Ti Bhayan Ratre in Marathi Horror Stories by Sam books and stories PDF | ती भयाण रात्र

The Author
Featured Books
Categories
Share

ती भयाण रात्र


"आई कशी आहे आता फोन केलास का तू?" अंजली अभिजितला विचारत होती.

अभिजित व त्याचे काही मित्रमैत्रिणी सगळे समुद्रकिनारी फिरायला गेले होते. सलोनी, अंजली, दिशा, अभिजित, रुद्र व राजवीर यांची चांगली मैत्री होती.

दोन तीन दिवसाचे नियोजन करून ते आले असले तरी आज एका फोनमुळे ते लगेच घरी निघाले होते.

"नाही! घाटात फोन लागत नाहीये" अभिजित थोडा तणावातंच बोलला.

"अभ्या तू नको काळजी करू, आपण वेळेत पोहचू तिथे" रुद्र त्याला समजावत बोलला.

तसा तो गाडी चालवतच 'हुं' म्हणाला.

अभिजित हा आपल्या आईसोबत मुबंईमध्ये राहायचा. वडील तो लहान असतानाच त्यांना सोडून गेले होते. त्यामुळे आईच त्याचं जग होती, त्याचं सर्वस्व होती.

● काही वेळापूर्वी...

आज सलोनीच वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करून अभिजितने तिला आजच लग्नासाठी मागणी घातली होती. ती ही त्याच्यावर प्रेम करत असल्याने त्याला लगेच होकार दिला.

तिला दुर्मिळ व पुरातन वस्तू, वास्तू व पुरातन गोष्टीमध्ये फारच रुची होती. तिची आवड लक्षात घेऊन अभिजीतने तिला एक घड्याळ भेट म्हणून दिले.

घड्याळ खूपच आकर्षक होते. गोलाकार आकाराचे आतमध्ये रोमन आकडे, वरती झाकण व त्यावर मोठा गरुड व ड्रॅगनचे नक्षीकाम केलेले दिसत होते. दोन्ही पध्दतीने ते घड्याळ वापरता येईल अशी त्याला सोय होती.

चेन व मनगटावर बांधता येईल असे दोन्ही बाजूला पट्टा ही होता. खूप सुरेख व सूंदर असे घड्याळ पाहून ती फारच खुश झाली.

आनंदाच्या भरात ती त्याच्या गळ्यात पडली. तो ही खुश झाला. लगेच अभिजितने तिच्या मनगटावर ते घड्याळ बांधले. आता सगळेच खुश होऊन संगीताच्या तालावर नाचू लागले.

संगीताच्या तालावर त्यांचे पाय थिरकत होते. सलोनीला मात्र घड्याळ मनगटावर बांधताच एक विजेची लहर सर्वांगातून वाहिल्यासारखी जाणवली.

ती ही गाण्यांवर थिरकत होती. पण तिला काही तर वेगळंच जाणवू लागले होते. ती हवेत असल्याचा तिला भास होऊ लागला. सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर फिरू लागल्या.

काही कळायच्या आत ती शुद्ध हरपून जमिनीवर कोसळली. तसे सगळेच आश्चर्ययुक्त काळजीने तिला पाहू लागले.

डोळ्यावर पाणी शिंपडून तिला जागं करण्यात आले व रिसॉर्टमध्ये घेऊन गेले. तिला रूममध्ये झोपवून सगळे पुन्हा बाहेर मोकळ्या जागेवर येऊन बसले.

अचानक रात्री उशीराच अभिजीतचा फोन वाजला. इतक्या रात्री कोणाचा फोन आहे म्हणून त्याने पाहिले तर त्याच्या आईचा फोन होता.

आईचा इतका उरीशा फोन पाहून त्याने पटकन फोन घेतला. पण फोनवर तर आई नव्हतीच, शेजारचे काका बोलत होते.

"हॅलो! अभि, बाळा तुझ्या आईला हृदय विकाराचा झटका आला आहे तू ताबडतोब घरी ये"

"पण काका मी शहरात नाहीये, मी इथून येईपर्यंत तुम्ही तिला दवाखान्यामध्ये घेऊन जा, मी लगेच निघतो इथून" अभि भीतीयुक्त काळजीने बोलला.

