Thats all your honors - 13 books and stories free download online pdf in Marathi

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१३)

दॅट्स ऑल युअर ऑनर
प्रकरण तेरा.


पाणिनी पटवर्धन सौम्या सोहोनी ला घेऊन मैथिली आहुजा राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेला.दारावरील बेल वारंवार वाजवून सुद्धा दार उघडले गेले नाही. तेव्हा तो अपार्टमेंट च्या स्वगातिके कडे गेला. ती चांगली तरतरीत मुलगी होती.

“ मला तातडीने मैथिली आहुजाला भेटायचं होत . पण ती दिसत नाहीये ”. पाणिनी म्हणाला.

“ ती नाहीये .” ती मुलगी म्हणाली. “ तिला मी दुपारीच दोन मोठ्या सुटकेसेस घेऊन बाहेर पडताना पाहिलंय. बहुदा ती बरेच दिवसांसाठी जात असावी. तुम्ही तिच्या नोकरीच्या ठिकाणी चौकशी केली का? ’

“ ती कुठे नोकरी करते ,माहित्ये का तुम्हाला?” पाणिनी ने विचारले.

“ कुठल्या तरी खाजगी कंपनीत ती सेक्रेटरी आहे म्हणे.पण नाव नाही माहिती कंपनीचे.”

“ तुमच्या कडे तिच्या फ्लॅट ची किल्ली असेल तर आपण पटकन आत जाऊन एक नजर टाकली असती.” पाणिनी ने सुचवून पहिले.

त्या मुलीने ठाम पणाने नकार दिला. “ आम्हाला असले काहीही करता येणार नाही. इथे राहणाऱ्या भाडेकरूंच्या खाजगी जीवनात आम्ही हस्तक्षेप करत नाही. कर तर तुमचे फोटो मी पेपरात बघितलेत आणि तुम्ही कोण आहात हे मी ओळखले म्हणून तुम्हाला एवढी तरी माहिती दिली.”

“ ती तिच्या गाडीने गेली की टॅक्सी ने?”

“ मी तिला लिफ्ट मधून दोन मोठाल्या सुटकेस घेऊन उतरताना पहिले.तिच्या मानाने त्या फारच जड होत्या .एका वेळी दोन सुटकेस तिला उचलता येत नव्हत्या.म्हणून तिने आधी एक उचलून लिफ्ट मधून पार्किंग पर्यंत नेली नंतर दुसरी घ्यायला परत आली.या वरून मला वाटतं की ती स्वत:च्या गाडीने गेली असावी. कारण टॅक्सी ने गेली असती तर ड्रायव्हर सुटकेस उचलायला आला असता. ”

“ मला आता एकाच सांगा,ती तुमचे भाडे चेक ने देत असेल ना? बँकेचे नाव सांगाल का?” पाणिनी ने विचारले

“ अहो ती कोपऱ्या वरची बँक.इथून बाहेर गेल्यावर उजव्या हाताला वळा. नंतर पुन्हा उजवीकडे जा.लगेचच दिसेल.” तिचे आभार मानून पाणिनी आणि सौम्या त्या बँकेत आले.

“ मला शाखा-व्यवस्थापकाला भेटायचं आहे .अत्यंत महत्वाचे काम आहे.मी पाणिनी पटवर्धन, वकील आहे.”

“ हो मी ओळखलंय तुम्हाला. ” पाणिनी ने बँकेत आल्यावर ज्या मुलीला विचारले ती म्हणाली आणि उत्साहात त्याला शाखा-व्यवस्थापका कडे घेऊनही गेली.तो ही पाणिनी ला ओळखत होता.

“ बोला पटवर्धन काय करू तुम्हाला मदत? ”

“ मला माहीत आहे मी जे विचारतोय ते खूप बेगले आहे आणि कदाचित बँकेच्या नियमाच्या बाहेरचे आहे,पण मी याची खात्री देतो ही कोर्टाच्या कामाच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे मैथिली आहुजानावाच्या एका स्त्रीचे खाते आहे. मला त्याची अत्ताच्या स्थितीची माहिती हवी आहे. ”

“ ओह ! सॉरी मिस्टर पटवर्धन. अशी माहिती नाही देता येणार.”

