Mall Premyuddh - 32 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 32

मल्ल- प्रेमयुध्द

आबा वीरच्या लहानपणीचे अल्बम बघत होते. लहानपणापासून मिळालेल्या ट्रॉफी, इनाम, प्रत्येकवेळी ज्या ज्या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेसाठी गेले त्या सगळ्यांचे आबांनी फोटो काढून ठेवले होते. लहानपणी आबांच्या गाडीत वीर ऐटीत बसायचा. त्यावेळी फक्त गावात आबांची गाडी होती. अस एकदाही झाले नाही की वीर कुस्ती न जिंकता गावात आला. "तिथेही सतत बाप लागायचा. आणि आता पोर एक पोरीपायी बोलायला लागलं. आबांकड डोळ वर न करता बोलणारा हा पोर बोलतोय आता. म्हणजे मला ह्या पोरांच्या मनातलं समजत नव्हतं व्हय?
खरच समजलं न्हाय मला?
"मामा... आत येऊ...?" स्वप्ना म्हणाली.
"व्हय या की स्वप्ना..." आबा वीरच्या फोटोकडं बघत बोलले.
"आबा.." स्वप्नाने डोळ्यात पाणी आणले.
"आव कशापायी रडताय... मला ठाव हाय तुमची कोंडी व्हती. तुम्हाला गृहीत धरत्यात... आम्ही नव्हतं गृहीत धरलं तुमास्नी. आधी सुद्धा आमला वाटत व्हत की ह्या घरात तुम्ही यायला पाहिजे. पण तवा वीरला क्रांती आवडली. अन आम्ही काय बी न बोलता लग्न ठरवलं. लग्न मोडलं अन तुम्हाला आणायचा इचार सुलोचनाबाईंनी आमच्या डोक्यात टाकला. परत फिरून तुमच्याकडं आलं. आता अमास्नी वाटलं हे पोर माझ्या शब्दभायर न्हाय पण झालं काय न्हाय एकल आमचं शेवटी तुमच्या मनाचा इचार तुमच्या आई बापानं पण न्हाय केला. वाईट वाटलं आम्हाला न्हाय तुमच्या नजरेला नजर मिळवायची हिम्मत झाली." आबा म्हणाले.

"आबामामा जेव्हापासून कळतंय तेंव्हापासून मी वीरशिवाय कोणाचाही विचार केला नाही. बऱ्याच जाणणारी सांगितलं की वीर कमी शिकलेला आहे तुझ्या योग्यतेचा नाही पण माझ्या मनात वीरची प्रतिमा बदलली नाही. त्यांनी कधी मला त्या दृष्टिकोनातून बघितलं नाही ही गोष्ट वेगळी.... पण मला काय वाटत याचा विचार तुम्ही करायला हवा होतात आबामामा... तुम्ही त्याला तयार करायाला पाहिजे होत. स्वप्न बघितली मी या घरात सून म्हणून यायची त्या स्वप्नांवर चिखल फेकून मिटवू का? आबा तुम्ही प्रयत्न केले. पण आता मला हार मानायची नाही।. मी केले तर वीरसोबतच लग्न करेन नाहीतर..." स्वप्ना
"नाहीतर आत्तापासूनच या घराच्या उंबरठ्या बाहेर जाणार नाही.मी इथंच राहणार त्याने माझ्याशी लग्न केलं किंवा नाही केल तरी. आणि मला तुमची साथ पाहिजे त्या साठी..." स्वप्ना हट्टीपणाने बोलत व्हती.
" तूमी कशापायी तुमचं आयुष्य खर्ची करताय... नका डोक्यात येड घालून घेऊ वीर म्हाइत हायत न तुमास्नी ऐकणार न्हाय... मला वाटतय जे होईल ते डोळ्यांनी बघायचं आता त्यांना बोलून नि आपण हट्टीपणा करून कायुन काय बी फायदा न्हाय." आबा स्वप्नाला म्हणाले.
"आबा मी खूप आशेने आले होते हो तुमच्याकडे पण तुम्ही वीरचं ऐकणार मग मला कोण पाठिंबा देणार तुम्ही तुमच्या मुलाचं ऐकणार म माझे आई बाबा माझं का नाही ऐकत माझा का नाही हट्ट पुरवत? आबामामा मला वीर हवाय मी तुमच्या पाय पडते." स्वप्ना आबांच्या दिशेने कोसळली.
"पोरी काय करताय? इतकं हतबल हुन न्हाय चालणार. तुमच्या मनासारखं होईल पण मग लग्नानंतर वीरने तुमास्नी सुख न्हाय दिल तर...? तर काय उपयोग.? पोर हट्टी हाय ऐकणार न्हाय तुम्ही नका डोक्यामधी काय बी घेऊ..." आबा

"बर आबा मग यानंतर तुमचा नि माझा भाची म्हणून संबंध संपला." स्वप्ना रागात निघून बाहेर पडली. सगळे आवरून क्रांतीला भेटायला निघाले होते.

