Swpnasparshi - 8 in Marathi Moral Stories by Madhavi Marathe books and stories PDF | स्वप्नस्पर्शी - 8

स्वप्नस्पर्शी - 8

                                                                                           स्वप्नस्पर्शी : ८

 रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी कातीव हिरव्यागार कुरणांच्यामधुन काळाशार रस्ता पुढे सरकत होता. पोटातलं पाणी पण हलणार नाही अश्या तलम रस्त्यावरून गाडी तरंगत असल्यासारखी जात होती. भारतातल्या दृश्यांशी तुलना करणं तर अवघडच होतं. अधुन मधुन कुरणं, शेती, रंगीबिरंगी फुलांमधून डोकावणारे फार्महाऊस दिसत होते. राघवांच्या मनातलं हिरवं स्वप्न त्या सगळ्याशी तुलना करून पाहू लागलं. “ बाबा आपलं घर जवळ आलं.” जानकीच्या आवाजाने राघव भानावर आले, आणि कुतुहलाने बघू लागले व घर दिसताच मुलांनी तिकडे लक्ष वेधलं. स्वरूपाला आपलं स्वप्नातलं घर पहात असल्याचा भास झाला. हिरव्यागार पार्श्वभूमीवर निळ्या पांढऱ्या रंगातली बंगली दिमाखात झळकत होती. हलकासा टर्न घेऊन नील फाटकातून आत गेला व आनंदाने स्वागत करत कारचे दार उघडले. थकल्या शरीराने पण प्रसन्न मनाने भोवतालची बाग पहात ते तीघही बॅगा काढायला मदत करू लागले व सगळ्यांनी मिळून बॅगा आत नेल्या.

    “ आई बाबा, ही तुमची खोली. आबा ही तुमची.” सामान त्यांच्या त्यांच्या खोलीत ठेवत जानकी म्हणाली.

    “ तुम्ही फ्रेश होऊन या. तोपर्यंत मी चहा करते.” जानकी

    एकीकडे बोलत ती कामाला लागली. आबा दमले होते ते खोलीतच आराम करत बसले. नीलने स्वरुपा आणि राघवांना आधी सगळं घर दाखवलं तीन बेडरूमचा प्रशस्त बंगला होता तो. जानकीची आर्टिस्टीक सजावट, टापटीप, शिस्तप्रियता सगळे जाणून होते. घराचं कौतुक करत त्यांनी मुलांच्या कर्तुत्वाला दाद दिली. जेवताना नील म्हणाला “ आता तुम्ही आराम करा. दोन दिवसात तुमचा थकवा जाईल. मग विकेंडला आपण बाहेर फिरायला जाऊ.”

   “ आबांना झेपेल असाच प्लॅन कर हं नील.” राघव म्हणाले.

   “ होय बाबा. काळजी करू नका. निवडक ठिकाणं आपण पाहू, आणि इथे व्हील चेअर मिळते. त्यामुळे त्यांना कुठेही चालावे लागणार नाही.”

   जेवून तिघही आपापल्या खोल्यांमध्ये गेले. दोन दिवस जेटलॅगमुळे ते कधीही उठुन खात, आवरत होते. तिसऱ्या दिवशी त्यांना जरा बरं वाटायला लागलं. मग मुलांसाठी, नील जानकीसाठी काय काय सामान आणलं ते काढायला सुचू लागले. स्वरूपाला जरा लाजल्या सारखं झालं. पण जानकीच म्हणाली “ असं काही वाटून घेऊ नका. आमचं पण असच होतं.”

    रात्री जेवताना नील म्हणाला “ बाबा आता तुम्ही कम्फर्टेबल आहात का ? आपण उद्या इथल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमला जाऊ. ते खुप मोठे आहे. तिथे जवळपास पस्तीस मिलियन जीवाश्मांचे प्रकार पहायला मिळतात. तसेच ४/५ बिलियन वर्षाचा इतिहास पहायला मिळतो. शिवाय तिथे जिवाश्मांचाच संग्रह आहे असे नाही. तर त्यावर केलेले संशोधनही आहे.”

   “ अरे वा, छानच. तुला योग्य वाटेल तशी, आणि आबांना झेपेल अशी ट्रीप तू ठरव.”

   “ ओके बाबा. तर उद्या आपण आठ वाजता घरून निघूया.”

   सकाळी भराभर आवरून सगळे घराबाहेर पडले. नीलचं घर शहराबाहेर होतं. त्यामुळे पोहोचायला जरा वेळ लागणार होता. आबांना बाहेरचं खाणं फारसं चालण्यासारखं नव्हतं. त्यामुळे जानकीने बरच काही घरचं खायला घेऊन ठेवलं होतं. गप्पांच्या नादात म्युझियम आले. तिकीट काढून आत गेल्यावर एकेका दालनासरशी त्यांचे डोळे विस्फारून गेले.