"बर! लगेच निघ"

"हो! काका"

"काय झालं अभि?" राजवीर पुढे येऊन विचारू लागला.

"आईला हृदयविकाराचा झटका आला आहे, शेजारचे काका होते त्यांनी फोन केला होता, ते दवाखान्यामध्ये घेऊन जातो बोललेत पण मला निघायला हवं लगेच"

"अरे अभि! आज अमावस्या आहे आणि एकटा घाटातून कुठे निघाला आहेस, सकाळी लवकरच आपण सगळेच निघुया" दिशा बोलली.

"सकाळपर्यंत माझे इथे मन लागणार नाही, आई तिथे त्रासात असताना मी इथे निवांत कसा काय झोपू शकतो" त्याचे डोळे भरून आले होते.

"बरं! मग आपण एक काम करू सगळेच निघुया आता" रुद्र त्याची मनस्थिती ओळखून बोलला.

"अरे! पण इतक्या रात्री आणि आज अमावस्या ही आहे ना मला वाटत आपण सकाळी लवकर निघुयात" दिशा गंभीरपणे बोलली.

इतक्यात अभिचा फोन पुन्हा वाजला. शेजारच्या काकांनीच पुन्हा फोन केला होता.

"हॅलो! अभि निघालास का? लवकर निघ तुझ्या आईला दवाखान्यात अतिदक्षता विभागात ठेवल आहे, त्यांची तब्बेत खूपच गंभीर आहे"

"हो! काका मी निघतो लगेच निघतो" अभि तणावपूर्ण मनस्थितीमध्ये बोलला.

सगळे त्यालाच पाहत होते.

"मी निघतो आताच, तुम्ही सगळे उद्या सकाळी निघा, नसेल तर आपली सहल ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी, मला नाही वाटत की माझ्यामुळे तुमचा आनंद कमी व्हावा"

"भाई! बस क्याss इतना ही समझे हम को, सगळेच निघू आपण एकत्र, ते ही आता लगेच" राजवीर त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला.

सगळे रूममध्ये सामान आणण्यासाठी गेले. तर रुद्र आपली बॅग घेऊन बाहेर आला. तर जवळच एक आजोबा शेकोटी करून बसलेले त्याला दिसले. तो त्यांच्याकडे निघाला.

"आजोबा तुम्ही आता इथे काय करताय? तुम्ही इथेच राहता का?" रुद्र ही त्यांच्या जवळ जाऊन बसत बोलला.

तसे आजोबा किंचित हसले.

"हो! मी इथेच राहतो, पण तुम्ही ही आजची रात्र इथेच राहा"

"राहायचं तर होतं पन एक अडचण आहे मसझ्या मित्राची आई आजारी आहे तर आम्हाला काही ही करून आताच जावं लागेल"

"आज अमावास्या आहे बाळांनो, तुम्ही नका जाऊ. तो तिची वाट पाहत आहे, आता तिथे गेलात तर तो तिला घ्यायला नक्की येणार आणि तुम्ही तुमचा जीव ही गमवाल" आजोबा कोड्यातच बोलले.

रुद्रला त्यांचे बोलणे काही समजले नाही.

"बाबा कोणाबद्दल बोलताय तूम्ही?मला काहीच समजत नाहीये"

आजोबा किंचित हसले.

"बाळा, त्याची वस्तू घेतली आहे तुम्ही आणि ती घ्यायला तो नक्की येणार...आजच येणार" गंभीरपणे बोलले.

"कोणती वस्तू? कोणी घेतली? आणि आहे तरी ती कोणाची?" रुद्र मनातून थोडा घाबरला होता.

"तुझ्या मित्राने अजाणतेपणी एक मोठी चूक केली त्याची वस्तू आणून..."

आजोबा अजून बोलत होतेच की गाडीचा आवाज आला.

"रुद्र चल पटकन" राजवीर गाडीत बसूनच बोलला.

