Devayani Development and Key - Part 19 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग १९

Featured Books
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग १९

     देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

 

 

 

 

 

भाग   १९  

भाग  १८   वरून  पुढे  वाचा ................

 

“अरे पण मला शिक्षा झाली तर मी एकटीच असणार आहे. मग मी काय करू.? मला, तुला सोडून कुठेही जायचं नाहीये” आणि तिने विकासचा हात घट्ट धरला. एखादा  लहान मुलगा घाबरल्यावर वडीलांचा हात जसा घट्ट धरून ठेवतो, तसच काहीसं विकासला जाणवलं. मग मात्र मुळीच वेळ न घालवता त्यानी शीतोळयांना फोन लावला. देवयानी म्हणाली की “स्पीकर वर टाक.”

“हॅलो, साहेब मी विकास बोलतो आहे. जरा चुकीच्याच वेळी फोन केला पण तुम्हाला सांगणं जरुरीचं वाटलं म्हणून कॉल केला.”

“काय झालं? त्याने पुन्हा काही हरकत केली का ?” – शीतोळे

“हो साहेब, त्यांनी देवयांनीला मेसेज केला आहे की ती जर लग्नाला तयार झाली नाही तर तो आत्महत्या करेल आणि देवयानीच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेल म्हणून.” विकासनी शीतोळयांना अपडेट दिलं.

“हूं, आता हे देवयानीला घाबरवून सोडण्यासाठी त्याची ही नवीन चाल दिसते आहे. कसही करून देवयानीनी त्याला हो म्हणावं या साठी हे उद्योग तो करतो आहे असं दिसतंय. हा माणूस आता चवताळला आहे. पण ठीक आहे तुम्ही तो मेसेज मला फॉरवर्ड करायला सांगा देवयानीला. मी बघतो काय करायचं ते.” – शीतोळे 

हे ऐकल्यावर देवयानी थोडी शांत झाली. रडायची थांबली पण मळभ होतच.

“साहेब करतील ना रे सगळं ठीक ?” देवयानीनी विकासला म्हंटलं.

“अग हो तू आता काळजी करूच नकोस. सांगितलं ना त्यांनी, की ते बघतील म्हणून. ते आता यात लक्ष घालताहेत, आणि त्यांना तुझी काळजी आहेच. सांगतीलच  ते, काय केलं त्यांनी ते. मग बघू.” – विकास  

“हूं. कसही  करून हा ससेमिरा सुटला पाहिजे बस. आयुष्य सुरळीत व्हायला पाहिजे.” देवयांनीनि म्हंटलं.

“तथास्तु.”  विकास ने आशीर्वाद दिला.

शीतोळे विकासचा फोन आला तेंव्हा पोलिस स्टेशन मध्येच होते. विकासशी बोलणं झाल्यावर, ते विचार करत होते की आता राजूला भेटायची वेळ आली आहे. त्यांनी दोघा शिपायांना बरोबर घेतलं आणि राजूच्या फ्लॅट वर निघाले. पण मग काही विचार करून त्यांनी जाणं रहित केलं आणि दोघा शिपायांना साध्या  कपड्यात जाऊन त्याला लगेच घेऊन या असं सांगून पाठवलं.

थोड्या वेळात राजू आला. तो आल्यावर त्यानी विचारलं-

“कशाला बोलावलं मला इथे साहेब, कसली चौकशी करायची आहे? ही तुमची माणसं काही सांगायला तयारच नाहीत.”

“आधी बसा तुम्ही, घ्या पाणी घ्या. हूं आता सांगा शीतोळयांनी सुरवात केली. काय करता तुम्ही राजू साहेब ?’

“म्हणजे” – राजू.

“म्हणजे काय करता, पोटा पाण्या साठी?” – शीतोळे

“मी इंजीनियर आहे आणि एका IT कंपनीत काम करतो.” – राजू. 

“मूळचे कुठले हो तुम्ही ?” – शीतोळे.

“साहेब, ही चौकशी का चालवली आहे तुम्ही? काही कळेल का?” – राजू.

“अहो हे पोलिस स्टेशन आहे. इथे काही लपून छपून नसतं. तुम्हाला कळेलच कशा करता चौकशी चालली आहे ते. पण आधी मी विचारतो आहे त्यांची उत्तरं द्या.

