Shahir - 2 books and stories free download online pdf in Marathi

शाहिर... - 2

'शाहीर'!

क्रमशः.....
भाग- २

"...या नाटकात मी नवरा, रामभाऊ कंडक्टर
(रामभाऊ मोरे- यांना उत्तम प्रवचनकार म्हणून ओळखतातच, पण ते आटपाडी एस. टी. डेपोमध्ये कंडक्टरची नोकरी करत होते, त्यामुळे जास्त करून त्यांना लोक 'रामभाऊ कंडक्टर' या नावानेच ओळखतात.)
यांनी माझ्या बायकोचं म्हणजे बाळाच्या आईचं काम केलं होतं. बंडातात्या सासरा आणि राजाभाऊ सासू अशी चार मुख्य पात्रं होती. या पात्रांभोवती नाटकाचं कथानक फिरत रहायचं.
रामभाऊंनी बाळासाठी वेडी झालेल्या-आईचं काम इतकं एकरूप होऊन केलं होतं, की लोकांच्या मनातून वेड्या आईची छबी जाता जात नव्हती. काही लोकं अजूनही सांगतात, 'ज्यांनी नाटक बघिटलंय, ते झोपेत सुद्धा चावळत उठायचे-' तिचं बाळ, तिला परत द्या.' म्हणायचे...

बाहेर गावांहून लोकं नाटक बघायला यायची. ती लोकं नाटक बघून त्यांच्या त्यांच्या गावात जाऊन आमच्या नाटकाची प्रसिद्धी करायला लागली, त्यामुळं परगावची लोकं त्यांच्या गावात नाटक सादर करण्यासाठी विनवण्या करू लागली. काही प्रतिष्ठित, ओळखीच्या लोकांच्या आग्रहाखातर आसपासच्या खेड्यात जाऊन आपल्या गावात नाटक झालं, की पुढचे चार दोन दिवस नाटकाचा प्रयोग त्या त्या गावात करू लागलो. थोरल्या वडव्याचे शेळके गुरुजी- त्यांना कलेची आवड होती, ते देखील अनेक प्रयोगांत भाग घ्यायला लागले. याचा परिणाम असा झाला, की काही गावचे लोक त्यांच्या गावात नाटक सादर करण्यासाठी सुपारी घेऊन यायला लागले.

नाटकात काम करणारी सगळी माणसं गावातलीच होती. दिवसभर आपापल्या शेतात काम करणारी.. फक्त हौस आणि कलेची आवड म्हणूनच काम करणारी होती. पैशासाठी नाटकात काम करणं हे अनेकांना पसंत नव्हते, शिवाय वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन प्रयोग सादर करायचे म्हणजे अनेक दिवस नाटकांसाठी वेळ द्यावा लागेल. मग शेतात काम कुणी करायचं!.. आणि घरच्या लोकांनी खायचं तरी काय!..

तुला तर माहीतच आहे, की एक तीन तासांचं नाटक बसवायचं म्हंटलं म्हणजे एक दिड महिना अगोदरच नाटकाच्या तालमी सुरू व्हायच्या.

वयोमानानुसार काही माणसं थकलेली, तर काहींना शेतातल्या कामातून वेळ मिळेनासा झालेला. काहींनी वेळेअभावी तर काहींनी घरगुती कारणांमुळे नाटकाला बगल दिली, पण पुढं नवीन पिढीनं नाटकात भाग घ्यायला सुरुवात केली. ज्यांचा कलेशी तुणतुण्याच्या तारे इतकाही संबंध नाही, पण आवड आहे, अशी काही पोरं सुद्धा हौसेनं नाटकात भाग घेऊ लागली. नव्या पिढीत बबन (लेखक- उत्तम डी. मंडले) नवीन नवीन नाटकं लिहू लागला,
आत्मा (आत्माराम),
पका(प्रकाश),
पंढरीनाथ,
कुंडला(कुंडलिक),
विठ्ठल,
राम,
हाणमा (हणमंत),
संभा (संभाजी),
नानाभाऊ जाधव
ही आणि अशी बरीच मंडळी काम करायला सुरुवात झाली.
बाहेर गावच्या नाटकाच्या प्रयोगासाठी आम्ही मोजकीच माणसं तयार झालो. सुपारीची रक्कम नाममात्र असायची. सुपारीच्या पैशात चहा पाणी, गाडी भाडं, नाटकासाठी लागणारं किरकोळ सामान आणि हार्मोनियम वाजवणारा. तेवढंच भागायचं.

