Savadh - 23 books and stories free download online pdf in Marathi

सावध - प्रकरण 23


प्रकरण २३

दुपारी दोनच्या जेवणाच्या सुट्टीनंतर पुन्हा ज्या वेळेला कोर्टाचे कामकाज सुरू झालं तेव्हा अॅडव्होकेट खांडेकर उठून उभे राहिले . त्यांचे चेहऱ्यावरील काळजी स्पष्ट दिसत होती.

"युवर ओनर एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे माझं असं मत झालं आहे की ज्या रिव्हॉल्व्हर ने खून झाला आहे त्याचा संबंध ठशाच्या दृष्टीने या खटल्यातले वकील पाणिनी पटवर्धन यांच्याशी जोडला जाऊ शकतो आणि कुणाच्या वेळेचा विचार केला तर त्या वेळेला पाणीनी पटवर्धन हे आरोपीच्या बरोबर गॅरेजमध्ये असल्यामुळे आरोपीचा देखील संबंध या रिव्हॉल्व्हरशी जोडला जाऊ शकतो. पाणिनी पटवर्धन यांना ओळखणारा जो साक्षीदार आम्ही आणला होता त्याला पाणिनी पटवर्धन यांनी काहीतरी मखलाशी करून ओळख पटवून अशक्य करून टाकलं अन्यथा त्याने मायरा कपाडिया बरोबर असणारा माणूस म्हणजे पाणिनी पटवर्धन हाच होता हे सहज ओळखलं असतं."

"पटवर्धन यांनी काहीतरी युक्ती वापरून तुमच्या साक्षीदाराची गलत केली हा भाग तात्पुरता बाजूला ठेवला तरी तुमच्या साक्षीदारांना पटवर्धनांचा किंवा आरोपीचा चेहरा बघितलेला नव्हता त्यानं त्याच्या कपड्यावरून उंचीवरून सर्वसाधारण वर्णन केलं होतं जे वर्णन पटवर्धन यांच्या बरोबरीने इतर अनेक लोकांना लागू पडेल याचा अर्थ गॅरेज जवळ उभी असलेली व्यक्ती पटवर्धनच होती हे सिद्ध होत नाही."न्यायाधीश आणि आपली भूमिका मांडली.

"तशाच कपड्यातला तेवढ्याच उंचीच्या इतरही व्यक्ती असू शकतील हे मान्य आहे परंतु ज्याच्या बोटाचे ठसे त्या रिव्हॉल्व्हर च्या आतल्या बाजूला उमटले आहेत अशी एकमेव व्यक्ती म्हणजे पाणिनी पटवर्धनच आहे" खांडेकर म्हणाले.

"पण तुम्ही अजून हे सिद्ध केलेले नाही की ज्याने खून झाला ते हत्यार पटवर्धनांच्या अशीलाचं आहे."न्यायाधीश म्हणाले.

"सुहानी कोलाडेला साक्षीला बोलवा."खांडेकर म्हणाले.

ही बाई म्हणजे आरोपी ज्या अपार्टमेंट मध्ये राहत होती त्या अपार्टमेंट मध्ये मॅनेजर होती. साक्षीला येताना तिने सांगितलं की प्रत्येक अपार्टमेंटला एक गॅरेज दिले गेलेले आहे मायरा चे अपार्टमेंट चा नंबर २०८ होता आणि त्या अपार्टमेंटला सुद्धा गॅरेज दिलं गेलं आहे. साक्षी मध्ये तिने पुढे असे सांगितलं की या अपार्टमेंटच्या आणि त्याच्या गॅरेजच्या किल्ल्या मायरा कपाडिया ला दिल्या गेल्या होत्या आणि त्या देताना तिची सही रजिस्टरवर घेतली गेली होती. खांडेकरांनी ते पुरावा म्हणून दाखल करून घेण्याची विनंती कोर्टाला केली पाणिनी पटवर्धन ने त्यासाठी काही हरकत घेतली नाही.

