Sant Eknath Maharaj Ganga read the scripture books and stories free download online pdf in Marathi

संत श्री एकनाथ महाराज। १७

द्विपरार्धायु विधाता । त्याचेनि नोहे गुणभागता । मग इतरांची कोण कथा । गुण तत्त्वतां निवडावया ॥११॥ ऐशिया ज्या त्रिगुणवृत्ती । मजही निःशेष न निवडती । यालागीं ध्वनितप्राय पदोक्ती । देव श्र्लोकार्थीं बोलिला ॥१२॥ मागिल्या तीं श्र्लोकार्थीं । सांगीतल्या त्रिगुणस्थिती । त्रिगुणांची मिश्रित गती । सन्निपातवृत्ती ते ऐका ॥१३॥

एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

सन्निपातस्त्वहमिति ममेत्युद्धव या मतिः । व्यवहारः संनिपातो मनोमात्रेन्द्रियासुभिः ॥६॥

गुणसन्निपातप्रकारु । एकचि जो कां अहंकारु । तो गुणसंगें त्रिप्रकारु । ऐक विचारु तयाचा ॥१४॥ वर्णाश्रमविहित विलास । वेदाज्ञा पाळणें अवश्य । मी आत्मा जाण चिदंश । हा अहंविलास सात्विक ॥१५॥ मी स्वधर्मकर्मकर्ता । मी स्वर्गादि सुखभोक्ता । मज पावती नानावस्था । या नांव अहंता राजस ॥१६॥ मी देहधारि सुभट नर । मीचि कर्ता शत्रुसंहार । मी सर्वार्थी अतिदुर्धर । हा अहंकार तामस ॥१७॥ गुणानुसारें ममता जाण । त्रिविधरुपें स्फुरण । तेचि अर्थींचें निरुपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥१८॥ माझे हृदयींचा भगवंत । तोचि सर्व भूतीं हृदयस्थ । भूतें माझींच समस्त । हे ममता शोधित सत्वाची ॥१९॥ भक्त संत साधु सज्जन । तेचि माझे सुहृज्जन । ऐशी जे ममता पूर्ण । उद्धवा जाण सत्त्वस्थ ॥१२०॥ जीवाहून परती । सद्गुरुचरणीं अतिप्रीती । ऐशी ममतेची जे जाती । ते जाण निश्चितीं सात्विक ॥२१॥ ज्या देवाची उपासकता । शैवी वैष्णवी दीक्षितता । देवीं धर्मी पूर्ण ममता । ते जाण सात्विकता सत्वस्थ ॥२२॥ शैवी वैष्णवी धर्मममता । दंभरहित निष्कामता । ते ते सात्विकी ममता । ऐक अवस्था राजसाची ॥२३॥ निवृत्तिमार्ग मानी लटिक । सत्य साचार लौकिक । लोकैषणेची ममता देख । ते आवश्यक राजसी ॥२४॥ प्रवृत्तिशास्त्रीं आवडी । लौकिकाची अतिगोडी । नामरुपांची उभवी गुढी । हे ममता रोकडी राजस ॥२५॥ स्त्रीपुत्रें माझीं आवश्यक । शरीरसंबंधी आप्त लोक । द्रव्याची ममता निष्टंक । हे बुद्धि वोळख राजस ॥२६॥ ज्या देवाची करितां भक्ती । नाम रुप जोडे संपत्ती । तीं तीं दैवतें आवडती । हे ममता निश्चितीं राजस ॥२७॥ काम्य कर्मीं आवडी देख । आप्त मानी सकामकर्मक । सत्य स्वर्गादि विषयसुख । हे ममता निष्टंक राजस ॥२८॥ हे रजोगुणाची ममता । तुज म्यां सांगीतली तत्वतां । तमोगुणाची जे अवस्था । ऐक व्यवस्था सांगेन ॥२९॥ आपुल्या देहासी जो हूंतूं करी । कां पूर्वपूर्वजांचा वैरी । त्यांच्या लेंकरांसीं वैर धरी । हे बुद्धि निष्ठुरी तामस ॥१३०॥ पुढें लेंकुरांचे लेंकुरीं । वृत्तिभूमि जीविकेवरी । आडवा येईल स्वगोत्री । त्यासी वैर धरी तामस ॥३१॥ ऐसे पूर्वापर माझे वैरी । मी निर्दाळीन संसारीं । यालागीं रिघे अभिचारीं । ते ममता खरी तामस ॥३२॥ अभिचारिकी जे मंत्रज्ञ । ते मानी माझे आप्त स्वजन । शाकिनीडाकिनीउपासन । हे ममता संपूर्ण तामसी ॥३३॥ असो बहुसाल व्युत्पत्ती । एकेक गुणीं अनंत शक्ती । हे तिन्ही जेथ मिश्र होती । सन्निपातवृत्ती या नांव ॥३४॥ कफ वात आणि पित्त । तिन्ही एकत्र जेथ होत । तेथ उपजे सन्निपात । तेवीं सन्निपात येथ त्रिगुणांचा ॥३५॥ संकल्पविकल्पात्मक मन । पंच विषय पंच प्राण । दशेंद्रियीं व्यवहार संपूर्ण । तेथ उपजे त्रिगुणसन्निपात ॥३६॥ तेंचि सन्निपातनिरुपण । त्रिगुणांचें मिश्रलक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । मिश्रगुणसन्निपातू ॥३७॥

एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

धम चार्थे च कामे च यदाऽसौ परिनिष्ठितः । गुणानां सन्निकर्षोऽयं श्रद्धारतिधनावहः ॥७॥

पुरुषाच्या ठायीं क्रियाकर्म । क्षणें स्वधर्म क्षणें काम । क्षणें वाढवी अर्थोद्यम । हा संक्रम त्रिगुणांचा ॥३८॥ गुणसंक्रमण करी काय । त्रिगुणीं धर्म त्रिविध होय । कामही त्रिविध होऊनि ठाय । अर्थस्वार्थनिर्वाह त्रिगुणात्मक ॥३९॥ येथ कर्मासी दोष नाहीं । दोष कर्त्याचे बुद्धीच्या ठायीं । तो जे कल्पना करील कांहीं । तें फळ पाहीं स्वयें भोगी ॥१४०॥ सोनें वंद्य सोनेपणें । त्याचें स्वयें घडविल्या सुणें । वंद्य तेंचि निंद्य करणें । तेवीं स्वकर्म दूषणें गुणबुद्धी ॥४१॥ भूमि सहजें शुद्ध आहे । जें पेरिजे तें पीक होये । तेवीं स्वकर्म शुद्ध स्वयें । फलभोगू लाहे गुणवृत्ती ॥४२॥ वाचा सहज सरळ गोमटी । रामनामें जोडे ब्रह्मपुष्टी । वृथा जाय करितां चावटी । भोगी निंदेपाठीं महापाप ॥४३॥ तेवीं स्वधर्म श्रद्धायुक्त । पुरुषास करी विरक्त । तेथ त्रिगुणांचा सन्निपात । श्रद्धा छळित तें ऐक ॥४४॥ स्वधर्मकर्मी श्रद्धा जोडे । क्षणैकें लागे विरक्तीकडे । क्षणें भोगफळाशा वाढे । क्षणैक पडे ममतासंधीं ॥४५॥ तैशी्च कामाचीही रती । क्षणैक निष्कामीं अतिप्रीती । क्षणें स्त्रीभोगआसक्ती । क्षणें कामरती परद्वारीं ॥४६॥ याचिपरी धनाची जोडी । क्षणैक द्रव्याशा सोडी । क्षणैक अर्थाची अतिगोडी । क्षणैक आसुडी परद्रव्य ॥४७॥ त्रिविध धर्म त्रिविध कर्म। त्रिविध रुपें धनागम । या गुणवृत्तीस्तव स्वधर्म । सांडूनि अकर्म करी प्राणी ॥४८॥ एवं धर्मअर्थकामांआंत । गुणसन्निपात अनंत । फोडूनि सांगतां येथ । वाढेल ग्रंथ अनिवार ॥४९॥ यालागीं गुणसन्निपात । सांगीतला संकलित । तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत संक्षेपें ॥१५०॥