Man karare Prasanna books and stories free download online pdf in Marathi

मन करारे प्रसन्न

मन करारे प्रसन्न

रात्रीचे जेवण करून मी नुकताच बेडरुममध्ये येवून बसलो होतो. तेवढयात माझ्या इंद्रजीत नावाच्या पुण्याच्या एका मोठया व्यापारी मित्राचा मला अचानक फोन आला.

मी फोन उचलून, " बोल इंद्रजीत ! आज खूप दिवसांनी आठवण काढली."

"आठवण काढली नाही. तर तुझीच आठवण आली. कारण मी काही दिवसांपासून निराशेच्या गर्तेत कुठेतरी खूप खोलवर अडकलो आहे. आणि मला माहित आहे.तुच यामधून मला बाहेर काढू शकतोस."

त्याच्या या बोलण्यानं क्षणभर मलाच काही सुचले नाही. कारण तो एक तर खूप मोठा ‍बिजनेसमॅन होता. त्याला पैशांची चिंता नव्हती.त्याची पत्नीही खूप सुंदर होती. तो नेहमी म्हणायचा, माझे भाग्य आहे की मला श्वेतासारखी पत्नी मिळाली. गावाकडील त्याचे आई-वडील व इतर कुटुंबीयही मजेत होते. मग याला चिंता कसली? क्षणभर मलाच प्रश्न पडला. त्याच्या निराशेमागचे नेमके कारण काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मी त्याला ‍विचारले,

" तुझ्यासारख्या सुखी माणसाला कशाच्या चिंतेने निराशेच्या गर्तेत लोटले आहे?"

"मी ही खूप विचार केला, पण सगळं सुख, समाधान असताना मलाच समजत नाही की, मला नेमकी कशाची चिंता आहे? त्यासाठीच मी तुला फोन केला आहे. सतत मनात नकारात्मक विचार येतात, बिजनेस कोसळण्याची भिती वाटते, कधी-कधी मृत्युचीही भिती वाटते. आपले नातेवाईक मरत आहेत याचेही स्वप्न पडून मी अचानकच झोपेतून दचकून उठतो. नंतर प्रयत्न करूनही मला झोप येत नाही. मी मनातून खूपच घाबरलेलो आहे. मी वरून जरी चांगला दिसत असलो तरी आतमधून पार कोलमडलो आहे. माझं मन थाऱ्यावर नाही.त्यामुळेच मी तुला फोन केला आहे. कारण तुच मला यामधून वाचवू शकतोस."

त्याचे निराशेने भरलेले वाक्य ऐकून मीही क्षणभर निराश झालो. कारण तो परिणाम माझ्या मनावर तात्काळ झालेल्या नकारात्मक विचारांचा होता.याचा अर्थ इंदजीतही नकारात्मक विचार करत होता. किंवा कोणत्यातरी नकारात्मक घटनांचा त्याच्या मनावर परिणाम होत होता. पण तेच त्याला सांगता येत नव्हतं.

नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे तो निराश झाला असेल याचे उत्तर शोधण्यासाठी व त्याला समजावून सांगण्याच्या उद्देशाने मी त्याला म्हणालो,

"निराशा फक्त वाईट विचारांमुळे किंवा आपल्या बाजूला घडलेल्या,घडत असलेल्या नकारात्मक घटनांमुळे किंवा अपेक्षाभंग किंवा आपल्या मनासारखे न घडल्यामुळे येते. तुझ्या बाबतीत असे काही घडले आहे का? ते तु मला आधी सांग. कारण नेमकी निराशा कशामुळे आहे ते आधी आपण शोधलं पाहिजे. कधी-कधी संकट खूप क्षुल्लक असतं. पण निराशेचे कारण न कळल्यानेही आपण निराश होत असतो."

"मी विचार करून तुला सांगतो." तो अर्धवट समाधानानेच बोलला.

मी त्याला सकारात्मक करण्याच्या उदेदेशाने, "तु काही काळजी करू नकोस. फक्त लक्षात ठेव. माणसाचे विचारच त्याला सुखी किंवा दु:खी बनवत असतात. त्यामुळे सकारात्मक विचार कर व सकारात्मक विचार असलेले पुस्तके वाच. तोपर्यंत मी काही तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो."

"ठीक आहे." म्हणत त्याने फोन ठेवून दिला.

आता मीही बेडवर अंग टाकले.पण खूप प्रयत्न करूनही मलर झोप येईना. इंद्रजीतला नेमक्या कोणत्या निराशेने घेरले असावे? माझ्या लक्षात न आल्याने मीही निराश झालो. पण मी स्वत:ला सावरले. कारण काही दिवसांपुर्वी मीही असाच अजाणत्या कारणाने निराश असायचो. पण सकारात्मक विचारांचे पुस्तके वाचून मी माझ्या मनाला सक्षम बनवत होतो.

फक्त छोटासा प्रयोग करून पहा. आपल्या कोणत्याही मित्राच्या व्हॉटस्अपला काहीतरी मेसेज करा. व त्या मित्राने तो मेसेज पाहण्यापुर्वी तो मेसेज डिलिट करा. त्या मित्राने डिलिट केलेला मेसेज पाहिल्यानंतर तो लगेच तुम्हाला मेसेज करेल. काय डिलिट केलेस? तुम्ही त्याला सांगु नका, त्याच्या मेसेजलाही रिप्लाय देवू नका. तो काय डिलिट केले असेल याचा विचार करत निराश होईल. म्हणजेच निराश व्हायला माणसाला क्षुल्लक कारणही पुरेसं असतं.

विचार करता-करता माझ्या डोक्यात व डोळयांसमोर काही दिवसात घडलेल्या घटना एखाद्या चित्रफीतीसारख्या धाडधाड येऊ लागल्या. कारण गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले होते.उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आले होते. भुमिहीन,शेतमजूर,छोटे व्यापारी, कंपन्यामधील नोकर वर्ग काम नसल्याने हतबल झाले होते. त्यातच निराशेमधून नामांकीत व प्रसिद्ध व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या बातम्या टी.व्ही.वर येत होत्या. कोरोनामुळे लोकांची चाललेली फजिती, कोरोनामुळे झालेले मृत्यु, कोरोनाच्या येणाऱ्या संभाव्य लाटा यांसारख्या नकारात्मक घटना कितीही सक्षम विचारांची व्यक्ती निराश होण्यास पुरेशा होत्या.काही दिवसांपासून अफगाणीस्तानामध्ये तालीबान्यांनी केलेल्या कब्जामुळे, त्यांनी चालवलेल्या अत्याचारांच्या बातम्यांमुळेही मानवी मन हेलकावे खात होते.महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थीतीमुळे तेथील लोकांचे झालेले हात पाहवत नव्हते. या नकारात्मक घटनांच्या प्रभावामुळेच वैयक्तीक आयुष्यात सुखी असलेला इंद्रजीत मनस्वास्थ बिघडून निराश झाला असेल याची मला पूर्ण खात्री झाली.

दुसऱ्या दिवशी त्याचाच फोन आला. यावेळी मात्र त्याच्या आवाजात प्रसन्नता स्पष्ट जाणवत होती.

"तु म्हणलास त्याप्रमाणे मी सकारात्मक विचारांचे पुस्तक वाचायला घेतले.दोन-तीन पाने वाचताच मला माझे मन प्रसन्न झाल्यासारखे वाटले."

त्याचे नकारात्मकतेने काळवंडलेले पण उजाळत असलेले पाहून मलाही खूप आनंद झाला. पुढे त्याने माझ्या अपेक्षेप्रमाणेच कोरोनामुळे व अफगाणीस्तानमध्ये उद्भवलेल्या गोष्टींमुळेच आपला व्यावसाय कोलमडेल व आपण आपल्यासोबतच आपल्या नातेवाईकांचेही प्राण गमवून बसु या अनामिक भितीनेच निराशा आल्याचे सांगीतले.

मी त्याला समजावत म्हणालो, "तुला समाजावून सांगण्या इतका मी मोठा नाही. पण तुझा मित्र असल्यामुळे तुला निराशेतून मुक्त करणे हे माझे कर्तव्य आहे. कोरोनापुर्वी मलेरिया, डेंग्यु, कँसर, एड्स बरेच रोग आले आणि आजही आहेत. एवढेच काय सकाळी काखेत गोळा आला व रात्री माणूस गेला असा जीवघेणा प्लेगही आला पण माणूस आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. तसेच यापुर्वीही युद्ध झाले त्या युद्धांमध्ये मोठया प्रमाणवर नरसंहार झाला, मानवी रक्तांचे पाट वाहिले. तरीही माणूस आजही तितक्याच प्रबळतेने उभा आहे. कारण या जगात वाईट माणसं आहेत त्याच्या कितीतरी पट चांगली माणसं आहेत. म्हणूनच हे जग टिकून आहे.अतिरेक्यांशी लढायला आपले सैनिक समर्थ आहेतच की, माणुसकीच्या बाजूने लढण्यासाठी व आपल्या प्राणप्रिय देशासाठी आपणही त्यांना प्रसंगी मदत करु. मरणापेक्षा मरणाची भीती मोठी घातक असते.जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जायचेच आहे. कारण ज्याला आरंभ आहे त्याला अंत आहेच. माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा या मुलभुत गरजा आहेत. त्या भागल्या म्हणजे झालं. व्यावसाय एक तर बुडणार नाही. आणि बुडाला तरी तो आपणच उभा केला त्यामुळे त्याच हिंमतीने परत उभा करु. मरणाची भिती न बाळगता उद्याची चिंता न करता फक्त आजचा दिवस आनंदाने जग.बघ तु आनंदी होतोस की नाही."

तो, "मित्रा! तु आज जवळ असायला हवा होतास."

मी, "का?"

"कारण,तुझ्या सकारात्मक वाक्यातील प्रभावपूर्ण शब्दांच्या हातोडयानं माझ्या मनातील नकारात्कतेच्या विटांनी तयार झालेली भिंत फोडून काढली आहे. तु जवळ असतास तर ती भिंत पायासकट उखडून काढली असती." तो भावनेने ओथंबलेल्या शब्दानं बोलत होता.

"आता उरलेलं काम तुच करायचंस." मी हसतच बोललो.

त्यानेही होकार देत मनोमन धन्यवाद देवून फोन कट केला.

आपण वाचलेल्या विचारांनी किंवा सकारात्मक भावनेने सांगीतलेल्या काही शब्दांमुळे इंद्रजीत निराशेमधून बाहेर आला याचा मला खूप आनंद झाला. ही जादू मी नाही तर मी वाचलेल्या सकारात्मक पुस्तकांनी केली होती.

भिंतीवर असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेकडे पाहून मला त्यांचा 'मन करारे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण ' हा अभंग आठवला. आज त्याचा अर्थ व त्याचे महत्त्वही पटले. कारण आपल्या मनाची प्रसन्नता हीच आपले कार्य पुर्णत्वास नेऊ शकते. म्हणून जशी शरीराला अन्नाची गरज असते. तशीच आपल्या मनालाही सकारात्मक विचारांच्या खुराकाची गरज असते.त्यामुळे आपले मन प्रसन्न करा निराशा कुठल्या कुठे पळून जाईल.