   किती आखीव पद्धतींनी पृथ्वीवरील सुक्ष्म जीवांपासून ते अवाढव्य डायनॉसॉर पर्यंतच्या साऱ्या जिवाश्मांची माहिती व विश्व तिथे मांडून ठेवलं होतं. ते सगळं नीट बघणं, वाचणं तर एका दिवसात तर शक्यच नव्हतं. शेवटी केवळ पाहून घ्यावे या विचाराने तिघं म्युझियम बघू लागले. नंतर त्याला लागुनच असलेले रोझगार्डन पहायला नील त्या तिघांना घेऊन गेला जानकी आधीच मुलांना घेऊन तिकडे गेली होती. तिथे शंभर जातीच्या  पंधरा हजार गुलाबांची झाडे व दोनशे प्रकारची फुलझाडे होती. गुलाबांच्या झाडाभोवती इतर शोभिवंत छोट्या झुडपांची आखीव बॉर्डर केलेली. बाजूलाच सुंदर कारंजे. १९२८ ला जेव्हा या गार्डनचे उद्घाटन झाले तेव्हा तिथे २ लाख गुलाबांची झाडे होती. राघवांचा फोटो काढण्याचा छंद उफाळून वर आला. किती प्रकार. रंगोत्सव. डोळ्यांचे पारणे फिटले. हिस्ट्री म्युझियममधे पाहिलेले गतकालीन जीवाश्म, आणि इथे जिवंतपणाचा उत्सव. अनोखा मेळ. बागेचा आनंद लुटणाऱ्यांमध्ये एक वेगळा प्रकार दिसला. नील म्हणाला “ इथे प्री वेडिंग शुटींग करायला खुप लोकं येतात. या अत्यंत सुंदर दृश्याचा कल्पकतेने उपयोग करून लग्नाचे फोटो स्मरणीय करून ठेवतात.” आबा, राघव हसले. त्यांच्या कक्षेबाहेरचे होते ते. पण पिढीगणिक वेगवेगळे फॅड चालते हे आता त्यांच्या वयाला समजून आले होते. आधीचे लोकं एकेका तत्वावर जीवन पणाला लावत आणि आता ह्या देशात तर स्वतःच्या लग्नाचे तर किती अल्बम बनत असतील त्यांनाच ठाऊक. प्रत्येकाच्या आनंदाच्या कल्पना वेगळ्या म्हणुन परत ते रंगांच्या दुनियेत हरवून गेले, मात्र स्वरुपाला ती कल्पना आवडली. नाना प्रकारच्या पोझेसनी राघव आणि नीलने आपल्या कुटुंबाचे फोटो काढत दिवसभर एन्जॉय केल्यावर सगळे घरी परतले. थकल्या आबांनी खोली गाठली. जानकी, स्वरुपानी सकाळीच थोडी रात्रीच्या स्वैपाकाची तयारी करून ठेवली होती त्यामुळे त्यांनी झटपट उरलेला स्वैपाक उरकला. राघव नील फोटोज पहात बसले होते, नंतर दोघांनी मिळून पुढच्या टुरची आखणी केली. आबांना झेपेल असा, एक दिवस आराम मग दोन दिवसांचा टुर ठरवला. जेवताना सगळ्यांना लास वेगासचा प्लॅन समजून सांगितला. उद्या घरी आराम करून परवा लॉस एंजलीसला निघायचे. त्याप्रमाणे एका टुर कंपनी कडून तिकीट बुकिंग करून ठेवले.

    दुसऱ्या दिवशी आराम करून, ठरलेल्या प्रोग्राम प्रमाणे सकाळी टुर बसने लॉस एंजलीसला जाण्यासाठी ते बसमधे बसले. काही वेळाने गाईड माहिती सांगू लागला “ आपण आता नॉर्थ अमेरिकेतील सगळयात जास्त लांबीच्या ‘मोजावे’ वाळवंटातून जात आहोत. हे एक रेन रोडा वाळवंट असून त्याच्या कडेला जोशवा झाडे आढळतात. असे मानले जाते की, विशिष्ट प्रकारच्या १७५० ते २००० वनस्पतींच्या जाती इथे आढळतात.

    वाळवंटाचा लालसर देखावा, वाळूच्या छोट्या बनलेल्या टेकड्या, वाऱ्याने त्यावर पडलेल्या वळणदार घड्या सगळच अप्रतिम दिसत होतं. काही वेळाने बस फॅशन आऊटला लंच व शॉपिंगसाठी थांबली. तिथे नानाविध ब्रँडचे कपडे, वस्तू उपलब्ध होत्या. नीलने आबांना खाता येतील असे पदार्थ ऑर्डर केले. फ्रेंच फ्राईज, पेकव्हीयन राईस करी, अपलपाय अश्या चवदार पदार्थांना दाद देत भुकेलेले जीव तृप्त झाले. त्यांची बसमधे एका भारतीय कुटुंबाशी ओळख झाली. राघवांच्याच वयाचे ते गृहस्थ. त्यांच्या मुलाने हा टुर अरेंज करून दिला होता. ते जॉली जोडपं यांना सामील झालं. सगळ्यांच्या हसण्या खिदळण्याला ऊत आला. खाणं पिणं झाल्यावर शॉपिंगचा नशा चढला. भारतात गेल्यावर स्वरुपालाही कुणाकुणाला काय काय द्यायचं होतं. पण नीलने बायकांना बजावून ठेवले इथेच सगळी खरेदी करू नका. मग तिघी निवडक खरेदीवर भर देऊ लागल्या. तासाभरानंतर टुर गाईडने सगळ्यांना ज्या ठिकाणी जमायला सांगितलं होतं तिथे जमल्यावर स्ट्रेटोम्फिअऱ् हॉटेलमध्ये जाण्यासाठी बस निघाली. आजचा मुक्काम तिथेच होता. बस हॉटेलवर पोहोचल्यावर एखादया राजवाड्यात आपण येऊन पोहोचल्याचं फिलींग येऊ लागलं. आलिशान हॉटेलची सजावट पाहण्यासारखी होती. कुठेही जा स्वच्छता आणि आणि अभिरुची यांचा संगम आणि संपन्नतेची किनार. आपल्याकडील श्रीमंती आणि इथल्या श्रीमंतीत जमीन आसमानाचा फरक होता.