"हो आलोच" अस म्हणून तो पुन्हा मागे फिरला.

"आजोबा..." तो मागे वळून आजोबांना सगळं विचारणार होता पण आता ते आजोबा तिथे नव्हते.

रुद्रने आपली नजर आजूबाजूला फिरवली पण आजोबा कुठेच दिसले नाहीत.

"तू येतो का आता तुला इथेच सोडून जाऊ?" राजवीरचा आवाज आला तसा तो थोडं पळतच गाडीकडे गेला.

काही वेळातच सगळे तिथून निघाले. काही अंतर गेलंच होते की पुन्हा ते आजोबा रस्त्याकडेला उभे असलेले दिसले. गाडी अचानक बंद पडली म्हणून राजवीर ती पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्न करत असतानाच ते आजोबा अचानक रुदच्या खिडकी जवळ आले.

"पोरांनो, इतक्या रात्री अस घाटातून जाण चांगलं नाही, सकाळी जा तुम्ही, पहाटे चार नंतर निघा धोका टळेल" आजोबा दम टाकत बोलले.

रुद्र गाडीतून उतरून बाहेर त्या आजोबांच्या जवळ जाण्यासाठी उतरला. पण ते आजोबा आता तिथे नव्हतेच.

रुद्रला थोडा धक्का बसला. गाडी पुन्हा सुरू झाली तसा रुद्र कोणाला काही ही न बोलता पुन्हा गाडीत येऊन बसला. काही वेळातच गाडीने पुन्हा वेग पकडला.

वस्ती सोडून गाडीने घाटात प्रवेश केला. किर्रर्र अंधारात, कुठे तरी घुबडाचा घुत्कार ऐकू येत होता. झाडांच्या पानांचा सळसळ आवाज होत होता. घनदाट झाडी सोबत भयाण काळोख आता सोबतीला होता.

सलोनी डोळे बंद करून सीटवर डोकं टेकून झोपली होती. गाडीत ही वातावरण गंभीरच होते. दिशा मनातून थोडी घाबरूनच बसली होती. अंजली व राजवीर मात्र या सगळ्यांपासून अजान होते.

रुद्र काही वेळापूर्वी भेटलेल्या आजोबांचा व त्यांच्या बोलण्याचा विचार करत होता. राजवीर गाडी चालवत होता. त्याच्या बाजूला रुद्र, मधल्या सीटवर अंजली व दिशा होत्या तर मागच्या सीटवर सलोनी व अभि बसले होते.

काही वेळात हवेत गारवा वाढला. वातावरण अचानक बदलू लागले. सोसाट्याचा वारा वाहू लागला. झाडांची हालचाल वाढली.आकाशात आकाळी ढग जमा होऊ लागले.

"अचानक या वातावरणाला काय झाले?" राजवीर गाडी चालवतच बोलला.

"मी म्हणाले होते आपण आता नको जाऊयात, पण माझं कोणी ही ऐकले नाही" दिशा घाबरतच बोलली.

"काही नाही होतं दिशा हा घाट आहे घाटात हवा अशीच असणार ना" अंजली तिला समजावत बोलली.

अंजली तिला समजावत तर होती पण मनातून ती ही आता थोडी घाबरलीच होती.

"ते आजोबा ही असेच काही मला बोलत होते" रुद्र आठवत बोलला.

"आता तुला भास होऊ लागले का भावा, चढली तुला कदाचीत तू झोप शांत, ओके!" राजवीरला त्याचं बोलणं म्हणजे मस्करी वाटतं होती.

"राज काही ही काय, मी ड्रिंक नाही करत माहितीये ना तुला" रुद्र थोडं चिडूनच बोलला.

"मग आज न पिताच चढली की काय?" राजवीर त्याची पुन्हा मस्करी करत बोलला.

त्याचं वेळी अचानक गाडी समोरून काही तरी धावत गेलं. राजवीरने पटकन ब्रेक दाबला. अचानकपणे ब्रेक लागल्याने सगळेच पुढच्या सीटवर आपटले.

