warmed up books and stories free download online pdf in Marathi

गुंजेचा पाला

प्रेमाचा ओलावा टिकवून ठेवायला सांगणारा - 'गुंजेचा पाला'

जेष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री. बबन पोतदार यांनी लिहिलेल्या व पुष्पक प्रकाशन, पुणे यांनी 1985 साली प्रथम प्रकाशित केलेल्या 'गुंजेचा पाला' या कथासंग्रहाच्या आत्तापर्यंत एकूण सहा आवृत्त्या निघाल्या आहेत. सोबतच 'आक्रित' व 'एका सत्याचा प्रवास' या कथासंग्रहांच्याही काही आवृत्त्या निघाल्या आहेत.

गुंजेचा पाला या पुस्तकाबद्दल आजवर खूप ऐकून होतो. पुण्यात‌ झालेल्या एका कवी संमेलनात एका नामवंत कवीने हलाखीच्या परिस्थितीत जवळ पैसे नव्हते, पण हे पुस्तक वाचण्याची ओढ होती. या ओढीने 'गुंजेचा पाला' हे पुस्तक एका नातेवाईकांकडून चोरून आणून वाचलं. ही आठवण खूद्द त्या कवीने भर सभागृहात उपस्थित कवी, साहित्य रसिकांच्या समोर कबूल केली.
आणि मग 'गुंजेचा पाला' हा कथासंग्रह आपणही कुठूनतरी मिळवून वाचायचा, असे मी ठरवले. त्यासाठी अनेक अॉनलाईन पुस्तक विक्रेत्यांकडे चौकशी केली, पण हा कथासंग्रह कुठेही उपलब्ध झाला नाही.

काही दिवसांपुर्वी एका कवितासंग्रहाच्या प्रकाशनाची निमंत्रण पत्रिका मला आली. निमंत्रण पत्रिकेत जेष्ठ साहित्यिक बबन पोतदार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने अध्यक्ष, लेखक श्रीपाल सबनीस हे येणार आहेत, असे समजले आणि मग ठरवून कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. पोतदार सर यांना त्या कार्यक्रमानंतर भेटलो. त्यांचा पत्ता घेतला. त्यांनीही आवर्जून घरी ये. भेटू निवांत बसून बोलू असे अगदी आपूलकीने सांगितले.

पोतदार सर यांना भेटायला जाण्यासाठी रात्री खूप उशीर झाला होता, तरीही रात्रीचे नऊ दहाच्या सुमारास मी माझ्या सहकारी मित्रांसोबत पोतदार सरांच्या घरी पोहोचलो. सकाळी अगोदरच "मी तुम्हाला भेटायला येणार आहे", असे मी त्यांना फोन करून सांगितले होते. त्यामुळे रात्रीचा इतका उशीर होऊनही ते माझी वाट पाहत होते. "सुभाषराव कुठे पर्यंत आला आहात.", असे ते राहून राहून फोन करून माझी विचारपूस करत होते.
एकदाचं सरांच्या घरी येऊन पोहोचलो.

सरांनी आदरातिथ्याने स्वागत केले. काही वेळ गप्पा मारल्या. सरांनी स्वलिखीत तीन कथासंग्रहांचा संच सप्रेम भेट म्हणून दिला. विजया काकूंनीही आम्ही नको म्हणत असतानाही लाडू, चिवडा फराळ अगदी आपुलकीने दिला.
आमच्या खूप वेळ साहित्यिक गप्पा सुरू होत्या. गावाकडच्या काही जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. शाळेत असताना 'माझे मराठीचे शिक्षक' या विषयावर जगताप सर, सर्व लोक त्यांना नाना म्हणायचे. त्यांनी वर्गातल्या चिमण्या जिवांपुढे शिक्षकाचं व्यक्तीचित्र लिहण्याचं आव्हान ठेवलेलं होतं. ते आव्हान पोतदार सर यांनी एकट्यानेच पेललं. नानांच्या गुणदोषांसकट तो निबंध सत्र परीक्षेत लिहिला होता, त्यानंतर त्यांनी जणू प्रेमवजा
आदेशच दिला, की 'खूप लिही, खूप मोठा हो. शाळेचं नाव काढ.' ही आठवण सांगताना त्यांचा उर भरून आला होता.
नेमकं त्याच दिवशी वयाची नव्वदी पार केलेल्या मसूरच्या जगताप सर, म्हणजे नानांवर 'नाना तुमच्यामुळे' हा बबन पोतदार सर यांचा लेख दै.प्रभात मध्ये छापून आला होता.
नानांच्या आठवणींनी पोतदार सर अगदी भारावून गेले होते. माझ्या सोबत माझे सहकारीही पोतदार सरांच्या गावचे, म्हणजे मसूर (सातारा) गावचे होते. त्यामुळे दै प्रभातमध्ये आलेला लेख त्यांनी मला मोठ्याने वाचायला लावला. मी तो त्या दिवशी सकाळी वाचला होताच, पण पुन्हा एकदा सगळ्या सहकाऱ्यांसमोर तो वाचला. त्यात, 'पुढे तू लेखक होशील' हा नानांचा पहिला व लाखमोलाचा आशिर्वाद खरा ठरला.
हे सारं सांगायचं प्रयोजन एवढंच की, केवळ नानांच्या आशिर्वादानेच 'गुंजेचा पाला' हा माझा पहिलावहिला कथासंग्रह प्रकाशित होतोय, असे आपल्या कथासंग्रहातील मनोगतात ते व्यक्त होताना सांगतात.
एक वाचक म्हणून मी जे अनुभवत होतो, तो अनुभव तो प्रसंग काळजावर कोरून ठेवण्यासारखा होता.

