Nirnay - 15 in Marathi Fiction Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | निर्णय. - भाग १५

निर्णय. - भाग १५

निर्णय भाग १५

मागील भागावरून पुढे…मिहीरच्या लग्नानंतर सहज म्हणून शरद आणि प्रज्ञा भेटायला घरी आले होते. मिहीरच्या लग्नाच्या वेळी मंगेश शरदशी खूप वेडंवाकडं काही बोलला नाही म्हणून शरदला वाटलं की मंगेशचा स्वभाव आता बदलला असेल म्हणून ती दोघं घरी आली.


कितीतरी वर्ष झाली म्हणजे शरदचं लग्न झालं आणि तो वेगळा राहू लागला. मंगेशचं विचीत्र वागणं सतत काहीही कारण नसताना शरदला प्रज्ञाला, इंदिरेला टोमणे मारणं चालू असायचं.


इंदिरा शांत असायची पण प्रज्ञा कशी शांत राहील? त्रास सहन करण्याची एक मर्यादा असते. गंम्मत म्हणून बोलताना भान राखलं पाहिजे हे मंगेशला कधी कळलंच नाही. म्हणूनच शरद वेगळा राहू लागला.


शरदकाका मिहीर आणि मेघना चे लाडके असल्याने दोघंही वेळ काढून काकांकडे जात.शरद आणि प्रज्ञाला मूलबाळ नसल्याने मिहीर मेघनावर त्या दोघांचं जीवापाड प्रेम होतं.


आज शरद आणि प्रज्ञा आले तेव्हा इंदिरा तिच्या बगीच्यात काम करत होती. दाराची बेल वाजलेली इंदीरेला ऐकूच आली नाही.

दार मंगेशनीच उघडलं.


दार इंदिरा उघडेल अशी दोघांची कल्पना होती.एकदम मंगेशला समोर बघून दोघंही बावचळले.


" या .आज कसे ऊगवलात?"


मंगेशच्या कुचकट बोलण्याकडे लक्ष न देता शरद म्हणाला


" सहज आलो. म्हटलं लग्नाची धावपळ आता संपली असेल तर निवांत भेटायला जाऊ म्हणून आलो."


" कशाकरता भेटायचं आहे निवांत?" निवांत या शब्दावर मंगेशनी जोर दिला.


" सहज."


" सहज कोणी कोणाला भेटायला येत नाही आणि निवांत तर मुळीच नाही." मंगेश म्हणाला.आता शरदला राग आला.


" माझं काहीही काम नाही. तुझ्याकडेतर मुळीच नाही. तुझ्याशी निवांतपणे बोलायला मी या जन्मात येणार नाही."


" मग का आलास?"


" मी वहिनींना भेटायला आलो आहे."


" तिच्याशी काय काम आहे?"


" प्रत्येक वेळी काम असेल तरच भेटायचं असं नसतं."


" हो. मग सख्ख्या भावाला विनाकामाचा भेटायला येत नाहीस. वहिनीला कशाला भेटायला येतोस?"


" मंगेश स्पष्ट बोल."


" हे घर माझं आहे. इथे मी म्हणेन तेच लोक येऊ शकतात."


दोघांच्या वादावादी मध्ये प्रज्ञा घाबरून उभी होती. इंदिरा बगीच्यातून आत येत असताना तिच्या कानावर ही वादावादी आली.मंगेशचं शेवटचं वाक्य ऐकताच ती कडक शब्दात म्हणाली.


" हे घर माझंपण आहे हे विसरताय तुम्ही. शरद भावजी या घरी कधीही येऊ शकतात. त्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही.हे कायम लक्षात ठेवायचं."


इंदिरेचा आवाज, चेह-यावरचे भाव बघून शरदला आश्चर्य वाटलं.


" या भावजी. येग प्रज्ञा.बसा" इंदिरा सोफ्याकडे बोट दाखवत दोघांना म्हणाली. शरद म्हणाला


" असू दे वहिनी.आम्ही निघतो."


" का निवांत बोलायला आला होतास नं वहिनीशी." मंगेश छद्मीपणे म्हणाला.


" तुझ्या डोक्यात विचीत्र किडे फिरतात आहे म्हणून थांबत नाही. चल प्रज्ञा." प्रज्ञा उठली.


