Swpnasparshi - 10 in Marathi Moral Stories by Madhavi Marathe books and stories PDF | स्वप्नस्पर्शी - 10

स्वप्नस्पर्शी - 10

                                                                                   स्वप्नस्पर्शी : १०

      दुसऱ्या दिवशी राघव दिवाळीला थांबणार आहेत हे कळाल्यावर सगळं घर आनंदलं. राघवांनी मधुरला फोन करून सांगितलं तेव्हा प्रथम तो हिरमुसला, पण त्यांनी त्याची समजुत काढली. “ मधुर, आता हे नेहमीच चालत रहाणार. पुणं, गुहागर, कधी इथे, अशीच कुठे कुठे दिवाळी होत रहाणार. तू फक्त असं कर, धनतेरसला आपल्या घरी लक्ष्मीपुजन करून घे, आणि मग इकडे या. म्हणजे आपली नेहमीची पुजा चुकली असे व्हायला नको. आजी आजोबा आता थकलेत. मला आता जरा वेळ आहे तर त्यांच्या मनासारखं करूया.”

      मधुरला त्यांचं म्हणणं पटलं. तिकडे स्वरुपा, आईला मसाज कसा करून द्यायचा हे पद्माला शिकवत, हलके आसनं त्यांच्या कडून करून घेत होती. नाष्टा झाल्यावर आबा आणि राघव बँकेच्या कामाला बाहेर पडले आणि आई, स्वरूपानी बायकांना कामाला लावून घर साफसफाई सुरू केली. मधुर येणार म्हणल्यावर एका बाजूची बंद रूम उघडून झाडपूस सुरू झाली. दिवसभर दारं, खिडक्या, कपाट, उघडे ठेऊन डबलबेडची गादी उन्हात वाळवायला ठेवली. आईंच्या देखरेखीखाली संध्याकाळ पर्यन्त घर आरश्यासारखं लख्ख दिसू लागलं. आता फक्त शिसवी खांबांना, दारं खिडक्यांना तेलपाणी करायचं राहिलेलं, ते काम उद्या गडी संपवणार होते. आईंना श्रम झालेले पण पद्मानी केलेल्या हळुवार मसाजाने अंग हलकेही जाणवत होते. मुख्य म्हणजे तिचे मन आनंदाने भरून गेलेलं, दुखण्यामुळे आपण कुणावर बोझ बनू नये या इच्छेने आईनी बाकी सर्व इच्छा मारल्या होत्या. बायकांमध्ये तीर्थयात्रेचा विषय निघाला की त्यांच्या मनात ते राहून गेल्याची बोच व मन मारून जगत असल्याची भावना मनात येई पण त्यातून लवकरच ती बाहेर पडत असे. बाह्यजगाची दुखः पाहून कळवळणाऱ्या मनाला सगळ्यांना सगळं मिळत नाही याची जाणिव करून देत असत व आपल्याकडून जेव्हढं लोकांचं दुःखं हलकं करता येईल ते करून त्या समाधानी रहात होत्या. पण राघवांच्या कालच्या बोलण्याने त्यांना बराच धीर आला. अशीही आपण शारीरिक वेदना सहन करतच आहे तर मनाच्या वेदना तरी कमी होतील. इच्छाशक्तीच्या जीवावर मोठमोठी कामं होतात तर आता आपणही ह्या सगळ्या गोष्टी इच्छाशक्तीने तारून न्यायच्या. ह्या विचाराने आणि चार भिंतीच्या बाहयजगाच्या चाहुलीने त्यांचं मन आनंदाने भरून आलं होतं. स्वरूपालाही ही गोष्ट लक्षात आली, त्यामुळे त्यांना कष्ट पडू नये म्हणुन तिने सगळ्याच जिम्मेदार्या आपल्या अंगावर घेतल्या. आईंना, तुम्ही फक्त काय काम करायचं ते सांगा असा मुख्य अधिकार त्यांच्याकडे ठेऊन, खुष करत त्या म्हणतील ती कामं उरकत होती. वासूही त्या दोघींना आनंदाने मदत करत होता. त्यांच्या चेष्टा मस्करीने सगळेच हसत होते. जेवायच्या वेळेपर्यंत आबा, राघव आले.

