Deep mystery books and stories free download online pdf in Marathi

गहिरे गूढ

गहिरे गूढ
*****************
छे चना चटपटा देना भैय्या!",साक्षीने म्हंटल.

"ज्यादा तिखा मत बनाव भैय्या!",मी म्हंटल.

भैय्या चना चटपटा बनवत होता आणि आम्ही गप्पा मारत होतो. इकडच्या तिकडच्या अभ्यासाच्या लवकरच पंधरा दिवसांनी निघणाऱ्या सहलीच्या आम्ही गप्पा करत होतो. बोलता बोलता माझं सहज भैय्या कडे लक्ष गेलं. त्याचे हात चना चटपटा बनवता बनवता थांबले होते म्हणून माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. तो आमचं बोलणं फार काळजीपूर्वक ऐकत होता असं मला वाटलं. त्याच्या डोळ्यात वेगळेच गूढ भाव होते. ते बघून मला विचित्र वाटलं.

"भैय्या रुक क्यों गये? जरा लवकर लवकर बनवा आम्हाला शाळेत सुट्टी संपायच्या आत जायचंय.
त्याने भानावर येत मान डोलावली. मी नजरेनेच साक्षीला चूप बसायची खूण केली आणि आम्ही स्तब्ध उभ्या राहिलो.

त्याच्याकडून चणे चटपटे घेऊन आणि त्याचे पैसे चुकते करून आम्ही शाळेकडे वळलो.

"काय झालं बोलता बोलता तू मला शांत राहायला का सांगितलं?",साक्षीने मला विचारलं.

"अगं तुझं लक्ष नव्हतं का? आपण बोलत होतो तेव्हा तो चणे चटपटे वाला त्याचं काम थांबवून आपलं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता आणि त्याची नजर खूप विचित्र गूढ वाटली मला. म्हणून मी तुला शांत राहायला सांगितलं. यावेळेस घेतले आपण त्याच्याकडून चणेचटपटे पण यापुढे त्याच्या गाडीजवळ ही फिरकायच नाही",मी म्हंटल.

साक्षी हसत होती.
"का हसतेय तू? तुला माझं बोलणं खरं वाटत नाही का?",मी

"नाही गं! खरं वाटतेय! पण लगेच त्याच्या गाडीकडेही फिरकायचं नाही असं तू म्हंटल म्हणून हसायला आलं, अतिसावध आहेस तू!",साक्षी पुन्हा हसत म्हणाली.

"गाफील राहण्यापेक्षा अतिसावध राहणं कधीही चांगलं असं मला वाटते साक्षी मग तू कितीही हस",मी गंभीरपणे म्हंटल

"चल लवकर मॅडम वर्गात येण्याआधी जाऊ",साक्षी विषय बदलवत म्हणाली.

मधली सुट्टी संपायला अवकाश होता त्यामुळे आम्ही म्हणजे मी, साक्षी, रक्षा,श्वेता,सीमा आणि मेधा सगळ्यांनी पटकन चणे चटपटे संपवले आणि वर्गात जाऊन बसलो.

वर्गात मॅडम भूगोल शिकवत होत्या त्यामुळे आपोआपच माझी नजर खिडकी बाहेर गेली. नेमका तोच चनेवाला मला खिडकीतून दिसत होता. रस्त्याच्या पलीकडे असला तरी त्याची नजर आमच्या वर्गाकडेच आहे अशी मला शंका आली.

"नेहा लक्ष कुठे आहे तुझं? नीट लक्ष दे तासाच्या शेवटी मी तुला काही प्रश्न विचारणार आहे आज जे शिकवलं त्यावर आधारित, तेव्हा इकडे तिकडे बघू नको शिकविण्याकडे लक्ष दे",मॅडम कडक आवाजात त्यांची करडी नजर रोखून मला म्हणाल्या.

आता मलाच प्रश्न विचारणार आहे म्हंटल्यावर मला लक्ष द्यावेच लागले. तास संपला प्रश्नांचे उत्तरं देणेही झाले.
पुन्हा एकदा सहज मी खिडकीबाहेर बघितलं. चनेवाला आमच्या वर्गातल्या मागच्या खिडकीच्या दिशेने बघत होता.

