Saint Venaswamy. books and stories free download online pdf in Marathi

संत वेणास्वामी.

*भावनारहित वेणी उरलीसे भजनी*

आज चैत्र कृष्ण चतुर्दशी, सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांच्या स्वनामधन्य शिष्या सद्गुरु श्रीसंत वेणास्वामी यांची पुण्यतिथी. तसेच राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील अवलिया विभूतिमत्त्व श्रीसंत चिले महाराज यांचीही पुण्यतिथी !
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामींच्या परिपूर्णकृपेने अलौकिक योगानुभूती घेतलेल्या श्री वेणाबाई या फार विलक्षण विभूती होत्या. त्यांची अनन्य गुरुनिष्ठा आणि त्यामुळे लाभलेली उत्तुंग आत्मानुभूती ही खरोखर आश्चर्यचकित करणारीच आहे. श्री वेणास्वामींचे वाङ्मय वाचताना आपण मोहरून जातो. त्यांच्या जीवनात सद्गुरुकृपेचा संपन्न वसंतऋतू एवढा बहरलेला आहे की शब्दच नाहीत ते व्यक्त करायला. त्यांची प्रत्येक रचना अशाच विविधांगी अनुभवफुलो-याने सुगंधित झालेली आहे.
श्रीसद्गुरूंनी कृपापूर्वक दिलेल्या दिव्यनामाने चित्ताचे चैतन्य झाल्याची सुमधुर अनुभूती आपल्या सखीपाशी व्यक्त करताना श्रीसंत वेणाबाई म्हणतात,
*काय सांगू साजणी । मनाची करणी ।*
*चालेना ठाईहूनी । पांगुळले॥१॥*
*दशलक्षणी घराचार । बिघडला साचार ।*
*वृत्तीचा विचार । खुंटोनी गेला ॥२॥*
*भ्रांती ना स्मरण । ना अहंकर्तेपण ।*
*देखणेपणाचे भान । मावळले ॥३॥*
श्री संत चरित्र कथानके वाचन करणे ही एक फार चांगली संवय आहे.संत साहित्य वाचन करीत असतांना वाचकास साहित्य संबंधित संताचा संग(सहवास) आपोआप घडत आसतो. जितका वेळ संत साहित्य वाचणात घालवु तितका वेळ सत्कारणी लागून साहजिकच मनुष्याचे जीवनमानात आणि वर्तनात अमुलाग्र बदल घडून ऊन्नतीचा मार्ग मिळतो.म्हणुन जीवाने प्रत्येक क्षण शिवाच्या चिंतनात घालवायला हवा.त्यामुळे वाईट कृत्याची वासनाच नष्ट होऊन माणसाची पुण्यप्रदपथावर वाटचाल सुरु होते. या सर्व गोष्टींचा परिणाम स्वरुप म्हणजे चार पुरुषार्थापैकी चवथा म्हणजे अंतिम पुरुषार्थ माणसाच्या दृष्टी पथात येऊ लागतो. नकळत इश्वराची कृपा होते.
*** संत श्री वेणाबाई ***
*भावनारहित वेणी । उरलीसे भजनी ।*
*सहज समाधानी । आहे आठवेवीण॥४॥*
"अगं साजणी, काय सांगू तुला माझ्या श्रीसद्गुरुरायांची करणी ! त्यांनी माझ्या मनाचा (अंत:करणचतुष्टयाचा) असा वेध केला की ते ठायीच्या ठायीच पांगुळले आहे. त्याचे काहीच चालेनासे झाले आहे. जे मन पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये अशा दहा मार्गांनी सतत क्रियाशील असते, तो त्याचा दशलक्षणी घराचार, म्हणजे त्याचा संसारच आता उठला आहे. त्यामुळे मनाच्या माध्यमातून बहिर्मुख होणा-या माझ्या सर्व वृत्ती देखील आता खुंटलेल्या आहेत, त्या पूर्णपणे आत वळलेल्या आहेत. (वृत्तींची निवृत्ती झालेली आहे.)
माझ्या सतत स्फुरणा-या अहंभावाचा व त्यामुळे भासणा-या प्रपंचभानाचाही लोप झालेला आहे. आता ना मला कसली जगद्भ्रांती आहे ना कसले स्मरण शिल्लक आहे. मी काही पाहते आहे किंवा जाणते आहे, असेही भान आता उरलेले नाही. माझी सर्व इंद्रिये निर्व्यापार झालेली आहेत. केवळ स्पंदरहित, विकाररहित, विचाररहित अशी उरलेली शुद्ध जाणीव, ते आत्मज्ञानही आता त्या ब्रह्मानंदामध्ये पूर्णपणे लोप पावलेले आहे. 'अहं ब्रह्मास्मि'चे स्फुरणही त्या आनंदानुभूतीमध्ये लोपलेले आहे.
कोणत्याही स्थूल भावना, मायामय प्रपंचाचे भान आणि अंत:करण चतुष्टयाने जाणली जाणारी कसलीच भावना आता या वेणी मध्ये उरलेली नाही. स्वत:च्या वेगळेपणाने होणा-या आठवाशिवाय ही वेणी, सद्गुरुकृपेने आतूनच लाभलेल्या सहज समाधिस्थितीमध्ये, त्या अद्वैतानंदामध्ये आपोआप होणा-या गुरुभजनासाठी मात्र सदैव तत्पर होऊन राहिलेली आहे !"
किती अद्भुत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडची उत्तुंग योगानुभूती येथे वेणाबाई अगदी सहजतेने कथन करतात पाहा ! ह्यावरून आपल्या लक्षात येईल की समर्थकृपेने श्रीसंत वेणाबाई आत्मानुभूतीच्या केवढ्या मोठ्या सिंहासनावर जाऊन बसलेल्या होत्या. त्यांच्या परमगुरुभक्तियुक्त भावोत्कट विभूतिमत्त्वाला म्हणूनच साश्रुनयनांनी वारंवार साष्टांग दंडवतच घालावेत ; आणि तेच आपल्यासाठी परमभाग्य ठरावे !
तुम्हां-आम्हां साधकांसाठी सदैव मार्गदर्शक असणा-या श्रीसंत वेणाबाईंच्या दिव्यपावन चरित्रावर पूर्वी घडलेले अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे. आजच्या या पुण्यदिनी तो लेखही आवर्जून वाचावा व श्री समर्थांच्या या मानसकन्येच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक असंख्य दंडवत घालावेत हीच सर्वांना मन:पूर्वक प्रार्थना !
*वेणा पावली पूर्णविराम*
https://rohanupalekar.blogspot.com/2017/04/blog-post_72.html?m=1