     जेवताना आबा म्हणाले “ वासू, संध्याकाळी तू आलास की आपण सगळे मिळून बाजाराची लिस्ट करू आणि उद्या सामान आणून टाकू.” “ हो चालेल आबा. यावेळेस एकदम धुमधडाक्यात दिवाळी साजरी करायची. दादा किती वर्षांनी दिवाळीला आपल्या बरोबर आहे. त्याच्या निमित्ताने मुलही इकडे येणार.” वासुला मुलांचा फार लळा होता आणि मुलांना त्याचा.

    “ वासू, आज रात्री मी तुझ्याबरोबर शेतावर झोपायला येणार आहे.”

    “ अरे वा, जरूर. आज पोर्णिमा आहे. खुप भुतं तुला भेटायला येतील.” खो खो हसत वासू म्हणाला. लहानपणी सगळ्या मुलांना भुताच्या गोष्टी सांगुन तो नेहमीच घाबरवून सोडत असे. त्याच्या बालभावाने सगळेच हसू लागले. राघव म्हणाले “ आता मी भुतं उतरवणारा आहे वासू.”

    “ बरं बरं, बघूया.” सगळ्यांचा निरोप घेऊन वासू दुपारची कामं संपवायला शेतावर गेला. राघव, आबा झोपायला गेले. चहाच्या वेळेस पुढच्या दिवसांचं प्लॅनिंग करायचं ठरलं. स्वरुपा, आई, बाकी बायका थोडी विश्रांती घेऊन परत कामाला लागल्या. आज साफसफाई संपवायचीच होती. उद्या सामान आलं की निवडणं, टिपडणं, फराळाच्या तयाऱ्या सुरू होणार होत्या.

     पडल्या पडल्या राघव विचार करू लागले. किती छान वाटतय उन्मुक्त, निर्बंध आयुष्य. कशाचा ताण नाही. डोक्यावर बॉस नाही. कामाची धांदल, हाताखालच्या लोकांच्या मुजोर्या, टार्गेट, प्रोजेक्ट, अपमान, कधी सुस्ती, टुर्स, शारीरिक धावपळ, मानसिक थकवा, सगळं आता थांबलं. पण तेही त्या वयात आवश्यकच होतं. पैसा कमवायचा तर हे सगळं सहन करावच लागतं, आणि ते सहन केलं म्हणुन पैसा, करियरचा आनंद, पद प्रतिष्ठा मान सन्मान सगळंच मिळालं. आता निवांत क्षण वाट्याला आले. पण आपण करियरही छान एन्जॉय केलं. टार्गेट कंप्लिट झाल्यावरचा आनंद, पार्ट्या, मजा यायची. प्रोजेक्ट आखताना, तयार करताना दिवस रात्रीचं भान नसायचं. कामाची झिंग असायची. मग त्या यशस्वीतेबरोबर मिळालेले बक्षिस, पगारवाढ सगळच आनंददायक होतं. त्या त्या वयात ती ती गोष्ट आवश्यकच असते. विचारातच राघवांचा डोळा लागला. “ अहो उठता का ? आबा थांबलेत चहासाठी.” स्वरूपाचा आवाज ऐकून राघवांना जाग आली. थोडं झोपावं असं क्षणभर वाटून गेलं. पण आता काही झोपायला चान्स नव्हता. उठून फ्रेश होऊन ते डाइनिंग टेबलपाशी बसले. रखमाने चहा, बाखरवडी, बिस्किटं आणून ठेवली. आबा म्हणाले “ राघवा, उद्या सकाळी बँकेचं काम संपवू. मग दुपारी वासू आणि तू दिवाळीची खरेदी करून या. परवा आपण शाळेत, हॉस्पिटलला जाऊन देणगी देऊन येऊ.”

   “ होय आबा. आता आपण जेव्हढं पटापट आटोपतं घेऊ तेव्हढी आपल्याला नंतर मोकळीक मिळेल. मग मुलांबरोबर मजाही करता येईल. मधे एक दिवस मोकळा ठेवू आणि तिसऱ्या दिवशी आधी ग्रामदेवतेला जाऊन मग तुळजाभवानीचा प्लॅन ठरवू. एनजीओच्या मित्राला फोन केला होता, आपण एव्हढी देणगी देणार म्हंटल्यावर त्याला फार आनंद झाला. चेक घ्यायला आणि तुम्हाला भेटायला तो स्वतः येणार आहे. आपण गावाहून आल्यावरच त्याला घरी बोलवतो.”