मी मागे वळून बघितलं तर मागे भावना आणि प्रतीक्षा ह्या माझ्या वर्गातल्या मुली तिथल्या बेंचवर बसल्या होत्या.
प्रतीक्षा थोडी चिंतेत दिसली आणि भावना तिला काहीतरी समजावत होती. चणेवाल्याकडे गिऱ्हाईक आल्याने तो त्याच्या कामात गुंतला होता. अनेक चणेवाल्यांकडून आम्ही आत्तापर्यंत पदार्थ घेतले होते पण हा चणे वाला वेगळाच वाटत होता. त्याची ती गहिरी गूढ नजर काहीतरी निराळी होती ती साधी वाटत नव्हती. त्यात अनेक रहस्ये लपलेले असावेत असं वाटत होतं. तेवढ्यात मोठमोठ्याने मला हसण्याचा आवाज आल्याने मी दचकून वर्गात बघितलं तर साक्षी व माझ्या इतर मैत्रिणी माझ्या भोवती गोळा होऊन माझ्याकडे बघून हसत होत्या.

"काय झालं एवढं दात काढायला?",मी माझी विचारांची तंद्री भंग पावल्याने जरा रागातच विचारलं. तर त्या आणखीनच जोरजोरात हसू लागल्या.

"नेहाला तो नवीन चणेवाला फारच आवडला आहे बरं का! तिची नजरच हटत नाही त्याच्यावरून!",साक्षी खिदळत म्हणाली.
"अच्छा! हे कारण आहे तुमचं खिदळण्याचं गधडयांनो! मला कशाला आवडेल तो बावळट कुठल्या! तो माणूस केव्हाचा त्या मागच्या खिडकीतून त्या बेंचकडे बघतोय म्हणून मी त्याच्याकडे बघत होती, मला हे सगळं विचित्र वाटतेय माझं अंतर्मन सांगतेय की काहीतरी विचित्र घडणार आहे",मी बेंचकडे अंगुलीनिर्देश करत म्हंटल.

मी असं म्हणताच इतकावेळ हसणं दाबून माझं बोलणं ऐकणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींचा एकच हास्यकल्लोळ लोटला.

"झालं हसून! मग बसा आपापल्या जागी. आता सायन्स चा तास आहे येतीलच सर एवढ्यात", मी रागाने म्हंटल.

तेवढ्यात सर आल्यामुळे सगळ्या आपापल्या जागेवर जाऊन बसल्या.

सायन्स चा तास मी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकला. त्यानंतरचा तास ऑफ असल्याने आम्ही लायब्ररीत बसलो होतो. जाताना पुन्हा मी खिडकीतून रस्त्याकडे बघितलं तर तो चणे वाला कुठेतरी गायब झाला होता तो त्याच्या नेहमीच्या जागेवर नव्हता.

लायब्ररीत अभ्यास करता करता हळूहळू सगळ्या पंधरा दिवसांनी असलेल्या सहली बद्दलच बोलत होत्या. माझ्याच बाजूला प्रतीक्षा आणि भावना बसल्या असल्याने मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं.

"अगं मी खूप पटविण्याचा प्रयत्न केला पण आई नाही म्हणते ट्रिप ला जायला माझा लहान भाऊ त्याची फी भरायची आहे न पुढच्या आठवड्यात तर त्यामुळे सहलीसाठी पैसे ऍडजस्ट होऊ शकत नाही असं म्हणाली ती",प्रतीक्षा नाराजीने म्हणत होती.

