Manachya vaatevarti Avyakt to an mi - 11 books and stories free download online pdf in Marathi

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 11

पुढे...

आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच्यावर नाराज राहू शकतो, त्याचा राग करू शकतो, पण त्याचा तिरस्कार करू शकत नाही... राग, नाराजी आपण त्याच व्यक्तीवर करतो ज्याच्यावर आपण आपला हक्क समजतो.. आणि हक्क कोणावरही गाजवल्या जात नसतो ना...!! प्रेमात नकळत आपण त्या व्यक्तीला आपण मानून घेतो, त्यामुळे त्याच्यावरचा रागात किंवा नाराजीतही त्याच्यावरचं प्रेम सुतभरही कमी होत नाही.... प्रेमात राग म्हणजे कसं असते माहीत आहे का??? जसा एखाद्या गडद रंगाच्या कपड्याला आपण जितकं घासणार, जितकं धुणार त्यातून तेवढाच रंग बाहेर पडत जाणार...प्रेमाचंही तसंच आहे...जितके भांडणं होतील, एकमेकांवर नाराजी असेल तरी ते प्रेम वाढतंच जाणार...आजपर्यंत तरी माझं अतुलवरचं प्रेम कमी झालं नाहीये...मग कॉलेजमध्ये छोटे छोटे गैरसमज कसे आम्हाला दूर करू शकत होते..हं, म्हणजे, बोलणं नव्हतं जास्त त्या गैरसमजांमुळे तरी ओढ मात्र होतीच...

प्रेम आणि त्यात होणारा मनस्ताप यांसोबत सगळ्यांचं एक विलक्षण पण निकट नातं बनतचं आयुष्यात कधी ना कधी... आयुष्यातल्या कोणत्या ना कोणत्या वळणावर आपला या गोष्टींशी सामना होतोच...प्रेम असेल तर ठीक पण जर मनस्ताप भेटला तर त्यातून बाहेर पडण्याचीही तयारी असावी आपली...खरं तर काय आहे, या गोष्टींतून आपण स्वतःला कसं घडवतो ते महत्त्वाचं आहे...शेवटची भेट झाली होती तेंव्हा अतुल बोलला होता,
"जर दोन लोकं एकमेकांत आकंठ बुडाले असतील आणि त्यामुळे जर ते एकमेकांना कमजोर करत असतील, तर ते बुडणंच चुकीचं आहे...कारण जे लोकं एकमेकांवर इतका जीव ओवाळतात ते एकमेकांचा आधार बनण्याऐवजी कुबड्या बनत असतील तर त्यांनी लगेच आपले मार्ग वेगळे करावे...अशी कमजोरी कधीच आपल्या आयुष्यात ठेवू नये, जे तुम्हाला आतून तोडून टाकेल...."
त्याच्या असं बोलण्यावर राग आला होता खूप मला पण आज ते बरोबर वाटते...कुठेतरी वाचलं होतं की प्रेम म्हणजे आपलं प्रतिबिंब शोधणं...पण जर तो व्यक्ती आपलंच प्रतिबिंब असेल तर त्यात नवीन काही घडणारच नाही...आपल्या हो ला हो करणारा जर आपलं प्रेम असेल तर ती आपली अधोगतीच आहे...पण तेच ना, या गोष्टी हळूहळू उलगडत जातात, वयानुसार प्रगल्भ होत जातात, पण कॉलेजमध्ये असताना कुठे समज होती याची...त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणं, मनाला लावून घेणं सुरू होतं...

त्या दिवशी मी अतुलवर रागवली होती कारण मला वाटलं होतं त्याने मुद्दाम सगळ्यांसमोर माझी चेष्टा केली आणि त्याचं रागात मी त्यालाही बरंच काही बोलून गेली होती...
त्यादिवशी संध्याकाळी होस्टेलला परत आल्यावर मी चेहरा पाडूनच बसली होती...कसंतरी दोन घास पोटात टाकले आणि पुन्हा तशीच एकदम शांत, उगाच पुस्तक उघडून रूममध्ये येऊन बसली, ऋताची बकबक सुरू होती पण माझं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं अजिबात... त्यामुळे तिने मला धक्का दिला अन बोलली,

"ओ मॅडम, लक्ष कुठे आहे...मी काहीतरी बोलत आहे तुला..ऐकलं की नाही...."

"हां... हो, हो आहे ना लक्ष, बोल काय बोलत होतीस...?"

"ते सोड, तू मला आधी एक सांग आज इतका का मूड ऑफ आहे तुझा....."

"का म्हणजे?? तुला माहीत नाही का आज काय झालं??"