    “ उत्तम. मग सगळं ठरलं तर.” आबा.

    “ राघवा, एक काम करशील ? वासुला पण आपल्याबरोबर देवदर्शनाला यायला लावशील ?” आईचा आर्जवी स्वर ऐकून राघव चमकले. “ होय आई. मी आजच त्याच्याशी बोलून घेईन.” त्यांच्या लक्षात आलं आबा, आईचा वासुवर फारच जीव आहे. त्याचं गाडं मार्गी लागेपर्यंत त्यांच्या जीवाला चैन पडणार नाही. वासू वरवर हसरा चेहेरा ठेऊन वावरतो पण आत नक्की कुठेतरी पाणी मुरतय.

     गप्पा मारता मारता संध्याकाळ झाली. वासू आल्यावर परत एक चहाची फेरी झाली. रखमाला संध्याकाळच्या स्वैपाकाचा बेत सांगून स्वरूपाही कागद पेन घेऊन बसताच आई म्हणाली “ आधी तुम्हाला काय काय दिवाळीचे पदार्थ पाहिजे ते ठरवा. मग त्याप्रमाणे यादी करता येईल.” आईने असे म्हणताच राघवांना एकदम लहान मुलासारखं वाटू लागलं. लहानपणी आईने दिवाळीचे पदार्थ विचारले की घरात असलेले सात, आठ मुलं मला हे, मला ते असे ओरडू लागायचे. ते आठवून राघव हसू लागले. वासुनेही खोडकरपणे हसून त्यांना साथ दिली. आई, मला चकली. राघवही मला शंकरपाळे असे म्हणताच आई, स्वरुपा हसू लागल्या. मग चिवडा, चिरोटे, शेव, बुंदीचे लाडू, बेसनाचे लाडू, नारळाच्या वड्या, अनारसे करायचे ठरले. आल्या गेल्यांसाठी, शिवाय गावात एकमेकांकडे फराळाची ताटं पोहोचवायची पद्धत होती, त्यासाठी मुरमुर्याचा चिवडा, रव्याचे लाडू, खारी बुंदी करायची ठरली. त्याप्रमाणे लागणाऱ्या सामानाची यादी स्वरूपाने लिहून काढली. “ आबा, घरावर लाइटींग करायला माणसाला सांगुन ठेवतो. आकाशकंदिलही या वेळेस मोठा आणणार आहे. मुलं आल्यावर आम्ही मिळून अंगणात किल्ला, आणि देखावा करणार आहे. ते आल्यावर त्यांच्या आवडीचे फटाके आणू.” वासूचा उत्साह नुसता सळसळत होता. एव्हढा रसिक भाऊ. का बरं संसारसुखाला वंचित राहू इच्छित असेल ? राघव विचार करू लागले. “ आबा, आणि आम्हाला दिवाळीला कपडे ?” वासूच्या या खोडकर प्रश्नावर आबांना आतून हसू फुटलं. त्यांचा रिवाज ठरलेला होता. दिवाळीला सगळ्या घरादाराला ते नवीन कपडे करत असत. “ हा तर मोठा कार्यक्रम बाकी राहिला आपला.” स्वरुपा म्हणाली.

     “ आबा, दरवर्षी तुम्ही सगळ्यांना कपडे करता. या वर्षी ते काम मला करू द्या. तुमच्याकडून बाकी मोठी कमाई सगळ्यांना मिळणार आहे तर यावेळेस हे थोडे पुण्य मला मिळू द्या.”

   “ चालेल राघवा, तुझ्या मनाप्रमाणे होऊ दे.” “ राघवा, मी पण येणार आहे हं खरेदीला. आधीच सांगुन ठेवते. आईचे हे वाक्य ऐकताच सगळे चकित झाले. जीवनाला नाकारून बसलेल्या आईमध्ये जीवनरस तयार होत आहे हे बघून आबांना भरून आलं. वासू तर आईला जाऊन बिलगलाच. त्यानी किती प्रयत्न केले होते आईला घराच्या, भिंतीच्या बाहेर काढण्यासाठी. यावेळेस दिवाळी खरच संस्मरणीय होणार असे दिसत होते.

      “ वासू यावेळेस भाऊबीजेला माझ्या सगळ्या लेकीबाळींना आमंत्रण दे रे.”