    पोटातील पाणी हलणार नाही अश्या प्रवासाने कुठेही थकवा जाणवत नव्हता. तरी सर्वांनी विश्रांती घेतली. रात्री लास वेगासचा टुर होता. लास वेगसचे खरे सौंदर्य रात्रीच दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झगमगणाऱ्या कॅसिनो मधुन करोडो डॉलर्सची उलाढाल, आणि सगळ्या वातावरणाला एक प्रकारची झिंग चढलेली जाणवत होती. जिंकण्याचा उन्माद, तर हरलेल्यांची दारुत बुडवलेली निराशा या मिलाफाचा कैफ तिथे कुतुहलाने बघणाऱ्यांना दिसत होता.

    त्या टुर मधल्या अजुन काही गोष्टी तुम्हाला पहायच्या असतील तर त्या तुम्ही वेगळ्या निवडू शकत असल्याने नीलने एक ‘ द अल्टीमेट व्हरायटी शो’ निवडला. तिथे जगातले ख्यातनाम कलाकार आपली कला सादर करत. जादू, स्पेशल इफेक्टस दृश्य, थरारक स्टंट, कॉमेडी करणारे कलाकार, उच्च दर्जाच्या शारीरिक कसरती करणारे तसेच नेत्रदीपक हालचाली असलेल्या या कलाकारांचे सादरीकरण पहाण्यासारखे होते. अजुन एका ठिकाणी नील ‘ ली रेव्ह शो ’ बघायला घेऊन गेला. तिथेही नकला, स्टंट, शारीरिक चापल्य दर्शन होते. पण त्याला जादुई वाद्यवृंदांची जोड असल्यामुळे एक वेगळीच वातावरण निर्मिती तयार झाली होती. तिथे पपेट शो व्दारा लास वेगसचा इतिहास दाखवण्यात येत होता. हे सगळं पहाताना डोळे विस्फारत. केव्हढी मेहनत, परिपूर्ण नियोजनाचं ते प्रतिक भासत होतं.

    यानंतर स्ट्रेटोस्फिअर ऑब्जर्व्हेशन डेक कडे नेण्यात आलं. आबा जरा थकल्यासारखे वाटत होते. नीलने जरा वेळ त्यांना बसवून सगळ्यांसाठी कॉफी आणली. तेव्हढयानेही तरतरी आली. आबांची इच्छाशक्ती मजबुत होती. ही इच्छाशक्तीच शारीरिक दुर्बलतेवर मात करून म्हातारपणीही तरुण रहायला मदत करते. त्यांचा फ्रेश मुड पाहून सगळ्यानाच बरं वाटलं. स्ट्रेटोसफिअर ओब्जर्व्हेशन डेक हा अमेरिकेतील सगळ्यात उंच असलेला डेक आहे. त्याची ऊंची ११५० फुट असून, तो डेक ३६० डिग्रीत फिरतो. नील माहिती सांगत होता. सुळक्यासारख्या उंच असणाऱ्या टॉवरवर फिरणाऱ्या डेकमुळे लास वेगासचे विहंगम दृश्य पहायला मिळत होते. चमचमणारे वेगास मनात कुठलीही कल्पना न ठेवता पहात रहाणे, केवळ ते दृश्य अनुभवत रहाणे हे आता राघवांना जमू लागलं होतं. ते सुंदर दृश्य मनात साठवतच तो टुर पुर्ण झाला. मुक्कामाच्या हॉटेलवर परतल्यावर फ्रेश होऊन खाली डाइनिंग हॉलमधे जमायचं ठरलं. तशी थोडी विश्रांती झाल्यावर तयार होऊन सर्व खाली आले. गप्पा, खाणं, पिणं कशाला कमी नव्हती. फिश, सँडविच, लजानिया, ग्रील्ड स्वेक, स्टेक, रशियन सॅलेड, च्यावडर, तिरामसु स्वादाने खाऊ लागले. उत्साहाने भारलेल्या वातावरणात माणसाला कसली दुःख असतात याचाही विसर प्रत्येकाला पडावा अशी ती जीवनाची एक बाजू होती.

    दुसऱ्या दिवशीचा टुर, जगप्रसिद्ध नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक असलेलं ग्रँड कॅनियन हे ठिकाण होतं. सकाळी उठताना अंग जरा जड झालेलं, पण एकदा का तयार झालं की, पुन्हा उत्साहाने नवनवीन गोष्टी अनुभवण्यासाठी मन आतुर झालं. सगळ्यांना घेऊन बस ग्रँड कॅनियनकडे निघाली. वेगवेगळ्या ठिकाणांहून ते दृश्य पहाता येते.

    गाईड सांगू लागला “ साऊथ रिम कडील माथेर पॉइंट वरून ग्रँड कॅनियनचे आपल्याला अवलोकन करता येईल. कॉलेरेडो नदी प्रवाह, झीज होण्याच्या प्रक्रियेने बनलेले एक मोठे खोरे किंवा दरी आहे. भुगर्भ शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे ही दरी साठ लाख वर्ष पुर्व अस्तित्वात आली असावी. हिची लांबी ४४४ कि.मी. असून सहा हजार फुट खोल व रुंदी १८ ते ३० कि.मी. आहे. ग्रँड कॅनियनमधे सापडलेल्या कॅल्साईटा युरेनियमच्या तपासणीवरून तिचे वय ठरवण्यात आले होते. पावसाळ्यात हजारो उपनद्या या नदीला येऊन मिळतात. ब्लॅक रॉक, लाईम स्टोन, वाळू यांनी बनलेली ही प्रचंड रंगीबिरंगी घळई पाहून निसर्गाची कमाल वाटत होती. कितीतरी प्रकारची जीवसृष्टी असलेलं ते नंदनवन होते. १७५० प्रकारच्या वनस्पती, पक्षांच्या ५० जाती, जमिनीत विवर करून रहाणारे छोटे प्राणी, वटवाघुळांच्या जाती, अशी अनेक प्रकारची जीवसृष्टी तिथे नांदत होती.” माथेर पॉइंटवरून हजारो मैल पसरलेले रंगीबिरंगी खोरे आपली दृष्टी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत दिसत रहाते. त्या अनोख्या दृश्यात सगळेच हरवून गेले. बाकी पर्यटकांचे फोटो काढणे, प्रतिक्रिया देणे यांचे आवाज बाजूला असतानाही ते दृश्य राघवांच्या मनात झिरपू लागले. सातत्याने होत राहिलेल्या किंवा केलेल्या एखाद्या गोष्टीचा किती सुंदर परिणाम समोर येतो, याचं ते सुंदर उदाहरण होतं. राघवांच्या हिरव्या स्वप्नांना बळ मिळत होतं. नीलने त्यांना भानावर आणल्यावर त्यांनी फोटो काढायला सुरवात केली. काही तास तिथे घालवून बस हुवर डॅमला पोहोचली.  