"राजss काय करतोय तू? असा अचानक ब्रेक का दाबला?" अभि मागूनच त्याला बोलला.

"अरे! कोणता तरी प्राणी आडवा आला"

अस म्हणत त्याने पुन्हा गाडी सुरू केली.

"राज तो खरंच प्राणी होता ना?" रुद्र दबक्या आवाजात बोलला.

"हो! रे! माझ्या राजा, तू एक काम कर तू मागे जाऊन बस, अभि तू ये पुढे नाही तर हा मला काय गाडी चालवू देणार नाही"

"हो! हेच ठीक राहील, तुम्ही दोघे काय गडबड करता माहीत आहे मला" अभि ही बोलला.

एका ठिकाणी गाडी थांबवून अभि पुढे येऊन बसला तर रुद्र मागे जात असताना त्याला बाजूच्या झाडावर काही तरी हालचाल जाणवली.

तसा तो घाबरून पटकन गाडीत बसला. आता अंजली सलोनी जवळ जाऊन बसली होती. तर रुद्र दिशाच्या बाजूला. दिशा त्यालाच पाहत होती.

गाडीने पुन्हा वेग पकडला. रुद्र बाहेर पाहत असताना त्याला अस जाणवलं की, त्यांच्या गाडीसोबत एक काळी सावली येत आहे.

तो खूपच घाबरला पण कोणाला काही ही न बोलता शांतपणे समोर पाहू लागला. कारण त्याला माहित होते की कोणीच त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार.

अंजली ही सलोनीच्या बाजूला झोपली. अचानक विजा चमकू लागल्या पाठोपाठ वीज कडाडण्याचा आवाज आला.

अचानक समोरच्या काचेवर एक वटवाघूळ येऊन आपटले. त्यामुळे राजवीरने करकचून ब्रेक दाबला. आता सगळेच घाबरले होते. हिम्मत करून राजवीरने पुन्हा गाडी सुरू केली.

समोरचा बल्ब लावताच गाडीसमोर प्रकाश्यात एक विचित्र अशी अमानवीय आकृती राजवीरला उभी दिसली.

"चलं ना आता पटकन" अभि त्याला समोर फक्त पाहत बसलेलं बघून बोलला.

"तू पाहिलं समोर काय होत ते?" राजवीर घाबरतच बोलला.

"काही नव्हतं तिथे तुला चढलीये आता, म्हणून म्हणत होतो थोडं कमी घे पण ऐकणार नाही ना" अभि थोडं रागातच बोलला.

"ये! नाही रे! खरंच तिथे होत कोणी तरी"

"हो! होतं ना, तुझा भास होता बाकी काही नाही" अभि त्याच्या डोक्यात टपली मारत बोलला.

"तू हो बाजूला मी चालवतो गाडी"

अभि अस म्हणून बाहेर उतरत होताच की राजवीर त्याचा हात पकडला.

"थांब उतरू नको अशीच सीट बदलू" राजवीर घाबरून बोलला.

इतक्या गारव्यात ही त्याला दरदरून घाम सुटला होता. अभिने याचं काही होऊ शकत नाही अश्याच अविर्भावत त्याच्याकडे पाहून जागा बदलली.

"आता तू ही झोपून टाक, मी घेतो गाडी वेगाने" अभि गाडी सुरू करत बोलला.

"अभिss म...म... मला वाटतं आपण इथूनच मागे फिरावं कारण प्रत्येक वळणावर काही ना काही खुणा मिळतं आहेत, कदाचित हे निसर्ग किंवा देवच आपल्याला पुढे जाण्यापासून सावध करत आहे" दिशा बोलली.

"अ....हो....हो...हो...म...म...ला ही असंच वाटतं" रुद्र ही अडखळत बोलला.

"शांत बसा सगळे, तुमच्या मनाचे खेळ आहेत हे सारे, अस काही नसतं हे फक्त नैसर्गिक आहे हवामानात बदल होणारचं ना" अभि रागातच पण समजावण्याच्या सुरात बोलला.

"अरेss अभि! निसर्गामध्ये जशी मानवी शक्ती आहे तशीच अमानवी शक्ती ही अस्तित्वात आहे तुला वेळ आली की समजेल" दिशा बोलली.