"माहीत आहे, पण ही गोष्ट पहिल्यांदा झाली आहे का आपल्यासोबत?? म्हणजे बघ, तूच बोलते ना की सिनिअर्स थोडी थट्टा मस्करी करतात जुनिअर्स ची, ते जास्त मनाला लावून नाही घ्यायचं... आणि आपण ही रोज ते हसण्यावरतीचं नेल्या ना गोष्टी...रोज कोणी तरी सिनिअर येऊन मस्ती करून जातातचं, आज अतुल आला, एवढाच काय तो फरक... मग तुला राग नक्की कशाचा आला?? वाईट कशाचं वाटतंय??"

"कमाल आहे तुझी ऋता...तुला माहीत आहे सगळं आज जे काही घडलं तरी विचारते की मला राग कशाचा आला.."

"हो, माहीत आहे, तू अन अतुल एकमेकांना आधीपासून ओळखता हे पण माहिती आहे, पण मला हे विचारायचं आहे की तुला राग अतुलने मजाक केला त्याचा आलाय की तो आणि त्याची ती मैत्रीण, प्रिया, ती त्याच्या सोबत होती, त्याचा आला..."
ऋताच्या या बोलण्याने माझ्यासमोर खूप मोठं प्रश्न चिन्ह उभं राहीलं होतं... म्हणजे, अगदी खरंच तर बोलली ती की याआधी जेंव्हा कधी सिनिअर्स ने येऊन असा जाच केला तेंव्हा तर इतकं वाईट वाटलं नाही, मग आज का?? मी गाढ विचारात होती, काहीही उत्तर देऊ शकत नव्हती ऋताला...ती येऊन माझ्याजवळ बसली आणि पुन्हा बोलली,

"कसं आहे, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याच जवळ असतात पण आपण ते पाहू शकत नाही...पण एवढंच सांगेन की तू अतुलला जरा जास्तच बोलून आलीस...."

ऋताच्या बोलण्याने माझ्या मनातली कालवाकालव जास्तच वाढवली होती... मी शांतपणे डोळे मिटून जेंव्हा सगळं आठवलं, तेंव्हा मला कळालं की मी रागाच्या भरात अतुलशी मैत्रीही नकारली होती... त्याला नक्कीच खुप वाईट वाटलं असेल, मी का अशी बोलली त्याला??? पण तो ही सतत प्रिया प्रिया करत होता, तेच नाही आवडलं मला...पण मला न आवडायला काय झालं??? असुदेत ना त्याच्या कितीही मैत्रिणी, मला का फरक पडतो??? आणि माहीत नाही काय काय विचारांनी धुमाकूळ घातला होता माझ्या डोक्यात......त्याला फोन करावा का??? पण रात्री असं फोन करणं बरोबर आहे का.? कितीतरी वेळा माझे हात मोबाईल वर जाऊन डायल लिस्ट मध्ये त्याच्या नावावर जाऊन थांबायचे, पण कॉल करायला मन धजत नव्हतं...शेवटी केवळ "सॉरी...." एवढा मेसेज करून मी झोपी गेली....

त्यादिवसानंतर आम्ही पुन्हा आमच्या आमच्या लेक्चर, प्रॅक्टिकल मध्ये बिझी झालो, पण तरीही मी रोज त्याच्या मेसेज ची वाट पाहायची, कारण माझ्या "सॉरी" वर त्याची काहीही प्रतिक्रिया आली नव्हती...कितीतरी वेळा आम्ही एकमेकांच्या समोरून गेलो पण त्याने मला साधी नजरही दिली नाही, तो तर असा वागत होता जसा आम्ही पूर्णपणे अनोळखी आहोत एकमेकांना... मला त्याचं हे वागणं खूप बैचेन करत होतं...आधी घरच्यांसमोर होतो म्हणून काही बोलू शकलो नाही आम्ही, आणि आता माहीत नाही का, पण उगाच त्याच्या किंवा माझ्या मित्रांच्या नजरेतुन हे लपवण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही...असं नाही की त्या घटनेनंतर मी प्रत्यक्षात त्याला बोलण्याचे प्रयत्न नाही केले, पण जेंव्हा कधी बोलण्याचा विचार केला, ती संधी मिळाली, त्याच्यासोबत प्रत्येकवेळी प्रिया होती..आणि तिला बघून तर माझं मन खूपच हिरमुसल्या सारखं व्हायचं.

प्रेम असं करावं की त्यात प्रेम हा शब्द ही आला नाही पाहिजे, इतकं ते खाजगी असावं दोन लोकांमध्ये... आणि कदाचित यामुळेच त्याचा गाजावाजा व्हावा अशी इच्छा आमची नव्हती...अतुलच्या वागण्यातून एक गोष्ट तर नक्कीच कळली होती की राग हा शांततेतूनही व्यक्त केल्या जाऊ शकतो आणि तीच भयाण शांतता मला अतुलकडे बघून जाणवायची...