    हुवर नदीवर हुवर डॅम हे एक विशाल धरण होते. ते बांधण्यासाठी हजारो लोकांनी अथक परिश्रम केले व पाच वर्षात तो बांधून पुर्ण झाला. या धरणाची ऊंची ७५० फुट आहे. गाईडने या धरणाविषयी एक अनोखी माहिती सांगितली. लास वेगासला प्रचंड तापमान आहे. आधी तिथे पाऱ्याचे थरमामीटर लावले तेव्हा ते अति तापमानाने फुटून गेले. आता तिथे डिजिटल थरमामीटर लावलेले आहे. रस्त्यावर अंड फोडून टाकलं तर तिथेच त्याचं ऑम्लेट तयार होत असे. असे उल्लेख तो सांगत होता. अश्या तापमानात बांधकामासाठी कुणी लोकं इथे टिकत नव्हते. शिवाय तिथे करमायला काही साधन नसल्याने कामावरच्या नगण्य संख्येतही फार उत्साह नव्हता. तेव्हा त्यांनी कामावर टिकून रहाण्यासाठी लास वेगास हे शहर वसवले. वेश्याव्यवसाय अधिकृत करायला परवानगी दिली. कसिनो उघडले. यामधून खुपच डेव्हलपमेंट होऊन धरण बांधायच्या कामाला वेग आला. शहरात मग पैसा फिरू लागला.” या माहितीने सगळे थक्क झाले. वेगळ्या दृष्टिकोनातून धरण पाहिले जाऊ लागले. रंगीबिरंगी खोऱ्यातून वहात येणाऱ्या नदीला अर्धगोलाकारात घातलेला बांध पाहून रचनाकारांना दाद द्यावीशी वाटली. राघवांचं मन निसर्ग टिपण्यात गुंगून गेलं होतं. बऱ्याच वेळानी त्यांना ही गोष्ट लक्षात आली की आपण कुणाशीच संवाद साधत नाहीये. मग ते सगळ्यांमधे येऊन हसु बोलू लागले.

    स्वरुपा हळूच म्हणाली “ छान वाटत होतं, तुम्हाला असं आत्ममग्न पाहून. आयुष्यभर वडवड केलीत. आता आपला आतला प्रवास सुरू करूया.” राघव स्वरूपाकडे पहातच राहिले. किती अचुकतेने जीवनाची नाडी ओळखते ही. कधी काय करावं याचं स्वरूपाला चांगली जाण होती. त्यामुळे राघवांना फार सांसारिक अडचणींना सामोरं जावं लागलं नाही. आबा राघवांपाशी येत म्हणाले “ राघवा, आता पुर्ण आयुष्य तुझ्यासमोर आढावा घ्यायला पसरलेलं आहे. फार त्याच्या गर्तेत माणसाने जायचे नाही. वर्तमानात रहायचे. गतकाळात जास्ती वेळ थांबले की खंत, उदासी, राग  या भावनांचा पगडा मनावर चढायला लागतो. ज्या वेळेस जी परिस्थिती येते त्याप्रमाणे तेव्हा निर्णय घेतले जातात. आणि ते त्या परिस्थिती प्रमाणे बरोबरच असतात. आता त्याचा उहापोह करून आपलं मनःस्वास्थ बिघडवू नये. भविष्यकाळाच्या फार कल्पना रंगवू नये. म्हणजे अपेक्षाभंगही वाट्याला येत नाही. सगळ्यात आनंद असतो तो वर्तमानात.”

     आबांचं शांत रहाणं किंवा योग्य तिथे मार्गदर्शन करणं राघवांना नेहमीच आवडायचं. ते नेहमी म्हणायचे आधी तुम्ही प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या अनुभवावर किंवा सल्ल्यावर अवलंबून राहू नका. आबांचा आदर्श राघवांनी नेहमीच ठेवला होता. प्रत्येक वयाच्या वळणांवर त्यांची मोलाची मदत झाली होती. हुवर डॅमची भव्यता राघव, आबांमध्ये झिरपत जात होती दोघही स्तब्धतेने विशाल पटावर डोळे लावून उभे राहिले.

   ट्रीपचा पुढचा स्टॉप चॉकलेट फॅक्टरीचा होता. चॉकलेट या शब्दातच अशी जादू आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यन्त सगळेच आनंदाने ओसंडून जातात. तिथे उतरल्यावर गाईड माहिती देऊ लागला “ इथेल एम, ही एक उच्च दर्जाची चॉकलेट व वाईन बनवणारी कंपनी आहे. पुर्ण हँडमेड चॉकलेट इथे बनवले जातात. त्यामध्ये कुठलेही कृत्रिम घटक वापरले जात नाही. चॉकलेट बनवण्याची प्रक्रिया गॅलरी मधुन पहाण्याची सोय तिथे आहे. शिवाय त्यांचे चॉकलेट शॉपही आहे.”

