Sakshidaar - 19 - last part in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | साक्षीदार - 19 (शेवटचे प्रकरण)

साक्षीदार - 19 (शेवटचे प्रकरण)
साक्षीदार
प्रकरण १९ ( शेवटचे प्रकरण)

ते चौघे अरोरा च्या बंगल्यात जमले होते.
“ पटवर्धन, काहीही गडबड करायची नाही हां, तुझ्या वर भरोसा ठेऊन मे आलोय इथे.स्वत:चा स्वार्थ साधायचा नाही.” हर्डीकर ने पाणिनी ला तंबी भरली.
“ तुझे डोळे उघडे ठेव.तुला जर वाटलं की मी कोणत्यातरी रहस्याची उकल करतोय, तर तो धागा पकडून बेलाशक पुढे हो आणि त्याचे संपूर्ण श्रेय तू घे. या उलट ज्या क्षणी तुला संशय येईल की मी तुला डबल क्रॉस करतोय, त्या क्षणी तू बाहेर निघू जा आणि जे वाटेल ते कर. ठीक आहे?” पाणिनी म्हणाला
“हे ठीक वाटतंय, पटवर्धन.” हर्डीकर म्हणाला.
“ आपण सुरुवात करण्यापूर्वी महत्वाचं लक्षात घे, हर्डीकर, मी आधी ईशा अरोरा ला या बंगल्याच्या उतारावर असलेल्या रस्त्यावरच्या केमिस्ट च्या दुकानात भेटलो.नंतर आम्ही एकत्रच वर या बंगल्यात आलो. तिच्या कडे बंगल्याची किल्ली नव्हती, तिची पर्स सुध्दा तिच्याकडे नव्हती.बंगल्यातून बाहेर पडताना तिने दार बंद केलं नव्हतं, फक्त ओढून घेतलं होतं, म्हणजे परत आल्यावर लगेच आत जाता याव म्हणून, असं मला तिने सांगितलं त्या वेळी.आम्ही दोघं एकत्र परत आलो तेव्हा दार बंद झालं होतं.” पाणिनी म्हणाला
“ ती असली खोटारडी आहे ना, की ती जर म्हणाली असेल की दार उघडं होतं, तर मग ते नक्कीच बंद असणार.” प्रेरक पांडे म्हणाला.
“ तरी सुध्दा लक्षात घे की ती पावसात भिजत घाईत बाहेर पडलेली दिसतं होती, आणि परत यायचा तिचा इरादा नक्कीच असणारच.” पाणिनी म्हणाला
“ बरं पुढे काय झालं?. –हर्डीकर ”
“ आम्ही जेव्हा आत गेलो, तेव्हा स्टँडवर छत्री दिसली.ती ओली होती आणि त्याच्यातून निघालेला पाण्याचा ओघळ खाली फरशीवर दिसत होता.” पाणिनी म्हणाला “ तू जेव्हा पहिल्यांदा तिथे आलास तेव्हा तुझ्या लक्षात आलं असेल ना?” पाणिनी म्हणाला.
“ आता मला आठवतंय, मी पहिल्याचं. त्याचं काय पण?”-हर्डीकर
“ काही नाही.” पाणिनी म्हणाला “ अत्ता तरी ”
त्याने दारावरची बेल वाजवली. आतून नोकराने दार उघडलं.
“ कुणाल गरवारे आहे आत?” पाणिनी म्हणाला.
“ नाही सर, कामासाठी बाहेर गेलेत सर, एक भेट ठरल्ये कुणाशी तरी.” नोकर म्हणाला.
“ इथली कामवाली बाई मंगल वायकर आहे आत?” पाणिनी म्हणाला.
“ अर्थातच सर, ती इथेच असते.”
“ आणि तिची मुलगी, सुषुप्ती?” पाणिनी म्हणाला.
“ आहे, ती पण ” नोकर म्हणाला.
“ हे बघ हे पोलीस आहेत, माझ्या सोबत, आम्ही आता अरोरा च्या वरच्या खोलीत जातोय. तू कुणालाही हे सांगायची गरज नाही.समजलं?” पाणिनी म्हणाला
“ हो सर.”
हर्डीकर ने आत आल्या आल्या स्टँडवर ठेवलेल्या छत्रीकडे नजर टाकली.त्याचे डोळे आता फार तीक्ष्ण पणे भिरभिरत होते. प्रेरक ऐकू ही येणार नाही अशा आवाजात शीळ घालत विचारात गढला होता. सर्व जण वर आल्यावर पाणिनी ने अत्यंत बारकाईने तपासणी करायला सुरुवात केली. सर्वात प्रथम त्याने भिंती तपासायला घेतल्या.
