Sangat books and stories free download online pdf in Marathi

संगत

संगत

 

        सकाळी करनला कोणाचा तरी फोन आला. समोरुन फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून करनचा चेहरा अचानक चिंताग्रस्त झाला. त्याने फोन कट केला. त्याचवेळी त्याच्या आईने त्याला जेवायला वाढले होते. पण तो न जेवताच बाहेर जावू लागला. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला थांबवून ‍विचारले.

        " तु कोणत्या तरी कारणामुळे तणावात दिसतोस. नक्की तणावाचे काय कारण आहे?"

        "काही नाही बाबा." करन त्यांच्याकडे न पाहता दुसरीकडे मान वळवून बोलला.

        "मी तुला गेल्या एक हप्त्यापासून पाहत आहे. तु तुझ्याच तंद्रीत आहेस. नक्की तु कोणत्यातरी संकटात आहेस. पण तु आमच्यापासून काहीतरी लपवतो आहेस. मला बिनधास्त सांग. मी तुला काहीच बोलणार नाही. उलट तुला संकटातून बाहेर पडायला मदतच करील." करनचे बाबा त्याला विश्वासात घेत बोलले.

        कारण त्यांना माहित होतं. आता आपला मुलगा मोठा झाला आहे. त्याला आता रागवून काहीच फायदा नाही. त्याला समजावून घेण्यासाठी आपल्यालाही त्याच्यासारखं व्हावं लागेल. व त्याच्या तणावाचे कारण समजावून घेत त्याला या संकटातून बाहेर काढावे लागले.

        त्यांच्या बोलण्याने करनच्या मनाला धीर मिळाला. त्याला जरा हायसे वाटले. आपले वडील,आपले छत्र आपल्या सोबत आहे. याची त्याला जाणीव झाली. त्याचे डोळे पाण्याने भरून आले.

        तो रडतच म्हणाला, "बाबा.मी चुकलो मला माफ करा."

        त्याला सावरत त्याचे वडील त्याला म्हणाले, "तु रडु नकोस. काय झाले ते मला आधी सांग."

        करन सांगु लागला.

        "मला  सिगारेट ओढण्याची व दारु पिण्याची सवय लागली आहे. एका बारवर मी मित्रांसोबत दारु प्यायला जात असायचो. त्या बारमालकाची माझ्याकडे जवळपास सत्तर हजार रुपये उधारी झाली आहे. तो सतत उधारीसाठी तगादा लावु लागला. त्यामुळे मी बार बदलले. त्यानंतर दुसऱ्या बारवर पण उधारीने दारु पिवू लागलो. अशा प्रकारे मी जवळपास चार बार बदलले व सगळयांची मिळून माझ्याकडे 3 लक्ष रुपये उधारी झाली आहे. त्या बारवाल्यांनी माझ्या मागे माणसं लावली आहेत. मला घरातून बाहेर पडणंही मुश्कील झालं आहे.”

        भांडे घासता-घासता त्याचे बोलणे ऐकत असलेली त्याची आई उलताणं घेवून रागातच बाहेर आली. व त्या उलताण्याचा एक रट्टा करनच्या पाठीत मारत ती करनला म्हणाली,

        "तुझे वडील व्यसन करत नाहीत. तुझ्या वडीलांचा बाहेरचे लोक आदर करतात. तु त्यांचं व घराण्याचं नाव चांगलंच मातीत घातलंस."

        त्याच्या वडीलांनी त्याच्या आईला शांत बसण्याची सूचना केली.  व ते करनला म्हणाले, "पुढे सांग."

        करन आईकडे  भितीने पाहत म्हणाला, “इथे नको नाहीतर पुन्हा आई मारेल.”

        त्यानंतर करनचे वडील त्याला दुसऱ्या रुम मध्ये घेवून गेले.

        करनने पुन्हा सांगायला सुरुवात केली.