"तुम्हाला उलट तपासणी घ्यायची आहे हिची?"

पाणिनी उलट तपासणीसाठी उठून उभा राहिला

"तू एकूण चार किल्ल्या मायरा कपाडिया ला दिल्यास दोन अपार्टमेंटच्या आणि दोन गॅरेजच्या बरोबर?"

"बरोबर"

एवढाच प्रश्न विचारून झाल्यावर पाणिनी थांबला

खांडेकरांनी पुढचा साक्षीदार म्हणून कार मेकॅनिक रमेश पायगुडेला बोलावलं त्यानं आपल्या साक्षीत सांगितलं की पाच तारखेला संध्याकाळी मायरा ने तिची गाडी त्याच्या वर्कशॉपला आणून सोडली. त्याच्या धुरांड्यातून फटफट असा आवाज येत होता.

"तुझ्या वर्कशॉप मध्ये तिने गाडी कधी आणून सोडली?" खांडेकरांनी विचारलं

"संध्याकाळी सव्वा सहा ते सहा वीसच्या दरम्यान."

"तिने ती गाडी तुझ्याकडे आणली तेव्हा गाडी कोण चालवत होत?"

"स्वतः मायरा कपाडिया."

"तुला काय माहिती ती मायरा कपाडिया होती? तू ओळखतोस तिला?"

"हो मी ओळखतो तिला ती माझी नेहमीची ग्राहक आहे."

"मायरा कपाडिया म्हणजे आत्ता आरोपीच्या पिंजऱ्यात उभी असणारी आरोपी हीच स्त्री आहे?"

"हो बरोबर तीच आहे."

"दॅट्स ऑल तुम्ही उलट तपासणी घेऊ शकता पटवर्धन."

"माझे काही प्रश्न नाहीत उलट तपासणीत "पाणिनी म्हणाला

" कीर्तीकर याला साक्षीसाठी बोलावण्यात यावं " खांडेकर आणि जाहीर केलं.त्याने आपलं नाव, व्यवसाय पत्ता अशी प्राथमिक माहिती दिल्यावर खांडेकरांनी विचारलं,

"परब ला तुम्ही ओळखता?"

"हो. तो माझा ड्रायव्हर म्हणून नोकरीला होता."

"तो मेला त्या तारखेपर्यंत तो तुमच्या नोकरीत होता?"

"हो."

"त्याला तुम्ही शेवटचं जिवंत कधी पाहिलं?"

"तो गेला त्याच संध्याकाळी पाच वाजल्यानंतर"

"त्यावेळेला तो कुठे होता?"खांडेकरांनी विचारलं

"पाणिनी पटवर्धन यांच ऑफिस ज्या इमारतीत आहे त्या इमारतीच्या समोर. पाणिनी पटवर्धन यांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्या ऑफिसमध्ये थांबलो होतो आणि मला अचानक लक्षात आलं की त्या दिवशी परब ला रात्रीची सुट्टी होती म्हणजे संध्याकाळी त्याची ड्युटी संपत होती त्यामुळे मी खाली गेलो आणि त्याला सांगितलं की तू थांबायची गरज नाही तू माझी गाडी घेऊन घरी जाऊ शकतोस"

"त्यानंतर काय झालं तुम्हाला सांगता येईल?"

"मला एवढेच सांगता येईल की मी जेव्हा माझ्या घरी गेलो तेव्हा माझी गाडी तिथे लावलेली होती."

"किती वाजले असतील तेव्हा?"खांडेकर आणि विचारलं

"मला वाटतं..... मी हॉस्पिटल मधल्या एका पेशंटला भेटून..... त्याच्याशी काही तडजोडीची चर्चा करून...."

"त्याचा याच्याशी काही संबंध नाही तुम्ही माझ्या प्रश्नाचा फक्त उत्तर द्या."खांडेकर ओरडले.