"थांबा भावजी. ज्या माणसाला नात्यांमधील पावित्र्य कळत नाही त्या माणसाला समजवण्यात काही अर्थ नसतो. तुम्ही बसा. असं करू आपण स्वयंपाक घरात बसूया. मी तुम्हा दोघांसाठी खायला करते.चला."


एवढं बोलून इंदिरा स्वयंपाक घरात आली पाठोपाठ शरद प्रज्ञा पण आले.


" वहिनी या मंगेशच्या डोक्याचं काय करावं कळत नाही. तुम्ही कसा इतकी वर्ष संसार केला त्याच्याबरोबर?"


" दुस-यानी डोकं कसं वापरायचं हे त्यांनी ठरवायचं. आपण आपलं डोकं शाबूत ठेवायचं. आयुष्यभर ज्या प्रकारे त्यांनी त्यांचं डोकं वापरलं त्यात हे असेच विचार येणार. चांगल्या विचारांना त्यांच्या डोक्यात जागा नाही. तुम्ही त्यांच्या बोलण्याचा वाईट वाटून घेऊ नका."

कढईत रवा परतत इंदिरा बोलली.


"वहिनी पण हे अती होतंय. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष तरी किती करणार? काही दिवस ठीक आहे पण आयुष्यभर दुर्लक्ष कसं करणार?"


"माझ्याच घरात माझ्याविषयी वाईट बोलायला लाज नाही वाटत?" मंगेश स्वयंपाकघरात येऊन शरदवर ओरडला.


शरद ऐवजी इंदिरा म्हणाली.


" भावजींवर ओरडू नका. तुम्हाला इथे येऊन बसायचं असेल तर बसा. तुमच्यासमोर तुमच्याविषयी बोलू. लपून ऐकण्याची गरज नाही.कळलं."


" अरे आयुष्यात मला या शरदचं तोंड पण बघण्याची इच्छा नाही.आत्ताही बेल वाजली म्हणून मी दरवाजा उघडला. आधी माहिती असतं हा येणार आहे तर दरवाजातूनच हाकलले असतं."


" भावजींचं तोंड बघण्याची इच्छा नाही तर आता कशाला इथे उभं राहून त्यांच्याशी बोलताय? तुम्ही तुमच्या खोलीत गेलात तरी चालेल."


इंदिरा ऊपम्याच्या कढईवर झाकण ठेवत बोलली.मंगेश दणदण पावलं आपटत निघून गेला. शरद आणि प्रज्ञा इंदिरेच्या बदललेल्या रूपाकडे बघतच राहिले.


" वहिनी तुम्ही एवढ्या धीटपणे कधीपासून बोलायला लागलात."


" तुम्ही म्हणालात नं की किती दिवस माणूस दुर्लक्ष करू शकेल तसंच आहे. इतकी वर्ष गप्प बसले. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना विरोध करणं आवश्यक होतं.म्हणून मी आता बोलायला लागले."


" मानलं तुम्हाला."


"भावजी प्रत्येक गोष्टीचा काळ असतो.कालपर्यंत यांची दादागिरी चालली. आता माझ्यामधला ठामपणा बाहेर आल्यावर त्यांना गप्प बसावं लागणार. सर्वकाळ कोणाचीच मक्तेदारी चालत नाही."


" खरय." शरद म्हणाला.प्रज्ञा स्तंभीत होऊन इंदिरेचे खणखणीत विचार ऐकत होती.


" घ्या गरम गरम ऊपमा." इंदिरेने दोघांच्या समोर गरम ऊपम्याच्या प्लेट्स ठेवल्या.

तिघही हसत खेळत गप्पा मारत ऊपम्याचा आस्वाद घेऊ लागले.मंगेश त्या तिघांच्या गप्पांमधून कधी बाहेर फेकल्या गेल्या ते त्यांनाही कळलं नाही.

___________


सकाळी सकाळीच इंदिरेने मेघनाला फोन लावला.

" आई इतक्या सकाळी का फोन केला?"

"मेघना तुला आता नोकरी लागली आहे. यावर्षीची परीक्षा आटोपल्यावर तू नोकरीच्या ठिकाणी रूजू होशील. मी विचार करतेय की तुझं नाव आता विवाहसंस्थेत नोंदवावं."


"आई इतक्या लवकर! मला नोकरी लागल्यावर जरा एन्जॉय करू दे. मग सहा महिन्यांनी नाव नोंदव नं."