“ माझ्या बरोबर तुम्ही ही जरा तपासायला घ्या.” पाणिनी म्हणाला
“ काय बघायचयं एवढं ? ” हर्डीकर
“ बुलेट होल.” पाणिनी म्हणाला “ बंदुकीतून सुटलेल्या गोळीने पडलेले भोक.”
“ त्यात वेळ घालवायची गरज नाही पटवर्धन ” हर्डीकर म्हणाला, “ आम्ही पहिल्या वेळी आलो तेव्हाच खूप तपशीलात पाहिलंय मी. आमच्या नजरेतून ते भोक सुटूच शकलं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भिंतीवरचं प्लास्टर निघालं असतं ना ! ते ही आढळलं नाही आम्हाला.”
“ मला ही पहिल्या वेळी सापडलं नव्हतं, म्हणूनच मला परत एकदा नजर मारायच्ये. काय घडलं आहे ते मला माहित्ये पण पुरावा नाहीये माझ्याकडे अत्ता तरी. तोच मिळतोय का पाहतोय.” पाणिनी म्हणाला
हर्डीकर ने जरा विचार केला, मग आपली हनुवटी चोळत म्हणाला, “ पाणिनी, तू त्या ईशा ला यातून वाचवायचा प्रयत्न करतोयस?”
“ मी वस्तुस्थिती काय घडली असावी ते शोधून काढतोय.” पाणिनी म्हणाला
“ हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.” हर्डीकर म्हणाला.
“ तर मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे.” पाणिनी म्हणाला
“ तर मग आपल्यात ठरलेल्या सौद्या नुसार मी बाहेर निघून जातो. मला तुझ्या सोबत एकत्र नाही करायचं काम.”
“ मी तुला या रहस्याची उकल करायची आणि त्याचं श्रेय उल मिळण्याची संधी देतोय.मला हवा तो पुरावा मिळाला की सगळीकडे तुझे फोटो छपून येतील हर्डीकर ! ” पाणिनी म्हणाला
“ नको, मला तुझा अनुभव आहे पाणिनी, श्रेय देण्याच्या नावाखाली अनेक तू फसवलं आहेस.”
“ मी मित्रांना कधीच धोक्यात नाही टाकत. प्रेरक पांडे इथे माझा मित्र म्हणून आलाय, मला फसवायचं असतं तर मी त्याच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी आणलं असतं. ” पाणिनी म्हणाला
“ मी थोडा वेळ इथे थांबावं असं म्हणतोय.” पांडे म्हणाला.
“ ठीक आहे पटवर्धन, मी पण थांबतो जरा वेळ,पण तू काय करतोयस हे मला कळायला हवं.” –हर्डीकर
पाणिनी पटवर्धन चे हर्डीकर च्या बोलण्याकडे लक्ष नव्हते.ज्या ठिकाणी दधिची अरोरा चे प्रेत पडले होते, त्या ठिकाणी पोलिसांनी खडूने आराखडा काढला होता.
अचानक पाणिनी मोठ्याने हसला. “ ओहो! वेडाच आहे मी !” तो उद्गारला.
“ काय झालं एकदम हसायला पाणिनी ?”
“ आता तुला काहीतरी दाखवायची वेळ आल्ये बरोब्बर, हर्डीकर ” पाणिनी म्हणाला “ तू जरा खालून त्या मंगल वायकर बाईला आणि तिच्या मुलीला वर बोलावून घेशील?”
हर्डीकर ला संशय आला. “ काय करणार आहे तू त्यांच्या बरोबर?”
“ त्यांना काहीविचारणार आहे, बाकी काही नाही.” पाणिनी म्हणाला
“ मी नाही देणार तुला परवानगी. उद्या तू म्हणायला मोकळा होशील, की हर्डीकर समोरच सगळ झालं म्हणून !”—हर्डीकर
“ अरे तुला धक्का द्यायचा असता तर मी इथे तुला बोलावून घेतलं नसतं थेट कोर्टातच त्या दोघींना साक्षीदार म्हणून बोलावलं असतं.” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे, पटलं. प्रेरक, तू त्या दोघींना वर मी बोलावलंय म्हणून सांग आणि घेऊनच ये.”—हर्डीकर