“ मला काळजी या गोष्टीची वाटत्ये की मला कळलेल्या बातमी नुसार तिने आज एका चेक ने रोख रक्कम काढली आहे आणि तो चेक फ्रॉड आहे.” पाणिनी म्हणाला.

“ तसे असेल तर वेगळीच गोष्ट आहे. अशा फसवणुकीच्या प्रकरणात आम्हाला नेहेमीच काळजी घ्यावी लागते. तुम्ही थांबा जरा इथे ” शाखा-व्यवस्थापक म्हणाला आणि बाहेर गेला.

“ तिने चेक ने रक्कम काढली असावी असे तुम्हाला का वाटले? ” सौम्या म्हणाली

“ तिला जर बरेच दिवसासाठी बाहेर जायचे असेल तर तिला रोकड रक्कम लागणारच. ! ”

“ पण ती चेक ने पैसे काढण्य ऐवजी स्लीप भरून रक्कम काढू शकली असती ना. ” सौम्या ने शंका विचारली.

“ तसे झाले असेल तर तो आपल्याला सांगेल ना की पटवर्धन तुम्हाला मिळालेली माहिती खोटी आहे.”

सौम्या ला पटले.तिने मान डोलावली.

“ जर तिने चेक आणि पैसे काढायची स्लीप दोन्ही वापरले नसेल आणि पैसेच काढले नसतील तरी शाखा-व्यवस्थापक आपल्याला सांगेल की नाही हो तिच्या खात्यातून रक्कम काढलेलीच नाहीये. याचा अर्थ तिला कोणीतरी खर्चाला रक्कम दिली आहे. मग आपल्याला तो कोण आहे हे शोधावे लागेल. ” पाणिनी म्हणाला.

“ वा ! याला म्हणतात धाडस.”

तेवढ्यात शाखा-व्यवस्थापका धावतच त्यांच्या जवळ आला. “ पटवर्धन, मला सांगा की तुम्हाला का वाटलं की तो चेक म्हणजे फोर्ज्ड चेक आहे म्हणून?”

“ तसा संशय होता मला. तिने तिच्या नकळत तो चेक वाताव्लेला असू शकतो. तुम्ही आपली योग्य ती चौकशी करा आणि खात्री करा.” पाणिनी म्हणाला.

शाखा-व्यवस्थापका त्याच्या खुर्चीत बसला.भरभर फोन ची डायल फिरवली.त्याच्या चेहेऱ्यावर तणाव आणि चिंता स्पष्ट दिसत होती. फोन पलीकडून उचलला गेल्यावर त्याने आपले नाव आणि पद सांगितले. “ मला एका चेक ची चौकशी करायची होती. मला नमन लुल्ला लुल्ला शी थेट बोलता येईल का? काय आहे आहुजानावाच्या एका पेई च्या नावाने चेक काढला गेलाय.रक्कम मोठी आहे त्यामुळे.... ” पलीकडचा माणूस काय बोलला ते कळायला पाणिनी ला मार्ग नव्हता. शाखा-व्यवस्थापक फक्त ऐकत होता. अचानक त्याचा चेहेरा तणाव मुक्त झाला. त्या वरची काळजी नष्ट झाली. “ ओह ! आभारी आहे.” तो म्हणाला.

नंतर पाणिनीला म्हणाला, “ पटवर्धन आपल्या दोघांनाही काळजीचे कारण नाही. चेक व्यवस्थितच आहे.फ्रॉड नाही. ज्यांनी चेक दिला त्याच्या खाजगी सेक्रेटरीने म्हणजे मिस बोरा ने च खात्री दिली आहे.”

पाणिनी ने चेहेऱ्यावर उसने हसू आणून त्याचे आभार मानले. “ आपल्या या भेटी बद्दल आपण कोणालाच बोलला नाहीत तर बरे.” पाणिनी म्हणाला.

“ कोणती भेट? कोणा बरोबर भेट?” शाखा-व्यवस्थापकाने विचारले.

पाणिनी ने हसून त्याला निरोप दिला.