"बघू जेव्हा मला तशी प्रचिती येईल तेव्हाच मी यावर विश्वास ठेवेन" अभि एकदम तोऱ्यात बोलला.

काही अंतर जाताच मुसळधार पासून सुरू झाला. काळ्या नभातून पडणारे ते मोत्यासारखे थेंब आज भयावह वाटत होते. गाडीच्या टपावर पडणारे ते मोती जोरजोरात आवाज करत आपटत होते.

सोबतीला विजाचा मन हादरून देणारा आवाज होताच.
पावसामुळे आता समोरचे काहीच दिसत नव्हते. तसाच अंदाज काढत त्याने गाडी सावकाश सुरू ठेवली.

"अभिss कुठे निघाला आहेस बाळा? मी तर इथेच आहे ना" अभिच्या कानात आईचा आवाज घुमला.

पटकन त्याने आपली मान वळवली तर त्याला बाजूच्या सीटवर आई बसल्याचे दिसले. अभिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की आई इथे आहे आणि अचानक आईचा चेहरा एक भयानक चेहऱ्यामध्ये बदलला.

गाडी जाऊन समोरच्या दरीत कोसळणारच होती की त्याने पटकन स्वतःला सावरले व गाडी पुन्हा व्यवस्थित सुरू ठेवली. पण गाडीत बाकीचे सगळेच झोपले होते. आता आपला अपघात होता होता वाचला तरी कोणीच उठले नाहीत.

अभि आता मात्र जाम घाबरला. इतक्यात मागून पुन्हा आवाज आला.

"आली का प्रचिती" हा आवाज होता सलोनीचा.

अभि घाबरतच अरश्यातून मागे पाहू लागला तर सलोनी त्याला पाहून विचित्रपणे हसत होती. आता त्याचे पाय कापू लागले व त्याने गाडी थांबवली.

"अभि चल ना लवकर गाडी का थांबवली अशी मधेच" रुद्रचा आवाज आला.

तसा अभि भानावर आला तर सगळे काही ठीक होते. सगळे त्यालाच पाहत होते. त्याने हळूच आपली नजर अरश्यातून मागे टाकली तर सलोनी शांतपणे झोपलेलीच होती.

त्याने एक उसासा टाकला व पुन्हा गाडी सुरू केली. पण आता तो मनातून पुरता घाबरला होता. त्याला ही आपला निर्णय चुकल्याची थोडी जाणीव झाली. एका हाताने चेहऱ्यावरचा घाम पुसत तो विचार करतच गाडी चालवत होता.

एव्हाना पाऊस थोडा थांबला होता. समोरच सगळं व्यवस्थित दिसू लागलं. समोर पाहून अभि पुन्हा घाबरला, कारण ते इतका वेळ प्रवास करून ही अजून एकाच ठिकाणी असल्याची त्याला जाणीव झाली.

त्याने काही ही न बोलता गाडी सुरू ठेवली. मनामध्ये हनुमान चालीसा म्हणतच तो गाडी चालवू लागला. अचानक गाडीवर काहीतरी जड येऊन पडल्याचा आवाज आला.

"अभि हा कसला आवाज होता?" राजवीर बोलला.

"माहीत नाही"

"मग गाडी थांबव ना पाहू काय आहे" अंजली बोलली.

"काही गरज नाही" रुद्र पटकन बोलून गेला.

"अरे पण..."

अभिने काही झालं तरी गाडी काही थांबवली नाही.
रुद्र बाहेर पाहत होता तर त्याला अजूनही ती काळी सावली आपल्या सोबत येत असल्याचे जाणवले. त्याने आपले डोळे बंद केले व देवाचे नामस्मरण करू लागला.

काही वेळाने हळूच त्याने डोळे उघडले व आपली नजर खिकडीकडे वळवली. तर त्याच्या एकदम चेहऱ्यासमोर एक काळी सावली जाणवली.

पटकन त्याने डोळे बंद केले व काही क्षणानंतर पुन्हा हळूच डोळे उघडले तर तिथे काहीच नव्हते.