      “ होय आई. उद्याच सगळ्यांना फोन लावतो.” वासू डोळे पुसत म्हणाला.

      “ दादा, तू सगळ्यांना कपडे करणार तर माझेही पैसे त्यात घालुन बहिणींना शालू दिले तर ?”

      “ हो. चालेल ना.” राघवांच्या या बोलण्यावर मग शालू किती लागतील याचा हिशोब सुरू झाला. तशी स्वरुपा म्हणाली “ घरातल्या सगळ्यांसाठी शालू घेऊ, आणि कामवाल्यांसाठी डिझायनर साड्या घेऊ. त्यांना त्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो.” बरोबर आणलेली एक डिझाईनर साडीही तिने दाखवली. जरदोजी आणि मोती वर्क केलेली साडी या बायकांना अप्रुपाची होती. मग अश्या किती साड्या, शालू, शर्ट पॅन्ट, मुलींचे सलवार कुर्ती, आबा, मधुर, राघव, वासू, दोन जावई, यांच्या शेरवान्या, अशी यादी सुरू झाली. ती लंबी चौडी लिस्ट पाहून आबा म्हणाले “ अरे ! कुणाचं लग्न करताय की काय ?”

     “ एव्हढी तयारी चालू आहे तर वासुचच लग्न लाऊन टाकू. काय वासू ?” त्यावर वासू कसनुसं हसला. ते पाहून सगळ्यांच्याच मनात कालवाकालव झाली. तसे सांभाळून घेत आबा म्हणाले “ वासू मधे नाना आला होता ना, तेव्हा आपण कसे इस्टेटीवर बोललो ते राघवला सगळे सांगितले. घर तुझ्या नावावर करेन.”

     “ माझ्या नावावर कशाला आबा. हा दादाचा हक्क आहे.”

     “ अरे वासू, मी कुठे इथे येऊन राहणार आहे. थोडे दिवस येईन तेव्हा तू काय नाही म्हणशील की काय ?”

     “ दादा, असं काय बोलता. सगळं तुमचच आहे.”

     “ वासू तू पण माझा आहेस. आई आबांची इच्छा आपण नेहमीच मानत आलो आहोत ना. ही तर त्यांच्या मनातली गोष्ट आहे. आईच्या मनात सामूहिक विवाह लाऊन द्यायचे पण आहे. ते कसे करूया ?”

     ही कल्पना वासुलाही आवडली. सामाजिक कार्यात तो नेहमी पुढे असायचा. “ ही तर छानच कल्पना आहे. उद्याच सरपंच्यांच्या कानावर ही गोष्ट घालुन ठेवतो. असा गावसोहळा सगळ्यांनाच खुप आवडेल.”

    “ बापरे, एव्हढी सगळी कामं, आणि इतके कमी दिवस. कसं होणार हे ?” स्वरूपाच्या चिंतेच स्वरूप खरं होतं. पण आबा म्हणाले “ पोरी, इकडे शहरासारखं नाही. सगळी कामं आपल्याला करावी लागत नाही. गावाकडे टीमवर्क असतं. फराळाची पण तू चिंता करू नको. रखमाला फक्त त्याची यादी वाचून दाखव. ती चौघांना हाताशी घेऊन छान फराळाचं बनवते. गडी सगळं सामान आणून टाकतात. मला वाटलं होतं तेव्हढच राघव गाव फिरेल. ओळखीच्यांशी बोलेल. म्हणुन त्याला जा म्हणलं.”

      “ आबा, स्वरुपा काही काळजी करू नका. काही कमी पडलं तर विकत आणु. कसलही टेंशन न घेता दिवाळी साजरी करू.” राघवांच्या बोलण्याने स्वरुपाला शांत वाटलं.

      रखमानी टेबलावर जेवण मांडून ठेवलं. बाजरीच्या गरमा गरम भाकरी, वांग्याचं भरीत, कांदा लसूणाची खमंग चटणी, वरणभात, नागलीचे पापड, गडगीळं. बेत पाहून राघव, वासू खुष झाले. दोघांनाही गडगीळं फार आवडायचे. लहानपणी आईजवळ, आजीजवळ हट्ट धरून बसायचे. आपण सध्या लहानपण उपभोगतोय हे दोघांच्याही लक्षात आले. आईच्या तालमीत रखमा स्वैपाकात एकदम तरबेज झाली होती. चवदार जेवण झाल्यावर वासू, राघव शेतावर जायला निघाले. तशी स्वरुपाला जरा काळजी वाटली. “ अगं, त्यात काय वासू नाही का नेहमी झोपायला जात. मलाही कधीची लहानपणीसारखी शेतावर झोपायची इच्छा होती. आता ती अनायसे पुर्ण होत आहे.”