मूळचे कुठले तुम्ही ?” शीतोळयांनी जरा कडक आवाजात विचारलं.

“धारवाड.” – राजू. 

“आई वडील तिथेच असतात ?” – शीतोळे.

“हो.”

“काय करतात ?” – शीतोळे.

“बाबा कॉर्पोरेशन मधे आहेत. आई एका शाळेत शिक्षिका आहे.” – राजू.

“गुड. आता मला सांगा, तुमच्या घरी जर कळलं की तुम्ही एका मुलीला धमक्या देता आहात तर काय होईल? त्यांना आनंद होईल का?” – शीतोळे.

“अच्छा, असं आहे होय ! आता माझ्या लक्षात आलं की माझी तक्रार केलेली आहे. पण साहेब हे खोटं आहे मी कोणालाही कसल्याही धमक्या दिलेल्या नाहीत. धादांत खोटं आहे हे.” – राजू.

काही न बोलता त्याच्या समोर शीतोळयांनी,  देवयानीला राजूनी पाठवलेल्या मेसेज च प्रिंट आउट ठेवलं.

“हं, मेसेज वाचून झाला असेल तर बोल आता. काय म्हणतोस यावर ?” – शीतोळे.

राजूचा चेहरा पडला. काहीच बोलला नाही.

“बोल. मला बरीच कामं आहेत. तुझ्या बरोबर गप्पा मारायला मला इंट्रेस्ट नाहीये आणि वाया घालवायला माझ्या जवळ वेळही नाही.” – शीतोळे कडक आवाजात.

“चुकलं साहेब.” – राजू आता थोडा घाबरला होता.

“असं कसं ? इतकी मोठी धमकी दिलीस, तेंव्हा त्यांच्या मागे बराच विचार केलाच असणार. आणि विचारपूर्वक गोष्टी केल्यावर, चुकलं म्हणून नामा निराळा होऊ पाहातोस? कसं शक्य आहे? काय विचार होता याच्या मागे ते सांग.” शीतोळे आता मुद्दा सोडायला तयार नव्हते.

“साहेब माझं देवयानीवर खूप प्रेम आहे. पण ती माझ्याकडे लक्ष देत नाहीये. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. पण ती विकास विकास करते आहे.”- राजू. 

“विकास आणि देवयानीचं लग्न दोन महिन्यात होणार आहे आणि हे तुला पण माहीत आहे, मग तू हे चाळे का करतो आहेस? सोडून का देत नाहीस? काय कारण आहे?” – शीतोळे

“नाही साहेब, शक्य नाही.” – राजू. 

“ओके मग आता काय करायचं ठरवलं आहे तू? आत्महत्या करणार आहेस? मग तर देवयानीची आशा धरून काहीच उपयोग नाही. की असा विचार केला आहे,  की तिला आधी संपवायची आणि मग आत्महत्या करून एकदम स्वर्गात भेटायचं. असा प्लॅन आहे?” – शीतोळे.

“नाही,नाही साहेब, अहो असा कसलाही विचार माझ्या मनात नव्हता.” – राजू. 

“खरं बोलतो आहेस तू? माझा विश्वास नाही बसत.” – शीतोळे.

 “नाही साहेब, देवयानीवर मी नितांत प्रेम करतो. तिच्या बद्दल असा वाईट विचार माझ्या स्वप्नात सुद्धा येणार नाहीत.” – राजू.

“मग हा मेसेज का पाठवला ?” – शीतोळे.

“ते मी उगाच एक प्रयत्न करून पाहीला.” – राजू.

“काय  म्हणून ?” – शीतोळे.

“देवयानी घाबरून किंवा माझी दया येऊन जर चुकून हो म्हणाली तर, म्हणून मी हा उपाय करून पाहीला.” – राजू. 

“बायकोला अशीच काहीतरी नाटकं करून आयुष्यभर दडपणाखाली ठेवणार होतास का ? हा प्रकार कौटुंबिक हिंसाचारा मधे मोडतो. तुला शिक्षा होऊ शकते.” शीतोळयांनी जरा जरबेच्या स्वरात सुनावलं.

“नाही साहेब, असं काहीही नाहीये. मी फार साधा माणूस आहे हो. माझ्यावर विश्वास ठेवा.” – राजू.

