बळी - २७ in Marathi Novel Episodes by Amita a. Salvi books and stories Free | बळी - २७

बळी - २७

                                                             बळी - २७
      रंजनाच्या मनावरील भीतीचा  पगडा अजूनही कायम होता. आपण केलेल्या चुका तिला नजरेसमोर दिसत होत्या. दिनेशच्या नादाला लागून ही पापे तिने  केली नसती; तर आज केदार मृत्यूनंतर  तिच्यामागे  लागला नसता, असं  तिला वाटत होतं. तिच्या मनातील काही अनुत्तरित प्रश्न ती दिनेशला विचारू लागली.  अजूनही  तिचा आवाज  थरथरत होता, 
       " लग्नासाठी केदारने माझ्यावर जबरदस्ती केली नव्हती -- पैशाची किंवा इतर  कोणतीही अपेक्षा त्याने  लग्न ठरवताना केली नव्हती --- लग्न झाल्यावरही माझ्या मनाविरूध्द त्याने मला स्पर्श करण्याचाही कधी  प्रयत्न केला नव्हता - त्याचा काय गुन्हा होता ; की  आपण त्याचा जीव घेतला? --- आपण आपल्या स्वार्थासाठी एका निष्पाप माणसाचा बळी गेतला;  ते पाप आपल्याला कधी ना कधी भोवणार आहे! दिनेश!--- त्याचा एकट्याचा नाही; संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतला आपण! घरात कमावणारं दुसरं कोणी नाही --- त्याच्या भावंडांचं  शिक्षणही थांबलं असेल! त्यांचा काय दोष होता! घरात सगळी माणसं माझ्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होती! कोणीही मला जराही त्रास दिला नाही; आणि मी मात्र त्यांचं आयुष्य उध्वस्त केलं! त्यांचे तळतळाट आपल्याला सुखी राहू देणार नाहीत; असा विचार सतत माझ्या मनात येतो! मला कशी चैन पडेल?  मी काहीतरी कारण सांगून केदारला नकार देणार होते; तू  मला त्याच्याशी  लग्न करायला  पाडलंस! आपले इतके जवळचे संबंध असताना मी कोणा दुस-या मुलाशी लग्न करणं हे मुळातच चुकीचं होतं! तू असं का केलंस; हा प्रश्न आजही मला पडतो!"
बोलताना तिची नजर घरात भिरभिरत होती. कॆदारचा आत्मा अाजूबाजूला आहे; आणि  आपलं बोलणं ऐकतोय असं तिला खात्रीपूर्वक वाटत होतं. आपल्याला होणारा पश्चात्ताप त्याच्यापर्यंत पोहोचावा, आणि त्याने आपल्याला क्षमा करावी; यासाठी तिचे प्रयत्न चालले होते. जे काही घडलं, ते दिनेशमुळे झालं, असं दाखवायचा आटापिटा तिच्या बोलण्यातून जाणवत होता.
      पोलिसांना  पाहिजे असलेले सर्व पुरावे  अनायासे मिळत होते!  इन्सपेक्टर दिवाकरांचं मिशन यशस्वी झालं होतं! आता त्यांचं पूर्ण लक्ष दिनेश आणि रंजनाच्या तोंडून मिळणा-या कबुलीजबाबाकडे होतं. त्यांनी त्यांचा मोबाईल कॅमेराही आता सुरू केला होता. कोणतीही रिस्क त्यांना घ्यायची नव्हती. आता केदारकडे लक्ष द्यायला आता त्यांना वेळ नव्हता. 
       पण निशाचं पूर्ण लक्ष केदारकडे होतं!  केदारची अवस्था  अतिशय वाईट होती. रंजनाच्या बोलण्यातून त्याला तिने दिनेशच्या मदतीने रचलेलं षड्यंत्र समजलं होतं. आता संशयाला जागा नव्हती.रंजनाच्या या रूपाची त्याने कधीही अपेक्षा केली नव्हती. त्याला वाटत होतं; की जाऊन रंजनाचा गळा आवळावा! त्याचे हात स्फुरण पावत होते. मुठी आवळल्या गेल्या होत्या; कोणत्याही क्षणी तो रंजना आणि दिनेशला जाब विचारायला कोणालाही न जुमानता  हाॅलमध्ये जाईल; याची त्याच्या देहबोलीवरून तिने ओळखलं!  ती त्याच्या कानात पुटपुटली;