“ ती हरामखोर मिस बोरा ! भयंकर पाताळयंत्री आहे.आपण तिला भेटलो तेव्हा तिला माहित होते आहुजाला मोठ्या रकमेचा चेक दिल्याचे.पण आपल्याला सांगीतले का बघा तिने.” सौम्या सात्विक संतापाने उद्गारली.” पण नमन लुल्ला ने मैथिली आहुजाला चेक का दिला असावा? ”

“ त्याचे सोप उत्तर आहे की तिला परगावी जायला आणि तिथे बरेच दिवस राहायला येणाऱ्या खर्चाची तरतूद म्हणून. ” पाणिनी म्हणाला. “ आता खरा प्रश्न हा आहे की नमन लुल्ला ने तिला परगावी का पाठवले असावे. याचे कारण असे असावे की मी तिला साक्ष द्यायला कोर्टात बोलावीन याची त्याला भीती वाटत असावी.”

“ सगळीच कोडी एका पाठोपाठ एक येत आहेत.” सौम्या उद्गारली.

“ सोडवू आपण ती . आपण पहिल्या पासून सुरु करू.असं गृहीत धरू कि आकृती खरं बोलते आहे. तसे असेल तर आकृती त्याच्या तावडीतून सुटल्यावर तिथे काय घडले असावे? म्हणजे तपन ने काय केले असावे?”

“ तो आऊट हाऊस मध्ये आला असावा नंतर त्याने अंडी आणि मटण खाल्ले असावे.” सौम्या ने अंदाज व्यक्त केला.

“ दोन प्लेट ? ” पाणिनी ने उलट प्रश्न केला.

“ एक प्लेट त्याने कचऱ्यात फेकून दिली असेल ” सौम्या म्हणाली.

“ मग एकच का फेकली? दोन्ही का नाही फेकल्या? कारण आकृती त्याच्या तावडीतून सुटल्यामुळे तो खाण्याच्या मनस्थितीत नसणारच. त्याला खाण्या शिवाय इतर गोष्टींची गरज होती. त्याने दोन्ही प्लेट मधील अन्न टाकून द्यायला हवे होते खरे म्हणजे. त्याला मद्य प्यायचे होते,त्याला कोरडे कपडे बदलायला हवे होते.त्याला स्त्रीचा सहवास हवा होता.स्वाभाविक पणे त्याला पुन्हा शहरात जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करायची होती.”

“ म्हणून हे सर्व त्याला पुरवू शकेल अशा व्यक्तीला त्याने बोलावले? ” सौम्या ने विचारले

“ बरोब्बर. आता तुझा अंदाज सांग,कोण असू शकेल अशी व्यक्ती ? ”. पाणिनी म्हणाला.

सौम्या ने मान हलवून नकार दिला. “ नाही सांगता येत.केसवड तर नाही सुचवायचे तुम्हाला? ”

“ त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल अशी एकच क्याक्ती असू शकत होती आणि ती म्हणजे मैथिली आहुजा.” पाणिनी च्या या शब्दांनी सौम्या नख शिखांत हादरून गेली.

“ याचा दुसरा अर्थ असा की पायस हिर्लेकरने तपन च्या गाडीतून उतरताना जिला पहिले ती खरच मैथिली आहुजा होती ? ” सौम्या ने बधीर होऊन विचारले.

“ नक्कीच ती असली पाहिजे.लक्षात घे की तिचे लुल्ला कुटुंबाशी संबंध होते.आकृती ला नोकरी नव्हती तेव्हा तिनेच तपन ला फोन केला आणि सांगितले असावे कि माझी खास मैत्रीण आहे आकृती नावाची तिला तुझ्याकडे नोकरीला ठेव.तपन ने जयराज आर्य ला एवढेच सांगितले असावे की आकृती सेनगुप्ता नावाच्या मुलीला मी स्टेनो म्हणून नोकरीला ठेवतोय.तिला जास्तीत जास्त पगार द्यायचा .ती तुझ्या पर्सोनेल विभागातून येणार नाही , मी तिला परस्पर ठेवली आहे. ” पाणिनी म्हणाला. “मैथिली आहुजाच्या बाबतीत असेच झाले असेल आणि आकृती च्या बाबतीत सुद्धा. तपन ने मैथिली आहुजाला फोन लावला असेल आणि म्हणाला असेल तुझ्या ज्या मैत्रिणीला तुझ्या सांगण्यावरून मी एका दिवसात नोकरीला ठेवले, ती स्वतःला समजते तरी कोण? माझा अपमान करून माझी इच्छा अतृप्त ठेऊन मला गुंगारा देऊन ,माझीच गाडी पळून नेऊन जाउच कशी शकते? जा माझ्या घरी जा आणि माझे काही कपडे घेऊन ये मी इथे भिजलोय.लगेच कामाला लाग वेळ न घालवता , आणि माझे बूट पण आण. ”