     जीपमध्ये बसुन दोघं शेतावर जायला निघाले. गावाबाहेर गाडी आल्यावर शांत, निवांत गार वारा तनामनाला स्पर्शून जाऊ लागला. खरच काय हवं असतं मनुष्याला जीवनात ? एव्हढी दुःखं तो स्वतःच निर्माण करतो आणि नंतर निस्तरत रहातो. खरच निसर्ग अनुभवत माणूस जगला तर फार कमी दुःखांना सामोरं जावं लागेल. राघवांना गप्प पाहून वासू म्हणाला “ दादा काय झालं ? गप्प का ?”

    “ काही नाही रे. किती सुंदर गार वारं आहे. ते अनुभवत आहे.”

    “ दादा, तुम्ही दिवाळीला थांबलात फार छान झाले. किती दिवसांनी आबा, आईला इतक्या आनंदात पहातोय. मी मुलासारखी काळजी घेतो त्यांची. ते ही मुलासारखच प्रेम करतात पण शेवटी कुठेतरी आतली ओढ वेगळीच असते.”

     “ नाही रे वासू. उलट तुम्हा तिघांची एकमेकांबद्दलची ओढ पाहून खरच खुप कौतुक वाटतं.आजच्या जगात पहातोस ना किती वृद्धाश्रम उघडत आहेत, आणि तू तुझ्या काका काकुवर आईवडिलांसारखं प्रेम करतोस.”

     “ दादा, पैसा सगळं काही नाही. पाठीवर कौतुकाची थाप द्यायला तुझ्यासारखा दादा हवा. आई गेल्यावर पोटच्या पोरासारखी सांभाळणारी काकू आणि बायको गेल्यावर जीवनरस निघून गेलेल्या बाबांना परत माणसात आणणाऱ्या काकांवर कोण प्रेम करणार नाही ?”

     “ वासू, तू पण खुप लाघवी आणि जगन्मित्र आहेस.” वातावरण हलकं करत राघव म्हणाले.

    “ अरे ! आधी लक्षात नाही आलं. आपण मस्त पान खाल्लं असतं.”

    “ दादा, इथे कितीतरी ढाबे आहेत. चला आज तुम्हाला तिथलं मस्त आइसक्रीम खाऊ घालतो आणि पानही.”

     दोघं गप्पा मारत एक ढाब्यापाशी थांबले. कोल्हापूर जिल्हा हा दही, दुध, तूप, गुळ नानाविध शेती मेव्याने भरलेला होता. त्या धाब्यावर कॉर्नरला बरीच गर्दी होती. “ दादा चला तिथे. ते आइसक्रीम तयार करताना सुद्धा पहाण्यात मजा आहे. गर्दी कमी झाल्यावर त्यांना समोर जागा मिळाली. एका मोठ्या थरमाकॉल बाउलमध्ये तो किसलेला बर्फ टाकत होता. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्यांमधुन बर्फावर ते सीरप छिडकले. मग मिल्कक्रिमचा बॉल त्यावर ठेवला. काजुबदामाची रेलचेल उधळून चॉकलेट सॉसची सजावट त्यावर केली आणि तो एव्हढा मोठा आइसक्रीम बाउल त्यांच्या पुढ्यात ठेवला गेला. राघव तर ते पाहूनच हबकले. जेवल्यावर एव्हढे मोठे आइसक्रीम कसे खाणार ? पण वासुला आइसक्रीम हादडताना पाहून त्यांनीही खाणे सुरू केले. अप्रतिम चव. अमेरिकेचे किंवा बाकी नाना प्रकारच्या चवींचे आइसक्रीम त्यांनी खाल्ले होते, पण हा प्रकार त्यांना फारच आवडला. “ वासू, स्वरुपा, मुलांना घेऊन इथे नक्की यायचं हं.” “ दादा, मुलांना हे माहित आहे. आम्ही इथे नेहमीच येतो. तुम्ही मोठ्यांचा गोतावळा बाहेर पडत नाही.”