"जरा धीर धर! आपल्याला अजून बरंच काही जाणून घ्यायचं आहे! शांत रहा!"
           "आणखी काय ऐकायचं राहिलंय? मेंदूवर  एवढा ताण येतोय, की मला श्वास घेणं कठीण होतंय! एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकतो! सोड मला!" केदारची सहनशक्ती आता संपली होती!
       निशाने त्याला तिथल्या बेडवर बसवलं. बॅग मधून पाण्याची बाटली काढून त्याच्या हातात दिली.  केदार पाणी प्याला आणि  हातांनी डोकं धरून बसला; हाॅलमधलं बोलणं तापलेल्या शिशाप्रमाणे त्याच्या कानावर पडत होतं! ----
        रंजनाचं बोलणं ऐकून  दिनेश मोठ्याने हसला, आणि म्हणाला,
          "तुला तुझ्या वडिलांनी कोणाशी तरी लग्न करायला लावलंच असतं! कुठल्या गावात--- मोठ्या कुटुंबात लग्न होऊन गेली असतीस, तर तुला परत इथे आणणं सोपं नव्हतं! लहान गावांमध्ये  कोणी एखादा नवीन माणूस दिसला, तरीही त्याच्याकडे  संशयाने   पाहिलं जातं! घरात खूप माणसं असतात; त्यामुळे एकमेकांवरही  बारीक लक्ष असतं! मुंबईत कोणी  कोणाला ओळखत नाही! आणि आपापल्या कामात रमलेली चार माणसं घरात असतात! तिथे तुझ्या नव-याला बेपत्ता करणं सोपं होतं. त्यांच्या  घरातही जुनं- जाणतं माणूस नाही--- भावंडं किशोर वयातली --- आणि एक विधवा आई---- तिला तू त्याच्यावर चोरीचा आळ येईल असं म्हटल्यावर तिने घाबरून अाजवर पोलीस कंप्लेंट केली नाही!---  हे दुस-या कुठल्या घरात शक्य झालं असतं? या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुला केदारच्या स्थळाला होकार द्यायला सांगितला होता!" दिनेश त्याच्या हुशारीच्या फुशारक्या सांगत होता. 
      तो पुढे बोलू लागला,
      "तुमच्या घराण्याची रीत माहीत आहे नं?  मुलीचं  एकदा लग्न झालं, की नंतर काहीही झालं, तरीही दुसरं लग्न करत नाहीत! जगाच्या दृष्टीने तुझा नवरा एका बाईबरोबर परागंदा झाला आहे; एकाकी आयुष्य काढणं  तुझ्या नशीबी आलं आहे; पण तरीही तुझ्या दुस-या लग्नाची गोष्ट तुझ्या घरात कोणी काढणार नाही ! तू  आता आयुष्यभर माझी आहेस! या गावातून तू कधीच बाहेर जाणार नाहीस! आपल्याला कोणीही दूर करू शकणार नाही! माझा प्लॅन परफेक्ट होता!" 
      "पण आपण दोघं सज्ञान होतो!-- पळून जाऊन लग्न केलं असतं; किंवा दुसरा एखादा मार्ग मिळाला असता! " रंजनाच्या या प्रश्नावर दिनेश परत हसला आणि म्हणाला,
      "ते  इतकं सोपं नव्हतं! तुझ्या वडिलांनी  आपल्या लग्नाला कधीच परवानगी दिली नसती---  तुला माहीत  आहे; त्यांना जेव्हा आपल्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागला, तेव्हा तुझी शाळा त्यांनी बंद करून टाकली--- साधं एकमेकांना भेटणंही आपल्याला अशक्य झालं होतं! काय मार्ग काढणार होतो आपण? आता मात्र आपण आपल्या मर्जीचे मालक आहोत! तू कायम माझ्या जवळ रहावीस म्हणून मी  इतकं सगळं केलं, आणि तू मात्र त्या केदारला  विसरायला तयार नाहीस! दोन घटका तुझ्याबरोबर सुखाने घालवू शकत नाही! आता तुझी सतत मनधरणी  करायचाही  मला कंटाळा आलाय! " 