“ म्हणून मग तिने त्याची गाडी घेतली, त्याच्या अपार्टमेंट मध्ये जाऊन त्याच्या वस्तू .........” सौम्या बोलताना मधेच थांबली. “ नाही यात काहीतरी चुकतंय. तिला कुठे माहित होते की तपन ची गाडी अग्नी रोधकासमोर लावली होती म्हणून? ”

“ सौम्या लक्षात घे.आकृती तिची खास मैत्रीण होती.तपन च्या तावडीतून सुटून आल्यावर आकृती ने मैथिली ला सर्व घटना सांगितल्या होत्या त्यात तिने त्याची गाडी कुठे लावली होती ते पण सांगितले होते. ”

“ खरच की ! पण यात वेळेच्या बाबतीत काही गोंधळ नाही ना?” सौम्या ने विचारले.

“ तपन चा तिला फोन आल्यावर ती लगेच निघाली नसावी,तिने जरा नटून वगैरे जायचे ठरवले असावे.तेवढ्यात तिला आकृती चा फोन आला असणार ”

“ या तुमच्या म्हणण्यातला तर्क एकदम पटतोय.परंतु तुम्ही गृहीत धरताय की मैथिली आणि तपन चे घनिष्ट संबंध होते. ”

“ असू शकतात सौम्या. म्हणूनच ते प्रभाकर लघाटे ला साक्षीसाठी कोर्टात आणायला घाबरत आहेत. कारण तो काय सांगेल माहित आहे? तो सांगेल की त्याने गाडीला समन्स लावले ,रात्री नऊ च्या सुमारास.पण तो नंतर हे ही सांगेल की नऊ नंतर रात्री बारा पर्यंत मला गाडी दिसली नाही.आणि ही गोष्ट सरकारी वकिलांच्या मताशी किंवा त्यांनी आधारभूत धरलेल्या गृहितकांशी जुळणारी नाही म्हणून त्यांनी त्याला साक्षीसाठी येऊन दिले नाही आणि त्याची साक्ष काय असेल ते फक्त सांगितले ,पण ते पूर्ण सांगितले नाही,केवळ त्यांच्या फायद्या चे आहे त्याच वाक्या पर्यंत संगितले. आणि त्या भीती पोटीच ते त्याला उलट तपासणीला पण आणायला टाळाटाळ करत आहेत”

“ ते झालं,कोर्टाच्या दृष्टीने.पण नंतर काय घडलं असाव ?” सौम्या ला उत्सुकता होती.

“ नंतर मैथिली तपन ला भेटायला गेली असावी,तिने जाताना त्याची गाडी नेली असावी,जी आकृती ने अग्नीरोधकापुढे लावली होती, त्याला तिने कपडे , बूट वगैरे दिले .नंतर कशावरून तरी त्यांचे भांडण झाले असावे त्याची परिणीती तिने त्याला भोसकण्यात झाली असावी. त्या आधी म्हणजे मैथिली येण्यापूर्वी तपन ने ताजे आम्लेट आणि मटण बनवले असावे. ती आल्यावर दोघांनी ते खाल्ले असावे आणि लगेचच त्यांचे भांडण होऊन तिने त्याला मारले असावे.म्हणूनच डॉक्टरांनी असे सांगितले की जेवण झाल्यावर त्याला काही मिनिटातच मृत्यू आला.” पाणिनी म्हणाला.

“ पण मग ....” सौम्या काहीतरी बोलायला गेली पण पाणिनी ला अजून काहीतरी बोलायचे आहे हे ओळखून गप्प बसली.

