whom thHod steers in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | जया देव तारी - भाग 7

Featured Books
Categories
Share

जया देव तारी - भाग 7

जया देव तारी - भाग ०७

त्याकाळी  इमारत बांधण्यापूर्वी   एक पाऊस काळ गेल्यावर पाया पक्का होतो   असं मानीत असत. म्हणून पायाच काम झाल्यावर एक पावसाळा भर  तरी  ते  तसंच राहू देत असत. त्याप्रमाणे  गीमात अखेरीला देवळाच्या पायाचं काम पुरं करून पुढचं काम दसरा झाल्यावर करायचा बेत नक्की झालेला होता.  देवळाच्या  इमारती साठी  बारं, सऱ्या, वासे, खांब यांना लागणारं  लाकूड - सागवान , किंदळ, आईन आणि  फणस  ही झाडं  भादव्यात तोडून घेतली.  खांबांसाठी सड्यावरचे  मोठ मोठे खैर  आडवे करण्यात आले. दसरा झाल्यावर तिर्लोट आणि  सौंदाळ्यातून चिरकाम्यांच्या आठ जोड्या   बोलावल्या. बांधकाम  गावातला बाबल्या सुतार करणार  होता. त्याने मापं  दिली  त्याप्रमाने चिरकामी   नग पाडायला लागले. जुनाट आईन. किंदळी  आणि खैर चिरताना  एकसारखी करवतींची धार उतरे.  चिरकाम सुरू होतं त्या जागेवरच   भाता घालून  पाजळणीची  सोय करावी लागली. काही  नग चिरताना पाण्याची  धार ओतीत राहून करवत चालवावी लागे. 

                  पायासाठी  चिर्‍याची  वळीवं  आणि  इतर कामासाठी एक हाती छिनेलं काढायचं काम पावसातच सुरू केलेलं होतं. पुष्या पौर्णिमेपर्यंत  चिरकाम आणि  दगडाच काम  पुरं करून  जाग्याला आणून   सावलीसाठी मांडव घालून थप मारून झाल्यावर  पुढचं  काम सुरू झालं. मंदिराचा गाभारा  चारी बाजुला भिंती घालून  बंदिस्त करायचा होता. सभामंडप तूर्त मोकळाच ठेवायचा होता. धूम धडाक्यात काम सुरू झालं . यावर्षी  इमारतीचं काम पुरं झालं  की पुढच्या   दत्तजयंती पूर्वी मुर्तींची प्रतिष्ठापना करून  दत्तजयंती वार्षिक  चालू  करायचा बेत होता. त्यामुळे घाई गडबड न करता  सगळी  कामं शिस्तवार  पुरी करायची  असं शंभू काकानी योजलेलं होतं. 

               देवाचं काम असल्यामुळे  आढीबाजी , चालढकल न करता   कामगार  आंग मोडून काम करीत होते. आढं चढवून झालं त्याच दरम्याने शंभू काकांची  म्हातारी  आजारी पडल्याची    तार  आली  म्हणून  त्याना अथणीला जावं लागलं. ते येण्या पूर्वी  छपराचं  काम पुरं झालेलं होतं. गाभाऱ्याची चौकट आणि दरवाजा ही  कलाकुसरीची  कामं एक कामगार हाताशी घेवून बाबल्या  पुरतावीत होता.  संभूकाका पंधरवडाभर अथणीला राहून म्हातारी  जर बरी झाल्यावर तिला सोबत घेवूनच हळयात आले. ते आळे तेंव्हा सगळीच कामं पुरतावलेली  होती. चिरे शिल्लक राहिलेले होते म्हणून सभागृहाच्या डाव्या अंगाला  सात हाती पडवी  काढता येईल अशा बेताने  चौथरा घालून घ्यायचे त्यानी  योजले.  ते  काम  पंधरवडा भराने सुरू केले. देवळाच्या सभोवार सहा हात जागा बेणून  खणती घेवून सवथळ करून  घेतल्यावर परिसर  चांगला प्रशस्त दिसायला लागला.  ते काम  आटोपे पर्यंत  मिरगाची शितडी पडली नी पाऊस खराच झाला. 