बाहेरगावी कार्यक्रम करायला गेलो, की लोकं विचारायची, 'तुमचा तमाशा हाय का आरकेसट्रा ?'
मग आम्ही म्हणायचो, " आमचं नाटक हाय."
तरीही लोकांना शंका यायची. लोकं विचारायची, 'तमाशा न्हाय.. आरकेसट्रा न्हाय.. मग ह्यो वाघ्या मुरळीचा कार्यक्रम तर न्हाय नव्हं!..पण, तुमच्यात मुरळी कुठं दिसत न्हाय ती...'

खरं सांगायचं, तर आम्ही ह्यातल्या कुठल्याच प्रकारात मोडत नव्हतो. आमच्यात रामभाऊ कंडक्टर आणि शेळके गुरुजी शिवाय दुसरं कुणी जादा शाळा शिकलेलं नव्हतं. हिच मंडळी पुढं हुन- 'आमचं कलापथक हाय', म्हणून सांगायची.
अशा तऱ्हेनं आमच्या नाटकाचं कलापथक झालं. कलापथकाला पुढं

'आर्शीवाद कलापथक'

हे नाव दिलं आणि पुढं या नावानेच कार्यक्रम करत राहिलो.
प्रत्येक वर्षी यात्रंखात्रंला छोटे छोटे प्रयोग आसपासच्या खेड्यात जाऊन करत होतो.
आपला दिलीप (कै.फौजदार, दिलीप (आप्पा) मंडले) हा पोलिस हवालदार म्हणून मिरज पोलिस स्टेशनला होता.
तिथल्या पोलिस चाळीत प्रत्येक वर्षी गणपती उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. अशाच एका गणेश उत्सवाच्या टायमाला दिलीपआप्पा तिथल्या पोलिस लोकांना म्हंटला, "आमचे चुलते शाहीर आहेत, त्या सगळ्यांचं एक कलापथक आहे. त्यातलं नाटक एकदा बघाच, मग तुम्हाला समजेल त्यांची कला."

मिरजेच्या पोलिस चाळीत दरवर्षी कोल्हापूरवाल्यांचा मोठा कार्यक्रम ठरलेला असायचा, पण दिलीप च्या सांगण्यावरून तिथल्या पोलिस लोकांनी आमचा कार्यक्रम घ्यायचं फिक्स करून टाकलं. हे ठरलेलं दिलीपनं गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गावात येऊन आम्हाला सांगितलं. अगदी पुढच्या तीन चार‌ दिवसानंतरचीच तारीख ठरलेली.

रुटींग बसल्यालं असलं, की तयारी करायला वेळ लागत नाही, पण आपापल्या कामानिमित्त हिकडं तिकडं पांगलेल्या लोकांना एकत्र आणायचं. त्यांची तालीम घ्यायची, म्हणजे लय जिकीरीचं काम! या सगळ्या खटपटीत आम्हाला तालमी साठी दोन दिवसच मिळाले.
त्यात पहिल्यांदाच मिरजेसारख्या मोठ्या शहरात आमचा कार्यक्रम होणार होता. त्या अगोदर स्त्री पात्रासहीत सगळी पात्रं गडीच करत होते,
पण शहरात कार्यक्रम होणार म्हंटल्यावर नाटकात बाई पाहिजे!.. म्हणून पलिकडच्या वडव्याची,
'शकुंतला पवार'
ही आर्केस्ट्रात नटी म्हणून काम करत होती. तिला कार्यक्रमासाठी आणायचं ठरलं. तिला आणायचं म्हंटलं म्हणजे जवळ पैसे पाहिजेत. त्यावेळी पैशाची थोडी चणचण असायची. कलापथकासाठी 'कुणाकडं पैसे मागायचं म्हणजे मरण परवडलं.'अशी गत असायची. आम्ही तिला कसलेही पैसे न देता मिरजेच्या कार्यक्रमाचं सांगून आलो. त्यावेळी तीने कोणतीही अट न घालता आमच्या कलापथकात नटी म्हणून काम करायला होकार दिला, ती त्यावेळी नाटकासाठी हो म्हणाली नसती, तर ऐनवेळी चांगलीच धावपळ उडाली असती. पुढं ती शेवटपर्यंत आमच्या कलापथकाचाच एक भाग बनून राहिली.
शकुंतला सोबत अलीकडच्या काळात राधा आणि साहेबराव ही पलिकडच्या वडव्याची कलाकार म्हणून नवरा बायकोची जोडी काही ठराविक कार्यक्रमासाठी आम्ही आणायचो एवढंच.