    त्या कंपनीच्या आवारातील तीन एकर परिसरात कॅक्टस गार्डन फुलवले होते. १५० प्रकारचे कॅक्टस व १५० दुर्मिळ रानटी झाडं अशी त्यांची लागवड केली होती. कॅक्टसची ती दुर्मिळ फुलं पाहून मन हरखून गेलं. काटयांमधून निर्माण केलेल्या त्या आविष्काराचा आस्वाद घेणं म्हणजे, निसर्गाच्या कणाकणात सौंदर्य आहे फक्त तुम्ही त्या दृष्टीने पहा. जणू हा संदेश देत असल्यासारखा तो नजारा होता. साधारण तिथे फिरायला गाईडने पाऊण तास दिला होता. सर्व पाहून फोटो काढून झाले. मुलं, जानकी, स्वरुपा लहान मुलांसारख्या चॉकलेट खरेदी करत होत्या. ते पाहून नील, राघव, आबा हसू लागले. पण त्यांनाही माहित होते की भारतात न्यायला ही चॉकलेट खरेदी चालू आहे.

       पुर्ण दिवस असा मस्त घालवल्यावर बस हॉटेलवर परतली आणि तो टुर संपला. दुसऱ्या दिवशी वापस लॉस एंजलीसला निघायचे होते. थकले भागलेले सगळे लवकर झोपी गेले. दुसऱ्या दिवशी जरा आरामात आवरूनच बसचा प्रवास सुरू झाला. नील, जानकी अजुनही काही काही दाखवत होते. रस्त्यात एक मोठी बाजारपेठ लागली. विविध प्रकारचे डिझाईनर कपडे, दागिने, पुस्तकं, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, या सगळ्यांची रेलचेल होती. मग तिथे थांबून शॉपिंगची मजा लुटली. थोडं खाऊन पिऊन परत बसचा प्रवास सुरू झाला. राघवांच्या मनात येत होते, का बरं माणुस खरेदीमधे एव्हढा गुंतून जातो ? खरेदी करताना मनाला दुसऱ्या कुठल्या जाणिवा उरत नसाव्या. कारण मनाला सातत्याने नवनवीन काहीतरी हवं असतं. अश्या वेळेस बाजारात दिसणाऱ्या वेगवेगळ्या वस्तुंची मनाला भुरळ पडते. आणि ते त्यात गुंगून जाते. थकव्यामुळे राघवांचा डोळा लागला. प्रवास आरामशीर होता. थोड्या वेळाने कुणाच्यातरी आवाजाने त्यांना जाग आली. स्वरुपा उठवत होती. जेवायसाठी बस थांबली होती. आबा, राघव, स्वरुपाला आता बाहेर खायचा प्रॉब्लेम येऊ लागला. सारखा ब्रेड खाणं तिघांनाही अवघड जात होतं. मग त्यातल्या त्यात सुप, मिल्कशेक, पाय पुडिंग असं खात काम भागवणं चाललं होतं. मजल दर मजल करत सगळे घरी पोहोचले.

      आबांसाठी नीलने आता दोन दिवस विश्रांतीचे ठेवले होते. तो आणि जानकी दोन दिवस ऑफिसला जाऊन येणार मग पुढची ट्रीप सॅनरेमॉनला ठरली. नीलचा एक मित्रही त्यांच्या बरोबर येणार होता. दोन दिवस मग निवांत आराम करुन तिसऱ्या दिवशी सगळे सॅनरेमॉनला गेले. त्या मित्राची फॅमिलीही बरोबर होती त्यामुळे सगळ्यांनाच वेगळे साथी मिळाले. गाडीत नील माहिती देत होता “ सॅनरेमॉनला ‘योसेमिटी नॅशनल पार्क’ आहे. साधारण साडेसात लाख एकर परिसरात वसलेले ते एक जागतिक वारसा स्थळ आहे. दहा लाख वर्षापुर्वीचे पर्वत अशी त्याची कालगणना केली होती. पुर्ण व्हॅलीमध्ये २ ते १३ हजार फुट उंचीचे वेगवेगळे पर्वत दिसतात.”