                 दसरा झाल्यावर  भलु गोठणकराला सोबत घेवून शंभू देसाई  गाणगापूरला दत्ताची मुर्ती  आणायला रवाना झाले. जाताना    दोघेही  हिप्परगीला वस्तीला  थांबले.  तिथे  मद्रासकडचा कोणी नंबुद्री ब्राह्मण त्याना  गाठ पडला. तो कानडी  जाणणारा होता. माणूस मोठा गप्पीदास होता . रात्री उशेरापर्यंत शंभूच्या नी त्याच्या गप्पा रंगल्या. ते कशासाठी  गाणगापुरला  जाताहेत हे कळल्यावर त्याने आपल्या ओळख़ीचा  मुर्तीकार आहे त्याच्याशी  गाठ घालून देतो  असे सांगून तोही त्यांच्या सोबत गाणगापूरला निघाला. गाणगापूर गाठी पर्यंत  संध्याकाल होत आलेली होती.  तिथे धर्मशाळेत पडशा टाकल्यावर नंबुद्री ब्राह्मण म्हणवणाराने  आपल्या पडशीतून रव्याचे लाडू  काढले. तिघानीही लाडू खाल्ले नी पानी प्याले . थोड्याच वेळात शंभू  आणि  भलूला झापड आल्यासारखी वाटली नी ते बसल्याजागीच कलंडले. दुसरे दिवशी  उजाडल्यावर खूप उशिराने दोघानाही जाग  आली . तरीही  उठून बसायची उमखा होत नव्हती. बराच वेळ आलकट पालकट मारल्यावर  आळस मोडला नी ते उठून बसले. शंभूच्या  खिशातले  एक हजार रुपये. हाताच्या बोटातले सोन्याचे दीड तोळ्याचे सोन्याचे वळे नी आंगठी, जानव्यातले चांदीचे कान कोरणे नी दात कोरणे  नाहिसे झालेले होते.  भलु  गोठणकराच्या मुंड्याच्या  खिशात पानाची  चंची होती  त्यातला  पुरळेतल्या सुताराकडे करून घेतलेला आडकित्ता  आणि  खिशात  दोन रुपयाचा खुर्दा होता  तोही लंपास झालेला होता. 

              परमुलखात कफल्लक होवून मोठीच आफत आलेली होती. त्यातल्यात्यात एक जमेची बाजू म्हणजे  शंभु कानडी  बोलणारा होता.  गोठणकराच्या  कमरेतला चांदीचा करदोटा  आणो शंभुच्या कमरेतली  चांदीची  दुपदरी भरभक्कम  साखळी  एवढा ऐवज शाबूत होता.  दत्तमंदिरा जवळच्या सराफाकडे जावून आपल्यावर काय आफत आली ते सांगून शंभूने आपल्याकडची साखळी देवून परतीच्या प्रवासासाठी दहा रुपयाची मागणी केली. आपण पंधरवडा भराने मूर्ती घ्यायला परत खेप करणार आहोत त्यावेळी  व्याजासुद्धा तुमची रक्कम भागवून माझी साखळी सोडवून घेईन असे शपथपूर्वक सांगितल्यावर तसा मजकूर लिहून तो कागद नी दहा रुपये सराफाने दिले. पोटात नुसती आग पडलेली होती. दोघेही  भटाच्या खानावळीत बसून खिचडी खात असताना शंभूच्या  गावातला, अथणीचा  कल्लप्पा तिथे आला. त्याचा आडतीचा धंदा होता.  त्याची नी शंभूची  चांगली घसण होती. त्याला आपल्यावर आलेली  आफत कळित झाल्यावर तो त्याना घेवून आपल्या  ओळखीच्या पेढीवर गेला. तिथे आपल्या पतीवर  हजार रुपये घेतले. पेढीवाल्याकडे चौकशी करून मूर्तीकाराची  माहिती काढली. (क्रमश:)