कनक ओजस ने उत्सुकतेने पाणिनी च्या तोंडाकडे बघितलं. पाणिनी च्या चेहेऱ्यावर कोणत्याही भावना दिसल्या नाहीत. एवढेच नाही तर प्रेरक पांडे मंगल वायकर बाई ला बोलवायला गेल्या पासून त्या वर येताना त्यांच्या पावलांचा आवाज येई पर्यंत पाणिनी ने एक शब्द ही उच्चारला नव्हता.
थोड्याच वेळात दार उघडलं गेलं आणि मंगल वायकर आणि सुषुप्ती ला घेऊन प्रेरक पांडे आत आला. मंगल वायकर ,नेहेमी प्रमाणे उदास,खिन्न होती, लांब टांगा टाकत आत आल्या आल्याच तिने खोलीतल्या सगळ्यांकडे नजर टाकली.सुषुप्ती ने घट्ट आणि उत्तान पणा कडे झुकणारे कपडे घातले होते.तिला तिच्या देखणे पणाची आणि सौष्ठावाची जाणीव होती.आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधलं जातं याची तिला जाणीव होती. आत आल्यावर सगळ्यांकडे पाहून तिने मंदसे स्मित केलं. त्यात एक उदास छटा होती.
“ तुम्हा दोघींना काही विचारायचं आहे.” पाणिनी म्हणाला
“ पुन्हा?” तिने विचारलं.
तिच्या प्रश्नाला बगल देऊन पाणिनी ने मंगल वायकर ला विचारलं, “ सुषुप्ती आणि कुणाल गरवारे च्या साखरपुड्या बद्दल तुला काय माहिती आहे?”
“ त्यांचा साखरपुडा झालाय, माहित्ये मला.” मंगल वायकर बाई म्हणाली.
“ त्यांच्यात प्रेम प्रकरण चालायचं याची तुला कल्पना होती?”
“ जेव्हा लग्न ठरतं तेव्हा सर्व साधारण पणे असं काहीतरी असतंच ”—मंगल वायकर
“ ते नाही म्हणायचं मला.” पाणिनी म्हणाला “ सुषुप्ती इथे अरोरा च्या घरी तुझ्या बरोबर रहायला यायच्या आधीपासून त्यांच्यात प्रेम प्रकरण चालू असल्याचं तुला माहीत होत का?”
मंगल वायकर ची नजर पाणिनी वरून सुषुप्ती कडे वळली. त्या दोघींची नजरा नजर झाली आणि पुन्हा पाणिनी कडे बघत ती म्हणाली, “ नाही, नंतर त्यांची ओळख झाली.”
“ तुझ्या मुलीच आधी लग्न झाल्याचं तुला माहीत होतं?” पाणिनी म्हणाला
मंगल वायकर च्या डोळ्यात आणि चेहेऱ्यावर काहीही बदल झाला नाही.मक्ख पणे ती म्हणाली, “ तिचं लग्न झालेलं नाहीये.”
पाणिनी ने आपली नजर पटकन सुषुप्ती कडे वळवून अचानक तिला विचारलं,
“ तुझं म्हणणं कायआहे? ? तुझं झालंय की नाही लग्न?” पाणिनी म्हणाला.
“ माझं नाही झालंय. पण करायचं आहे मला.पण याचा अरोरा च्या खुनाशी काही संबंध असेल असं मला वाटतं नाही. तुम्हाला खुना संदर्भात प्रश्न विचारायचे असतील तर त्यांची उत्तरं देणं मी समजू शकते, पण आमच्या खाजगी गोष्टीत नाक खुपसणे बरोबर नाही.” –सुषुप्ती.
“ पण आधी तुझं एक लग्न झालेलं असतांना तू कुणाल गरवारे शी कसं काय लग्न करू शकतेस?” पाणिनी म्हणाला
“ माझं लग्न झालेलं नाही.” –सुषुप्ती. “ मगाशीच सांगितलंय मी.”
“ श्याम लोटलीकर तसं म्हणत नाही.” पाणिनी म्हणाला
त्या मुलीच्या चेहेऱ्यावर थोडा सुध्दा बदल जाणवला नाही पाणिनी ला. एवढेच काय, डोळ्याच्या पापण्या सुध्दा फडकवल्या नाहीत तिने.
“ मी लोटलीकर हे नाव सुध्दा कधी ऐकलं नाहीये. ” ती म्हणाली.
“ मंगल वायकर, तू ? ” पाणिनी म्हणाला.