"मी मदत केली असती गं पण माझ्याच आई बाबांना मी कसंतरी कंव्हीन्स केलं ट्रिपसाठी नाहीतर माझे बाबा राजी नव्हते ते म्हणाले अभ्यास करा ह्या ट्रिप्स वगैरे सगळा टाईमपास आहे",भावना

"तेच काही कळत नाही गं माझी खूप इच्छा आहे पण करणार काय? तू जा आणि एन्जॉय कर हं",प्रतीक्षा

प्रतिक्षाला ट्रिप ला जायचं असूनही ती पैशाअभावी जाऊ शकत नाही हे ऐकल्यावर मला वाईट वाटलं. ह्यावर काय उपाय करता येईल ह्याचा मी विचार करू लागली.

शाळा संपल्यावर आम्ही आमच्या घराकडे रवाना झालो.
जाता जाता पुन्हा लक्ष गेलं तर तो परत त्याच्या नेहमीच्या जागी आला होता. तसंही त्याचा विचार करायला वेळ नव्हता कारण मला आणि साक्षीला गणित कठीण जात असल्याने आम्हाला त्याच्या शिकवणीला जायचं होतं. आम्ही बोलत बोलत सायकल वरून घरी पोचलो.

दुसऱ्या दिवशी मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना आपण प्रतिक्षाला मदत करायची का त्याबद्दल विचारलं सगळ्यांना ते पटलं आणि आम्ही सहा जणी मिळून प्रतिक्षाची सहलीची फी भरायला तयार झालो.

"तुमचे कसे आभार मानू कळतच नाही थँक्स मैत्रिणींनो. पण एक समस्या आहे",प्रतीक्षा

"ती कोणती?",मी

"अगं तुम्हाला माझ्या घरी येऊन हे सगळं सांगून माझ्या आईला कंव्हीन्स करावं लागेल."

"एवढंच न! आम्ही आज संध्याकाळी येतो.",आम्ही सगळ्यांनी म्हंटल. त्या दिवशी तो चणेवाला काही दिसला नाही.

ठरल्याप्रमाणे शाळा संपल्यावर आम्ही संध्याकाळी तिच्या घरी गेलो आणि तिच्या आईला तिला ट्रिप ला येऊ द्या म्हणून पटवून दिलं.

"तुम्ही मुली एवढा आग्रह करताच आहात तर मी पाठवते पण तुमच्याकडून असे पैसे घेणं पटत नाही गं मुलींनो"

"काकू तुम्ही उगीच संकोच नका करू, एवढं च तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या सवडीने तुम्ही कधीही आमचे पैसे परत देऊ शकता",मी म्हंटल.

"मग ठीक आहे. लाग प्रतीक्षा सहलीच्या तयारीला",प्रतिक्षाची आई तिच्याकडे हसून बघत म्हणाली.

प्रतिक्षाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

इकडे आमची शाळा सुरू होती आणि घरी आलं की सहलीची तयारी सुद्धा सुरू होती.

हा हा म्हणता सहलीला निघायचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. आम्ही सगळ्या मैत्रिणी खूप उत्साहित होतो. एवढ्या धांदलीत चणे वाला काही दिसलाच नाही.

"बघ तो चणे वाला तुला घाबरून पळून गेला",साक्षी हसत म्हणाली.

"जाऊ दे बरं झालं! सगळी तयारी झाली का सहलीची",मी विचारलं

"हो मी भरपूर स्नॅक्स घेतलं आहे, गरम कपडे पण घेतले",साक्षी

"मी रेनकोट पण घेतला कधीकधी पाऊस पडतो तिथे",रक्षा

"प्रतीक्षा भावना तुमची झाली का तयारी",श्वेता ने विचारलं

"हो हो दोन बॅग्स भरून तयार आहेत",दोघीही म्हणाल्या.

त्यादिवशीची शाळा आटोपून आम्ही घराकडे निघालो. दुसऱ्या दिवशी बरोब्बर सकाळी नऊ वाजता आम्हाला पोचायचं होतं.

सकाळी लवकर आटोपून आम्ही आमच्या बॅगा घेऊन शाळेत पोचलो. सगळ्या विद्यार्थिनी बॅग्स घेऊन वर्गात बसल्या होत्या. पण कोणीच उत्साहात नव्हतं सगळ्या काळजीत आणि नाराज दिसत होत्या ते बघून मला विचित्र वाटलं. शाळेच्या ट्रस्टी पैकी कोणी गचकलं की काय अशी मला धास्ती वाटली. पण जेव्हा खरं कारण कळलं तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली.

