Devayani Development and Key - Part 20 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग २०

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

 

 

 

 

 

भाग   २०

भाग  १९  वरून  पुढे  वाचा ................

 

“हो. साहेब. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे करतो. उद्या तुम्हाला दाखवायला केंव्हा येऊ साहेब ?” – राजू.

“फोन करून ये.” – शीतोळे.

“ठीक आहे साहेब. येऊ मी आता ?”

“ठीक आहे. ये.” – शीतोळे.

राजू गेला. साहेब विचार करत होते की विकासला फोन करावा का म्हणून, पण नंतर, माफीनामा आल्यावर विकासच फोन करेल. असा विचार करून त्यांनी तो विचार बाजूला सारला.

त्या दिवशी रात्री अकरा वाजता देवयानी आणि विकास ला राजुचा मेल मिळाला. दोघांनाही तो माफी नामा वाचून आश्चर्यच वाटलं. आणि आनंदही झाला. देवयानीने लगेच विकास ला फोन केला आणि सांगितलं. विकास पण चक्रावला होताच, त्यांनी सांगितलं की त्याला पण ह्या मेल ची कॉपी आली आहे.

“विकास हे कसं काय झालं असेल ? एकदम इतकी उपरती कशी काय झाली या माणसाला ?” – देवयानी.

“काही कळत नाही कदाचित  शीतोळयांनी त्याला समजावलं असेल.”- विकास.

“पण मेल मधे त्याचा काहीच उल्लेख नाहीये.” – देवयानी. 

“बरोबर आहे. हे माफी पत्र आहे. त्यानी तुझी  माफी मागीतलेली आहे. त्यात पोलिसांचा उल्लेख कसा असेल ? हे तुझ्या आणि त्याच्या मधलं  transaction आहे. देवयानी एक कर त्या मेल चा स्क्रीन शॉट  घे आणि मला whatsapp वर पाठव.” – विकास. 

कशाला ? तुलाही आला आहे मेल.

“हो पण मला कॉपी मार्क केली आहे. मी शीतोळयांना पाठवायचा विचार करतो आहे. आत्ता बराच उशीर झाला आहे, आणि त्यांना या वेळी त्रास देणं बरोबर नाहीये. म्हणून.” – विकास

‘स्क्रीन शॉट पाठवला whatsapp वर.  पण हे किती छान झालं नाही का ! ही मेल आल्यामुळे आता माझ्या डोक्यांवरचं टेंशन उतरलं.” देवयानी आता रीलॅक्स मूड मधे आली होती. 

“खरंच मा‍झ्याही मनावरचं टेंशन उतरलं.” – विकास

“मला काय वाटतंय सांगू ?”- देवयानी.

“माहीत आहे मला. खरं म्हणजे मलाही तसंच वाटतंय.” – विकास 

“काय वाटत ?” – देवयानी

“मला वाटत की तू इथे अगदी उडत उडत यावं आणि एकमेकांच्या मिठीत हा आनंद साजरा करावा.” विकास म्हणाला.

“काय अंतर्यामी आहेस की काय ? माझच मन वाचलंस की तू.” – देवयानी.

“मग ! काय म्हणतेस? येतेस का? मी येऊ का घ्यायला?” – विकास अधीर.

“नको नको आपण उद्या भेटू. बोट दिलं की मनगट पकडायला धावतोस तू. गुड नाइट. बाय.” देवयानीनी फोन ठेवला.

विकासला हसू आलं. ही तिची नेहमीचीच सवय होती. त्यांनी पुन्हा देवयानीला फोन लावला.

“आता काय आहे?”- देवयानी.

“हे बघ ही तुझी जी सवय आहे ना, फोन कापण्याची तिचं मी व्याजा संकट उट्टं काढणार आहे. म्हणजे तसा संकल्पच केला आहे. बघच तू.” विकास म्हणाला.

“हे सगळं तू केंव्हा करणार आहेस ?” – देवयानी.

“केंव्हा म्हणजे ? अर्थात लग्न करून तू माझ्या घरी आल्यावर.” – विकास. 

