Swpnasprshi - 6 books and stories free download online pdf in Marathi

स्वप्नस्पर्शी - 6

                                                                                              स्वप्नस्पर्शी : ६

    रात्री अकरापर्यन्त घरी पोहोचले तेव्हा सगळे अगदी थकून गेले होते. रस्त्यातच जेवण करुन घेतल्यामुळे घरी आल्यावर कसेबसे कपडे बदलून सर्वजण गाढ झोपुन गेले. दुसऱ्या दिवशी घराला जरा उशिराच जाग आली. पहाटे उठणाऱ्या राघवांना आज सुर्यकिरणांनी जाग आणली. गडबडीत सगळेच उठले. आज मधुरला कामावर जायचं होतं. त्याच्या मुलांनाही शाळा होत्या पण मुलं थकलेले होते. शिवाय नीलची मुलं घरी आहेत म्हंटल्यावर त्यांचा आज शाळेत जायचा अजिबात मूड नव्हता. मग त्यांचा नाद सोडून अस्मिता मधुरच्या डब्याची तयारी करू लागली. जानकी, स्वरुपा नाष्टा तयारीला लागल्या. दोन दिवसांनी नील, जानकी, मुलं मुंबईला तिच्या आईकडे जाणार होते, व चार दिवसांनी तिकडून तिकडेच अमेरिकेला जायला निघणार होते. काम करता करता तिघींच्या गुहागर विषयी गप्पा चालू झाल्या. बागेत नील आणि आबा बोलत होते. बसमधे आबांच्या लक्षात आलेली गोष्ट बोलायला दोन दिवसात वेळच मिळाला नव्हता.

   “ नील, एव्हढा अस्वस्थ का आहेस राजा ?”

   “ आबा, तुम्हा सर्वांपासून दुर जाताना खुप अस्वस्थ वाटतं. तिकडे कामात, मुलांमध्ये वेळ जातो, पण प्रेम, माया या गोष्टींसाठी जीव तुटतो. घरी आल्यावर कुणी मोठं माणुस प्रेमाने बोलायला असावं असं वाटतं.”

   “ अरे! पण तुलाच तिकडे जायचे होते ना. मग आता असे का वाटते ? तू जी स्वप्न पाहिलीस ती पुर्ण केलीस. आता जरा त्या स्वप्नांचा आस्वाद घे. ते जग जगुन बघ. पैसा कमव. काही वर्षांनी इकडे येऊन जा. आम्ही तर आहोतच. राघवनी बघ कसं व्यावहारिक जग सार्थ केलं आणि आता त्याच्या विश्वात रमायला मोकळा झाला. अमेरिका अशी किती लांब आहे रे. एका दिवसात पोहोचता तुम्ही इथे. आमच्या वेळेस मुंबई गाठायची म्हंटल तरी दोन दिवस जायचे.”

   “ हो ते तर खरं आहे आबा.”

   “ नील, राघवचे एकदा का घराचे, जमिनीचे काम सुरू झाले की परत त्याला एक दोन वर्ष उसंत मिळणार नाही. आताच तू राघव आणि स्वरूपाला तुझ्याकडे का नाही घेऊन जात ? त्यांचं तुझ्याकडे येणं झालच नाहीये. त्यांना अमेरिका दाखव.”

   “ अरे हो आबा, ही तर नाइस आइडिया आहे. मागे बाबांना विचारलं होतं तेव्हा रिटायर्ड झाल्यावर येऊ म्हणाले. आता त्यांना यावच लागेल आणि आबा तुम्हाला पण.”

   “ अरे आता मी कशाला?”

   पण या विचाराने अतिशय आनंदलेल्या नीलने कुणाचच ऐकायच नाही ठरवलं. “ आबा, आता मी कुणाचं ऐकणार नाही. आता नाही तर तुम्ही कधी येणार ?” आबांचा हात धरून त्यांना आत नेत नीलने हाका मारायला सुरवात केली. “ बाबा, बाबा.” त्याचा आवाजातील उत्तेजितपणाने काही तरी वेगळे आहे हे जाणवून सगळेच हातातले काम सोडून बाहेर आले.  काय झालं कुणालाच काही कळेना. “ बाबा, आबांनी आता जे काही सांगितले आहे त्याने मी हरखुन गेलो आहे. आणि तुम्हीही ते टाळू शकणार नाही.”

  “ हो . पण काय सांगितलं त्यांनी ?”