गुंजेचा पाला या पुस्तकाबद्दल बोलायचं म्हटलं, तर एकूण सोळा कथा असलेल्या या कथासंग्रहाला जेष्ठ कवियत्री, गीतकार कै. शांताबाई शेळके यांची प्रस्तावना लाभली आहे.
प्रत्येक कथेची पहिली ओळ वाचकाच्या मनाचा अचूक वेध घेते, त्यानंतर ती कथा वास्तव रूप धारण करून काळीज हेलावून टाकते. हे या कथासंग्रहातील प्रत्येक कथेचं वैशिष्ट्य आहे.

कथासंग्रहातील पहिलीच कथा 'गुंजेचा पाला' आहे. मैत्रीत वियोग येऊच नये, गुंजेच्या पाल्यासारखी गोड मैत्री अतुट रहावी, यासाठी मित्र काय काय करू शकतो हे या कथेत वाचायला मिळेल. ही कथा मित्र प्रेमाच्या अतुट नात्याची साक्ष देणारी आहे, कदाचित म्हणूनच लेखक बबन पोतदार यांनी हा कथासंग्रह आपल्या शाळकरी मित्रांना समर्पित केलेला आहे.

'शापित' या कथेतील नायकाच्या मनाची उध्वस्त अवस्था खरोखरच मनाला भिडणारी आहे. आपल्या हातून भावनेच्या, वासनेच्या भरात ज्या चुका होतात, त्या चुकांबद्दल समोरची व्यक्ती कधीही माफ करणार नाही. यदाकदाचित ती व्यक्ती माफ करेलही, पण आपण केलेल्या चुकीच्या कृत्याचे आपल्याच मनावर खोल व्रण निर्माण झालेले असतात, की ते काही केल्या मिटता मिटत नाहीत. त्यामुळे माफ करायचं ठरवलं तरीही आपण स्वतःलाच माफ करू शकत नाही.

कथांचे स्वरूप ग्रामीण भागातील सामान्य लोकांचं जीवन असले, तरी त्या लोकांच्या जीवनात आलेले प्रसंग आत्तापर्यंत काही मोजक्याच लेखकांनी रेखाटन केले आहे. त्यात 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' या कादंबरीवजा कथासंग्रहाचे लेखक ह. मो. मराठे यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. लेखक मराठे यांनी लोकांच्या मनावर बाह्य परिस्थितीचा कसा परिणाम होतो हे रेखाटला आहे, तर लेखक बबन पोतदार यांनी लोकांच्या अंतर्मनावर उमटलेल्या ओरखड्यांचा परिणाम किती भयाण आहे हे रेखाटले आहे. भलेभले लेखक मंडळी अशा विषयांना हात घालत नाहीत, पण अशा विषयांच्या कथा हाताळणाऱ्या लेखकांमध्ये माझ्या मते बबन पोतदार सर हे एक दुर्मिळ लेखक आहेत.

माणसामाणसातील प्रेम, जिव्हाळा हीच माणसाच्या जीवनातील सर्वात प्रबळ प्रेरणा आहे. या प्रेमाच्या ओलाव्यानेच माणसाच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. चैतन्य मिळते, नाहीतर माणसाचं जगणं उजाड, रखरखीत वाळवंट बनतं. हे सत्य स्थिती आहे. म्हणूनच प्रेमाचा ओलावा टिकवून ठेवायचा असेल, तर 'गुंजेचा पाला' हा कथासंग्रह आवर्जून वाचायला पाहिजे.

_सुभाष आनंदा मंडले
पुणे.(9923124251)