“ नाही बुवा, सुषुप्ती, कोण गं हा ?” –मंगल वायकर
“ मी तुम्हा दोघींना जरा आठवण करून देतो. तो बिल्वदल अपार्टमेंट नंबर ३१२ मधे राहतो.” पाणिनी म्हणाला
सुषुप्ती ने आपली मान ठाम पणे हलवून नकार दिला. “ काहीतरी चूक होत्ये तुमची पटवर्धन.”
पाणिनी ने आपल्या खिशातून समन्स आणि तक्रार अर्जाची प्रत बाहेर काढली.
“ तर मग हा तक्रार अर्ज तुझ्या सहीने कसा काय आला? आणि त्यावर हा समन्स कसा पाठवला गेला लोटलीकर ला?” पाणिनी म्हणाला.
दचकून सुषुप्ती ने आपल्या आईकडे बघितलं. मंगल वायकर चा चेहेरा पूर्ण पणे निर्विकार होता.पण तिची मुलगी, सुषुप्ती, दचकली तिच्या तोंडून भरभर शब्द बाहेर पडले. “ सॉरी, पटवर्धन, मला खोटं बोलावं लागलं, पण आता तुम्ही सगळचं शोधून काढलाच आहे, तर सांगते, मला कुणाल ला काहीच कळून द्यायचं नव्हतं,माझं लग्न झालं होतं आणि मला नवऱ्याकडून प्रोब्लेमच निर्माण झाला होता.मी इथे आले आणि कुणाल ची आणि माझी इथेच ओळख झाली.मी पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडले.आमचा साखरपुडा झाला पण तो उघड करायचे धैर्य आमच्यात नव्हतं कारण अरोरा ला हे पचनी पडणं शक्यच नव्हतं.पण अरोरा गेला आणि आम्हाला हे गुपित ठेवायची गरज नव्हती. माझ्या नवऱ्याला दुसरी बायको असल्याचं माझ्या लक्षात आलं.ते एक कारण होतं आम्ही वेगळं होण्याचं ठरवलं याचं.आम्ही आमच्या वकिलाशी चर्चा केली , तो म्हणाला हे लग्न कायदेशीर नाही.आपण ते रद्द करून घेऊ.आम्ही ते गुप्तता पळून करायचं ठरवलं होतं.आम्हाला वाटलंच नाही की कोणी माझा आणि गरवारे चा संबंध लावेल म्हणून ” सुषुप्ती म्हणाली.
“ गरवारे म्हणणे तसं नाहीये.” पाणिनी म्हणाला
“ बरोबरच आहे.त्याला यातलं काहीच माहिती नाहीये.”-सुषुप्ती
पाणिनी ने मान हलवली. “ माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नाहीये, तुला वाटतो तसा. मला सांगायचयं की गरवारे ने कबुली दिल्ये.आम्हाला एवढंच तपासायचं होतं की तू अजाणते पणाने परिस्थितीची शिकार बनली आहेस की जाणून बुजून पुरावा लपवला आहेस. ” पाणिनी म्हणाला
“ पटवर्धन, या क्षणीच मी तुला हे सर्व थांबवायची आज्ञा देतो.” हर्डीकर म्हणाला.
“ अजून फक्त एक मिनिट संयम धर.” पाणिनी म्हणाला
सुषुप्ती ने अस्वस्थपणे प्रत्येकाकडे पाहिले.तिची आई कुत्ता जाने चामडा जाने असा भाव चेहेऱ्यावर आणून बसली होती.
“ काय झालं माहित्ये का, ईशा आणि तिच्या नवऱ्या मधे वाद झाले. अगदी विकोपाचे वाद विवाद.तिने त्याच्या दिशेने गोळी झाडली. पुढे काय घडलं ते न बघताच ती घाबरून बाहेर पळत सुटली.पावसात, रेनकोटा ऐवजी हाताला आलं ते जर्किन तिने घातलं. तो पर्यंत मंगल वायकर , तू गोळीचा आवाज ऐकून काय झालं ते बघायला उठून निघालीस.तुला दिसलं की तेवढ्यात कुणाल गरवारे बाहेरून घरात आला होता.बाहेर पाऊस पडत असल्यामुळे त्याने सोबत आणलेली भिजलेली छत्री स्टँडवर ठेवली आणि तो वरच्या मजल्यावर गेला.तू ऐकलंस की अरोरा कुणाल गरवारे ला सांगत होता की ईशा ने त्याच्यावर गोळी झाडली. ही बाई व्यभिचार करणारी आहे हे सिध्द होईल असा पुरावा त्याच्या कडे आहे.