"संबंध नाही कसा पाणिनी पटवर्धन यांनी माझी फसवणूक केल्ये ज्यामुळे मला बराच मोठा भुर्दंड पडला" कीर्तीकर ओरडून म्हणाला.

"स्वतःला जरा आवरा. मला तुम्ही एवढेच सांगा की तुम्ही किती वाजता घरी पोहोचलात?"खांडेकर म्हणाले

"साधारण साडेनऊ ते दहा च्या सुमारास असेल तेव्हा माझी गाडी तिथे लावलेली होती."

"तुम्ही प्रश्न विचारा पटवर्धन माझे झालेत विचारून" खांडेकर म्हणाले.

“तुमचा व्यवसाय काय आहे?”

“ स्टोन क्रशिंग चा म्हणजे खाण व्यवसाय आहे. ”

“ यात तुमचे कोणी भागीदार आहेत की एकट्याचाच आहे?”

“ एकट्याचाच आहे.” कीर्तीकर म्हणाला.

“ हिराळकर आणि दुग्गल यांना तुम्ही ओळखता?”

“ हो.”

“ कुठली ओळख ?”

“ आम्ही एकाच क्लब चे मेंबर आहोत.” कीर्तीकर म्हणाला.

" तुम्ही घरी पोचलात त्या दिवशी,तुम्हाला कसं कळलं तुमची गाडी तिथे होती म्हणून?" पाणिनी ने विचारलं.

"कसं म्हणजे? ती असणारच ना तिथे ! गॅरेजचं दार तर बंद होतं."

"तेच मला म्हणायचं तुम्ही जेव्हा घरी आला तेव्हा गाडी गॅरेज मध्ये आहे की नाही हे प्रत्यक्ष बघितलं नाही तर तुम्ही असं गृहीत धरलं की गॅरेज दार बंद आहे म्हणजे गाडी आत असणार. बरोबर आहे की नाही मी म्हणतो ते?" पाणिनी ने विचारलं.

"हो बरोबर आहे."

"बर मला सांगा की तुम्ही घरी कसे गेलात?"

"विमा कंपनीच्या ज्या माणसाला मी चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं त्याने मला घरी सोडलं."

"घरी साडेनऊ दहाच्या दरम्यान तुम्ही पोहोचलात असं म्हणता आहात झोपायला कधी गेलात?"

"अकराच्या आसपास असेल"

"त्यानंतर गॅरेजमध्ये तुमची गाडी आहे की नाही हे बघायची वेळ कधी आली?" पाणिनी ने विचारलं.

"दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता मला एक फोन आला आणि पोलिसांनी मला माझ्या ड्रायव्हर बाबत काय घडलं ते सांगितलं त्यांनी बरेच प्रश्न विचारले त्यांनी मला सांगितलं की ते मला भेटायला येत आहेत मी कपडे बदलून तयार झालो आणि गॅरेज मध्ये जाऊन नजर टाकली."

"तेव्हा गाडी होती तुमची गॅरेजमध्ये?"

"बरोबर. होती तेव्हा."

"तुम्ही माझ्यावर वैयक्तिकरित्या काही आरोप केलेत?" पाणिनी म्हणाला

"हो केले आरोप . तुम्हाला माहिती होतं की माझा ड्रायव्हर अपघातामध्ये अडकला आहे असा मला संशय होता."

"तुम्ही मला विमा कंपनीशी एका अशा बाबतीत तडजोड करायला लावली की जो प्लॅन पूर्णपणे खोटा होता मी तुम्हाला सावध करतोय की माझी फसवणूक केल्याबद्दल मी तुमच्यावर खटला भरणार आहे आणि........"

"ओहो! म्हणजे तो तुमचा ड्रायव्हर होता जो गाडी चालवत होता अपघाताच्या वेळेला असं तुम्हाला वाटतंय?" पाणिनी ने विचारलं.