पाणिनी पुढे म्हणाला,“ पुढच्या गोष्टी मैथिली च्या फायद्याच्याच होत्या. समोर तपन चे प्रेत होते पण तिला घाबरायचे कारण नव्हते.कारण आकृती तिथे येऊन तपन शी भांडून गेल्याचे आणि जाताना ती

“ आणि पायस हिर्लेकरने तिलाच तपन च्या गाडीतून उतरताना पहिले होते आणि आपण असा प्रयत्न केला की त्याने मैथिली ला गाडीतून उतरताना पाहिलं असा त्याचा गोंधळ उडवायचा. ” सौम्या म्हणाली.

पाणिनी म्हणाला “बरोबर आहे.”

“ परंतू हे रात्री दहा वाजता घडले नाही?” सौम्या ने विचारले

“ नक्कीच नाही .त्या संदर्भातल्या सगळ्याच गोष्टी असे दर्शवतात की रात्री दहा नंतरच घडले.पण माझी पण त्यात चूक झाली , वेळे च्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला नाही .आणि ती चूक व्हायचे कारण असे की मला माहिती होते की आकृती ने नऊ पूर्वीच लावली असावी गाडी. कारण त्या नंतर पोलिसाने नऊ वाजता समन्स लावले.”

“ आता पुढे काय?” सौम्या ने विचारले.

“ आता सर्वात प्रथम आपण मैथिली आहुजाला शोधून काढायचे आणि तिच्या कडून गुन्हा कबूल करून घ्यायचा.”

“ पण कसे काय करणार आपण ते?” सौम्या ने शंका विचारली.

“ आपण तिला दाखवून देऊ की आम्हाला सर्व माहिती झालंय काय घडलंय ते.तिला सांगायचे आपण की पायस हिर्लेकरने तुला गाडीतून उतरताना पाहिलंय आणि ओळखलंय.”

“ पायस हिर्लेकर सहकार्य करेल ? ”

“ तो चांगलाच गोंधळून गेलाय.खर तर त्याने जिला पाहिले होते गाडीतून उतरताना,ती मैथिली आहुजाच होती पण त्याला असे वाटले की ती आकृती होती आणि मी त्याला असे भासवतोय की ती मैथिली होती. पोलिसांनी त्याला पटवलं की पटवर्धन त्याला घोळात घेतोय प्रत्यक्षात त्याने जिला पाहिले ती आकृती होती. ”

“ अशा गोंधळलेल्या मानसिकतेत आपण त्याच्या कडून काय अपेक्षा करू शकू का? ”

“ मला सांगता येणार नाही.मी त्याला माझे सगळे पत्ते खुले करून दाखवायचं ठरवलंय. खर काय घडलंय आणि त्याचा काय गोंधळ होतोय हे त्याला स्पष्ट पणे सांगणार.” पाणिनी उत्तरला.

“ आता प्रथम तेच करणार का आपण ?” सौम्या ने विचारले.

“ नाही. प्रत्यक्ष पुरावा मिळवायचे काम प्रथम करू.”

“ म्हणजे कसला पुरावा?

“मैथिली ने तपन साठी कोरडे कपडे आणि बूट नेले.पण तपन चे ओले बूट आणि कपडे आऊट हाउस मधे मिळाले नाहीत.म्हणजे ते कोणीतरी गाडीतून घेऊन गेले.अर्थात मैथिली च घेऊन गेली असणार पण ते तपन च्या गाडीतही ती ठेऊन गेली नव्हती.म्हणजे,तिने ते गाडीतून हलवले असणार . तिने ते तिच्या स्वतःच्या गाडीत हलवले असतील.किंवा तिच्या गॅरेज मधे असतील. ”

“ आपल्याला मिळवता येतील ते? ” सौम्या ने विचारले.

“ ती जर बाहेर गेली असेल गाडी घेऊन तर गॅरेज उघडे ठेवले असायची शक्यता आहे, तसे असेल तर मिळतील. ”

“ नमन लुल्ला चे काय?”