    योसेमिटी पार्कमधे शिरल्यावर त्यासगळ्याचे सौंदर्य आणि भव्यता मनाला भिडू लागली. उंचच उंच ग्रेनाईट पर्वतांच्या त्या दृश्यावर नजर ठरत नव्हती. वेगवेगळ्या उंचीचे खडक किंवा दगडाचे डोंगर असही त्याचं वर्णन करता येऊ शकत होतं. यामुळे हे ठिकाण ट्रेकिंग, रॉकक्लाईम्बिंग साठीही प्रसिद्ध आहे. बऱ्याच ठिकाणी पांढरे शुभ्र धबधबे जोरदार गर्जनेने कोसळत होते. एका पॉइंटवरून नीलने सांगितले “ समोरचा जो धबधबा आहे ना, त्यावर सुर्योदय व सुर्यास्ताच्या विशिष्ट वेळेसचे सुर्य किरण पडून ते पाणी लाव्हारसासारखे केशरी लाल रंगात वहाताना दिसते.” पुढे गेल्यावर अजुन एक धबधबा समोर आला. त्याच्या तुषारांनी आसमंत व्यापून गेला होता. त्या पाण्याच्या थेंबांवर सुर्यकिरण पडून अनेक इंद्रधनुष्य तयार झाली होती. एका अँगलनी तो धबधबा इंद्रधनुष्याच्या रंगांमध्ये पुर्ण रंगुंन गेल्यासारखा दिसत होता. थंडीत या धबधब्याचे पुर्ण बर्फ बनते ते ही रुप पहाण्यासारखे असते. पुर्ण व्हॅली लाल पिवळ्या रंगानी झगमगत होती. एका पॉइंटवरून नीलने ग्लॅशिअर व्हॅली दाखवली. तिथे स्किइंगचे प्रकार चालतात व त्या व्हॅलीत झाडांच्या, प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. जेवायची वेळ झाली तशी एका हॉटेलमध्ये जेऊन पुढे जायचे ठरले. व्हॅलीचा नजारा दिसेल असे एक हॉटेल दिसल्यावर तिथे निवांत जेवायला बसले. बरितो, गार्लीक ब्रेड, फिशकरी राईस, आणि अपलपाय अशी नीलने आणि त्याच्या मित्राने ऑर्डर दिली. पदार्थ येईपर्यंत वाईनचे घुटके घेत गप्पा चालू होत्या. स्वरूपाने जानकीला विचारले “ अगं हे बरितो काय आहे ?” “ आई, आपल्याकडच्या पोळीभाजी सारखच असतं ते. मक्याच्या पिठाची पोळी आणि त्यामध्ये चीज, बीन्स, कांदा, टोमॅटो, तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या घालुन त्याचा रोल केलेला असतो. व्हेज, नॉनव्हेज दोन्ही प्रकारांनी बरितो खाता येतो.”

   “ असं आहे का. खाऊन बघूया.” स्वरुपाला नवनवीन गोष्टी चाखायला नेहमीच आवडत असे. खाऊन पिऊन परत सगळे व्हॅली पॉइंट पहात फिरले. एव्हढा मोठा एरिया पुर्ण पहाणं तर शक्यच नव्हतं. पण तरी जेव्हढं पहाता येईल तेव्हढं पाहून घेतलं. तृप्त मनाने घरी परतल्यावर झोपेतही जणू तीच दृश्य पहातोय असं भासत होतं.

     दोन दिवसांच्या आरामानंतर कुपरटीनोला जायचा प्रोग्राम होता. नीलची ऑफिस आणि ट्रीप यात बरीच धावपळ होत होती. राघव शेवटी म्हणाले “ नील, अरे सगळं आताच दाखवणार आहेस का ? नंतर आल्यावरही पहायला काही राहु दे.”

     “ नाही बाबा, हे तर आपल्या घराजवळ आहे. आता ते पाहून घेऊ. नंतर आल्यावर अमेरिकेची दुसरी बाजू पाहू.”

     दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कुपरटीनोला त्यांच्या मित्रानी डाउन टाउनची तिकीटं काढून ठेवली होती. त्या टुरमधे पिअर सिक्सटीन, गोल्डन गेट, बॉटनिकल गार्डन, जेल, व सांताक्रुज बीच पहायचा असे ठरले होते. नीलने प्रवास करून कुपरटीनोला हॉटेलमधे मुक्काम करण्यापेक्षा मित्राने त्याच्या घरी यायचा आग्रह केल्यामुळे तिथे मस्त गेट टुगेदर झाले. मग दुसऱ्या दिवशी बस टुरने प्रथम बे एरिया मधल्या फेमस जागा दाखवल्या. सजावट केलेले चौक, ऑफिसेस, मुर्त्यांनी सजवलेले चौक हे सगळे डाउन टाउन मधे होते. ते पहाताना नीलची माहिती देणं चालूच होतं शहर कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना होता. इथल्या प्रत्येक शहराला डाउन टाउन असते. तिथुन समुद्राला लागून असलेली पिअर्स त्याने दाखवली. पिअर सिक्सटीन म्हणुन ती जागा होती. हिरवळीवर बसलेल्या त्या पिअरमधे वेगवेगळे कलाकार आपली कला सादर करतात. हा एक छान अनुभव असा राघवांनी आपल्याच मनाशी रिमार्क दिला. नीलने एका दुकानातून हॉट चॉकलेट आणि फ्रेंच फ्राईज घेतल्या. त्याचा स्वाद घेऊन झाल्यावर परत ते पिअर पहात फिरल्यावर बस टुरने त्यांना एका बॉटनिकल गार्डनला नेले. आबांना आधीचेही बॉटनिकल, कॅक्टस गार्डन फार आवडले होते. जमिनीत लागवड करुन उगवण्याच्या क्रियेत त्यांना फारच स्वारस्य. नैसर्गिक जंगलापेक्षा हातांनी जोपासलेल्या वृक्षवेलीवर त्यांचा जीव असायचा. अश्या ठिकाणी आबा खुपच खुलत. त्यानंतर बस गोल्डन गेटला पोहोचली. गाईड माहिती सांगु लागला “ जेव्हा इथे सोन्याच्या खाणी सापडल्या होत्या तेव्हा तिथे काम करणारे लोकं या ब्रिजवरून ये जा करत असत. म्हणुन या गेटला गोल्डन गेट म्हणतात. राघव मनात विचार करत होते. किती उलाढाल झाली असेल. जागतिक स्तरावर करोडोंचे व्यवहार पार पडले असतील. कदाचित काही सोन्याचे चुकार कणही या ब्रिजवर पडलेले असु शकतील. सॅनफ्रॅन्सिस्को बे आणि पॅसिफिक महासागराला जोडणारा हा ब्रीज एक मैलाचा आहे.” पुलाखालच्या निळ्याशार पाण्यावर नजर ठरत नव्हती. एकेक प्रेक्षणीय स्थळ बघत बघत टुर बस चाललेली. यानंतर एका अनोख्या जेलला भेट देण्यासाठी बस थांबली. अलकार्टेस हे एक पॅसिफिक मधले बेट होते. पॅसिफिकचे पाणी अतिशय थंड असते. हिवाळ्यात तर कुणी त्या पाण्यात पायही घालू शकत नाही, म्हणुन त्या बेटाचा वापर जेलसारखा करून तिथे कैद्यांना ठेवण्यात आले होते. तिथुन कुणी पळून जाणं शक्यच नव्हतं. नैसर्गिक परिस्थितीच तशी होती. हे जेल फार वर्षांपूर्वी वापरण्यात येत असे. आता ते म्युजियमच्या रूपात दाखवण्यात येते. ज्याला ही कल्पना सुचली असेल त्याचे मनोमन कौतुक आणि वाईटही वाटले. या जेल पहाणी टुर संपल्यावर घरी वापस जाण्याआधी जेवण करायचे ठरले. नीलचा मित्र तिथे जॉइन होणार होता.