"अर्थातच मी गाडी चालवत नव्हतो मला माहितीये ना तो ड्रायव्हर माझा नोकर असल्यामुळे त्याच्या हातून अपघात झाला तरी कायदेशीर जबाबदारी माझीच आहे"

"हे सगळं या घडीला महत्त्वाच आहे का?"न्यायाधीशांनी विचारलं

"मला वाटतं महत्त्वाचा आहे कारण साक्षीदाराच्या मनाचा कल कसा कलुषित होता हे त्यातून दिसतं"पाणिनी म्हणाला

"पटवर्धनांना जे विचारायचे ते विचारू देत माझी काही हरकत नाहीये सर्व वस्तुस्थिती समोर येऊ दे."खांडेकर म्हणाले.

"खांडेकर तुमच्यासमोर सर्वच वस्तुस्थिती येईल लवकरच. बर मिस्टर कीर्तीकर, तुम्ही तुमची सगळी हकीगत सांगाल का?" पाणिनी ने विचारलं.

"या महिन्याच्या पाच तारखेला दुपारी तीन वाजता अॅडव्होकेट पटवर्धन माझ्या घरी आले. परब, माझा ड्रायव्हर तेव्हा तिथे होता पटवर्धन मला असं म्हणाले की त्यांच्याकडे माझी गाडी एका अपघातामध्ये सापडल्याचा ढळढळीत पुरावा आहे. या अपघातात त्यांचा अशील गंभीरपणे जखमी झाला आहे. पटवर्धन म्हणाले माझ्या गाडीला काही ठिकाणी ठोकल्याप्रमाणे पोचे आले आहेत.... म्हणजे ते म्हणाले ते बरोबर होतं."

"मी म्हणालो ते बरोबर होत असं तुम्हाला का वाटतं?" पाणिनी ने विचारलं.

"कारण माझ्या ड्रायव्हरला त्याच दिवशी गाडीच्या संदर्भात एक प्रॉब्लेम होता त्यांनी तो त्याच्या परीने सोडवायचा प्रयत्न केला ती गाडी चोरीला गेली असल्याच त्याने सांगितलं. त्याचं म्हणणं होतं की पोलीस स्टेशनवर चोरीची वर्दी देताना मी त्याच्याबरोबर असावं म्हणजे तो पोलिसांना सविस्तर सांगू शकेल. चोरी होण्यापूर्वी त्याने जिथे गाडी सोडली होती त्या ठिकाणी मी त्याच्याबरोबर गेलो. त्या संपूर्ण वेळेत माझा हा ड्रायव्हर खूप प्यालेला होता आणि काहीतरी दडवत होता, कशात तरी अडकला होता असं मला जाणवत होतं. मलाही एकंदरीत त्या प्रकाराची काळजी वाटायला लागली होती की हा माणूस मलाही अडकवणार नाही ना. मी क्लब वर परत आलो आणि माझी गाडी चोरीला गेल्याचे पोलिसांना कळवलं पण मला असं अजिबात वाटत नव्हतं की माझी गाडी चोरीला गेली असावी पोलिसांना शेवटी ती मुख्य शहरापासून थोडे दूर एका गावात मिळाली अग्निशमनाच्या खांबाशेजारी ती लावली होती." कीर्तीकर म्हणाला

"मी तुम्हाला जे काही सांगितलं होतं त्या आधारे तुम्ही असं ठरवलं की माझा अशील पेंढारकर याला शोधायचं आणि त्याच्या वकिलाला म्हणजे मला पत्ता लागू न देता परस्पर त्याच्याशी तडजोड करायची. बरोबर की नाही?" पाणिनी ने विचारलं.

"मी असा काहीही विचार केला नाही."

"विचार केला नाहीस पण प्रत्यक्ष तसंच केलंस हो की नाही?" पाणिनी ने विचारलं.