“ नेमके काय घडले आहे ते सर्व नमन लुल्ला ला माहित झाले आहे.आकृती ने काही सांगू नये आणि मैथिली ने त्याला पुष्टी देऊ नये अशी त्याची इच्छा असणार त्या मुळे च त्याने तिला भरपूर पैसे बरोबर देऊन बाहेर गावी पाठवले आणि खटला संपे पर्यंत परत येणार नाही ती अशी व्यवस्था केली. ” पाणिनी म्हणाला.

“ ओमकार केसवड आणि मंडलिक बाई या जोडीचे काय?” सौम्या ने विचारले.

“ या ठिकाणी आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. आकृती ने ओव्हन मधून बिस्किटे बाहेर काढली आणि ते दोघे खायला बसणार तेवढ्यात तपन ला फोन आला आणि त्या फोन मुले त्याला त्याची सर्व योजना बदलावी लागली.तो फोन ओमकार केसवड चा असावा.ओमकार केसवड आणि मंडलिक बाई हे दोघे भागीदारीत काहीतरी करत असावेत. ते कोणत्यातरी मुद्द्यावर तपन ला ब्लॅक मेल करत असणार आणि त्याचे कडून पैसे काढत असणार.त्यांनी फोन वर तपन ला सांगितले असणार की आम्हाला पाच हजार हवेत लगेचच.आम्ही अर्ध्या-पाऊण तासात येतोय. ”

“ तो त्याला सांगू शकला नसता का की एक तासानंतर ये म्हणून? ” सौम्या ने विचारले.

“ त्याने प्रयत्न केला असेल पण त्याने ऐकले नसेल त्यामुळे आकृती बरोबर जेवण करायचे आणि रोमान्स करायची त्याची योजना धुळीलाच मिळाली. त्यामुळेच त्याचा फोन येऊन गेल्यावर नंतर लगेचच त्याने आकृती चे चुंबन घेतले आणि बळजबरीचा प्रयत्न केला.कारण त्याने जे सावकाश करायचे ठरवले होते ते त्याला लगेचच उरकावे लागले.कारण तपन स्वभावात:च असा आहे की त्याला हवे ते मिळवणारच.”

“ त्या नुसार ओमकार केसवड आणि मंडलिक आले असणार? ” सौम्या ने उत्सुकतेने विचारले.

“ नक्कीच.पण ते आले तेव्हा आकृती निघून गेली होती आणि त्यांनी तपन कडून पाच हजाराचा चेक घेतला सुद्धा . तपन त्यांना पैसे देऊन लगेचच घालवून देऊ इच्छित होता कारण त्याने मैथिली ला बोलावून घेतले होते आणि ती कोणत्याही क्षणी आली असती.”

“ सर, तुम्ही एकदम सगळे तार्किक दृष्ट्या योग्यच मांडलय ! ” सौम्या खुश होऊन म्हणाली.

“ आकृती गेल्या नंतर सुद्धा तपन जिवंत होता हे माहित असणाऱ्या तीन व्यक्ती आपल्याला आता माहिती आहेत.पहिली मैथिली आहुजा, दुसरी मंडलिक बाई आणि तिसरा ओमकार केसवड. ”

“ आणि तिघांनाही या खुनात गुंतायला आवडणार नाही.”सौम्या ने पटवर्धन च्या मनातील भाव बोलून दाखवले. “ सर, ओमकार केसवड आणि मंडलिक बाईने त्याच्याशी झटपट केली आणि .....”

“ नाही तशी शक्यता नाही सौम्या.” पाणिनी पटवर्धन ने खुलासा केला. “ त्याच्या अंगावरील कपडे कोरडे होते, बूट कोरडे होते. मैथिली ने ते त्याच्या गाडीतून आणेपर्यंत त्याला ते मिळणे शक्यच नव्हते.”

“ सर् हे सगळे उद्या कोर्टात सर्वाना सांगून आकृती ला सोडवा ! ” सौम्या ने विनंती केली.

“ मी सोडवीन पण मला तसे साक्षीदार मिळायला हवेत.. आत्ता पर्यंत सगळेच साक्षीदार खोटे बोललेत,आणि पुढेही खोटेच बोलतील.पोलिसांकडून तर काहीच सहकार्य नाही मिळणार. त्यामुळे, काही पुरावा आपल्यालाच शोधायला हवा ”

“ म्हणून आपण मैथिली च्या गॅरेज ला भेट द्यायची .असेच ना?” सौम्या ने उत्तेजित होऊन विचारले.