तिचा यार कोण आहे त्याचं नाव ही अरोरा ने कुणाल ला सांगितल्याचं तू ऐकलसं.अरोरा ने कुणाल गरवारे ला हे ही विचारलं की पुढे काय करावं. कुणाल ला फार आश्चर्य वाटलं ईशा ने गोळी झाडल्याचं आणि हे ही कळून चुकलं की तिचा नेम चुकल्याचं ! त्याने अरोरा ला सांगितलं की तिने गोळी झाडताना अरोरा कुठे उभा होता ते त्याने पुन्हा दाखवावं. अरोरा जेव्हा त्याला दाखवण्या साठी पुन्हा तिथेच बाथरूम जवळ उभा राहिला, तेव्हा कुणाल गरवारे ने थेट त्याच्या छातीत गोळी झाडली.पिस्तूल तिथेच टाकून तो खाली उतरला आणि आपल्या गाडीतून लांबवर पळाला. बार मधे जाऊन भरपूर प्याला.आपल्या गाडीच्या तयार मधली हवा काढली.आणि उशिरा घरी आला.पोलीस घरी आल्याची खात्री केल्यावरच आला.त्याने असं भासवलं की घरातून सकाळी बाहेर पडल्यानंतर तो अत्ता पहिल्यांदाच येतोय घरी. पण छत्री चा मुद्दा त्याच्या लक्षात राहिला नाही.म्हणजे अरोरा ला मारायच्या वेळी तो घरात आला तेव्हा येताना त्याने ओली छत्री स्टँडवर ठेवली होती हे तो विसरला. तो हे ही विसरला की तो आत आला तेव्हा दरवाजा उघडाच होता ”. पाणिनी म्हणाला
“ कारण काय पण खून करायचं?”
“ अरोरा मेला असता तर मृत्युपत्रा नुसार कुणाल त्याच्या संपत्तीचा मालक ठरणार होता. दुसरं म्हणजे, ईशा ला वाटत जे होतं की तिच्याच गोळीने अरोरा चा बळी घेतलाय हे कुणाल ला माहीत झालं होतं. हृषिकेश शी ईशा चा संबंध जोडणारा पुरावा ईशा च्या ज्या पर्स मधे होता ती पर्स अरोरा च्या टेबल वरच होती. ईशा ची बंदूक तिथेच पडली होती आणि तीच वापरून त्याने अरोरा ला मारलं होतं त्यामुळे ईशा वरच खुनाचा आरोप येणार हे त्याने जाणलं होतं. ” पाणिनी म्हणाला
सुषुप्ती काही तरी बोलायला गेली पण पाणिनी ने आपले म्हणणे पुढे चालूच ठेवलं.
“ सुषुप्ती, तुम्ही दोघीने जे काही पाहिलं त्यावर चर्चा केली आणि ठरवलंत की कुणाल ला खुनात अडकवण्याची ही चांगली संधी आहे.पण त्याला अडकवण्यापेक्षा त्याला ब्लॅक मेल करण्यात तुमचा फायदा आहे हे तुम्ही जाणलत.आणि एक डील म्हणून कुणाल ने सुषुप्ती शी लग्न करायचा घाट घातलात. ” पाणिनी म्हणाला
हर्डीकर चं डोकं सुन्न बधीर झालं.त्याने जोरजोराने आपला हात डोक्यावर मारून घेतला.सुषुप्ती ने हताश होऊन आपल्या आई कडे पाहिलं.
“ अत्ताच खरं बोलायची ही शेवटची संधी आहे तुम्हा दोघींना.खरं म्हणजे तुम्ही दोघी ही खुनाला मदत केल्याच्या आरोपावरून आणि खून झालाय हे माहिती असूनही पोलिसांना न कळवल्याच्या आरोपा वरून आत जाऊ शकता.कुणाल ने आमच्या कडे कबुली जबाब दिलेलाच आहे.तुमच्या साक्षीची आम्हाला गरज नाहीये पण जर तुम्ही दोघींनी हे कबूल केलंत तर तुम्हाला कमी शिक्षा होईल. काय ते ठरवा. ” पाणिनी म्हणाला
“ सुषुप्ती, मी तुला एकच प्रश्न विचारणार आहे. पाणिनी पटवर्धन म्हणतोय ते खरं आहे? तसाच विचार केला तुम्ही? उत्तर दे, आणि फक्त हो किंवा नाही या भाषेत दे. ” हर्डीकर म्हणाला.