"मला जेव्हा वाटलं की पटवर्धन यांचं अशील खूप गंभीरपणे जखमी झाले त्यावेळेला मला खूप इच्छा झाली त्याला मदत करावी अशी. त्या सगळ्याच गोष्टीबद्दल मला खूप वाईट वाटलं मी तुम्हाला भेटायला तुमच्या ऑफिसमध्ये आलो तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये नव्हता मी तुमची वाट बघत बसलो तुम्ही बहुदा त्या वेळेला मायरा कपाडिया ला भेटायला गेला होतात."

"मी तिच्याकडे गेलो होतो हे तुम्हाला नक्की माहिती आहे?"

"नाही नक्की असं नाही."

"मग मी तिच्याकडे होतो असं तुम्हाला वाटण्यासाठी काही खास कारण आहे?" पाणिनी ने विचारलं.

"पोलिसांनी मला तसं सांगितलं... पण नाही..... त्यावेळेला मला माहिती नव्हतं तुम्ही तिच्याकडे होतात." कीर्तीकर म्हणाला.

"बर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये माझी वाट बघत बसला होतात आणि तुम्हाला सांगण्यात आलं की मी बाहेर गेलोय. त्यावेळेला तुमचा ड्रायव्हर कुठे होता?"

"तुमच्याच ऑफिसच्या इमारतीच्या बाहेर रस्त्यावर लावलेल्या माझ्या गाडीत माझी वाट बघत बसला होता."

"रस्त्यावर तुमची गाडी लावायला तुम्हाला जागा मिळाली होती?" पाणिनी ने विचारलं.

"ड्रायव्हरने मला तुमच्या इमारतीपाशी सोडलं तेव्हा तिथे जवळ गाडी लावायला जागा नव्हती मी त्याला सांगितलं जागा मिळेपर्यंत तू गाडी जरा फिरवून आण पण त्याला थोड्याच वेळात लगेच जागा मिळाली."

"ऑफिसमध्ये माझी किती वेळ वाट बघत बसला होता?" पाणिनी ने विचारलं.

"तुमच्या ऑफिसमध्ये बसलो असताना माझ्या लक्षात आलं की या अपघाताबद्दल विमा कंपनीला काही न कळवण म्हणजे मी मोठी चूक केली असती म्हणून मी साधारण सहा वाजेपर्यंत तुमच्या ऑफिसमध्ये बसलो आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की मी त्या अपघाताच्या नुकसान भरपाई साठी तुमच्याशी म्हणजे पटवर्धनांशी चर्चा करून तडजोड करण्याचा प्रयत्न करतोय." कीर्तीकर म्हणाला

"आणि विमा कंपनीच्या माणसांनी तुम्हाला असं सांगितलं का की वकिलांशी म्हणजे माझ्याशी तडजोड करण्यापेक्षा बाहेर जाऊन संबंधित रुग्णाशी म्हणजे पेंढारकर शी चर्चा करणे हे जास्त फायद्यात ठरेल?" पाणिनी ने विचारलं.

"विमा कंपनीचा माणूस म्हणाला की तो मला भेटे पर्यंत मी तुमच्याशी म्हणजे पटवर्धनांशी या विषयावर अजिबात बोलू नये. त्यामुळे त्यांची व माझी भेट झाल्यानंतर हा सगळा विषय मी त्याच्यावर सोपवला." कीर्तीकर म्हणाला.

"त्यांना असं सांगून सुद्धा मला कळून न देता तुम्ही परस्पर हॉस्पिटलमध्ये जाऊन पेंढारकर ला भेटून त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न केलात?" पाणिनी ने विचारलं.

"कळू न देता म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला पटवर्धन? ऑफिसमध्ये मी तुमची तासनतास वाट बघत बसायचं आणि तुम्ही मात्र दुसऱ्याच कुठल्यातरी अशीला बरोबर चर्चा करत बसायचं तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्याचे उत्तर द्यायचं नाही. माझ्या वेळेला काही किंमत आहे की नाही?"

"तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन जेव्हा त्याच्याशी तडजोड केली, तेव्हा विमा कंपनीने दिलेल्या रकमेपेक्षा तुम्ही स्वतःच्या पदरची आणखी काही रक्कम त्याला दिलीत?" पाणिनी ने विचारलं.

"हो दिली."

"कारण काय त्याचं?"

"कारण एखादा तरुण जेव्हा अपघातात सापडतो आणि जायबंदी होतो तेव्हा त्याच्या शारीरिक व्याधी बरोबर त्याच्या भावनेचाही विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. माझे पैसे वाचावे म्हणून तडजोड करणे हा विमा कंपनीचा व्यवसाय आहे हे मान्य परंतु त्या अपघातग्रस्त तरुणाची मला दया आली आणि थोडे जास्त पैसे त्याला द्यायची इच्छा निर्माण झाली." कीर्तीकर म्हणाला.

"तुम्हाला या कोर्टाची अशी समजूत करून द्यायची का की तुम्ही विमा कंपनीला या अपघाताला तुम्ही जबाबदार आहात असंच फक्त सांगितलं असं नाही तर तुमची गाडी अपघातात अडकली आहे या मी केलेल्या विधाना मुळे ही रक्कम द्यायला तयार झालात?" पाणिनी म्हणाला.

"तुम्ही एक प्रसिद्ध फौजदारी वकील आहात त्यामुळे मी असं मानून चाललो की ज्याअर्थी तुम्ही म्हणताय की माझी गाडी अपघातात अडकली आहे याबद्दलचे पुरावे तुमच्याकडे आहेत, त्या वेळेला ते बरोबरच आहे असे मी गृहीत धरून चाललो ."

"तरीही तुम्ही तुमच्या क्लबच्या रखवालदाराला लाच दिलीत आणि त्याला असं सांगायला सांगितलं की तुम्ही संपूर्ण दुपार क्लब मध्येच होतात बाहेर कुठेही पडला नाहीत जेणेकरून तुमचा ड्रायव्हर अपघातात किंवा इतर कशातही गुंतला असला तरी त्याचं बालंट तुमच्यावर येणार नाही?"

"हे असलं काहीही केलेले नाही मी."

"त्या रखवालदाराला पैसे दिले नाहीत तुम्ही?"

"अशा लोकांना क्लबचे सभासद टीप म्हणून पैसे देतात तेवढेच मी केलं."

"किती टीप दिली तुम्ही?"

"माझी हरकत आहे या प्रश्नाला. साक्षीदाराला जाणून बुजून अडकवले जात आहे." खांडेकर म्हणाले

"ओव्हर रुल्ड"न्यायाधीशांनी आदेश दिला.

"टीप म्हणून किती रक्कम दिलीत?" पाणिनी ने विचारलं.

"मला वाटलं की मी त्याला शंभर ची नोट दिली पण प्रत्यक्षात ते पाचशे रुपये दिले गेले म्हणजे मी थोडी दारू प्यायला होतो त्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही."

"तीन तारखेला दुपारनंतर तुम्ही तुमची गाडी चालवली नव्हती हे तुम्हाला माहिती आहे?" पाणिनी ने विचारलं.

"अर्थात माहिती आहे."

"याचा दुसरा अर्थ असा ज्या कोणी ती गाडी चालवली असेल ती व्यक्ती म्हणजे तुमचा ड्रायव्हर होता?"

"कार चोरीला गेलेली असू शकत होती."

“ पण तसं असतं तर तुम्ही अपघातातल्या नुकसानीला जबाबदार नव्हतात. कम ऑन ! तुम्ही धंदेवाईक आहात.खरं सांगा काय ते.” पाणिनी म्हणाला

“ तुमचा मुद्दा लक्षात आला माझ्या. "तुम्ही गेल्यानंतर मी माझ्या ड्रायव्हरची अगदी सविस्तर बोललो त्यांनी मला शेवटी कबूल केलं की तोच गाडी चालवत असताना त्याच्या हातून एक अपघात झाला पण मी त्याला ओरडेल किंवा कामावरून काढून टाकेल या भीतीने आपली गाडी चोरीला गेल्याची बतावणी त्याने केली."