  “ आबांनी तुम्हाला अमेरिकेला घेऊन जायला सांगितले आहे.”

  “ नील आपला बोलण्याचा विषय काय होता. तुला जरा बरं वाटावं म्हणुन बोलत होतो. तू लगेच पकडून बसलास.” आबा परेशान झाले.  

   “ नील पण आता कसं शक्य आहे ? पेन्शनची, जमिनीची काम आहेत.”

   “ बाबा आता पेन्शनची कामं कुठे अवघड राहिली आहे. ऑनलाइन मूळे पटापट होतात. जमिनीच्या व्यवहाराला तर अजुन वेळ आहे, आणि एकदा का ते काम सुरू झालं की परत तुम्ही बिझी होऊन जाल. आता जरा तुम्ही मोकळे आहात. शिवाय आताच माझ्याबरोबर चला असे थोडीच म्हणत आहे. व्हिसा प्रोसिजर, तिकीट बुकिंग या सगळ्यात महिना जाईल. हा सीझनही चांगला आहे. आई पण नंतर अडकून जाईल. तेव्हा तुम्ही आताच आलं पाहिजे.” लहान मुलासारखा हट्ट धरून बसलेल्या नीलला पाहून स्वरूपाला हसू आलं. पण राघवांना त्यामागचं गांभीर्य लक्षात आलं. त्याची आई, वडील, आजोबा यांना आपल्या घरी नेण्याची तीव्र इच्छा पराकोटीला पोहोचली आहे हे जाणवले. नील कधी हट्ट करत नाही आणि एकदा का हट्टाला पेटला की कुणाचच ऐकत नाही. हे राघवांना अनुभवाने माहित होतं.

     मग ते मनाशी विचार करू लागले. पेन्शन प्रोसिजर तर तीन महिने आधीच सुरु झाले होते. सर्व फॉर्म भरुन पी. पी. जी. ला पाठवले होते. मागच्या महिन्यांची सॅलरी त्यांच्या परसेंटेज प्रमाणे साठ हजार पेन्शन व पन्नास लाख हातात येणार होते. शेतजमिनीचा खर्च आबा करणार आणि मधुरला इन्कमटॅक्स बेनीफिट साठी होम लोन काढायचे होते ते आता तो घेणार होता. फक्त बेसिक रक्कम आपल्याला टाकायची आहे. रिटायर्ड झाल्यावर जरा मुलांच्या कलानेही घ्यायला हवं, आणि आबांचही वय झालय ते कधी जग फिरणार ? स्वरूपालाही नीलचं घर, अमेरिका बघायची आहे. नंतर आपणही अडकू. आताची वेळ योग्य आहे.

  “ आबा पण आईचं काय ? ती पण येईल ना ?” राघव.

  “ राघव, तुला माहित आहे ना तिचे गुढघे धरल्यापासून ती कुठे बाहेरच जात नाही. एव्हढा मोठा तुझा सोहळा झाला पण तिने तुला घरुनच आशिर्वाद पाठवले. तिचं म्हणणं माझ्यामुळे कोणाला त्रास नको. घरातल्या घरात ती हळुहळू फिरते. बाहेर पडणं आता तिला कठीण आहे.”

  “ ठीक आहे नील आम्ही येतो अमेरिकेला. कर तू प्रोसिजरची सुरवात.”

  राघवांचं बोलणं ऐकलं की नील जानकी, मुलं स्वरुपा आनंदाने ओरडले. आबांच्याही ते मनात असावं ते ही खुष झाले. बाबांच्या कुशीत शिरत नील म्हणाला “ बाबा, किती दिवस मी या क्षणाची वाट पहात होतो.” सगळ्यांचेच डोळे पाणावले.

   “ चला चला, आता जायच्या आधी मला खुप कामं संपवायचे आहेत.” मधुरच्या पाठीवर हात मारत नील त्याला म्हणाला पुढच्या वेळेस तुमचा नंबर आहे हं. मी काही ऐकणार नाही.

   त्याच्या हातात हात मिळवत मधुर डन म्हणाला. भावांचं प्रेम पाहून स्वरुपा राघव सुखावले. लहानपणी त्यांच्यात निर्माण झालेली तेढ आठवून क्षणभर दोघेही हेलावले. पण काळाच्या गणिताने नंतर त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली होती. अमेरिका वारीने पुर्ण घराला उत्साहाची लागण झाली. काय करायचं ? कसं करायचं ? कधी जायच ? अशा चर्च्यांचा कीस पडू लागला. सगळे आपापल्या कामाला लागले पण मनात तेच विचार रुंजत होते.

