकत मी.मला फक्त तिला डोळ्यात आणि हृदयात साठवायचंय पण जमेल का? नाही यार...माहित नाही. ”

गॅलरीत अस्वस्थपणे येरझारा मारत कितीतरी वेळ तसाच निघून गेला.

तरीही स्वतःशीच बडबड चालली होती.स्वतःचेच प्रश्न आणि उत्तरं देखील.

“कालसाठी पुन्हा एकदा सॉरी म्हणूया का?असंही आता थांबायचा निर्णय घेतलाच आहे तर तिच्यासोबतचा एक एक क्षण जगायला हवा,पण आता जाऊ?
ती उठली असेल का ? खरं म्हणजे रात्री किती नाराज होती झोपली तरी असेल का?
....नाही यार तिला आता बघायचंय मला,आत्ताच......”

आरश्यात बघून केस करतांना त्याला त्याचंच हसू आलं-

“शेवटी टिपिकल निब्बा केलंच पोरीने!”

***********

थरथरत्या हाताने त्याने तिच्या रूमची बेल वाजवली.
बेल वाजवून दरवाजा उघडायच्या एक दोन मिनिटांत तिला अगदी समोर बघून पहिल्यांदा काय बोलायचं याचा शंभराहून अधिक सराव केला त्याने.

दरवाजा उघडण्याचा आवाज झाला तसं ती समोर दिसेल याची अनामिक गोड हुरहूर दाटली होती.

दरवाजा उघडला गेला,समोर मोना होती.

“ओह्ह, हाय कबीर” ती अजूनही झोपाळलेली होती.

“हाय,गुड मॉर्निंग. Actually ऋतुजाशी जरा बोलायचं होतं,तिला आवाज देतेस का?”

“अरे ते ध्यान सकाळीच माझ्याशी भांडून बाहेर निघून गेलंय, गॅलरीतून बघितलं, मागच्या बाजूला तरी नाहीये ती. तू पुढे नदीच्या किनाऱ्यावर वैगरे शोध ते येडं तिथेच असेल,पक्का.”

“ओके थँक्स.”

“अरे पण जपून हं! काय माहित काय झालंय तिला खूप चिडलेली होती,माझ्यामागे येऊ नको असं बोलून गेलीय मला. !!”

“तुला येऊ नको म्हटलीय ,मला नाही.”

तो गोड हसला आणि निघून गेला.

“अरे यार .. असा हसत नको जाऊ रे,आमचं ते ध्यान ,खुळावतंन मग.”

त्याला पाठमोरं बघून ती हसत पुटपुटली.

********************

बराच वेळ शोधाशोध केल्यावर किनाऱ्यावरच्या एका पायरीवजा दगडावर बसलेली दिसली.
एरवी वाऱ्याने भुरभुरणारे दाट केस ओलेते असल्याने निमूट बसलेले होते.साधासा टी शर्ट आणि केप्री. दुरूनच पाण्यात पाय बुडवून थोडं पाणी उडवायचा खेळ चालला होता.
उजव्या पायात फक्त एक नाजूक काळा दोरा त्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर खुलून दिसत होता.

”त्या धाग्यामुळे ती क्युट वाटतेय की धागा तिच्या पायात असल्याने क्युट वाटतोय”

मनात क्षणभर चमकून गेलेल्या विचाराचं त्याला हसू आलं.

तिचं ते स्वतःत मग्न असणं तसचं असावं म्हणून तो हळुवार पावलांनी तिकडे गेला.तिला चाहूल लागलीच –

“मोने मी तुला म्हटलं होतं,मला एकटं राहू दे.”

“पण मला नाही ना एकटं सोडायचं तुला..”

तो न राहवून बोलून गेला,आताश्या तिला समोर पाहून पहिल्यासारखं फिलिंग्स लपवणं जरा जरा अवघड झालं होतं खरं.

‘कबीर..’
ओठावर हलकेच नाव आलं.तिने झटकन मागे वळून पाहिलं.
काही वेळा पूर्वीची नाराजी हवेतच विरून गेली..’पण पण...हा जातांना शेवटचं म्हणून भेटायला आला असावा,पुन्हा स्टॅच्यु करायला.”
क्षणात चेहऱ्यावरचं हसू मावळलं.

“...I mean एकटं बसणं चांगलं नसतं मनासाठी”
तिच्या शेजारी बसत तो म्हणाला.तिने पुन्हा एकनजर त्याच्याकडे बघितलं.सकाळच्या हलक्या उन्हासारखा सतेज आणि हवाहवासा.

