Bali books and stories free download online pdf in Marathi

ब ळी

" ब ळी "


मच्छिंद्र माळी औरंगाबाद

आज चौदा-पंधरा वर्सं होत असतील.
जव्हा माय मला आजोळी बेलापूरला घेऊन आली, तव्हा मी आसन सात आठ
सालचा. बेलापुरातच मी मायच्या कष्टावरच वाढलो, खेळलो अन कर्संबर्सं चार बुकं शिकलो.
मागासवर्गीय म्हणुन बांधकाम खात्यात ढंपरचा डायव्हर झालो. सरकारी कामानिमित्त
गावोगांव फिरतीवर असायचो. कुठं रोडच्या कामाला तर कुठं धरणाच्या कामाला जावा
लागायचं. वडगावच्या धरणाच्या कामावरबी म्या ढंपार घेऊन गेलो होतो.
वडगाव तसं माझं मुळ जल्म गांव!
हे कोणालाबी ठावं नव्हतं. दिवसभर धरणावर ढंपर, टॅक्टरची घरघर, खडखड होत
होती. हजारो माणसं उन्हातान्हात मुंग्यासारखी राबत होती. माती उपसत होती. धरणाच्या
पाटाकीत होती. दिवसागणिक धरणाची भिंत आकार घेत होती.
ळी
वर आणून
धरणाच्या कामाला आज बाजारचा दिवस असल्याने सुटी होती.
समदी निरवा नीरव झाल्यावर म्या सहज गावात गेलो. डोळ्यापुढं वडगावचा ओस
पडल्याला भकास बुध्दवाडा दिसत होता. जुनाट मोडकळीला आल्याली काही घरं कसातरी
तोल सावरुन आज पडू का उद्या पडू, या ईचारात उभी होती. कांही घरं तर जमीनदोस्त
होऊन भुईर्सपाट झाली होती.
जुन्या आठवणीनं अंतःकरण मळभ भरल्या आभाळागत भरुन आलं.
मन भूतकाळात कधी सरपटत गेलं हे समजलंच नाही.
नकळत पंधरा वरसा अगुदरचा वडगाव मह्या नजरापुढं तरळू लागलं.
किती खेळीमेळीचं वातावरण होतं तवा गावात ? गावचं बारा बलूतं, सगळे खाऊन पिऊन सुखी समाधानी होते. गावकरीबी बुध्दाला कधी हीन समजत नव्हते. गावच्या
लोकांनीच पुढाकार घेऊन मोठ्या आपुलकीनं बाबासाहेबांचा पुतळा उभा केला होता.
कोणाच्याही अडल्या नडल्या कामाला परतेक जण जात पात इर्सरून धाऊन यायचा.
गावात कोणाच्याबी घरी लगन कार्य असलं तर आम्ही उघडे नागडे, ढेबरी,शेंबडी पोरं तर
पोट फाटेस्तोवर खायचो. वर आणखी घरीबी आणायचो. 'तुळशीचं लगन' कधी लागतं आण
लगनसराई कव्हा सुरू होती याची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. लगनसराई आम्हाला
जणू ती सुगीच वाटायची.
लगनसराईच्या नुसत्या आठवणीनं बी आमच्या जिभेवर गेल्या सालच्या बुंदी,
लाडूची चव रेंगाळायला लागायची. सणावाराच्या दिवशी मायच गावातून मागून आणायची.
मायनं मागून आणलेल्या अन्नावर म्या अन हौशी तुटून पडायचो. असाच एकदा पोळ्याच्या
सणाला मायनं मला पाटलाच्या वाड्यावरून मागून आणायला सांगतले. तव्हा 'म्या नाही
जात, मला लाज वाटतीया' म्या मान वाकडी करीत म्हणलो. तर मायनं मला लालाज 'लाज
लाज वाटतीया त वाण्या-बामनाच्या घरात का पैदा झाला नाही? असं म्हणत तरवडाच्या
फोकाटीनं मला चांगला हिरवा-पिवळा होईस्तोर झोडपलं. हौशीनं मातर मधल्या मधी मोठमोठ्यानं रडून उगाच दारी कलमा केला. त्या दिवशी कोणीच जेवलं न्हाई.