        “ मला झटपट श्रीमंत होण्याच्या ओढीने जुगार खेळण्याचंही वेसन लागलं. त्यामध्ये मला खूप नुकसान झालं. मी मित्रांकडून उसने पैसे घेवून जुगार खेळलो. मित्रांचे माझ्याकडे एक लक्ष रुपये आहेत. आता तेही मला पैसे मागु लागले आहेत.त्यातच काल माझ्या एका मित्राने कॉलेजमध्ये एका मुलीला छेडले होते.त्यावेळी मी त्याच्यासोबत होतो. तो अचानक असा करेल याची मला कल्पना नव्हती. त्या मुलीने त्याच्या सोबतच माझेही नाव तिच्या घरी सांगीतले आहे. आताच माझ्या दुसऱ्या एका मित्राचा फोन आला  होता. तिचे वडील माझ्यावरही पोलीस केस करणार असल्याचे त्याने सांगीतले.”

        त्याचे बोलणे ऐकून आता त्याच्या वडीलांनाही काळजी वाटु लागली. त्याचे वडील त्याला म्हणाले, “मी तुला या सर्व संकटातून बाहेर काढेल. पण यापुढे तुला मी जसे सांगेल तसेच वागावे लागेल.”

        करनने होकारार्थी मान हलवली.ते करनला घेवून पहिल्यांदा त्या मुलीच्या घरी गेले. करनच्या वडीलांची व त्या मुलीच्या वडीलांची आधीच तोंड ओळख होती. तिचे वडील त्या मुलीला घेवून पोलीस स्टेशनकडे निघालेच होते. करनच्या वडीलांना पाहून ते थांबले. करनला पाहून त्या मुलीने करनकडे बोट दाखवून हाच काल त्या मुलासोबत असल्याचे सांगीतले.

        त्यावर तिच्या वडीलांना राग अनावर झाला. ते करनच्या वडीलांना म्हणाले,

        “तुम्ही इतके चांगले आहात. तुमचा मुलगा असा निघेल असे वाटले नव्हते. मी आता पोलीस केस करायलाच चाललो होतो.”

         त्यावर करनचे वडील त्या मुलीला म्हणाले, “ काल हा तुला काही बोलला होता का ?”

        तिने नाही म्हणून सांगीतले.

        त्याचे वडील त्या मुलीच्या वडीलांना म्हणाले, “हा काल फक्त त्या मुलाच्या सोबत होता. पण यापुढे हा आता त्याच्यासोबत तुला कधीच दिसणार नाही. तुम्ही जर आज याचा काही गुन्हा नसताना याच्यावर केस केली तर याचे जीवन उद्ध्वस्त होईल. याच्या जीवनाची दिशा चुकेल. यावेळी त्याला त्याची चुक सुधारण्यासाठी संधी द्या.”

        तिचे वडील म्हणाले, “तुम्हाला पाहूनच मी याच्यावर केस करण्याचा माझा विचार बदलला आहे. पण यापुढे याला चांगली संगत धरायला सांगा. तुम्ही थोडा उशीर केला असता तर याच्यावर नक्कीच गुन्हा दाखल झाला असता.”

        आपल्यावर आलेले एक संकट टळल्यामुळे करनला थोडे हायसे वाटले. त्याने त्या मुलीची व तिच्या वडीलांचीही माफी मागीतली. त्यानंतर करन व त्याचे वडील घरी आले.

        करन म्हणाला, “बाबा! बरं झालं तुम्ही मला माझ्या तणावाचे कारण  विचारले. नाहीतर माझ्या हातून काहीतरी चुकीचे पाऊल नक्कीच उचलण्यात आले असते.”

        त्याचे वडील म्हणाले, “आता तु काही टेंशन घेऊ नकोस. तुझी उधारी व तुझे देणे सगळे मी  देवून टाकतो. पण यापुढे वाईट मार्गाला जावू नको.”

        वडीलांच्या बोलण्याने त्याचे मन भरून आले. तो म्हणाला, “आता यापुढे मी कधीच वाईट वागणार नाही.माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला.”