    “ खरय रे. पण दोन तीनं दिवसांसाठी आल्यावर त्यांच्यामधुन निघणं मला शक्य नसायचं. प्रत्येकाच्या अपेक्षा पुर्ण करता करता माझं काही जगायचं राहूनच गेलं असं वाटत. पण हरकत नाही. आता जगुन घेऊया.” हसुन दोघं चवीने आइसक्रीम खात बसले. नंतर त्या ढाब्यावर पानाच्या दुकानात दोन मसाला पानं पॅक करून घेतली. इतक्या छान आईस्क्रीमच्या चवीवर पान खाणं शक्य नव्हतं.

    दोघं दहा मिनिटात वावरात पोहोचले. वासुनी तिथे स्वतःसाठी तीन रूम काढलेल्या, आणि त्याच्या सोबत गड्याला दोन रूम एका बाजूला बांधून दिल्या होत्या. तिथे तो कुटुंबासह रहात असे. अंगणात दोन खाटा, अंथरूण, पांघरुण मच्छरदाणीसह तयार होत्या. त्यांना पहाताच विष्णू समोर आला. थोडावेळ जुजबी गप्पा मारून निघून गेला. राघव, वासू कपडे बदलून आपापल्या मच्छरदाणीत शिरले. उशीशेजारी टॉर्च आणि पाण्याची बाटली ठेवली होती. इतकं व्यवस्थित सगळं जागच्या जागी पाहून राघव चकित झाले. निळ्याकाळ्या आभाळातल्या चंद्र चांदण्यांखाली झोपण्याची इच्छा किती वर्षांनी पुर्ण होत होती. चंद्राचा दुधी प्रकाश, हवेतला गारवा, अधुन मधुन एखाद्या पक्षाची शीळ, रातकिडयांची किरकिर, समोर दाण्यांनी भरलेल्या कणसांच शेत, त्या अद्भुततेत राघव विरघळू लागले. पण लवकरच ते भानावर आले. बरोबर वासू होता. तो काहीतरी विचारत बोलत होता. मग त्यांच्या अघळपघळ गप्पा सुरू झाल्या.

      राघवांनी वासुला हळूच विचारले “ वासू एक विचारू ? खरं सांगशील ? तू लग्न का करत नाहीस ?”

     “ तसं काही नाही दादा. मला त्यात अडकायचं नाही.”

     “ वासू, हे खरं उत्तर नाही हे तुलाही माहित आहे आणि मलाही. माझ्याजवळ मन मोकळं करणार नाहीस का ?”