“तुझी फिलोसॉफी तुझ्याजवळच ठेव.”

त्याला टाळण्यासाठी तो बसला म्हणून ती उठायच्या बेतात असतांना त्याने तिचा हात पकडला.

तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं.

तो समोर बघत होता.तिच्याकडे त्याचं लक्ष ही नव्हतं,तिने हात सोडवायचा प्रयत्न केला,त्याची पकड जरासुद्धा सैल झाली नाही.

“कबीर...हात सोड.”

ती चिडली होती की चिडायचा प्रयत्न करत होती तिला तिचंच काही कळत नव्हतं.

“मी बोलत असतांना असं निघून गेलेलं मला आवडत नाही.शांततेत बसायचं.”

तो शक्य तितक्या सौम्य आवाजात म्हणाला.

“कबीर,हे तुझं ऑफिस नाहीये की तू माझा बॉस नाहीये ऑर्डर द्यायला.”

तिने पुन्हा हात सोडवायचा प्रयत्न केला.

ती ऐकत नाही हे पाहून हात खेचत त्याने तिला खाली बसवलं.

“पहिली गोष्ट, मी ऑफिसमध्ये कुणाचा हात पकडत नाही. दुसरी गोष्ट हात पकडला तर सोडत नाही..आणि कुणी मी सांगूनही ऐकत नसेल तर...”

तिच्या डोळ्यात सरळ आरपार बघत तो म्हणाला.

तिच्या पापण्यांवर नदीवरून येणाऱ्या ओलसर वाऱ्याची भूल,त्यात त्यांची फक्त चंचल उघडझाप.

“तर काय?”
ती जरा जडावलेल्या आवाजात म्हणाली. ह्या जगाचे जणू संदर्भ पुसले गेलेले,क्षणांची गृहितकं बदललेली..!

“तर,.....तर, मारामारी....! You तो know ‘I love मारामारी.”
तो जरासं गोड हसला, नजरेचा रेशमी धागा तसाच कायम.

“तू मला मारणार...?”

तिलाही ह्या समांतर जगातून वास्तवात यायची इच्छा कुठे होती,ती पाण्यावरच्या लहरीसारखी पाण्यात एकरूप झालेली.त्याच्या हातात अजूनही तिचा हात तसाच.

“हम्मम..माझं ऐकलं नाही तर नक्कीच.”

“बदमाशी करणार?”

एव्हाना फक्त आवाज जड होता आता डोळे डबडबले,मनात सारखं एकचं हा शेवटचं भेटायला आलाय,हा क्षण शेवटचाय.

“ह्म्म्म..”

“खडूस..!”

तेवढ्यात जवळपासच पाण्यात कुणीतरी उतरल्याने झालेल्या आवाजामुळे ते भानावर आले.तिच्यापासून तो जरा बाजूला झाला.
‘हे बरयं,कुणी बोलायच्या अगोदर उठून जायचं,रूड वागायचं आणि त्यालाच खडूस म्हणायचं.”

तो डिस्कशन सहज,फॉर्मल करायला म्हणून बोलला.
तिच्या मनात प्रचंड गोंधळ-

“काय करतेय ऋतू? त्याला का जाणीव करून देतेय प्रेमाची? तू म्हणजे कम्प्लीट मेस आहेस, बालिश,नादान...त्याचं सहज सुंदर,स्टेबल आयुष्य का खराब करतेय? तो आहे ना तुझ्यासोबत डायरीच्या पानांतून,स्वप्नांत,विचारात,मनात जाणीवेत,नेणीवेत का त्याला आयुष्यात उतरवण्याचा अट्टाहास करतेय,तू त्याचही आयुष्य विस्कटशील.गेल्या सहा महिन्यात एकदाही त्याने प्रयत्न केला का तुझ्या आयुष्यात डोकावून बघायचा? त्याचं आयुष्य सुरळीत चालू असतांना का त्याला तुझ्या कंप्लीट केऑस् असणाऱ्या प्रेमाची शिक्षा देतेय,नको करू असं.तुझं खरचं प्रेम असेल त्याच्यावर तर दूर ठेव त्याला.प्लिज !"

#क्रमशः

Copyright©2019 हर्षदा
All rights reserved. No part of this story may be reproduced or used in any manner without the prior written permission of the copyright owner, except for the use of brief quotations in a review.