        त्याचे वडील म्हणाले, “खरे तर माझेही चुकले. माझ्या कामाच्या व्यापात माझे तुझ्याकडे दुर्लक्ष झाले. आपला मुलगा कोणत्या मुलांमध्ये राहतो. त्याचे  मित्र कसे आहेत? याबाबत दक्षता घेणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. कारण  किशोर

 

वयामध्ये मुलांना वाईट व्यसन, वाईट सवयी लागतात. त्याचा परिणाम मुलांच्या भवितव्यावर होतो. तु वाईट नाहीस. पण तुझी संगत वाईट आहे. कोणताही माणूस वाईट नसतो तर त्याचे विचार वाईट असतात. माणसाच्या सभोवताली जसे वातावरण आहे. माणूस तसाच बनत असतो. आपल्याला चांगल्या लोकांत राहायचे की वाईट लोकांमध्ये हे आपल्याच हातात असते.

        तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे.

        चित्ता मिळे त्याचा संग रूचिकर | क्षोभविता दूर तो चि भले ||१||

        याचा अर्थ आहे. आपल्या मनाशी ज्याचं मन जुळतं, त्याचीच संगत आपल्याला आनंद देते अशा माणसाचीच संगत करावी. काही लोकांच्या सहवासाने आपल्या मनात क्षोभ निर्माण होतो, आपलं मन अस्वस्थ होतं, अशा लोकांपासून दूर राहणंच चांगलं आहे.

        यापुढे लक्षात ठेव. आपल्यामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आपण स्वत: संकटात येतो असे कृत्य कधीच करायचे नाही. आपल्याला जर चांगले व्हायचे असेल तर आपण चांगल्या  विचारांच्या, चांगल्या वागणुकीच्या मित्रांमध्ये राहिले पाहिजे. एखाद्या व्यक्तीची पारख त्याच्या मित्र परिवारावरूनच होत असते. त्यामुळे नेहमी चांगली संगत धरायची. याचा अर्थ असा नाही की जे वाईट आहेत. त्यांच्याशी बोलणेच बंद करायचे. ते वाईट असले तरी त्यांच्यासोबत कामापुरतेच रहायचे. कोणाशीही शत्रुत्व करायचे नाही. तु तुझ्या वाईट मित्रांची संगत लगेच सोडू शकत नाहीस. पण हळूहळू सोडून देवून चांगल्या मित्रांची संगत धर.”

        करनला आपल्या वडीलांचे म्हणणे पटले. तो तेव्हापासून चांगल्या विचारांच्या मित्रांमध्ये राहू लागला. अल्पावधीतच त्याचे दुषीत मन शुद्ध झाले. त्याला स्वत:लाच प्रसन्न वाटु लागले. चांगल्या मित्रांमध्ये राहिल्यामुळे त्याचे मनही चांगले होवू लागले.

        एके दिवशी त्याचा एक जुना मित्र त्याला भेटला. तो करनला जुगार खेळण्यासाठी आग्रह करु लागला. परंतु करन त्याच्या बरोबर गेला नाही. त्याचा मित्र म्हणाला, “चल तुला आज खूप पैसे जिंकून देतो. तु फक्त सुरुवातीला पैसे लाव.”

        त्यावर करन म्हणाला, “माझ्यामुळे माझ्या आई-वडीलांना खाली मान घालावी लागेल असे कृत्य मी कधीच करणार नाही. मला माफ कर मी तुझ्यासोबत जुगार खेळायला येवू शकत नाही.”

        त्याचा तो मित्र निघून गेला व करनही आपल्या चांगल्या मित्राकडे निघून गेला. काही वेळाने जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचा तो जुगार खेळण्यासाठी आग्रह करणारा मित्र त्याच्या वडीलांसोबत बोलत बसला होता. करनच्या वडीलांनीच मुद्दाम त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या मित्राला जुगार खेळण्यासाठी करनला आग्रह करण्यास सांगीतले होते. त्याच्या वडीलांनी घेतलेल्या परीक्षेत तो पास झाला होता. आता त्याला कळून चुकले होते. आयुष्याची परीक्षा पास व्हायची असेल तर संगत चांगली असणे खूप महत्वाचे आहे.