Asaahi ek Trikon - 1 books and stories free download online pdf in Marathi

असाही एक त्रिकोण - भाग 1

असाही एक त्रिकोण  भाग  १

 

दारावरची बेल वाजली आणि छोटा विनय बाबा आलेss  अस म्हणून दार उघडायला धावला. संध्याकाळची वेळ होती म्हणून त्यांची आई त्यांच्या मागे धावली पण तो पर्यन्त त्यांनी दार उघडलं होतं. दारात एक सुटा बुटातला अनोळखी माणूस उभा होता. विनय गोंधळला. त्याच्या आईने म्हणजे  वसुधाने कोण आलंय ते ओळखलं आणि मागेच थबकली आणि दारा आडून बघू लागली.

“काय रे हरीचा मुलगा का तू. ? काय नाव तुझं. ?” – गृहस्थ

“विनय हरीहर रायरीकर.” छोटा विनय उत्तरला.   

“छान नाव आहे रे. बरं तुझा बाबा आहे का ?” – गृहस्थ.

“नाही ते अजून ऑफिस मधून यायचे आहेत.” – विनय  

“मग कोण आहे घरी ?” – गृहस्थ.

“तुम्हांला का सांगू ?” – विनय.

“तुझी आई आहे का ?” – गृहस्थ.

“आहे.” – विनय.  

“बोलाव” – गृहस्थ.  

आत मधून वसुधा हा संवाद ऐकत होती. तिने येणाऱ्या माणसाला ओळखलं होतं आणि ती स्वयंपाकघरात गेली आणि रेवतीला म्हणाली की “कोणी तरी आलंय, तूच जा समोर.”

“का ग ?” – रेवती.

“तू जा, म्हणजे तुला कळेल.” – वसुधा.

विनयच्या आई ,आई अशा हाका चालूच होत्या.

रेवती समोरच्या खोलीत आली, आणि तिला धक्काच बसला. तिला लगेचच कळलं की वासुधाने तिलाच का जायला सांगितलं ते. प्रथम तिने विनयला आत पिटाळलं.

“अरे विश्वास भाऊजी तुम्ही ! असे अचानक आलात ? अहो पत्र तरी पाठवायचं.” – रेवती.  

“चार पत्रं पाठवली पण एकाचंही उत्तर नाही. तुम्हाला ती पत्र मिळाली नसणार कारण तुम्ही गावच बदललं. शेवटी गावी गेलो तेंव्हा कळलं की तुम्ही इथे आहात म्हणून. मग इथे आलो.” – विश्वास.

“इतक्या वर्षांनंतर अचानक यायचा कसा विचार केलात ? आमची कशी काय आठवण झाली ? तुम्ही तर सर्व संबंध तोडून गेला होतात.” रेवतीचा सुर जरा नाराजीचाच होता.

विश्वास काही बोलणार तितक्यात हरिहर आला. विश्वासला पाहून त्याला आश्चर्यच वाटलं. कपाळावर आठ्या घालत त्यांनी विचारलं की “अचानक इथे कसा काय ? तू तर आफ्रिकेला असतोस न ? आणि सामान दिसत नाहीये यांचा अर्थ वापस भारतात आला आहेस आणि घर केलं आहेस अस समजायचं का ?  की दुसरीकडे उतरला आहेस ?”

“नाही मी आफ्रिकेतच असतो. ती मोठी कहाणी आहे. सर्व सांगतो पण आधी काही चहा पाणी देशील की नाही ?” – विश्वास.

रेवती हरीहर कडेच बघत होती, त्यानी मान डोलावल्यावर ती आत गेली.

चहा पिता पिता विश्वास बरंच काही सांगत होता. आफ्रिकेत त्यांनी अतिशय कष्टाने कसं बस्तान बसवलं व्यापारात आणि आता कशी चांगली सुस्थिती आली आहे वगैरे वगैरे. हरिहर आणि रेवती ऐकत होते पण त्यांना अजूनही काही थांग लागत नव्हता की हा अचानक भारतात का आला ते. विश्वास थांबल्यावर हरीहर म्हणाला की

“एवढं सगळं सांगितलं पण इथे येण्याचं प्रयोजन काय ते नाही सांगितलस.”- हरीहर.

“अरे मी इथे इतक्या वर्षांनंतर आलोय त्याचा आनंद झालेला दिसत नाहीये तुला.” – विश्वास.

“नाही. खरं सांगायचं तर नाही. तू तर आमच्याशी सर्व संबंध तोडूनच गेला होतास ना ? तेंव्हा आता मुद्दया चं बोल. Come to the point.” – हरीहर .