   मग एकेक चक्र सुरू झालं. नीलची जाण्याची तयारी स्वरूपाने सुरू केली. काही पदार्थ त्याला आईच्या हातचेच लागायचे. मेतकुट, लाडू, पुडचटणी, मसाला सुपारी, चकल्या ते करता करता दोन तीन दिवस यातच जायचे. तरी तुम्ही येताना काही गोष्टी आणा असे करत काही गोष्टी आवरत्या घेतल्या गेल्या. जायच्या आधी ऑनलाइन फॉर्म भरणे, अपॉइटमेंट, या गोष्टी नीलने करून ठेवल्या. आबांचे कागदपत्र इथे नव्हते. मग गावाकडे त्यांना पोहोचून आजीचा निरोप घेऊन येताना त्याने कागदपत्रही आणले. आठ दिवसांनी आबा परत पुण्याला येऊन प्रोसिजर पुर्ण होईपर्यन्त रहाणार होते. पहाता पहाता नीलचा जाण्याचा दिवस उजाडला. यावेळेस नेहमी प्रमाणे निघताना त्याला उदास वाटत नव्हते. तर मन फुलून आले होते. आई बाबा, आबा येणार तर त्याला तिकडे जाऊन कितीतरी तयाऱ्या करायच्या, कितीतरी प्रेक्षणीय स्थळं दाखवायची होती. येताना हे आणा, ते आणा, अश्या सुचनांचा भडीमार चालू होता. मधुरनी प्रोसिजर समजावून घेतली होती. एंबेसीमधे तो घेऊन जाणार होता. मुंबईला जायला गाडी आल्यावर मोठ मोठ्या बॅग्स आणि नीलचे कुटुंब बसले तशी सगळ्यांची मनं जड झाली. नील नजरेआड होईपर्यन्त डोळे भरून पहात स्वरुपा आपल्या अमोल ठेव्याला बघत राहिली.

    एक दोन दिवस घर आवरण्यात गेले मग सगळ्यांचे आपापले रुटीन सुरू झाले. आता राघवांनाही वेगळे काही जाणवू लागले. इतके दिवस रिटायर्ड झाल्यावर धामधुमीत काही गोष्टी जाणवल्या नव्हत्या. खरं तर अजुन समोर इतकी कामं होती कि रिकामपण आणि एकटेपणा जाणवायचा प्रश्नच नव्हता. पण ऑफिसमधले वातावरण, कधी गरमागरमी, कधी नरम विनोद, टुरिंग, पार्ट्या, मित्रमंडळी, येणारा पैसा, त्याचे कॅल्क्युलेशन, त्याची झिंग ह्या गोष्टीचं वलय एकदम नाहीसं झाल्यावर त्यांना दिवस पेलणं अवघड जावू लागलं. अधिकार गाजवणाऱ्या माणसाला त्याच्या त्या हक्कापासून वंचित केल्यावर केव्हढा त्रास होऊ शकतो तो त्यालाच माहित. एक प्रकारची हतबलता बेचैनी येऊन राघव अस्वस्थ झाले. त्यांना आपण या पेलूने जीवनाकडे का पहातोय ते कळेना. मग एकदम लक्षात आले आता आपण घरी एकटेच आहोत. घरातली जाग पुर्णपणे थांबली आहे. ही शांतता त्यांनी कधी अनुभवली नव्हती. म्हातारपणी माणुस सगळ्यात जास्त कशाला घाबरतो तर तो एकटेपणाला. अशी शांतता पेलायला मन फार सक्षम असायला लागतं. त्या शांततेत झालेला छोटासा आवाजही आंतरिक आघात निर्माण करू शकतो. राघव आता वस्तूंच्या अस्तित्वाने ते एकटेपण पेलण्याचा प्रयत्न करू लागले. खरं तर टी व्ही लावला असता तर त्या क्षणी ह्या येणाऱ्या वेगळ्या अनुभवातून ते बाहेर येऊ शकले असते. पण अस्वस्थ वाटले तरी त्यांना हा अनुभव घेऊन बघण्याची इच्छा होत होती. कारण असे क्षण आपल्या वाट्याला सध्यातरी फार येणार नाही हे ते जाणून होते. नंतर नंतर त्यांना जाणवू लागलं शांततेलाही एक नाद असतो. मग हळुहळू फ्रीजचा, पंख्याचा आवाज स्वतंत्रपणे जाणवू लागला. वाऱ्याची लय अनुभवता येऊ लागली. पडद्यांची सळसळ, बागेत हलणारी डुलणारी झाडे, फुले, उडणारे पक्षी यांच्याशी राघवांचं मन तदात्म पावू लागलं. त्या क्षणी त्यांच्या मनात जाणवून गेलं असा असतो आतला प्रवास. अजुनही आपण बाह्य पहात, ऐकत आहोत. इथूनच असच अंतरंगात जाता येईल.