“मग हरकत नाही.” – देवयानी. 

“म्हणजे ?” विकास आता गोंधळला.

“म्हणजे मग मी फोन कापणारच नाही. जो काही त्रास द्यायचा असेल तो समोरा समोरच देईन. तू आत्ता पासून मनाची तयारी करून ठेव की किती काटे तुला बोचणार आहेत त्याची.” देवयानीनी विकासला चिमटा काढला.

“अरे आता त्याची फिकीर करायची जरूर नाही. मधाची गॅरंटी असेल ना! मग काय काळजी आहे.”- विकास.

“तुला काय माहीत गॅरंटी आहे म्हणून? मी कुठे दिली आहे अजून?” – देवयानी.

“हे भगवान ! देवयानी तुम्हारा  कुछ नही हो सकता.” – विकास हताश.

देवयानीला हसू आल. अगदी खळखळून  हसली. आणि हसता हसताच गुड नाइट केलं.

देवयानीनी मग काय मेल आला आहे ते सुप्रिया आणि लक्ष्मीला सांगितलं. त्यांनी पण सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सगळ्यांनाच शांत झोप लागणार होती. राजूचं जे सावट आलं होत, ते आता निघून गेलं होत. आता लग्नाचा मार्ग मोकळा झाला होता. जे अनपेक्षित संकट आलं होतं त्याचं निवारण झालं होतं.

विकास ने मग शीतोळयांना whatsapp वर स्क्रीन शॉट पाठवून दिला. विचार केला की उद्या सकाळी त्यांना भेटू. दुसऱ्या दिवशी विकासला इतकं काम होतं की संध्याकाळी सहा वाजे पर्यन्त त्याला श्वास घ्यायला पण फुरसत नव्हती. तो पोलिस स्टेशन ला पोचला तेंव्हा संध्याकाळचे  सात वाजले होते. शीतोळे साहेब केबिन मध्येच होते पण स्टाफ बरोबर काही महत्वाचं डिसकशन चालू होतं. विकासला जवळ जवळ तास भर थांबवा लागलं. तेवढ्यात देवयानीचे दोन फोन येऊन गेले.

मीटिंग संपली आणि विकास आत  गेला. शीतोळे त्यांच्या कडे बघून दिलखुलास हसले.

“काय विकास साहेब, झालेलं दिसतंय सगळं ठीक.” – शीतोळे.

“काय जादू केली  हो तुम्ही साहेब, आम्हाला सांगा न.” – विकास. 

“अरे जादू बिदू काही नाही त्याला बोलावून जरा समजावलं इतकंच, पोरगा तसा चांगला आहे हो. जरा भरकटला होता इतकंच. तुम्ही म्हणाला होता ते बरोबरच होतं. त्याचं आयुष्य स्पॉईल करण्यात काहीच मतलब नव्हता. ऐकलं त्यांनी. हां पण जर तो पुन्हा वाकड्यांत शिरला तर मात्र त्याला सोडायचं नाही. आता तुमचं निवेदन, त्याचा मेसेज आणि त्याची मेल हे सगळं आमच्या फाइलला आहेच, माझी इच्छा आहे की त्या फाइल चा उपयोग करायची वेळच  येऊ नये. बाकी येणारा भविष्य काळच ठरवेल. या साऱ्या प्रकरणात तुम्ही दोघांनी अतिशय समजूतदार पणा दाखवला त्या करता मी तुमचं अभिनंदन करतो. लेट अस होप फॉर दी बेस्ट.” -शीतोळे म्हणाले.

“हो साहेब खरं आहे.” असं म्हणून विकास बाहेर पडला.