काल शाळेतून प्रतीक्षा आणि भावना घरी पोचल्याच नव्हत्या. बराचवेळ झाला तरी त्या आल्या नाही म्हणून त्यांच्या आईबाबांनी शाळेत चौकशी केली असता सगळ्या मुली घरी कधीच्याच रवाना झाल्या आणि त्यात प्रतीक्षा आणि भावना सुद्धा होत्या असं त्यांना कळलं.

त्यांनी ती ज्या ज्या मैत्रिणींकडे जाण्याची शक्यता आहे तिथे सगळीकडे चौकशी केली पण ती तिथे नव्हती. आमच्यापैकी कोणाचाच नंबर माहीत नसल्याने त्यांनी आमच्याकडे चौकशी केली नाही. रात्र झाली तरी तिचा पत्ता नसल्याने त्यांनी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली.

शाळेत पोलिसांची जीप दिसत होती. काही महिला कॉन्स्टेबल्स आणि एक महिला इन्स्पेक्टर दिसत होत्या.
प्रतीक्षा आणि भावना आमच्या वर्गात असल्याने त्या वर्गातल्या सगळ्या मुलींची चौकशी त्या महिला इन्स्पेक्टर करत होत्या. चौकशी करता करता त्यांनी आम्हाला बोलावलं आम्ही सहा ही जणी त्यांच्या जवळ गेलो. रक्षा जरा घाबरत होती.
"अगं घाबरते काय! पोलीस काय आपल्याला खात नाही",साक्षी तिला म्हणाली.

"काय गं मुलींनो तुम्हाला काही माहिती आहे का? तुमच्या मैत्रिणी कुठे गेल्या असतील? तुमच्यापैकी कोणाला त्यांनी काही सांगितलं का? किंवा कोणाकडे त्या काल संध्याकाळी आल्या होत्या का?",इन्स्पेक्टर मॅडम ने आम्हाला कडक आवाजात विचारलं. त्यांच्या वर्दीवरचे लेबल बघून त्यांचं नाव सौदामिनी दांडगे आहे हे मला कळलं.

"नाही इंस्पे मॅम शाळा सुटल्या सुटल्या आम्ही घरी रवाना झालो. त्या दोघी आमच्या घरापासून लांब राहतात त्यामुळे आम्ही सोबत ये जा करत नाही",साक्षी म्हणाली.

"इंस्पे मॅम मला काहीतरी सांगायचंय",मी म्हंटल.

"बोल काय सांगायचंय?",इंस्पे सौदामिनी दांडगे

"मॅम एक पंधरा दिवसंपूर्वीची घटना आहे ह्या केस मध्ये त्याचा कितपत फायदा होईल माहीत नाही पण तेव्हा मला विचित्र वाटलं म्हणून ते सांगावं असं मला वाटते",मी

"न घाबरता अगदी थेट सांग मुली,आधी तुझं नाव सांग? आणि सगळं सरळ सरळ सांगून टाक",इंस्पे मॅम

"माझं नाव नेहा आहे मॅडम, पंधरा दिवसांपूर्वी आम्ही इथे रस्त्याच्या पलीकडे एक चणेवाला उभा राहायचा त्याच्याकडून चणे घेतले होते तेव्हा त्याची नजर मला थोडी विचित्र वाटली तो आमच्या बोलण्याकडे लक्ष देत होता असं मला वाटलं आणि जेव्हा आमचा तास सुरू झाला तेव्हा तो खिडकीतून मागे बसणाऱ्या प्रतीक्षा आणि भावना कडे बघत होता.",मी

"हे तुम्ही तुमच्या मॅडम ना किंवा हेड मॅडम ना का नाही सांगितलं?",इंस्पे मॅम

"तेव्हा हे प्रकरण एवढं गंभीर असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं मॅम",मी
"त्यानंतर तू शेवटचं त्याला कधी बघितलं?",इंस्पे मॅम