"अभि! मला फार भीती वाटातीये रे! आपण फार मोठ्या संकटात अडकलो आहे अस मला वाटतं" दिशा घाबरून बोलली.

"काही ही काय दिशा, तू ही घाबरतेस व बाकीच्यांना ही भीती घालतेस. सलोनी बघ कशी शांत झोपली आहे. तू ही झोप म्हणजे तुला ही भीती नाही वाटणार" अंजली बोलली.

"अरे! अभि! हे बघ काय! आपण अजून जास्त अंतर गेलोच नाहीये अस वाटत आहे. तासभरापूर्वी ही आपण इथेच होतो,हो ना!" राजवीर रस्त्याबाजूचा माईल स्टोन पाहून बोलला.

हे ऐकून आता सगळेच बुचकळ्यात पडले.

"काही नाही पावसामुळे अस वाटत आहे" अभि डोळ्यांनीच राजवीरला इशारा करत बोलला.

तसा तो ही इशारा समजून हो म्हणाला. आधीच सगळे घाबरलरले त्यात आता हे समजलं असत तर कदाचित सगळे आणखीनच घाबरले असते.

रात्रीचे तीन वाजले आणि मागच्या सीटवरून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. घाबरून सगळे मागे पाहू लागले तर सलोनी डोळे बंद करून आवाज करत होती.

"ही घोरतीये का अशी?" रुद्र घाबरतच बोलला.

"माहीत नाही, सवय असेल तिला" अंजली खांदे उडवत बोलली.

अभि अरश्यातून मागे पाहत होता. त्याच वेळी एक अमानवीय आकृती गाडीसमोर आली.

"अभिsss समोर बघ" राजवीर ओरडला.

अभिने पटकन समोर पाहिले तर ती आकृती विक्षिप्तपणे हसत असताना दिसली. त्याने करकचून ब्रेक दाबला आणि जोरजोरात हनुमान चालीसा म्हणू लागला.

ती आकृती आता हळूहळू गाडीकडे सरकत होती. पांढराफटक चेहरा त्यावर पांढरे डोळे. पांढऱ्या डोळ्यात मिरीच्या आकाराचा तो काळा ठिपका. डोळ्याभोवती गडद काळे वर्तुळ दिसत होती.

विक्षिप्तपणे हसताना त्याच्या तोंडातील जागी जागी काळेकुट्ट पडलेले दात दिसत होते. हाताच्या बोटांची नखं प्रमाणापेक्षा लांब व टोकदार होती.

ती आकृती हळूहळू गाडीकडे सरकत होती आणि अभि पटकन गाडी मागे घेण्याचा प्रयत्न करत होता. पण गाडी मागे ही जात नव्हती जस की मागुन कोणी तरी तिला दाबून पकडले आहे.

आता गाडीत सगळ्यांनाच घाम फुटला. सगळेच घाबरून गेले होते.

"मला खाली जाऊ दे" एक विचित्र आवाज गाडीत सगळ्यांच्या कानात घुमला.

तसे सगळे मागे पाहू लागले. सलोनी खाली मान करून, बंद डोळे ठेवूनच काही तरी बडबड करत होती. तिचं वागणं, बोलणं सगळंच बदललं होतं.

अचानक तिने आपला चेहरा वर केला व डोळे उघडले. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते. डोळ्यातील काळ्या बाहुल्या कुठेतरी लुप्त झाल्या होत्या. तिच्या तोंडातून रक्त बाहेर आले व ती विचित्रपणे हसली.

हे पाहून सगळयांच्या मनात धस्स झालं. सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यांची पापणी लवते न लवते तेच तिने शेजारी बसलेल्या अंजलीच्या नरड्याचा घोट घेतला.

तिला काही समजायच्या आतच ती तडपडून शांत झाली. तिची आर्त किंकाळी वातावरणात विलीन झाली. तिला तशीच हातात पकडून सलोनीने आपली नजर बाकीच्या लोकांवर टाकली.