त्या दिवशी विकास आणि देवयानी दोघंही  हवेतच तरंगत होते. दोघांचेही कामात लक्ष लागत नव्हतं. त्यांनी देवयांनीला फोन केला आणि मग असं ठरलं की इतके दिवस रेंगाळलेले फ्लॅट सजवण्याचं काम आज half  day  घेऊन पूर्ण करू. विकास half day  सुट्टी घेऊन घरी आला. देवयानी सुद्धा तशीच सुट्टी घेऊन विकासच्या फ्लॅट वर आली. आता लग्नाला केवळ दोनच महीने राहिले होते. म्हणून मग फ्लॅट वर काय काय करायचं यांची आधी केलेली यादी घेऊन बसले आणि मग शॉपिंग ला निघाले. दिवस भर मग खरेदी, जेवण करून विकासने देवयांनीला रात्री अकरा वाजता फ्लॅट वर सोडलं. दिवस आनंदात घालवल्याचं समाधान दोघांच्याही मनात होतं.

आता लग्नाला दोनच महीने उरले होते. एक दिवस देवयानीच्या आईचा रात्री आठ वाजता फोन आला. ती त्या वेळेला विकास बरोबर त्यांच्याच फ्लॅट वर होती आणि अजून काय काय करायचं शिल्लक आहे या बद्दल त्यांची चर्चा चालली होती. मध्येच फोन आला. आईचा फोन म्हंटल्यांवर देवयानीनी लगेच घेतला.

“हॅलो काय ग आई. काय म्हणतेस ?”

“अग लग्नाची खरेदी! म्हणजे कपडा आणि दागिने अजून राहिले आहेत. ते पुण्याहून करायचे असं ठरलं आहे. म्हणून आम्ही दोघं उद्या पुण्याला येतो आहोत. तुझ्या फ्लॅट वर आमची सोय होईल का ? नाही तर एखादं हॉटेल बूक कर.” देवयानीच्या  आईनी विचारलं.

“हॉटेल कशाला? सुप्रियाचा फ्लॅट लहान आहे पण  दोन चार दिवस अॅडजस्ट करू. नो प्रॉब्लेम.” – देवयानी.

विकास देवयानीचं बोलणं ऐकत होता. त्यांनी विचारलं की “कशा साठी हॉटेल?”

आई एक मिनीट होल्ड कर. “अरे आई बाबा इथे कपडा आणि दागिने खरेदी साठी” येणार आहेत. आई म्हणत होती की सुप्रियाच्या फ्लॅट वर राहता येईल का म्हणून

विकासला राहवलं नाही तो म्हणाला, “अग तो फ्लॅट किती छोटा आहे आणि गाद्या वगैरेची सोय करावी लागेल, जरा अडचणच होईल. त्या पेक्षा त्यांना इथेच येऊ दे. इथे सर्व सोई आपण केल्याच आहेत. आणि हा फ्लॅट पण मोठा आहे.”

“अरे पण इथे कसे उतरतील ते? आपलं लग्न अजून व्हायचं आहे.” – देवयानी.

“अग त्यात काय झालं? पुढच्या वर्षी येतील तेंव्हा आपल्याकडेच उतरतील न, मग आत्ता राहायला काय प्रॉब्लेम आहे. तू आहेसच ना.” – विकास.

“हॅलो आई विकास म्हणतो आहे की त्याच्याच फ्लॅट वर रहा. फ्लॅट मोठा आहे  आणि गेल्या दोन तीन महिन्यात आम्ही सर्व सोई करून घेतल्याच आहेत. किचन सुद्धा पूर्ण functional आहे.” देवयानीनी विकासचं म्हणण काय आहे ते सांगितलं.

“ऐकलंय विकास जे म्हणाला ते. थांब बाबांना विचारते.” – आई म्हणाली.

“देवयानी, बाबा म्हणतात की संकोच वाटेल.” – आई.

देवयानीनी विकासला सांगितलं, बाबा काय म्हणतात ते. विकासने देवयानीच्या हातातून फोन घेतला

“हॅलो बाबा, मी काय म्हणतो, उद्या लग्न झाल्यावर तुम्ही आमच्याच कडे येणार, मग आता काय हरकत आहे? परिस्थितीत काहीच फरक पडणार नाहीये, आणि दुसरं म्हणजे सुप्रियाचा फ्लॅट खूप छोटा आहे तिथे सर्वांनाच अडचण होईल. इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि तसंही, तुम्ही नागपूरला आमच्याकडे चार दिवस होताच की.”

 

क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद. 

Share

NEW REALESED