पाणिनी ने मान डोलावून होकार दिला.

“ बेकायदा घुसायचे तिथे? ”

“गॅरेज उघडे असेल तर पुरावा मिळवायला आपण जातोय ही गोष्ट दरोडा या सदरात बसणार नाही.आपल्यावर मालकाच्या परवानगी शिवाय आत घुसल्याचा आरोप येईल पण चोरी किंवा दरोड्याचा नाही. ” पाणिनी ने युक्तिवाद केला.

“इन्स्पे.तारकरला हे पटेल? समजा आपण त्याला आधी सांगितले की.......” सौम्या काहीतरी बोलणार होती पण तिचे वाक्य पूर्ण होऊन न देता पाणिनी म्हणाला,

“ तो हसेलच आपल्याला.”

“ चला तर मग निघूया , मी येतेच तुमच्या बरोबर.”

“ ये, पण तुला गॅरेज च्या आत यायची गरज नाही.तू गाडीत बसून रहा.”

“ मग मी यायचं तरी कशाला.? सर्, तुम्हाला जर तिथे आत काही पुरावा सापडला आणि तेथे मी असेन तर त्याची मी साक्षीदार म्हणून उपयोगी ठरेन.पण मी नसेन तर तुम्ही आरोपीचे वकील म्हणून स्वत:च साक्षीदार या नात्याने तो पुरावा सापडल्याची साक्ष देऊ शकणार नाही. ”

“ धूर्त आहेस तू सौम्या. ठीक आहे.ये तू आत.” पाणिनी म्हणाला.

ते दोघेही मैथिली च्या अपार्टमेंट पाशी गाडीने आले. खाली बरीच गॅरेज होती ,प्रत्येकाला अनुक्रमांक दिले होते. मैथिली चे गॅरेज उघडेच होते.

“ आपण आपली गाडी थेट आतच घालू या सौम्या. म्हणजे बाहेरून कोणाला कळायला नको.”

त्यांनी गाडी आत घातली आणि दार बंद केले. “ सर , मी या बाजूला बघते, तुम्ही दुसऱ्या बाजूला बघा.” सौम्या ने सुचवले.

“ आपल्याला हवी असलेली बुटाची जोडी आणि कपडे लोखंडी ट्रंकेत किंवा सुट केस मध्ये असतील. ती पलीकडची ट्रंक उघडी आहे का बघ जरा.” पाणिनी सौम्या ला म्हणाला.

“ कुलूप आहे त्याला.”

अचानक गॅरेज च्या बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. पाणिनी आणि सौम्या ने दचकून एकमेकांकडे पहिले. दार उघडले गेले आणि आत आलेल्या व्यक्तीला पाहून दोघे हादरलेच. तो जयराज आर्य होता., आकृती चा साहेब. पाणिनी आणि सौम्या यांना तिथे बघून त्याला झटकाच बसला.एवढे कमी म्हणून की काय जयराज आर्य च्या गाडीतून आणखी एक माणूस उतरला . तो इन्स्पे.इन्स्पे.तारकर होता.

“ इन्स्पेक्टर, मी तुम्हाला म्हणालो नव्हतो, हे लोक इथे कुठला तरी पुरावा निर्माण करून ठेवायला येतील म्हणून? यांना अटक करा ” जयराज आर्य म्हणाला.

“ कुठल्या आरोपाखाली अटक करा म्हणताय ? ” पाणिनी ने विचारले.

“ आकृती ने तुम्हाला काही वस्तू दिल्या आहेत त्या तुम्ही या गॅरेज मध्ये ठेवत होतात.ज्यायोगे तुम्ही आकृती ऐवजी मैथिली आहुजाला अडकवू शकाल.” जयराज आर्य म्हणाला. “ तुमचा प्रथम पासूनच तिला अडकवण्याचा विचार होता.तुम्ही तिचा ड्रेस फाडून त्याचा तुकडा त्या काटेरी तारेच्या कुंपणाला अडकवला.तिचा ड्रेस तुम्ही आकृती च्या घरात ठेवलात. पायस हिर्लेकरकडे तुमचे गुप्त हेर पाठवून ,त्याला मैथिली चे फोटो दाखवून , गाडीतून उतरताना बघितलेली स्त्री ही आकृती नसून मैथिली च आहे हे त्याचा मनावर ठसवायचा प्रयत्न केलात. जे जे तुम्हाला शक्य होते, तिला यात गोवण्यासाठी ते ते तुम्ही केले.”

“ आम्ही आत आलो हे खर आहे पण तपास करण्या साठी,कोणताही पुरावा पेरण्या साठी नाही,” पाणिनी म्हणाला.

“ जयराज , तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे.आपण पटवर्धन ला रंगे हाथ पकडलाय. त्याचा वर काय आरोप लावायचे ते सरकारी वकिलांना ठरवू दे.”

“ इन्स्पे.तारकर, तुझ्याशी खाजगीत दोन मिनिटं बोलायचं आहे.” पाणिनी म्हणाला.

इन्स्पे.तारकर ने मानेनेच नकार दिला. “ जे काय सांगायचयं ते सरकारी वकिलांना सांग.”

नंतर जयराज आर्य ला उद्देशून म्हणाला, “ हे बघ जयराज , माझा तुला सल्ला आहे की त्याला अटक करायचा आग्रह धरू नको. आपण त्यांना पकडलंय रंगे हाथ, इथ पर्यंत ठीक आहे.आपण दोघांनी मिळून सर्व जागा पिंजून काढू.काही सापडले तर सरकारी वकिलांच्या ताब्यात देऊ.”

“ ठीक आहे तुझा सल्ला ऐकतो मी ” जयराज आर्य म्हणाला.

“ जयराज आर्य त्याची गाडी मागे घेईल.पाणिनी , त्या नंतर तू आणि सौम्या इथून निघून जा.”

“इन्स्पे.तारकर इथे काही वस्तू आहेत, ज्या पुरावा म्हणून उपयोगी आहेत.त्या भलत्याच माणसाच्या हाती लागू देऊ नको.आणि कोणालाही माझ्या विरुद्ध कान भरून देऊ नको. ” पाणिनी ने त्याला सावध केले.

“ त्या सापडू दे एकदा मग त्या कोणी पेरल्या इथे हे पण आम्हाला कळेल.” जयराज आर्य म्हणाला.

“ वाद नकोत ” इन्स्पे.तारकर जयराज आर्य ला म्हणाला. जयराज आर्य ने आपली गाडी बाजूला घेतली . पाणिनी आणि सौम्या दोघे ही त्यांच्या गाडीत बसले. “ जेवढे म्हणून वाईट घडायचे होते तेवढे घडले.” पाणिनी म्हणाला. “ अॅड.खांडेकर नक्की असाच पवित्र घेतील की मीच पुरावा पेरला तिथे.”

“ मी म्हणाले तसे आपण आधीच इन्स्पे.तारकरला सांगून घेऊन जायला हवे होते.तो फार तर हसला असता पण हा प्रसंग ओढवला नसता. ” सौम्या म्हणाली.

“ तुझं बरोबर आहे पण आता आपण यात अडकलोय खरे.उद्या कोर्टात अॅड.खांडेकर थयथयाट करत येईल आणि आपण रंगे हाथ कसे पकडले गेलो हे न्यायाधीशांना सांगेल.” पाणिनी खिन्न होत म्हणाला.

“ काय करताना पकडले गेलो?” सौम्या म्हणाली”

“ ती एक संधी आहे आपल्याकडे. पुरावा पेरत असताना आपण पकडले गेलो नाही.”

“ अशा अनेक प्रसंगातून आपण बाहेर आलोय सर, मी यात तुमची शेवट पर्यंत साथ देईन.” सौम्या पाणिनी च्या हातावर हात ठेवत म्हणाली.

“ आपण दोघेही यात अडकलोय आणि दोघेही लढून सुटणार आहोत. म्हणजे,सुटावेच लागेल आपल्याला. ” पाणिनी म्हणाला.


( प्रकरण तेरा समाप्त)