“मी माझ्या बायकोला, यशोदेला न्यायला आलो आहे. ती कुठे आहे ?” – विश्वास.

आत मध्ये काही आवाज झाल्यासारखा वाटला म्हणून रेवती आत आली. स्वयंपाकघरात वसुधा छोट्या विनय ला पोटाशी घेऊन बसली होती. रेवतीला तिच्याकडे बघून भडभडून आलं आणि रेवतीला तो भयंकर दिवस आठवला.  

***

त्या दिवशी संध्याकाळी बराच उशीर झाला तरी विश्वास घरी परतला नव्हता. रात्रीचे दहा वाजले होते आणि आता हरिहारला सुद्धा काळजी वाटायला लागली. १९५३-५४ सालचा काळ होता आणि कोणाकडेही फोन नावाची वस्तु नव्हती. हरीहर सायकलने विश्वासच्या मित्रांकडे चौकशी करायला निघाला. दीड एक तासाने वापस आला तेंव्हा त्याला वाटलं होतं की विश्वास घरी आला असेल म्हणून. पण तसं काही झालं नव्हतं. रात्रभर वाट पाहून सकाळी हरिहर पोलिसांना कळवायला गेला. त्यांनी complaint नोंदवून घेतली आणि सांगितलं की आम्ही शोध घेतो. यशोदा रात्रभर रडत होती तिला समजावता समजावता रेवती आणि हरीहर ची पुरेवाट होत होती.  आठवडाभर रोज हरीहर पोलिस स्टेशन मध्ये चकरा मारत होता. नंतर आठवड्यातून एकदा आणि मग थांबला. दोन एक महिन्या नंतर सर्वांनाच कळलं की आता विश्वास येणार नाही. कुठेही आसपास अपघात किंवा मृत्यूची बातमी नव्हती तेंव्हा स्पष्ट झालं की विश्वास पळून गेला. पण का ? याचं उत्तर मिळत नव्हतं. हे उत्तर सहा महिन्यांनी मिळालं.

विश्वासचं पत्र आलं. पत्रावर युगांडा चा शिक्का होता. पत्रात लिहिलं होतं की तो आता आफ्रिकेत युगांडा या देशात आहे. आणि तिथेच राहून नशीब आजमावणार आहे. यापुढे घरात कोणाशीही संबंध ठेवण्याची इच्छा नाही. त्यामुळे इत:पर माझा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये. यशोदेला  मी टाकली आहे. यशोदे बद्दल वाईट वाटत पण त्याला काही इलाज नाही. तिची सोय तीने बघावी.

या पत्रानंतर घरातलं वातावरण बदलून गेलं. यशोदा इतके दिवस मनात काही आशा धरून दिवस कंठत होती पण आता सारंच बदललं होतं. यशोदेच्या नवऱ्याने तिला  टाकलं, आणि तो पळून गेला ही बातमी लवकरच पसरली. आजूबाजूच्या शेजार्‍या पाजाऱ्यांना खूपच पुळका आला. त्या चौकशीच्या निमित्तानी यायच्या आणि बरंच काही बोलून जायच्या. दिवसेंदिवस यशोदा खचत चालली होती. एक दिवस कोणाकडे तरी हळदी कुंकू होतं आणि एक छोटी मुलगी बोलावणं करायला आली होती. रेवती आणि यशोदा दोघी गेल्या. यशोदा नको नको म्हणत होती पण रेवती म्हणाली की चार चौघांत मिसळली तर बर वाटेल, म्हणून  तिच्या बरोबर गेली.

जिच्याकडे हळदी कुंकू होतं तिच्या आतेसासुबाईंनी यशोदाला पाहिलं आणि एकदम टि‍पेच्या स्वरात बोलली की “हिला कोणी बोलावलं ? ही अवदसा इथे का आली, निर्लज्ज पणाचा कळस आहे.  हिचा नवरा हिला कंटाळून पळून गेला आणि तरी ही निर्लज्ज इथे आमचं घर नासवायला आली, हिला आधी घालवा.”

हा एवढा अपमान झाल्यावर दोघी जणी तिथे थांबणं शक्यच नव्हतं. पण हा प्रसंग यशोदेच काळीज विदीर्ण करून गेला. त्या नंतर ती कुठे बाहेर निघेनाशी झाली. आतल्या आत कुढत राहिली. घरातल्या सगळ्या कामाचा भार तिने आपल्या अंगावर घेतला. तिला कसं समजवाव हे रेवती आणि हरीहरला कळत नव्हतं. दिवस असेच जात होते.

क्रमश: -----

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com