"तुम्हाला प्रत्यक्षात माहीत होतं किंवा कुठून तरी कळलं की ज्या गाडीने माझ्या अशिलाला धडक दिली ती गाडी तोंडवळकर नावाचा माणूस चालवत होता?"

साक्षीदारांना काही उत्तर दिले नाही पाणिनी पटवर्धन ने पुढचा प्रश्न विचारला

"तुम्ही आणि विमा कंपनीचा माणूस पेंढारकर कडे गेलात आणि त्याला दम दिला की खोटी बतावणी करून त्याने तुमच्याकडून पैसे उकळले आहेत ते त्यांनी तुम्हाला परत करावे नाहीतर त्याला कोर्टात खेचू म्हणून?"

"आम्ही दमदाटी केली नाही त्याला फक्त समजावलं की ती रक्कम घेण्याचा त्याला काहीही अधिकार नाहीये म्हणून कायद्याने नाही आणि नैतिकतेनेही नाही याचं कारण माझ्या गाडीच्या धडकेने त्याला अपघात झालाच नव्हता."

"यावर पेंढारकर काय म्हणाला?" पाणिनी म्हणाला.

"तो म्हणाला की त्याच्या वकिलांनी म्हणजे तुम्ही त्याला ते पैसे ठेवून घ्यायचा सल्ला दिला आहे कारण ती रक्कम मी त्याला स्वतःहूनच दिली होती त्यामुळे ती परत घेण्याचा अधिकार मला नाही तो असाही पुढे म्हणाला की वकील या नात्याने तुम्ही त्या विमा कंपनीला चांगलाच धडा शिकवणार आहात."

न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं

"मला सांगा परब हा जर अपघातात अडकला नव्हता तर त्याच्याच हातून अपघात घडल्याचं त्यानं तुम्हाला का सांगितलं?" पाणिनी म्हणाला.

"मलाही नेमका हाच प्रश्न पडलाय. मी त्याचाच विचार करतोय. त्याचे उत्तर मला अजून मिळालं नाहीये. हा माणूस ब्लॅक मेलर असावा आणि असं त्यांने मला खोटं सांगण्यासाठी काहीतरी कारण असावं" कीर्तीकर म्हणाला

"तो अपघातात गुंतला होता असे त्यांन तुम्हाला खोटं सांगितलं असून सुद्धा त्याला रात्रीच्या ड्युटी मधून सुट्टी देण्यासाठी तुम्ही फार उत्सुक होतात?"

"मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ड्रायव्हर लोकांची एक एजन्सी आहे ते स्वतःची नोकरी सांभाळून असोसिएशन चालवतात आपल्या नोकरीतून त्यांना जेव्हा सुट्टी मिळते किंवा त्यांचे कामकाजाचे तास संपतात तेव्हा असोसिएशन तर्फे आलेल्या दुसऱ्या एखाद्या ड्युटीवर ते हजर राहतात त्यातून त्यांना पगाऱ्या व्यतिरिक्त जास्तीचे पैसे कमावता येतात मी स्वतः व्यावसायिक असल्यामुळे अशा पद्धतीने पैसे कमावले तर मला त्याच्यात काही चुकीचं वाटत नाही त्यामुळे माझ्याकडे तास संपल्यावर मी त्याला रात्रीची सुट्टी दिली."

"एक गोष्ट घडली असायची शक्यता तुम्हाला वाटते आहे का?" ,पाणिनी म्हणाला.

"कोणती?"