क्षणाचाही विलंब न करता सगळे गाडीतून बाहेर पडले व जीव मुठीत घेऊन धावू लागले. तशी सलोनी ही गाडीच्या काचा फोडून एखाद्या श्वापदासारखी चालत गाडीच्या टपावर चढली.

अभिने मागे वळून पाहिले तर गाडीवर तसाच आणखी एक पिशाच्च त्याला दिसला.

"गाईझsss लवकर पळा" तो मागे पाहतच बोलला.

तसे सगळेच मागे पाहू लागले. ते दोन पिशाच्च आता उडत त्यांच्याच दिशेने येत होते. आता सगळे आणखीनच घाबरले.

"र....र...रु....रुद्र हे...हे...काय आहे? सलोनी आ... आ...पली सलोनी? आणि तिने अंजु...ला" दिशा रडत पळतच बोलली.

"मी म्हणालो होतो नको जायला ते आजोबा बोलले होते तो तिची वाट पाहत आहे, आता तिथे गेलात तर तो तिला घ्यायला नक्की येणार आणि तुम्ही तुमचा जीव गमवणार"
रुद्र ही पळतच बोलला.

दिशा हे ऐकून स्तब्ध झाली. तसे तिच्यासाठी सगळेच थांबले.

"तू हे आम्हाला आधीच का नाही सांगितले?" दिशा चिडून ओरडली.

"ही वेळ भांडायची नाहीये, चल! जीव वाचला तर नक्की भांडा तुम्ही दोघे" राजवीर तिला ओढत पळत बोलला.

"अरे! मी सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तुम्ही मला वेड्यात काढले"

समोर एक भला मोठा दगड होता. राजवीरने सगळ्यांना खुणावले तसे सगळे त्यामागे लपले.

"अरे! ते भूत आहेत चोर नाहीत जे आपण लपून बसल्यावर निघून जातील" रुद्र राजवीरला हळूच बोलला.

तसे त्याने ओठांवर बोट ठेवून त्याला शांत बसण्यास खुणावले. पिशाच्च ही हवेत नाहीसे झाले. हे पाहून चौघांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

"बघ तुझं भूत चोर पळून गेले" राजवीर मोठमोठे श्वास घेत हसत बोलला.

रुद्रला काही तरी आठवले व तो अभिकडे पाहू लागला.

"अभि मला सांग तू ते घड्याळ कुठून घेतलं होतंस?"

"कुठून म्हणजे दुकानातून"

"खोट साफ खोटं"

"अभि हा काय बोलतोय?" दिशा गंभीरपणे बोलली.

"त्याचा काय संबंध आहे इथे?"

"काय संबंध! कदाचित त्या घड्याळामुळेच हे सुरू आहे."

"काही ही बोलू नको, तुला फक्त मला दोष द्यायचा आहे म्हणून तू हे बोलत आहेस हो!ना!"

"मी का असा करेन? ते आजोबां अस ही म्हणाले होते की,' त्याची वस्तू तो घ्यायला नक्की येणार तुझ्या मित्राने अजाणतेपणी खूप मोठी चूक केली आहे' अस काहीस"

"अभि! सांग ना यार कोठून आणले तू ते घड्याळ?" दिशा कळकळीने बोलली.

तसा अभिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.

"ते...मी...ते.... आपण येताना एका ठिकाणी थांबलो होतो आणि खाली जंगलात गेलो ना तिथे हे माझ्या पायात पडलेलं होत."

"म्हणजे ते घड्याळ तूला कोणत्याही दुकानातून नाही तर अस जंगलातून मिळालेलं होत"

"हो! मी उचलून पाहिले व दूर टाकून देणार होतोच की सलोनीची आठवण झाली, तिला असेच काही तरी नेहमी आवडतं आणि तिचा वाढदिवस ही होता व मी तिला लग्नासाठी ही बोलणार होतो म्हणून मग मी ते घड्याळ माझ्याकडेच ठेवले"

"ओहह शिट!" राजवीर मागे पाहून जोरात ओरडला.