एक येळेस शेजारच्या गावात भंडारा होता. म्या अन हौशी गेलो तर मागणाराची
ही तोबा गदी. म्या तर गर्दी पाहुन हादरूनच गेलो. म्या बाजुला उभा राहायलो. हौशीनं
मातर चिकाटी सोडली न्हाई.फाटका इटका परकर सावरीत, केसांच्या झिंज्या मागं करीत
पाण्यात शिरावं तसं ती गर्दीत शिरली. घटक्याभरानं परकराच्या वटीत भलीमोठी बुंदी
घेउन आली. आम्ही एका झाडाखाली बसलो. पोटभर बुंदी खाल्ली. उरलेली िडक्यात
धडूत्यात बांधुन घराच्या वाटाला लागलो.
चालता चालता बुंदीचं गठूडं माह्या हातून कसं निसटलं काय माहीत? गठूडं खाली
पडलं अन गाठ सुटून सगळी बुंदी फुफाट्यात पांगली. हौशी मह्याशी खूप भांडली, म्हणून
म्या फुरंगटून बसलो. ती पुन्हा घरी जाण्यासाठी माह्या इनवण्या करू लागली. अंधार पडता
पडता आम्ही घरी आलो.
माय आमची वाटच पहात होती. आम्ही रिकाम्या हातानं आल्याचं पाहून हौशीवर
माय डाफरलीच. 'रंडके, काळं त्वांड घेउन रिकाम्या हातानं घरी आलीस तरी कशाला?
तिकडंच तुझं काळं-पांढरं का न्हाई केलं? असं म्हणत तिनं हौशीला काठीखाली काळीनिळी
होईस्तोर मारलं.
मला लइ वंगाळ वाटलं. म्या केलेल्या चुकीबद्दल हौशीनं एक शबुद बी न बोलता
मुकाट्यानं मायचे झोडपे खाल्ले. ती बाहेरच मुसमुसत बसली. माय घरात कामाला लागली.
मला लइ गलबलून आलं.
म्या तिच्या जवळ गेलो. तिला घरात नेण्यासाठी तिचा हात धरला तर काय,मला
चटकाच बसला. तीच्या अंगात सनसनून ताप भरला होता. म्या तीला घरात नेऊन
वाकळीवर झोपवली.
पाचवा दिवस उजाडला तरी तीचा ताप जराबी उतरला न्हाई. बा शहरातून
डागतर आणला,पण त्यानं पाहून सांगितलं,फार उशीर झाला,केस हाताबाहेर गेली'.
दुस-याच दिवशी हौशी समदे मायापाश तोडून देवाघरी निघून गेली. काल-यानं
तिचा बळी घेतला होता. मला मातर म्याच तिचा अपराधी असल्यासारखं वाटत होतं.
मायलाबी लई वाईट वाटत होतं. 'म्याच पोटकरपीनं पोरीचा जीव घेतला 'म्हणून ती
जीवाला सारखी खाई.
हौशी गेली आण मायच्या वागण्यात जमीन-अस्मानचा फरक पडला. तिनं जणू 'धरी
ना शस्त्र करी 'अशी प्रतिज्ञाच केली. दिवसभर पाटलाच्या शेतावर राबायची, र्सोंगणीच्या
कामाला जायची. बा बी रोजंदारीनं काम करायचा. म्याबी नेमानं शाळेत जायचो. एक
दिवस म्या असाच घराम्होरं पाटीवर लिहीत बसलो होतो. समुरच बाबासाहेबाचा पुतळा
दिसत होता. सुका साळव्याचा जग्या उगाचच चाळा म्हणून खडे-गोटे फेकीत होता. असाच
त्याने फेकलेल्या एका लहानशा दगडाने बाबाबासाहेबाचं नाक फुटलं. जग्याला वाटलं हे
कोणी पाह्यलच नाही. रातच्याला बा घरी आल्यावर बा ला हे सांगतलं.
शहरात नुकतीच 'नामांतर चळवळ 'पेटल्याली होती. खेड्यापाड्यातून
विखुरलेल्या दलितांचे लोंढे शहराकडे धाव घेत होते. मिळेल ती मदत लाटीत होते. दुसऱ्या
दिवशी सकाळीच शहरातून एक सूटबूटवाला,दाढी वाढवलेला पुढारी अन केरबाच्या