"त्यानंतर मी दोन तीन दिवस बघितलं तर तो होता पण मध्येत तो गायब होता काल संध्याकाळी तो पुन्हा दिसला",मी

"अच्छा!! ठीक आहे! तू त्या चणे वाल्याचे वर्णन करू शकते का?",इंस्पे मॅम

"हो मॅम मी त्याला कुठूनही ओळखू शकते त्याचे ते गूढ डोळे माझ्या चांगल्याच लक्षात आहे.",मी

इंस्पे मॅम नी त्यांच्या डिपार्टमेंट च्या स्केच एक्सपर्ट ला बोलावलं. त्याला मी सगळं वर्णन केले त्यानुसार त्याने त्या चणे वाल्याचे स्केच तयार केलं. स्केच अगदी हुबेहूब जमलं होतं.

त्यांनी ते चित्र सगळीकडे पाठवलं. सगळे बसस्थानके, रेल्वेस्थानक सगळीकडे अश्या वर्णनाचा इसम सापडला की तात्काळ पोलिसांना कळविण्यास सांगितलं.

युद्धपातळीवर प्रतीक्षा आणि भावनाचा शोध सुरू झाला. इंस्पे सौदामिनी दांडगे दिवस रात्र एक करून त्या चणे वाल्याच्या तपास करत होत्या. पण तो कुठे गायब झाला होता काय माहीत? त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता.

इकडे प्रतीक्षा भावना कडे खूप काळजीचं वातावरण होतं त्या दोघींच्या घरच्यांची परिस्थिती खूप वाईट होती. प्रतिक्षाच्या आईने जेवण सोडलं होतं.
आमची ट्रिप रद्द झाली होती. आमचं कोणाचेच लक्ष न शाळेत न घरी लागत होतं.

प्रतीक्षा आणि भावना बेपत्ता होऊन 24 तास उलटले होते.
शाळेत सतत पोलिसांची ये जा सुरू होती. त्या दिवशी शाळा लवकरच सोडली होती. कारण शाळेतून दुसऱ्या वर्गातल्या आणखी तीन मुली गायब झाल्या होत्या. सगळं भीषण वातावरण होतं. त्या तीन मुलींचे पालक येऊन हेड मॅडम शी भांडत होते. 24 तासात एकाच शाळेतल्या 5 मुली बेपत्ता झाल्या होत्या.

शाळेतून घरी जाता जाता आम्ही त्याच विषयावर बोलत चाललो होतो.

"मी म्हंटल नव्हतं तो चणे वाला काहीतरी विचित्र दिसतो नक्की त्यानेच पळवून नेलं असणार ह्या सगळ्या मुलींना.",मी

"अरे पण अश्या सगळ्या मुली काय मूर्ख आहेत का त्याच्यासोबत गेल्याच कशा त्या?",साक्षी

"काहीतरी आमिष दाखवून पळविले असेल. परवा प्रतीक्षा आणि भावनाला आपण शेवटचं बघितलं तेव्हा त्या आपल्याला काहीही बोलल्या नाही.",श्वेता

"काय भानगड आहे काही कळत नाही लवकरात लवकर सापडल्या पाहिजे त्या",रक्षा

"अरे माझी तर सायकल पंक्चर आहे.",मी

"हवा भरली नसशील तू बरेच दिवस पण आता घरापर्यंत ढकलत न्यावं लागेल कारण शाळेजवळ चे दुकान बंद आहे ते बघ",मेधा

"ठीक आहे गणिताच्या शिकवणीला जाऊ तेव्हा तिथे रस्त्यावर एक सायकल दुरुस्ती चे दुकान आहे तिथेच मी काढून घेईन पंक्चर",मी

आम्ही सायकल ढकलत ढकलत घरापर्यंत गेलो.
घरी माझ्या आई बाबांनी काळजीयुक्त आवाजात विचारलं,
"त्या मुली सापडल्या का गं तुझ्या वर्गातल्या?"