    दिवसभराच्या भटकंतीनंतर ठरलेल्या हॉटेलवर नील सगळ्यांना घेऊन गेला. त्याच्या मित्राला यायला अजुन वेळ होता आणि जेवायचीही वेळ झाली नसल्याने त्याने मसाला चहा आणि पिझ्झा ऑर्डर केला. कांदा, टोमॅटो, सिमला मिर्च, बेबी कॉर्न, चीज घातलेला रंगीबिरंगी पिझ्झा समोर आल्यावर सगळ्यांच्याच भूक खवळल्या. पण नंतर जेवायलाही भूक ठेवायची होती. त्यामुळे एकच लार्ज पिझ्झा मागवला होता. इंडियन चवीपेक्षा जरा वेगळा पण तरी चटकदार असल्याने तो झटकन संपला. मसाला चहाचे घुटके घेत गप्पा मारत मोठे लोकं बसुन राहिले. मुलं प्लेईंग झोनमधे खेळायला आणि चहा संपल्यावर नील राघव हॉटेल भोवती चक्कर मारायला गेले. जानकी मुलांकडे वळली, आबा स्वरुपा आजुबाजूचे न्याहाळत गप्पा मारत बसले. ठरलेल्या वेळाप्रमाणे त्याचा मित्र बायको मुलांना घेऊन आला. जेवणाचे टेबल बुक केले होते तिथे सगळे जाऊन बसले. मुलांना मुलं मिळाल्यावर त्यांच्या बालसुलभ गप्पा सुरु झाल्या. बायकांचे त्यांचे विषय चालू होते. नीलने आधी ऑर्डर सांगू मग गप्पा मारू असे म्हणुन मेनूकार्ड बघत कुणाला काय खायचं आहे ते विचारू लागला. पुरुष्यांनी वाईन मागवली. जानकी म्हणाली इथे मालावी शॅंडी मिळते. ती आमच्यासाठी मागव.”

   “ अगं जानकी, मी काही पिणार वगैरे नाही हं ” स्वरुपा जरा ठामपणे म्हणाली.

   “ नाही हो आई, आपलं रसना लिक्विड असतं ना तसच हे बर्फावर टाकून केलेले असते. छान लागते. पिऊन तर बघा.”

   मग स्वरुपा तयार झाली. नीलने मालावी शँडी, वाईन, कोक, तळलेले काजू, शेंगदाणे, ड्राय मंचुरीयन मागवले. वेटर ऑर्डर घेऊन गेला. नीलचा मित्र बॉटनीचा प्रोफेसर होता. मग त्याच्या आबांच्या छानच गप्पा सुरू झाल्या. नील, राघव ऐकत काही प्रश्न विचारत होते. राघवांच्या हिरव्या स्वप्नासंबधात ही माहिती कामी येणार होती. स्वरुपलाही त्यात इंटरेस्ट आला ती ही आता या विश्वाशी जोडली जाणार असल्याने कान देऊन ऐकू लागली. मधे नीलने परत सर्वांना जेवणाचा मेनू ठरवा म्हणुन सांगितल्यावर वेगळी चर्चा सुरू झाली. मग सुशी कोकोनट, मिल्ककरी, आमरसभात, मॅश पोटॅटो, ट्यूबा सॅलेड अशी ऑर्डर दिली. यथास्थित जेवल्यावर सगळे घरी परतले. 

    दुसऱ्या दिवशी सांताक्रुझ बीच पहायला जायचे होते. तिथले मुख्य आकर्षण म्हणजे सांताक्रुझ बोर्ड वॉक. ते म्हणजे लाकडी फळ्यांपासून तयार केलेली पायवाट. समुद्राच्या पश्चिम तटावर सगळ्यात जुने अम्युजमेन्ट पार्क आहे. ‘ मोंटरी बे नॅशनल मरीन सेंच्युरी ’ येथील एक मैल लांबीचा अत्यंत सुंदर बोर्डवॉक आहे. कुणाच्यातरी स्वप्नांच्या वाटेवरून चालण्याचा आनंद घेऊ लागले. कल्पकता व सौंदर्याचा उत्कृष्ट मेळ तिथे साधला होता. तीन दिवस मजेत घालवल्यावर नीलचा निरोप घ्यायच्या वेळेस त्याचा मित्र भांबावून गेला. सगळ्यांना जरा जड वाटले. स्वरुपाने त्याच्या मुलांसाठी काही गेम आणले होते, ते दिले व एकमेकांचा निरोप घेऊन ते परत लॉस एंजलीसला आले. नीलने परत दोन दिवस विश्रांती घेऊन अजुन एक टुर आखला होता. आता भारतात जायचे दिवसही जवळ आलेले. एक दिवस विश्रांती घेऊन मग बॅगा भरायच्या आणि प्रत्येकासाठी गिफ्ट घेऊन झाले का ते ही चेक करून घ्यायचे असे ठरले. ठरलेल्या प्रमाणे दोन दिवस घालवून तिसऱ्या दिवशी फॅमिली, मजा करायला बाहेर पडली.