     हे ऐकताच वासू ढसढसा रडू लागला. त्याच्या आतल्या कप्प्याला कुणीतरी मायेने स्पर्श केला होता. ती जखम उघडी पडली, तरी त्यावर कुणी हसणारं चिडवणारं इथे कुणी नव्हतं. जमलं तर त्यावर हळुवार लेपच लावला जाईल. हे त्याला माहित होतं. राघव पटकन उठून त्याच्याजवळ गेले. त्याला कुशीत घेत त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागले. का आपण आपल्या भावाकडे लक्ष दिले नाही ? याचाच त्यांना राग येऊ लागला. हळूहळू तो शांत झाला. राघव आपल्या बिछान्यात येऊन बसले. पाणी पिऊन जखमी स्वरांनी वासू बोलू लागला “ दादा तुझ्या माझ्या वयात बरच अंतर आहे. तू जेव्हा शाळा कॉलेजमधे पहिला यायचास तेव्हा आबा सगळ्यांना पेढे वाटायचे. मग माझ्या नजरेसमोर पेढे आणि तुझं होणारं कौतुक उभं रहायचं. त्यामुळे तुझ्यासारखच आपणही शिकायचं असं त्या वयातल्या मनानी ठरवलं. खुप अभ्यास करायचो. आबा आणि तू ही खुप कौतुक करायचास.   सातवीत गेल्यावर त्यावर्षी बोर्डाची तयारी करायची. खुप चांगले मार्क मिळवायचे आणि तुझ्याकडे शिकायला यायचं असं आबांचं आणि माझं ठरलं होतं. चांगले मार्क मिळावे म्हणुन आबांनी शाळेत नवीन आलेल्या तरुण सरांकडे ट्यूशन लाऊन दिली. सुरवातीला सगळं व्यवस्थित होतं. पण नंतर त्यांनी मला एकट्याला बोलवायला सुरवात केली. तू हुशार आहेस. तुझ्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे असे करत ते बोलवून घेत. शिकवताना माझ्या अगदी जवळ येणं, गणित बरोबर आलं की कुशीत घेऊन कौतुक करणं, चूक झाली की दोन्ही गाल ओंजळीत घेऊन हलकेच दाबणं असं सुरू झालं. नंतर त्यांची मजल वाढत गेली. माझ्या अंगाशी नाही नाही ते चाळे करायला सुरवात केली. वय लहान. काही कळेना. कुणाशी बोलता येईना. वरून त्यांनी धमकी दिली कुणाला काही सांगितलस तर नापास करून टाकेन. सातवी पर्यन्त मानाने पास होत असल्याने नापास या कलंकाला सामोरं जाण्याची कल्पनाही करवेना. मानसिक ताणाने मी आजारी पडू लागलो. ट्यूशन चुकवू लागलो. काहीतरी गडबड आहे हे आबांच्या लक्षात आले. त्यांनी खोदून खोदून विचारल्यावर मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. संतापलेल्या आबांनी शाळा गाठली. हेडमास्तरांकडे तक्रार करून पोलीसांकडे प्रकरण नेण्याची धमकी दिली. तसा तो मास्तर गाव सोडून पळून गेला. पण माझं मात्र आयुष्य उध्वस्त करून गेला. मी त्या वयातच ठामपणे आबांना सांगुन टाकलं की मी पुढे शिकणार नाही. त्यांनी तेव्हा मला काही मनाई केली नाही नंतर बघू म्हणुन सोडून दिलं. पण काही काळाने बारावी पर्यंतचे शिक्षण घ्यायला लावले. पण माझं मन कधी नंतर त्यात रमलं नाही. माझी हुशारी शेतीत, व्यवहारात लावली. नाना पद्धती हाताळल्या. शेतकी अवजारं दुरुस्तीमधे पंचक्रोशीत माझा कुणी हात धरू शकत नाही. माणसं कशी पारखावी, जोडावी, कुठे अलगद बाजूला सारावी हे मला चांगलं अवगत झालं. कुणाच्याही मदतीला जाणं, मित्रत्व, आदर यांचं योग्य भान ठेऊन जगन्मित्र बनलो. दादा, पण अजुनही ती लहानपणाची आठवण आली की काळजात कळ येते रे.”

   “ वासू, एव्हढं सोसलस. कधी बोलला नाही रे मला. एव्हढं परकं केलस का रे ?”

  “ नाही दादा, पण आबांची शिकवण होती आपलं दुःखं कुणाजवळ मांडत बसायचं नाही. समोरच्याला त्या दुःखाची तीव्रता कळली नाही तर तो एक तमाशा होऊन बसतो. आबांनी खुप जपलं मला. ही गोष्ट माझ्या वडीलांनाही माहीत नाही.”

  “ वासू, पण झालं ते झालं. ती गोष्ट आता तू काय जन्मभर कवटाळून बसणार आहेस ? लग्न का नाही करत ?

  “ दादा, त्या प्रकाराने माझं मानसिकच नाही तर शारीरिक नुकसानही झालेलं आहे. आलेल्या कमजोरीने मी काही करायला असमर्थ आहे.”

  “ हे कुणी ठरवलं ? तुझं तूच ना ? अरे विज्ञान, औषधशास्त्र एव्हढं पुढे गेलं आहे की भले भले चांगले होतात. तू कधी दवाखान्यात जाऊन आलास का या संदर्भात ?”

  “ बापरे, याचेही दवाखाने असतात ? वासुला बसलेला धक्का पाहून राघवांच्या मनात आशा निर्माण झाली. त्यांना वाटलेलं की हा औषध उपचार करून आल्यावर असे बोलत आहे. त्यांनी समजवणीच्या सुरात म्हंटले “ हो. आणि योग्य औषधाने कमजोरी दुर होऊ शकते. मग तर तुला लग्न करायला काहीच हरकत नाही ना ?”

  तसा वासू लाजला. जणू एक नवी सप्तरंगी वाट आयुष्याला फुटावी असे भाव त्याच्या मनात निर्माण झाले.