बघता बघता पहिलं सेमिस्टर संपायला आलं होतं, सबमिशन, असाईनमेंट, प्रेझेन्टेशन यांची बरसात सुरू होती...मी माझं सगळं पूर्ण करून लायब्ररीत बुक्स शोधत असताना मला चेतनाचा कॉल आला..तसं चेतनशी माझं बोलणं व्हायचंच...त्याची ती मस्ती, त्याचे अन साक्षीचे किस्से ऐकून मन प्रफुल्लित व्हायचं...सध्या माझी जी काही मनस्थिती होती, त्यात चेतनचं असं हसणं खिदळणं मला दिलासा देऊन जायचं... मी त्याचा कॉल घेण्यासाठी बाहेर गेली तर मला अतुल लायब्ररीत येताना दिसला, आणि विशेष म्हणजे आज तो एकटा होता, आणि सबमिशन मुळे लायब्ररी ही रिकामीचं होती...त्यामुळे त्याला बोलायला एक संधी होती माझ्याकडे...मी घाईघाईने चेतनला बोलली की नंतर बोलते आणि अतुलच्या मागे लायब्ररीत गेली...

अतुल एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसला होता, मी गुपचूप जाऊन त्याच टेबलवर जाऊन बसली, त्याने एक नजर उचलून माझ्याकडे पाहिलं आणि मी काही बोलणार इतक्यात माझा मोबाईल वाजला..चेतन मला पुन्हा फोन करत होता...मी कट केला तरी त्याने अजून एक कॉल केलाच... इतक्यात अतुल उठून बाहेर जायला निघाला...माझं लक्ष मोबाईल वरही होतं आणि अतुलवरही...त्यामुळे जेंव्हा तो जायला निघाला, त्याला थांबवण्यासाठी माझ्या तोंडून निघालं...

"चेतन, ऐक ना, थांब ना..."
आणि मी माझी जीभ चावली की हे काय माती खाल्ली मी पुन्हा..अतुलने एक कटाक्ष माझ्यावर टाकला, आणि उपहासात्मक हास्य देत बोलला,

"मॅडम...मनात एक आणि तोंडात एक असेल तर असंच होतं... तुमच्या लक्षात नसेल तर, म्हणजे ते नसेलच म्हणा..त्यामुळे सांगतो माझं नाव अतुल आहे.."
आणि असं बोलून तो जायला निघाला.. मी पुन्हा घाईघाईने त्याचा हात पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याने माझा हात झटकला...आता मला राग आला, आणि मी त्याला रागातच बोलली...

"काय चाललंय तुझं?? आज सगळं क्लिअर केल्याशिवाय मी तुला येथून जाऊ देणार नाहीये...समजलं..आज बोलावंच लागेल तुला...खूप झालं हे शांत राहणं आता...."

"काहीही नाही बोलायला,
वो जो ख़ामोशी की एक पतली लकीर उभरी थी,
.. अब सरहद बन चुकी है.. तेरे मेरे दरमियाँ…।"

त्याने फक्त एवढीच प्रतिक्रिया दिली आणि पुन्हा जायला निघाला...आता मात्र तो माझ्या डोक्यात गेला...मी त्याच्या मागे गेली आणि त्याचा हात पडकून त्याला माझ्याकडे वळवत बोलली

"अतुल... काय चाललंय तुझं?? का असा वागतोयेस?? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे...."
माझं असं चिडल्यामुळे त्याने त्याची चालणारी पाऊलं मागे वळवली, त्याच्या हातातलं पुस्तक टेबलावर आदळलं, आणि माझ्या आणखी जवळ येत बोलला...

"मी काय वागतोय?? तुझं काय चाललंय ते सांग आधी?? तू कशी वागत आली आहेस आजपर्यंत ते बघ आधी, मग माझ्यावर बोट उचल...."

"मी...मी काय केलं?? काय एवढा मोठा गुन्हा केला मी बोल??? दे उत्तर..."
माझे डोळे डबडबले होते, तरीही एकटक त्याच्या डोळ्यांत पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती मी, या आशेत की तो काहीतरी समाधानकारक उत्तर देईल...

"काय उत्तर देऊ??? कशासाठी देऊ?? तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही..कळलं ना...आणि आपण आहोत कोण एकमेकांचे?? काय अधिकार आहे आपला एकमेकांवर?? आपल्यात साधी मैत्रीही नाही...हे तुच बोलली होतीस ना...मग आता हे बोलणं किंवा हा प्रश्न उत्तरांचा खेळ कशासाठी???"