   आज मालिबू समुद्रावर भटकंती करून मग लॅक्मा म्युझियमला जायचे होते. मुलं जरा नाराज झालेले कारण त्यांना समुद्रात जास्ती खेळायला मिळणार नव्हते. लॅक्मा म्युजियम बरेच मोठे असल्यामुळे ते बघायला खुप वेळ लागणार होता. सकाळी सगळं आवरून पोहोचेपर्यन्त आठ वाजलेच. मालिबू बीच, लॉस एंजलीस शहराच्या पश्चिम तटावर आहे. हॉलीवूड सुपरस्टारचे बंगले, अत्यंत धनाढ्य श्रीमंती वैभव असलेल्या बीचवर तुम्ही कितीही वेळ घालवू शकता. त्या समुद्राचं वैशिष्ट म्हणजे अत्यंत मोठमोठ्या लाटा इथे उसळत असतात. ज्यांना सर्फिंग आवडते त्यांच्यासाठी तर ते नंदनवन. मनाला आवर घालुन तिथुन बाहेर पडणं अतिशय कष्टदायक झालं, पण पुढचही आकर्षण होतच. मग त्या ओढीने सगळेच तिथुन बाहेर पडले. एका बाजूला टेकडीवरची धनाढ्य पुत्रांची घरं दारं कसले, राजवाडे कितीतरी अंतरापर्यन्त दिसत होते. अत्यंत निसर्गरम्य, निळं पाणी डोळ्या-मनातून साठवतच त्या दृष्यातून बाहेर आलो. राघव, आबा या हिरव्या कलावंतांचं मन त्या निळ्या निळाईत डुंबून गेलं होतं. बस एका भव्य इमारतीसमोर थांबली. आत गेल्यावर तिचे कलात्मक रूप उलगडू लागले. पेंटिंग्ज, देशोदेशीचे जॅपनीज, कोरियन, अमेरिकन पुराण वस्तूंचा व मिनीएचर्स, मुर्त्यांचा संग्रह होता. आपली कला, कल्पना तिथे प्रकट केलेल्या माध्यमातून दिमाखात उभ्या होत्या. हजारो पर्यटक ते अद्भुत कलेचे विश्व पाहून त्यांच्या आनंदात सहभागी झालेले. दिवस कुठे उगवला आणि कुठे मावळला याचा पत्ताच लागला नाही. त्या भव्य कलात्मकतेने प्रत्येकाच्या मनात त्या कलाकरांविषयी कौतुकाचा भाव उत्पन्न झाला होता.

     टूर संपला. राघवांनी आता नीलला फिरणं पुरे म्हणुन सांगितलं. आबा थकले होते. “ बाबा, आता फक्त एकच दिवस. मग आपलं जवळ जे होते ते बघून होईल. दोन दिवस आराम करा मग एकच दिवस भटकू. पुढचा पुर्ण आठवडा आराम, गप्पा, विश्रांती. फक्त आपण आपली मजा करू.” नीलचं मन मोडणं सर्वांच्याच जीवावर आलं. दोन दिवस आराम करून तिसऱ्या दिवशी परत सकाळीच बाहेर निघाले. आधी सांतामोनिका पिअर, आणि नंतर युनिव्हर्सल स्टुडिओ पहायचे ठरले होते.

     सांतामोनिका पिअर अनेकविध प्रकारांनी सजलेले होते. पॅसिफिक पार्क, दुकानं, अक्वेरिअम, कसरतींचे खेळ, दुर्मिळ दगडांची दुकाने, डान्सपब, सायकलिंग, खाणेपिणे, नाना प्रकारचे मनोरंजन तिथे उपलब्ध होते. तरुणाईची झिंग व निसर्गाचे अवलोकन अश्या दोन्ही गोष्टी एन्जॉय करता येत होत्या. राघवांच्या मनात आलं माणसाकडे फक्त पैसा आणि हौस पाहिजे. मग सगळं जग अनुभवता आणि उपभोगता येतं. तिथे जेव्हढी मजा करता येईल तेव्हढी मजा करून नीलने युनिव्हर्सल स्टुडिओला आणले. तिथे पुर्ण सेट तयार करून ठेवलेले आहेत. हॅरीपॉटर, डिस्नेलॅंड परीकथांचे विश्व उभारून तिथे शुटींग केले गेले. तिथे अद्भुत विश्वात शिरल्याचा भास होत होता. ट्रीपचा शेवटचा टप्पा पार पडला. नीलच्या मते अजुन काही बघता आलं असतं पण थोडक्यात आणि महत्वाचं तसं बरच बघुन झालं असल्याने खुप मजा आली. सगळ्यांच्या तब्बेती सांभाळून पार पडलं होतं.

     त्या रात्री झोपताना नीलला आपण आपल्या आई बाबा, आबांसाठी काही केलं या समाधानाने छान झोप लागली आणि त्या तिघांना अमेरिकावारी छान पुर्ण झाली व नीलही आपल्या येण्याने आनंदला त्याची इच्छा पुर्ण झाली या समाधानाने त्यांनाही झोप लागली. असे समाधानाचे क्षण फार थोडे असतात. पण जे असतात ते मात्र अगदी भरभरून जगुन घ्यावे. राघवांनी डोळे मिटले. आपलं हिरव्या जगाचं समाधान, एक पाऊल पुढे सरकल्यासारखे त्यांना जाणवत होते.

                                                                                        .................................................