"नाही न! त्या तर सापडल्याच नाही पण दुसऱ्या एका वर्गातल्या आणखी तीन मुली बेपत्ता झाल्यात."

"बापरे! काय भयंकर प्रकार आहे हा! तू जपून राहा बरं! कोणी काहीही आमिष दाखवलं तरी त्याला बळी पडू नको.",आई

"मी लवकरच तुला एक साधा फोन घेऊन देतो. प्रत्येक विद्यार्थ्याला स्मार्ट फोन तर नको पण साधा फोन अत्यावश्यक आहे.",बाबा

शिकवणी ची वेळ झाल्याने मी व साक्षी घराबाहेर पडलो. मी माझी आणि ती तिची सायकल ढकलत चाललो होतो.

"अरे बापरे तिथे तर मोठ्ठी बस आहे आता तिच्या सगळ्या चाकांची हवा भरेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. त्यापेक्षा असं करायचं का येताना दुरुस्त करू सायकल.",साक्षी

"नको येताना पुन्हा तेवढं अंतर सायकल ढकलावी लागेल. आणि आताही शिकवणी च्या ठिकाणा पर्यंत ढकलत न्यावी लागेल त्यापेक्षा आत्ताच करू.",मी

आम्ही दुकानात थोडं बाजूला उभं राहिलो. हवा भरणारा माणूस बस च्या मागच्या चाकात हवा भरत होता. बस चा ड्रायव्हर चहा टपरीवर चहा पिण्यासाठी उतरला. मी माझी सायकल स्टँड वर लावत होती. दुकानासमोर खूप सायकली होत्या त्यामुळे मागे मागे जात मी सायकल स्टँडवर लावली.

"साईड प्लिज",कोणी म्हंटल म्हणून मी बघितलं तर तो ड्रायव्हर होता. त्याच्याकडे मी बघितलं आणि माझ्या डोक्यात एकदम एक गोष्ट क्लिक झाली. त्याने लांब अंगरखा पगडी घातली होती. त्याला दाढी मिशी होती तरीही मी त्याचे डोळे ओळखले. तो तोच चणेवाला होता.

मी बाजूला झाली पण आता कसंही करून ह्याला थांबवून ठेवणं आवश्यक होतं. साक्षीला हळूच मी सगळं पटकन सांगितलं. साक्षीने दुकानासमोरच्या एका सायकल ला धक्का मारला आणि सगळ्या सायकली धाड धाड पडून गेल्या नेमक्या बस समोर त्यामुळे बस वाला वैतागला. तेवढ्यात सायकल दुकानदारांकडून मी अर्जंट फोन करायचाय म्हणून त्याचा मोबाइल मागितला आणि दोन दिवसांपूर्वी इंस्पे सौदामिनी दांडगे यांनी मला जो त्यांचा फोन नंबर दिला होता तो मी लक्षात ठेवला होता. तो फोन मी लावला आणि त्यांना त्वरित त्या ठिकाणी यायला सांगितलं.

सगळ्या सायकल्स उचलायला फार वेळ लागला नसता आणि आम्हाला इंस्पे मॅम येईपर्यंत त्याला जाऊ द्यायचं नव्हतं त्यामुळे मला शक्कल सुचली मी दुकानातील एक टोकदार हत्यार घेतलं आणि बस चे मागचे दोन्ही चाकं बेमालूमपणे पंक्चर करून टाकले.

बस ड्रायव्हर सायकल दुकानदाराला शिव्या देऊ लागला.
"अशी कशी हवा भरली तू? खूप ठासून भरली असशील म्हणून लगेच पंक्चर झाले चाकं! चल लवकर पंक्चर काढ माझ्या कडे वेळ नाही"

पंक्चर काढेपर्यंत इंस्पे सौदामिनी दांडगे पोलीस कॉन्स्टेबल्स सह तिथे पोचल्या. त्या डायरेक्ट बस मध्ये शिरल्या. आत बघून त्या अवाक झाल्या.