        त्याच्या बोलण्यात  राग डोकावत होता. केदार आणि त्याच्या कुटुंबियांविषयी तिच्या तोंडून ऐकलेले चांगले शब्द त्याला झोंबले होते.  रंजनाच्या हे लक्षात आलं; आणि ती त्याच्या जवळ गेली आणि त्याचे हात हातात घेऊन त्याला समजावण्याचा  प्रयत्न करू लागली,
"तसं नाही रे राजा! मला खरंच झाडाखाली केदार  दिसला होता! तू म्हणतोस तसा तो कदाचित् भास असेल; पण मी मात्र खूप घाबरून गेले होते! पण आता मात्र मी ठरवलंय -- त्याचं नाव घ्यायचं नाही! त्याला विसरून जायचं!  तू माझ्या  बरोबर आहेस नं --- आता मी कशालाही घाबरत नाही!" 
        तिची भीती कमी होत आहे; हे बघून दिनेश थोडा निवळला. तिला  धीर देत म्हणाला,
      "अशीच बिनधास्त रहा! काही काळजी करू नकोस! मी सगळा बंदोबस्त चोख  केला आहे! केदारला अशा जागी पाठवलाय की तो परत कधीच येणार नाही!  आणि हे प्रकरण  पोलीसांपर्यंत जाणार नाही; याची व्यवस्थित काळजी घेतली आहे!  "
        यावर रंजनाला काहीतरी आठवलं; आणि ती दिनेशला सावध करू लागली;
        "पण पोलीस चौकशी चालू झाली आहे. काल तीन - चार दिवसांपूर्वी केदारच्या आईचा फोन आला होता; पोलीस त्यांच्याकडे चौकशीसाठी आले होते; असं म्हणत होत्या! ते खोदून खोदून चौकशी करत होते! आणि आम्ही आलो होतो;  हे कोणाला सांगू नका, अशी ताकीद त्यांना देऊन ठेवली आहे! पण ते कदाचित् इथेही येतील; असं त्यांना वाटलं; -- म्हणून  त्यांनी मला फोन केला! जर पोलिसांनी चौकशी चालू केली असेल, तर यापुढे जपून रहायला हवं! कधीही इथे येऊन धडकतील! दोन दिवसांपूर्वी रजिस्टर लेटर आहे, अशी बतावणी करत कोणी तरी माझी माहिती काढत होता! मी पोस्ट- आॅफिसमध्ये जाऊन चौकशी केली, पण असं कोणतंही पत्र आलेलं नाही, असं पोस्ट - मास्तर म्हणाले!  डोक्यातल्या या  विचारांमुळेच कदाचित् मघाशी  केदारचा भास झाला असेल!" 
दिनेशचा राग कसा काढायचा; हे रंजनाला चांगलंच माहीत होतं. त्यासाठी तिने हा संवदनाशील विषय काढला होता.
      " काय म्हणाली केदारची आई? त्यांनी काय विचारलं तिला?" दिनेशने विचारलं.
       "ते त्यांनी काही सांगितलं नाही; पण 'मिसिंगची तक्रार का केली नाही ?' -- असं विचारत होते त्यांना! --- दिनेश! पोलीस जर इथे आले तर? ---"  
       मीराताईंच्या फोनची  आठवण येताच  रंजना मनातून खरोखरच  धास्तावली होती.        
        पोलीस चौकशीला तोंड द्यायच्या  विचारानेच  तिच्या तोंडचं पाणी पळालं  होतं. 
                         *******          contd.  Part 28

 

Rate & Review

sanjana kadam

sanjana kadam 3 months ago

Shubhangi Kadam

Shubhangi Kadam 3 months ago

Amol Fulore

Amol Fulore 3 months ago

Eshwar Gaidhani

Eshwar Gaidhani 3 months ago

Swati Irpate

Swati Irpate 3 months ago