   “ अहो, असे अंधारात काय बसले आहात ? असे काय बघताय ? काय झालं ? स्वरुपा राघवांना हलवून विचारत होती. पण राघवांना कळेना एकदम काय झालं ? अंतरंगातून बाहेर पडणं एकदम नकोसं वाटू लागलं. त्या वेगळ्या अनुभवातून येणं क्लेशकारक होऊ लागलं. पण हळुहळू ते सावरले. भानावर येऊ लागले. तोपर्यंत स्वरुपा पाणी घेऊन आली. “ अगं काही नाही जरा डोळा लागला होता.” “ संध्याकाळी असं एकटं बसत जाऊ नका. मी चहा टाकते तुम्ही बागेत चक्कर मारा.”

    म्हणजे ? हिला पण कधीतरी हा अनुभव येऊन गेला आहे तर. आपण बरेचदा टुरिंगमुळे बाहेर असायचो. मुलं मोठी झाल्यावर तर ते त्यांच्या विश्वात, मी माझ्या विश्वात. किती एकटेपणा जाणवला असेल तिला. आपल्याला तर ही गोष्ट लक्षातच आली नाही. ती ही कधी बोलली नाही. कसा यातून तिने मार्ग काढला असेल? खरच प्रत्येक माणुस किती वेगळा असतो. आपलं माणुस म्हंटलं तरी आपण किती एकमेकांना ओळखतो ? आपण तरी तिला किती गोष्टी सांगितल्या ? विचारात गर्क होऊन राघव बागेत फेऱ्या मारत होते. स्वरुपा चहा बिस्किटाचा ट्रे घेऊन झोपाळ्यावर बसली तरी त्यांना पत्ता लागला नाही. “ कसल्या विचारात आहात ? घ्या चहा.” चहाचा कप घेऊन राघव तिच्या शेजारी बसले. “ विचार करत होतो की खरच आपण किती एकमेकांना ओळखतो ?”

  “ काही तरी काय ?”

  “अगं तसं नाही. तुला त्रास नको म्हणुन मी किती तरी प्रॉब्लेम तुझ्यापासून लपवले. तसच तू पण मला त्रास नको म्हणुन तुझ्या, मुलांच्या कितीतरी गोष्टी सांगितल्या नसतील ना.”

  “ हो ते तर आहे. पण जीवनात अश्या काही गोष्टी असतात की त्या फक्त एकमेकांना सांगितल्या जातात, पण मार्ग आपल्यालाच काढावा लागतो.”

  हो, ते ही खरच आहे. पण त्यामुळे मनंही मोकळी होतात.”

  मधुर अस्मिताही त्यांच्यात येऊन गप्पा मारत बसले. कितीतरी वेळ गप्पा चालू राहिल्या. मुलं भुक लागली म्हणत बाहेर आले तेव्हा दोघी घाईनी स्वैपाकघराकडे वळल्या.

  “ बाबा परवा आबा येणार आहेत ना ? तुम्ही तुमचे कागदपत्र काढून नीट लावून ठेवले आहेत ना ?” मधुर.

  “ हो रे. समोरच आहेत. मधुर, ही सगळी प्रोसिजर झाली की आबांबरोबर मी पण जाऊन येईन गावाकडे आईला भेटायला. आबांची अमेरिकेला न्यायची बॅग व कपडे इथेच खरेदी करून भरून ठेवू. एक बॅग तिकडून ते आणतील. कारण नील, आजीलाही हे पाहिजे, ते पाहिजे सांगून गेला आहे. तर ती बॅग येताना ते घेऊन येतील. राघव, मधुर पुढचं प्लॅनिंग करत होते. अस्मिता आतून जेवायला आवाज देईपर्यन्त दोघं बोलत राहिले.

                                                         .............................................................................................................