“ते दिसतंच आहे. पण मग मला सांग की,  आता आत्महत्येचा दूसरा प्रयत्न केंव्हा करणार आहेस ? नाही म्हणजे आम्ही त्या वेळा तयारीत राहू, अॅम्ब्युलन्स, फॉरेन्सिक टीम  वगैरे घेऊनच  येऊ.” – शीतोळे.

“साहेब, माफ करा मला. माझी चूक मला कळली आहे. आता पुन्हा असं होणार नाही. मी खात्री देतो. जाऊ द्या मला.” – राजू. 

“तशी खात्री तू याच्या अगोदर दोनदा दिली आहेस. एकदा देवयानीशी अति प्रसंग करायच्या अगोदर आणि दुसर्‍यांदा अतिप्रसंग केल्या नंतर. आता आम्ही तुझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा ?” – शीतोळे.

“मी काय सांगू साहेब. खरंच चुकलं माझं. माझ्याकडून पुन्हा असं काहीही होणार नाही. मी देवयानीला मुळीच त्रास देणार नाही.” राजू आता गयावया करत होता.

“ठीक आहे, माझ्या मते, या बाबतीत तुझ्या आई, वडीलांनी जर खात्री दिली तर ते जास्त बरोबर होईल. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू. केंव्हा आणतोस  तुझ्या आई, वडीलांना ?” – शीतोळे.

“साहेब सोडा ना. आई बाबांना मधे नका आणू, त्यांना खूप मोठा शॉक बसेल. आणि मग आमचे संबंध कधीच पूर्ववत होणार नाहीत.” – राजू. 

“भल्या गृहस्था, आम्हाला सगळ्यांच्या मान सन्मानाची जाणीव असते, म्हणूनच दोन साध्या ड्रेस मधले पोलिस पाठवले होते. नाही तर आम्ही फूल ड्रेस मधे येऊ शकलो असतो. मग सोसायटी मधे आणि ऑफिस मधे तुझा बॅन्ड  वाजला असता. पण तुला एका मुलीच्या सन्मानाची जाणीव झाली नाही आणि म्हणूनच तिचा विनयभंग करायला धजावलास.” शीतोळयांनी राजूला चांगलीच समाज दिली. ते पुढे म्हणाले

“आता दुसरी बाजू ऐक. ते लोक म्हणजे देवयानी आणि विकास काय म्हणाले ते तुला सांगतो. ते म्हणाले की त्यांना तुझी FIR करायची नाहीये. कारण जर विनय भंगाची तक्रार नोंदवली असती तर तुला शिक्षा झाली असती आणि तुझ्या वर जो डाग  लागला असता त्यामुळे तुला आयुष्य भर तोंड दाखवायला जागा राहिली नसती. म्हणून मला म्हणाले की त्याला फक्त समजावून सांगा. बोल आता काय ठरवलं आहेस ?”

“साहेब माफ करा मला पुन्हा  अशी गोष्ट माझ्या हातून होणार नाही. साहेब माझं डोकं फिरलं होतं, नाही तर माझ्यावर आजवर कुठलाही डाग नाहीये. प्लीज मला क्षमा करा.” राजूची आता शेळी झाली होती. तो आता खूपच घाबरला होता.

“माफी माझी नाही देवयानीची आणि विकासची माग. ते ही लेखी. तुझ्याच लॅपटॉप वरून, तुझ्याच पर्सनल ई-मेल वरून देवयानी आणि विकास ला मेल कर. आणि उद्या तुझा लॅपटॉप घेऊन ये आणि आम्हाला दाखव. प्रश्न तुम्हा दोघांचा आहे तेंव्हा मेल मधे आमचा म्हणजे पोलिसांचा संदर्भ नको. आल्यास तुझी खैर नाही. आलं का लक्षात ? आणि माफी नाम्या मधे, झालेल्या प्रसंगाचा उल्लेख करून त्या बद्दल माफी माग. आणि पुन्हा असं होणार नाही यांची ग्वाही दे.” शीतोळयांनी विषय संपवला. 

“हो. साहेब. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे करतो. उद्या तुम्हाला दाखवायला केंव्हा येऊ साहेब ?” – राजू.

“फोन करून ये.” – शीतोळे.

“ठीक आहे साहेब. येऊ मी आता ?”

“ठीक आहे. ये.” – शीतोळे.

 

 

क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.