   “ वासू, तुझ्या आयुष्यात एकही मुलगी आली नाही असे तर होणं शक्यच नाही. आज तू मला सगळं सांग.”

   “ दादा आपल्या नानी मावशींची वीणा आठवते तुम्हाला ?”

   “ हो. आपल्याच गावात आहे ती. अरे, पण तिचे लग्न झाले आहे ना.”

   “ हो. लग्न झालं होतं, पण वर्षभरातच तिचा नवरा गेला आणि सासरच्यांनी तिला माहेरी पाठवून दिलं. माझी आणि तिची वेव्हलेंग्थ छान जुळली आहे. पण आम्ही दोघं त्या विषयावर येत नाही. कारण मला माझा प्रॉब्लेम माहीत आहे, आणि ती विधवा असल्याने कोण तिला स्विकारणार असे वाटून ती पण घरात हा विषय बोलत नाही. पण आम्ही दोघं एकमेकांना आवडतो. मी जर का औषध उपचाराने बरा झालो आणि आई आबांना अशी सून चालत असेल तर आम्ही आनंदाने लग्न करू. अन्यथा आयुष्यभर अशीच लांबून एकमेकांना साथ देत राहू.”

    “ वासू प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतच. मार्ग असतातच. ते बघायचं सोडून प्रश्नच कवटाळून बसला आहेस. ते काही नाही. आता आधी तुझं काम करायचं. उद्याच आपण पुण्याला जाऊ. घरी सांगू कामाला जातोय संध्याकाळपर्यन्त येऊ. दवाखान्यात दाखवायचं आणि तसच इकडे वापस यायचं. कुणाला काही कळणार नाही. माझ्या मित्राच्या मुलानी यावर संशोधन केलेलं आहे. त्याच्याकडे जाऊ. सकाळीच त्याच्याशी बोलून ठेवतो.”

  “ दादा, इतकी काय घाई आहे ?”

  “ आधीच इतका उशिर झाला आहे. आपल्या थकल्या आई आबांना तुझ्या लग्नाचा आनंद घेऊ द्यायचा की नाही ? वीणा संदर्भात मी आबांशी बोलेन. पण तुझीही इच्छाशक्ती पणाला लाव. औषध उपचारला तीव्र प्रतिसाद दे. वीणा आपल्या आयुष्यात आली पाहिजे ही खूणगाठ बांध. सगळं मार्गी लागेल.”

  वासूच्या मनात बाहेरचं स्वच्छ चांदणं उतरत गेलं. आयुष्यावरचं काळं सावट विरघळू लागलं. आपल्याही आयुष्यात चांगलं काही घडू शकतं या कल्पनेने तो आनंदुन गेला. “ दादा, तुम्ही काय यावेळेस सगळ्यांच्या समस्या सोडवायला आले आहात का ? आईला उभारी दिली. आबांचा पैसा मार्गी लावला. सगळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केलात.”

   “ वासू दुसऱ्यांना आनंद देऊन आपल्यालाही खुप समाधान मिळतं होय ना. तुम्ही सगळ्यांनी आनंदात रहावं एव्हढीच इच्छा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा आपल्याला समस्या येते तेव्हा गप्प रहाण्यापेक्षा ती सोडवायकडे कल ठेवायचा. आता तू संसारात पडशील तर हा माझा मोलाचा सल्ला लक्षात ठेव.”

  आज वासुला झोप येणं शक्य नाही हे राघवांच्या लक्षात आलं. प्रश्न सुटला होता. आता फक्त उत्तरं लिहीत जायची आहेत. “ वासू आता मी झोपतो. तुला तर झोप येणार नाही.” राघवांनी मारलेल्या कोपरखळीने वासू लाजून हसला. “ आठ वाजता आपण पुण्याला जायला निघणार आहोत. त्याप्रमाणे घरी किती वाजता जायचे ते तू ठरव. गुडनाईट.” वासूही गुडनाईट करून झोपी गेला. पण दोघही कुशीवर झोपून, आपण झोपलो असे दाखवत होते. राघव विचार करत राहिले. जगात कोण कोण कुठल्या प्रकाराने दुःखी असतील आणि वासू विचार करत होता का बरं आपण उगाच असं आयुष्य घालवलं ? विचारतच दोघं कधी झोपले त्यांनाच कळाले नाही.

                                                                            .................................................