"पाच तारखेला संध्याकाळी त्याला दुसरी एक ड्युटी लागली असावी त्यामुळे तुमची गाडी त्यांनी स्वतः तुमच्या घरी नेऊन गॅरेजला लावण्याऐवजी त्याने दुसऱ्या एका माणसाला तुमची गाडी घरी घेऊन जायला सांगितलं आणि त्याला जी दुसरी ड्युटी लागली होती ती करायला तो तिथून गेला असावा"

कीर्तीकर मी क्षणभर विचार केला आणि नंतर म्हणाला,

"असं घडलंच नसेल असं मी म्हणणार नाही. माझ्या गॅरेजला माझी गाडी व्यवस्थित लावण्यात आली होती हे मात्र नक्की आणि मला तेवढं पुरेसं होतं."

"परब ला जेव्हा सुट्टी असायची त्यावेळेला या असोसिएशन तर्फे एखादा ड्रायव्हर घेण्याचा प्रसंग आला का तुमच्यावर?" पाणिनी म्हणाला.

"नक्कीच नाही, कधीच नाही. आला असता तर दुसरा ड्रायव्हर घेण्याऐवजी परब लाच मी ओव्हरटाईम चे पैसे देऊन त्या दिवसासाठी कामाला ठेवलं असतं." कीर्तीकर ने उत्तर दिलं.

"मी तुम्हाला पंधरा नावं असलेली एक यादी दाखवतो यापैकी काही लोकांना तुम्ही ओळखता का सांगा." पाणिनी म्हणाला

"फार भरकटत चालल्ये साक्ष. काय उपयोग आहे ही यादी दाखवून?" खांडेकर वैतागून म्हणाले

"परबच्या हातून अपघात झालेला नसताना सुद्धा आपल्याच हातून अपघात झाला आहे असं त्यानं का सांगितलं हे त्यातून स्पष्ट होईल." पाणिनी म्हणाला

खांडेकर त्याला हरकत घेणार होते परंतु न्यायाधीशाने पाणिनी पटवर्धनला ती यादी साक्षीदाराच्या हातात द्यायला सांगितलं. साक्षीदाराने त्या यादीवरून नजर टाकली आपल्या स्मरणशक्तीला जरा ताण देण्याचा प्रयत्न केला आपल्या हाताने आपले डोके खाजवलं

"मला जरा तपासून बघावं लागेल हे मिस्टर पटवर्धन लगेच नाही सांगता येणार." कीर्तीकर म्हणाला

"ठीक आहे कोर्ट पंधरा मिनिटाची सुट्टी जाहीर करत आहे तोपर्यंत तुम्ही यादी बघून काही आठवतंय का त्याचा प्रयत्न करा खांडेकर तुम्हीही साक्षीदाराला मदत करा." न्यायाधीश म्हणाले आणि खुर्चीतून उठले. ते जाताच खांडेकर आणि कीर्तीकर या दोघांत हळू आवाजात खाजगी बोलणं झालं. खांडेकरांच्या चेहेऱ्यावर नापसंतीचे भाव उमटले.ते घाईघाईत पण नाराजीने पाणिनी जवळ आले.

“ती यादी कसली आहे आणि कितपत महत्वाची आहे?” त्यांनी पाणिनीला विचारलं.

“ खूप महत्वाची आहे.” पाणिनी म्हणाला

“ कीर्तीकर म्हणतोय की त्याला असं पटकन आठवून सांगता येणार नाही. त्याच्या कंपनीच्या सभासदांची यादी त्याला तपासावी लागेल.काही नावं त्याला ओळखीची वाटताहेत काही अनोळखी आहेत.” खांडेकर म्हणाले.

“ तपासून घेऊ दे यादी त्याने. ” पाणिनी म्हणाला

“ पण त्यासाठी आपल्याला थांबावे लागेल उद्या पर्यंत ”

“ मला चालेल.” पाणिनी म्हणाला

“ पण मला चालण्यासारखे नाही ना !” खांडेकर म्हणाले.

“मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणे महत्वाचं आहे.”

“ ठीक आहे थांबू उद्या पर्यंत.” नाईलाजाने खांडेकर म्हणाले. “ तशी विनंती करतो मी न्यायाधीशांना.”

(प्रकरण २३ समाप्त.)