तसे रुद्र व दिशा ही घाबरून मागे झाले. कारण सलोनी म्हणजेच ते पिशाच्च व तिच्या सोबत आणखी एक तशीच आकृती हवेत अभिच्या मागे उभी होती.

दुसऱ्याच क्षणी एका वाऱ्याच्या रुपात वलय करून त्याने अभिला गिळून टाकलं. राजवीर, रुद्र व दिशा पुन्हा पळत सुटले.

काही अंतर पळताच राजवीर हवेत तरंगू लागला.

"राज!राज" रुद्र मागे वळून ओरडत होता.

दिशा त्याचा हात पकडून रडत होती.

"तुम्ही जा! इथून जा पटकन" राजवीर ओरडला.

तसा रुद्रने दिशाचा हात पकडला व पुन्हा पळू लागला. राजवीर ही त्या काळ्या वलयात नाहीसा झाला. त्याच्या मन हादरून देणाऱ्या किंचाळ्या हवेत घुमल्या.

खूप वेळ पळून ते दूर आले होते. पण अचानक दिशा ठेच लागून खाली पडली. रुद्र फारच घाबरला पण हिम्मत एकवटून तो मागे फिरला व दिशाकडे जाऊ लागला.

त्या दोन अमानवी आकृत्या तिच्या जवळ आल्या व ती हवेत उलटी लटकू लागली. ते पिशाच्च तिच्यावर झडप घालणार होते की अचानक एक विचित्र, भयानक, मन घाबरवून सोडणारा कर्कश्य आवाज करत ती सावली आपोआपच मागे जाऊ लागली.

दिशा धपकन खाली पडली. तसा रुद्र घाबरतच तिच्या जवळ गेला. ती अमानवी शक्ती आता नाहीशी झाली होती. काही वेळापूर्वी प्रमाणे ते पुन्हा येईल या भीतीने ते दोघे ही जीव मुठीत घेऊन पळत सुटले.

काही अंतरावर एक शेकोटी पेटलेली त्यांना दिसली. आजूबाजूला पाहिले तर तो त्याच रिसॉर्टचा परिसर होता. हे पाहून त्या दोघांनीही एक मोठा सुटकेचा नि:श्वास सोडला.

"या! पोरांनो, या! या!" त्या शेकोटी जवळ बसलेल्या व्यक्तीने त्यांना आवाज दिला.

तसे हळूहळू दोघे ही त्या व्यक्तीकडे जाऊ लागले. जवळ जाताच रुद्रने त्या व्यक्तीला ओळखले.

"आजोबा तुम्ही?"

तसे ते गालात हसले व होकारार्थी मान हलवली. दिशा मात्र गोंधळून त्याच्याकडे पाहत होती.

"तुम्ही सांगितले होते अगदी तसच झालं आजोबा पण तुम्हाला कसं समजलं की हे घडणार आहे"

"कारण ज्या घड्याळामुळे तुमच्यावर संकट आले ते घड्याळ मीचं बनवले होते खूप वर्षांपुर्वी"

"मग आम्ही कसे काय बचावलो गेलो?"

"कारण त्याची वेळ संपली"

"म्हणजे..."

"रात्रीच्या तीन वाजता त्याची शक्ती जागी होते व ती वाढतच जाते पण चार वाजताच ती शक्ती पुन्हा बंधनात आडकते"

रुद्र भारावून गेला होता सगळं ऐकून तर दिशा त्याला अजून ही गोंधळूनच बघत होती.

"मी तुला तेव्हाच सांगितलं होत चार नंतर निघा, पण तुझ्या मित्रांनी तुझं ऐकलं नाही, तुम्ही दोघे बचावला कारण त्याची वेळ संपली"

दुसऱ्यादिवशी शहरात जाताच रुद्र व दिशा अभिच्या आईकडे गेले. तर आई एकदम ठणठणीत होती, हसत आईने त्यांचं स्वागत केलं व अभि बद्दल चौकशी केली.

आईला तिच्या तब्बेतीबद्दल विचारताच, तिला काहीच झाले नाही अस आई म्हणाली. रुद्र व दिशा फक्त एकमेकांना पाहत राहिले.