घराम्होरं समदी माणस जमली. बा मातर सकाळच्यालाच कामावर गेला होता. खलबतं
होऊ लागली, उलटसुलट चर्चा झाली. दलीतांच्या भावना दुखवल्या, गावक-यांपासुन
दलीतांच्या घरादाराला व जीवाला धोका असल्याचा अर्ज पोलीस ठाण्यावर देण्याचं
एकदिलानं ठरलं. अन त्याच दिवशी संध्याकाळी पोलीस चवकशीला गावात दाखल झाले.
बानं मातर 'खरी घटना कशी घडली' हे पोलीसाला सांगितलं. पुढार् याचा आशण
शहराकडे जायला आसुसलेल्या पाखंडी लोकांचा डाव सपशेल आपटला. गावक-यांना बा इषयी खुपच आपुलकी वाटू लागली. 'भिवा चव्हानानं सत्य उजेडात आणलं म्हणून
गावावरचं इघीन टळलं बाबा!' असं पुटपुटत सुटकेचा सुस्कारा टाकला. त्या दिवसापासुन
मातर दलीताबद्दल गावक-यांच्या मनात अढी पडली. तेढ निर्माण झाली. घृणा वाटू लागली.
पण बा ला मातर कोणी दूर लोटलं नाही, कोणी अंतर दिलं नाही.
दत्तु पाटलाच्या पोरीचं, सिंधूचं लगन तोंडावर आलं होतं. म्हणून त्यांनी बा ला
सकाळीच सरपण फोडायसाठी बोलावलं होतं. बा चं जेवणबी वाड्यावरच झालं. दिवसभर
लाकडं फोडून दमलेला बा दिवस बुडायच्या वकुताला घरी आला. बा घरात बसत नाही तोच
पोलीसांनी घराला गराडा घातला. गांजाचा धंदा करतो म्हणून दोन-तीन पोलीस घरात
घुसले व झडती घेतली. धुडक्यात बांधलेल्या गांजाचा पोलीसांनी पंचनामा केला.
एवढ्यात माय कामावरून परतली. समुर हे वाढल्यालं वाढाण पाहून तर ती मटकन
खालीच बसली. बानं गांजा बांधल्यालं धडूत दादू अभंगच्या कमळीच्या जुन्या परकराचं होतं
हे मनातल्या मनात वळखीलं होतं. आपल्याच माणसांनीच आपला घात के ला होता.
घराच्या उघड्या धुराड्यावाटं गठूडं टाकुन आपल्यावर हे बालंट आणलं होतं. पण बा काहीच
बोलला नाही. बा ला बेड्या घालुन पोलीस घेउन गेले. दुसऱ्या दिवशी पाटलानं मोठ्या
मिनतवारीनं बा ची जामिनावर सुटका केली. काम असल्याचा बहाणा करून बा सोबत न
येता तिकडंच थांबला. पाटील एकटेच आले. वाट पहातच आम्ही झोपी गेलो.
रात्री बा घरी आलाच नाही. दुसऱ्या दिवशी वडगाव-बोरगाव रस्त्यावरच्या मोठ्या
वडाच्या झाडावर बा चं लोंबकळणारं प्रेत गावक-यांना दिसलं. बा नं स्वतःच्या पागुट्यानं
वडाच्या झाडावर फांशी घेऊन जीव दिला होता. माणसाच्या दुष्ट भावनांनी बाचा 'बळी '
घेतला होता. सत्त्यासाठीच बा बळी पडला होता. गावकरी खूप हळहळले. सारे जण म्हणू लागले,'आज बाबांचा एका र्सच्या अनुयायाचा अंत झाला. बाबाच्या चरणी नेमानं
बुध्दवंदना म्हणणा-या उपासकाचा सत्त्यासाठीच बळी गेला !
गावक-यांनी मोठ्या श्रध्देने बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळच ' बा ' चा बसवलेला
एक लहान पुतळा जणू काही ' सत्य हेच श्रेष्ठ आहे, माणसामाणसात तेढ निर्माण करणारं,
दुरावा निर्माण करणारं तत्त्वज्ञान बाबांनी कधीच सांगतलं नाही. माणूस नुसता
परिस्थितीनं सुधारून उपेगाचा नाही, तो मनानं सुदीक सुदारला पाह्यजे, तरच खर् या अर्थानं
बाबांच्या शिकवणुकीचं चीज झाल्यासारखं होईल,सार्थक होईल. ' असं सांगत निश्चल उभा
आहे. पुतळ्यापुढं म्या किती येळ हात जोडून भान हरवून उभा होतो हे मला समजलंच
नाही. अंतःकरण ढवाळून निघालं. मन गहिंवरून आलं. नकळत आसवां फुलं गालावरून
घरंगळून बा च्या चरणावर पडत होती. सायबाच्या हाके नं म्या भानावर आलो अन जड
पावलानं कँपावर परतलो......
*** *** ***