"मेघना विवाह संस्थेत नाव नोंदवलं की लगेच लग्न जमत नाही. अशी केस लाखात एक असते. स्थळं बघता बघता कधी दोन तीन वर्ष उलटतात कळत नाही."


"पण आई…"


"काही आई वगैरे चालणार नाही. मी तुझं नाव नोंदवतेय. तुझे फोटो पाठव म्हणजे ते अपलोड करीन."


"ए आई प्लिज ऐक नं…"


"मेघना तू कुठे जमवलं आहेस का? तसं असेल तर सांग. मग नाव नोंदवत नाही."


"नाही ग आई. मी काही कुठे जमवलेली नाही पण थांब नं प्लीज."


"मेघना तुझे चांगले फोटो पाठव. मुलांची स्थळ तुला पाठवत जाईन.आवडलं तर मुलाकडच्यांशी बोलेन."


"ठीक आहे. तू ऐकतच नाहीस तर पाठवते फोटो."

"पाठव."


इंदिरा फोन ठेऊन आणि मागे वळली तर मागे मंगेश उभा होता. इंदिरेच्या डोक्यात तिडीक जाते.


"रिटायर्ड झाल्यापासून तुम्हाला दुसरं काही काम नाही का? दुस-यांचं बोलणं चोरून ऐकण्याचीच सवय लागली आहे."


" तू वागतेसच तशी.आजकाल काय करते ते सांगत नाही. माझी परवानगी घेत नाही. म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवावं लागतं. तुझं बोलणं चोरून ऐकावं लागतं."


"लक्ष ठेवण्यासारखं असं वेडंवाकडं मी वागत नाही मी. स्वत:सारखं मला समजू नका."

"म्हणजे काय म्हणायचय तुला?"मंगेशनी चिडून विचारलं.

"मला तोंड उघडायला लावू नका."इंदिरा जरा वरच्या पट्टीत बोलली.

"बोल नं बोल काय बोलायचय ते." मंगेश बोलला.

"मला माझं तोंड खराब करायचं नाही ते सगळं बोलून." इंदिरा म्हणाली.


इंदीरा एवढं बोलून बाहेर जाऊ ‌लागली तसं तिला अडवत मंगेश म्हणाला

"तूझं तोंड कशाला खराब होईल.साधीभोळी असण्याचा आव आणू नको."


"मी साधीच आहे.भोळी नाही आणि मूर्ख तर त्याहून नाही."


"मग सांग नं फोनवर कोणाशी बोलत होतीस?"


"मी कशाला सांगू?"


"मला सगळं समजतंय."

"समजतंय नं मग कशाला विचारताय?"


"मी गप्प राहतो म्हणून फार आचरटपणा करू नको.कळलं."


"आचरटपणा कोणी केला आयुष्यभर ते आठवा मग मला म्हणा."


"सांग ना मी काय आचरटपणा केला?"


"माझं तोंड उघडायला लावू नका.तसच मी काय करते? मी कोणाला फोन करते? यावर तुम्ही पाळत ठेवलेली मला चालणार नाही."


इंदिरा हे बोलताना तिच्या लक्षात आलं की फोनची बॅटरी संपत आली आहे. तिने फोन लगेच चार्जिंगला लावला. कारण मेघना ने फोटो पाठवले की ते फोटो आणि तिची माहिती विवाहसंस्थेचा वेबसाईटवर तिला टाकायची होती.


मंगेशची रोज चिडचिड होत होती. कारण इंदिरा आता त्याला जुमानत नव्हती. इतकी वर्ष इंदिरा ही आपण विकत घेतलेली वस्तू असल्यासारखं त्याला वाटायचं.


इतकी वर्ष म्हणजे अगदी लग्न झाल्यापासून मंगेश तिला मालमत्ता समजून तिच्यावर हक्क गाजवत असे. आता एकदमच तिच्यावरचा हक्क संपल्या सारखे झालंय असं त्याला वाटू लागलं म्हणून त्याची चिडचीड होतहोती.

कसंही करून घरात आणि इंदिरेवर आपली सत्ता स्थापीत केलीच पाहिजे या भावनेने त्याला झपाटून टाकलं.

मंगेशच्या मनात चाललेल्या विचारांची इंदिरेला अजिबात कल्पना नव्हती.

__________________________

क्रमशः पुढे काय झालं ते वाचा पुढील भागात

निर्णय

लेखिका…मीनाक्षी वैद्य

Rate & Review

umesh bobade

umesh bobade 8 months ago