“ हो.” अस्फुट पणे सुषुप्ती, आपल्या आईकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाली.
इतका वेळ बधीर पणाचा आव आणणाऱ्या मंगल वायकर बाईचा संयम सुटला.
“ मूर्ख मुली गप्प बस, काळात नाही का तुला? हा सापळा आहे आपल्यासाठी. धादांत खोटं आहे हे.” मंगल वायकर किंचाळली.
“ मंगल वायकर, मलाही वाटत होतं की पटवर्धन केवळ अंदाजाने हे कुभांड रचत असावा पण आता तू ज्या पद्धतीने किंचालालीस त्यावरून मला खात्रीच पटली की अगदी असंच घडलंय. आता बऱ्या बोलाने काय ते सांगून टाक. ” हर्डीकर म्हणाला.
मंगल वायकर चे ओठ थरथरले. “ या मूर्ख मुलीला मी यात गोवायलाच नको होतं.खर म्हणजे कुणाल ने माझ्याशी लग्न करावं असा माझा डाव होता.पण शेवटी माझ्या पेक्षा सुषुप्ती चं आयुष्य मला महत्वाचं वाटलं आणि कुणाल ने तिच्याशी लग्न करावं असं मी ठरवलं.” मंगल वायकर म्हणाली.
“ अरे पटवर्धन, जर ईशा च्या गोळीने अरोरा मेला नाही असं तुझं म्हणणं आहे तर तिने मारलेली गोळी गेली कुठे? ” हर्डीकर ने विचारलं
“ मी हाच विचार करत होतो सतत आणि मला त्याचं उत्तर मिळालं हर्डीकर.” पाणिनी म्हणाला
“ काय ते?”
“ लक्षात येतंय का हर्डीकर ?” पाणिनी म्हणाला. “ कुणाल ने जेव्हा अरोरा ला सांगितलं की ईशा ने गोळी मारली तेव्हा तू नेमका कुठे उभा होतास ते मला दाखव आणि त्या स्थितीत जेव्हा अरोरा ने त्याला उभा राहून दाखवलं आणि कुणाल ने हातात बंदूक धरली त्याच वेळी कुणाल च्या लक्षात आलं असावं की ईशा ने मारलेली गोळी अरोरा ला न लागता कुठे गेली असावी ते. ”
“ कुठे गेली असावी?” हर्डीकर ने विचारलं
“ ज्या बाथरूम मधे अरोरा टब बाथ घेत होता, तो त्याच्या आडदांड देह यष्टीला साजेसा मोठा होता. उंचीलाही चार फूट होता. ईशा ने मारलेली गोळी त्याला न लागता मागे गेली आणि टबातल्या पाण्यात शिरली.आणि हे कुणाल ने अरोरा वर नेम धरला तेव्हाच त्याच्या लक्षात आलं. चुकलेली गोळी जर भिंतीत किंवा छतात गेली असती तर कुठेतरी गोळीने पडलेलं भोक दिसायला हवं होत.आणि ते दिसलं असतं तर ईशा वर आळ आला नसता, ती वाचली असती. हे सर्व कुणाल च्या लक्षात आलं आणि त्याने अरोरा च्या छातीत गोळी झाडली आणि टब तपासला तेव्हा त्याला त्याच्या अंदाज नुसार गोळी सापडली. त्याने ती उचलून खिशात टाकली आणि पोबारा केला. आणि खुनाच्या वेळेला अॅलिबी निर्माण करण्यासाठी आपण बाहेर असल्याचे नाटकं केलं,टायर पंक्चर झाल्याची थाप मारली.” पाणिनी म्हणाला.
“ आता या क्षणी कुणाल कुठे आहे?”
आपल्या खिशातून तीन बेड्या बाहेर काढत, आणि त्यातल्या दोन बेड्या सुषुप्ती आणि मंगल च्या हातात अडकवत हर्डीकर ने विचारलं.
( प्रकरण १९ आणि संपूर्ण कादंबरी समाप्त)

Rate & Review

sharwari kakade

sharwari kakade 3 months ago

Best story

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 5 months ago

Vimal Chavan

Vimal Chavan 7 months ago

Swati Irpate

Swati Irpate 9 months ago

K Shashikant

K Shashikant 9 months ago