बस च्या आत जवळपास दहा मुलींना हात पाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत झोपवलं होतं. त्यातल्या भावना आणि प्रतिक्षाला मी लगेच ओळखलं. पाच जणी आमच्या शाळेतल्या होत्या आणि पाच इतर वेगवेगळ्या शाळेतील होत्या. इंस्पे मॅम नी त्या मुलींच्या पालकांना तातडीने कळवलं तसेच त्यांच्या शाळेच्या हेड ला सुद्धा कळवलं. सगळ्या मुलींना त्यांच्या पालकांना सुखरूपपणे सुपूर्द करण्यात आलं. तो चणे वाला पळण्याच्या बेतात होता पण इंस्पे सौदामिनी दांडगे यांचा एक भक्कम फटका त्याच्या खांद्याच्या नेमक्या भागावर पडला आणि तो बेशुद्ध झाला.
जेलमध्ये शुद्धीवर आल्यावर त्याला सगळं सांगावं लागलं.

मानवी तस्करीचे मोठे रॅकेट पकडल्या गेले होते. इंस्पे सौदामिनी दांडगे मॅम नी आम्हाला शाबासकी दिली.

"शाब्बास मुलींनो तुमच्या मुळे मोठ्ठा गुन्हेगार पकडल्या गेला."

इंस्पे मॅम नी त्या सगळ्या मुलींना विचारलं,"
मुलींनो तुम्ही ह्या चणे वाल्याच्या बोलण्याला कश्या काय फसल्या?"

"मला तर त्याने ट्रिप ला जायला पैसे पाहिजे असेल तर हे चणे त्या गाडीवल्याला देऊन ये असं म्हंटल. मला वाटलं सोपं आहे असं केलं तर मला पैसेही मिळतील म्हणजे मी माझ्या मैत्रिणींचे पैसे देऊ शकेल म्हणून मी ते चण्याची पुडी घेऊन कोपऱ्यातल्या कार जवळ गेली आणि दोन माणसांनी मला पकडून त्या कार मध्ये ठेवलं माझ्या सोबत भावना सुद्धा होती त्यामुळे तिला सुद्धा पकडलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला डोळ्याला पट्टी बांधून दोन दिवस एका अंधाऱ्या खोलीत ठेवलं जेवायला असंच काहीतरी ब्रेड बटर ते द्यायचे आणि आज ह्या बस मध्ये आम्हाला त्यांनी हात पाय बांधून बसवलं. जास्त आरडाओरडा केला तर तुम्हाला जीवानिशी मारू असं आम्हाला सांगण्यात आलं.", प्रतिक्षाने हे सगळं सांगितलं.

"पंधरा सोळा दिवसांपूर्वी तुम्ही त्या चणेवाल्याकडून चणे घेताना पैशाच्या अडचणी बद्दल बोलली होती का?",मी

"हो तो चणे तयार करेपर्यंत मी भावनाशी त्याच विषयावर बोलत होती म्हणूनच त्याने मला पैशाचं आमिष दाखवलं.",प्रतीक्षा

"आता यापुढे तुम्ही सगळ्यांनी सावध राहा. असं कोणाच्याही भूल थापांना बळी पडू नका. लवकरच मी प्रत्येक शाळेत सावध कसं राहायचं ह्याची कार्यशाळा घेणार आहे.",इंस्पे सौदामिनी दांडगे मॅम म्हणाल्या.

आम्ही त्यांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतलो.

दुसऱ्या दिवशी शाळेत मधल्या सुट्टीत

"बघा त्यादिवशी तुम्ही मला हसल्या पण मी म्हंटल तेच खरं झालं.",मी

"हो आम्ही मान्य करतो तू बरोबर होती आम्ही चूक होतो.",सगळ्या एकसुरात म्हणाल्या.

"ऐ तिकडे बघ एक चणे वाला दिसतोय!",रक्षा

"आता नो चणे नो फुटाणे आता आपापल्या घरून आणा डबा भरून खारे दाणे!!",मी असं म्हणताच पुन्हा हास्यकल्लोळ उठला.
◆◆◆◆◆◆◆समाप्त◆◆◆◆◆◆◆◆