तर नाटक बघायला येणाऱ्या पब्लिकचा अंदाज यावा, म्हणून आम्ही कार्यक्रमा दिवशी थोडं लवकरच मिरजेत पोहोचलो.
आम्ही पोहचण्याअगोदरच स्टेज चांगलंच सजवून ठेवलेलं. समोर लेडीजसाठी एक आणि माणसांसाठी एक भाग, असे लाकडी बांबू ठोकून दोन भाग बनवलेले. त्या बांबूपासून शेवटच्याकडंपर्यंत रस्स्या बांधल्याल्या आणि मधला भाग येण्याजाण्यासाठी मोकळा ठेवलेला. लोकांची गर्दी वाढत जाईल तसतसा गोंगाट वाढत चाललेला. आम्ही सगळीच थोडं धास्तावलेलो होतो, पण 'कार्यक्रम झक्कासच होणार' याची खात्री होती.

पण फक्त सुरवातीला मनाला थोडी रुखरुख लागली होती, 'नाचगाण्यासाठी अजून दोन तीन नट्या आणल्या असत्या तर बरं झालं असतं.'

कार्यक्रम सुरू झाला. मी खड्या आवाजात कवण म्हणायला लागलो,

"गुणी आहे बायको माझी भोळी भाबडी,
घेतो तिला नायलॉनची भारी ती साडी,
दिसेल जणू शंकर पार्वतीची जोडी,
संसारात भरती त्या साखरेची गोडी..."

अशी फक्त शाहिरी तडाख्याची सुरुवात ऐकूनच वातावरणातला गोंगाट शांत झाला आणि लोकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवून वातावरण दणाणून सोडलं. तशी अंगातली उर्मी अजूनच उसळली.

शाहिरी कवणं झाली. गण झाला आणि एका गीतावर शकुंतलाचा नाच झाला. एक गीत झालं आन् लोकांनी कार्यक्रम थांबवला. त्यातले तीन चार कार्यकर्ते स्टेजच्या पाठीमागं आले आणि बोलले, "हे नाच गाणं, बंद करा. आम्ही नाचगाणी बघायला आलेलो नाही."

आमच्यात कुजबुज सुरु झाली. ह्या अचानक घडलेल्या प्रकारानं मनातली ऊर्मी ढासळून पडली. मनात थोडी धाकधूक सुरू झाली,' ह्या लोकांनी आतापर्यंत कार्यक्रम कसातरी निभावून घेतला, तसं पुढं निभावून घेणार का नाहीत, कुणास ठाऊक!..'

तोपर्यंत एक कार्यकर्ता बोलला, 'आम्हाला तुमची नाचगाणी बघायची नाहीत, नाचगाणी बघायची असती, तर कोल्हापूरची एखादी पार्टी आणली असती, न्हाय तर सिनेमातल्या एकापेक्षा एक सरस नट्या नाचवायला आणल्या असत्या, तुमचा कार्यक्रम कशाला ठेवला असता!'
आम्ही बुचकळ्यात पडलो. आता करायचं काय!..
तोपर्यंत एक कार्यकर्ता बोलला, "आम्हाला बाकी काही बघायचं न्हाय. हे सगळं बंद करा आणि थेट तुमच्या नाटकाला सुरूवात करा."

दिव्याच्या वातीची काजळी झाडल्यावर अंधारातला अंधुकपणा जाऊन लख्ख उजेड दिसायला लागतो, तसं आमच्या सगळ्यांचं झालं. काळजावरचा भला मोठा दगड बाजूला सारल्यागत झालं.

तिथं जायाच्या अगोदर, 'अजून दोन-तीन नट्या आणायला पाहिजे होत्या, अशी जी मनात चुटपुट होती, ती त्या माणसांच्या बोलण्यानं बंद झाली.
लोकं नुसती नाचगाण्याचीच हौशी नसत्यात, कलेची जाण असणारी, कलेची आवड असणारी माणसं सुद्धा असत्याती, हे समाजलं.
आन् मग काय!.. ज्याच्यात आमचा हातखंडा होता ते म्हणजे आमचं 'नाटक'... मनातल्या नरमाईला झटकून टाकलं आन् जोमानं पुढच्या तयारीला लागलो.
मैदानावर पब्लिक मावत नव्हतं, इतकी गर्दी!
नाटक तीन तास चाललं. मधल्या वेळेत लोकांनी मुतायला सुद्धा जागा सोडली नाही, कारण एकदा का जागा सोडली, की पुन्हा त्या जागेवर बसून नाटक बघायला मिळणार नाही, मग लांबूनच नाटक बघावं लागेल...

अशा तऱ्हेनं मिरजेतला कार्यक्रम जोमात झाला..

मिरजतलं नाटक झालं आन् ...

क्रमशः.....
©_ सुभाष आनंदा मंडले
(9923124251)