माझ्या पायाखालची जमीनचं हरवली अतुलचं उत्तर ऐकून, स्वप्नांत ही विचार केला नव्हता की अतुल असा काही बोलेल मला...माझ्या डोळ्यांतील पाणी बाहेर पडू नये याचे अतोनात प्रयत्न मी करत होती आणि तो तसाच रागाने मला बघत होता...शेवटी माझे अश्रू बाहेर पडलेच, आणि त्याच्यापासून दोन पाऊलं मागे घेतले...पण अतुलला काय झालं काय माहीत आणि त्याने माझा हात हातात घेत बोलला,

"हे बघ, हे असं रडू न..."
पण त्याचं वागणं मला खूप दुखवुन गेलं होतं, त्यामुळे मी त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच माझा हात काढून घेतला आणि बोलली,

"बस्सस...कळलं... आता जोपर्यंत तू बोलत नाही स्वतः, तोपर्यंत तुला बोलणं तर दूर, तुला बघणार ही नाही मी..."
मी माझ्या थरथरत्या आवाजात बोलली,

"हम भी खामोश रहकर तेरा सब्र आजमायेंगे,
देखते है तुझे हम अब कब याद आयेंगे ।"

आणि अतुलला त्याच्याच भाषेत उत्तर देत, मी डोळे पुसले, टेबलावरचं सगळं सामान आहे त्या अवस्थेत गोळा केलं आणि निघून आली बाहेर, माझ्या तुटलेल्या मनाचा एक तुकडा अतुलजवळ ठेवून...त्या दिवशी असं वाटलं जसं एखादी खूप महागडी वस्तू हातातून निसटून तुटून गेली असेल आणि आता मात्र ती सावरताही येत नाहीये...मी लायब्ररीतुन निघाली खरं, पण मला वाटत होतं एकदा तरी अतुल येईल, कमीतकमी बोलेल किंवा एखादा मेसेज तरी करेल, पण अतुल वळून मात्र आला नाही...दोन तिन दिवस चोरून चोरून रडण्यात घालवले, पण असं वागून चालणार नव्हतं मला...पूढे सेमिस्टर एक्साम तोंडावर होती, अभ्यास करायचा होता, आता अतुल नावाचं पुस्तक बंद करून, खरी खरी पूस्तकं हातात घ्यायची वेळ होती...मन थाऱ्यावर नव्हतं त्यामुळे तो अभ्यास तरी काय डोक्यात जाणार होता आणि याचे परिणाम जे व्हायचे तेच झाले..परीक्षा झाल्यावर जेंव्हा रिझल्ट आला, त्यात मी फक्त बोलायलाच पास झाली होती...नुसतंच पासिंग ग्रेड घेऊन आयुष्यात पहिल्यांदा रिझल्ट आला होता माझा...बाबाही काही विशेष खुश नव्हतेच माझ्या निकालाने, ते एक बर्डन वेगळंच होतं...अतुलच्या दुःखाने माझी अवस्थाही 'फाईव्ह पॉईन्ट समवन' होईल याचा विचार मी केला नव्हता कधीच....
**********************

क्रमशः


Dear readers,

आजपर्यंत तुम्ही माझ्या 'समर्पण' आणि 'अधांतर' कथेला भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी मी तुमचे जितके आभार व्यक्त करेल तितकं थोडंच आहे...तरीही मी मनापासून तुमची ऋणी आहे...एक लेखक घडत असतो वाचकामुळे असं माझं ठाम मत आहे, त्यामुळे स्वतःचं लेखन अजून दर्जेदार करण्यासाठी तो सतत वाचकांच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद आणि समीक्षेवर अवलंबून राहतो... त्यामुळे मलाही माझ्या वाचकांच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद जाणून घ्यायच्या आहेत, माझ्या लिखानाबद्दल, कथेबद्दल जेणेकरून मी अजून चांगलं लिहून तुमच्यापर्यंत पोहीचवण्याचा प्रयत्न करू शकेल...त्यामुळे माझी तुम्हा सगळ्या वाचकांना कळकळीची विनंती आहे, जर तुम्हाला माझं लेखन आवडत असेल किंवा नसेल ही तरी मला तुमच्या प्रतिक्रिया समीक्षेतून, मॅसेज मधूनकळवा... तूमचं समीक्षण मला अजून प्रोत्साहन देईल अजून चांगलं लिहायला... त्यामुळे आशा करते ही माझी ही विनंती तुम्ही नक्कीच वाया जाऊ देणार नाही...काही चुकल्यास क्षमस्व...!!


तुमचीच,

अनु...🍁🍁