" येतीस न स्वप्ना?" स्वप्नाची आई म्हणाली
"हो येते... पाच मिनिटं द्या आवरून आले." तेजश्रीच्या रूममध्ये स्वप्ना गेली. तेजश्री तिची वाट बघत बसली होती.

"काय म्हणाले आबा???सांग ना स्वप्ना?" तेजश्री म्हणाली.
"त्यांनी मला वीरला विसर अस सांगितलय... ते सुद्धा एक बाप म्हणून वीरचा विचार करतायत... आबा हरले त्यांच्या मुलाच्या प्रेमाने..." स्वप्ना म्हणाली.
"बर... हे घडणार असा अंदाज बांधला व्हता मी... पण कुठं तरी वाटत व्हत की आबा हार मानणार न्हाईत." तेजश्री म्हणाली
"मग कशाला पाठवळस मला तिथं तुला जर माहीत होतं तर..." स्वप्ना रागात म्हणाली.
"आग तुझ्या काळजीनं त्यांचं काळीज पिळवटून निघालं असलं काय न्हाय इचार तर करतील... बर मग आता पुढं के ठरवलंय?" तेजश्री म्हणाली

"आता मी जाते तिला भेटायला." स्वप्ना आवरत म्हणाली.
"जा आणि ठणकावून सांग तिला की वीर फक्त तुझा हाय..." तेजश्री म्हणाली.

"माझ्या मागे तुझ्याशिवाय कुणी नाही... अगदी आई बाबा सुद्धा... मी बोलेन पण ती मला किती ऐकून घेईल माहीत नाही." स्वप्नाने ओढणी घेतली आणि खाली निघाली.


वीरने क्रांतीला फोन केला.
" क्रांती आत्या,मामा, ऋषी बाकी मी आणि स्वप्ना येतोय तासाभरात." वीर म्हणाला.
"बर या पण जेवायलाच या..." क्रांती म्हणाली तसे वीरने आत्याला विचारले.
"आत्या जेवण नको म्हणतीये." वीरने क्रांतीला सांगितले.
"बर मग पोटभर नाश्ता करून जा सगळे. " वीर हसला आणि फोन ठेवला. क्रांती पळत आईकडे गेली.

"आई अग वीरचे मामा आणि आत्या येत्यात... ऋषि आणि त्यांची मुलगी स्वप्ना पण..."
"अरे देवा... आग मग जेवायला बोलवायचस ना... चाल तयारी करू तासाभरात येतील सुद्धा अन आपली तयारी काहीच नसलं..." आशा घाईत बोलत व्हती.
"आई आग ते जेवायला न्हाय येणार , आपण पोहे करू..."क्रांती म्हणाली.
"काय नको पवे आपण लापशी करू आवडलं त्यांना..."आशाने लपशीचे गहू लगबगीने काढलं अन गुळसुद्धा.
"बर..." क्रांती
"कसली गडबड सुरू हाय अन गोंधळ कसला दोघींची...?" चिनू म्हणाली.
"आग जावईबापूंच्या मामा अन आत्या येत्यात अन त्यांची पोर.." आशाने कढईत साजूक तुपात लापशी भाजायला टाकली.
"कोण???" चिनूने परत क्रांतीला विचारले.
"आग ह्यांची आत्या कोकणातली...ऋषी..." ऋषीचा नाव ऐकलं अन चिनुच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव आला.
"काय...? अचानक?" चिनू ओरडली.
"हो की मलापण आत्ताच कळतंय..." क्रांती म्हणाली तशी आशा क्रांतीला म्हणाली. " क्रांते जा साडी नेस बाई..." क्रांती उठली.
"हा मी पण जर चांगला ड्रेस घालते."चिनू म्हणाली.
"हा काय वाईट हाय चांगला हाय तू नको बदलु..." आशा म्हणाली.
"न्हाय नको बदलते मी हा बघ किती मळालाय अस चांगलं न्हाय वाटत..."
"चांगलं वाटायला काय तुला बघायला येणार हायत व्हय..." अशाच काहीही न ऐकता चिनू क्रांतीच्या आधी खोलीत गेली. ड्रेस बदलला. केस केले.थोडी पावडर लावली. कपाळावर टिकली चिटकवली.
आरश्यामध्ये स्वतःला ती खूप छान दिसत होती.कितीतरी वेला क्रांती तिला आवाज देत होती. पण चिनूचे मन ऋषिकडे पळाले होते. तिच्या डोळ्यात लाज, भेटण्याची ओढ सगळं एकवटल होत.
"चिनू कुठं हरवलीस ग बाई...? कधीपासन हाक मारती.
चिनू भानावर आली.
"काय नाय तायडे असंच, आवरत व्हती न..." चिनू घाबरून म्हणाली.
"मला सांगतोस व्हय?? मला म्हाइत नाय का हे डोळ कुणाची वाट बघत्यात अन ही गालावर लाली का आली.." करांतुली हसत होती.
"तायडे अस काय नाय..." चिनू म्हणाली.
तेवढ्यात गाडीचा आवाज आला. अन चिनुच्या काळजाची धडधड आणखीच वाढायला लागली.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत