Whom the God steers in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | जया देव तारी - 10 (अंतीम भाग)

Featured Books
Categories
Share

जया देव तारी - 10 (अंतीम भाग)

जया देव तारी–अंतीम भाग १० 

         येशाला वाड्याबाहेर काढला त्यावेळी देवस्थानचे मानकरी  दात्ये यांचा मोठा मुलगा सदानंद देवगडात मामलेदार म्हणून आला. त्याच्या कानावर ही वार्ता गेल्यावर त्यानी गावच्या तलाठ्याला खोतांच्या मिळकतींची शोधचौकशी करायली सांगितली. घरभाटासह  सगळ्या मोठ्या मिळकती शंभू देसायाच्या नावावर लागलेल्या होत्या, मात्र  मळ्यातली  सव्वा एकर जमीन कोकाटे आणि  देवळेकर यांच्या कूळ वहिवाटीखाली असली  तरी अद्याप खोतांच्या नावावर होती. गावच्या मराठी शाळेची  इमारत असलेली चौतीस गुंठे राजरस्त्यालगत मोक्याच्या जागची  जमिन आणि देवराई पासून ते सड्यापर्यंत सलग बारा एकर वरकस जमिन यादोन्ही मिळकती  वारस तपासात आलेल्या नसल्यामुळी शिल्लक राहिलेल्या होत्या. नंदाभाऊनी  कूळाना बोलावून निम्मे वाटणी  येशाला सोडायची तडजोड  सुचवली. कुळानी ते मान्य  केले. शाळेची इमारत जिल्हा परिषदेची होती. पण मालकाने बक्षिस पत्र न दिल्यामूळे तांत्रिक अडचणीतच होती. नंदा भाऊनी  दहा गुंठे  शाळेला बक्षिसपत्राने देवून उरलेली चोवीस गुंठे निर्वेध येशाच्या नावे करून दिली. 

            त्या काळात देवगड तालुक्यात जोरदार कलम लागवड सुरू होती. हे खूप जिकीरीचे काम होते.  वळकूवातले गोगटे अर्धलीच्या बोलीवर जमिनीची बांध बंदस्ती, बेणणावळ करून कलम लागवड करून तीन सीझन शिंपून पाच वर्षाने निम्मे बाग़ मूळ मालकाच्या ताब्यात देत. नंदाभाऊनी  बापूकाका गोगट्यांशी  समक्ष बोलून येशा खोताची  देवराई जवळची  बारा एकर मिळकत अर्धलीच्या करारावर कलम लागवडीसाठी सुपूर्द केली.  आता येशा खोताचे गाडे रांगेला लागले. त्याची बायको चतूर नी संसारी होती.  कुळांकडची शेत जमिनी ताब्यात आल्यावर ती खंडाने न देता भाग़ेलीवर स्वत: कसायला लागली. जो भागीदार असेल त्याला  नांगरटीचा मोबदला म्हणून उत्पनाचा चौथा भाग देवून उरलेले उत्पन्न मालक नी भागेली  वाटून घेत अशी रूढ होती. या पद्धतीत  मालक स्वत: वहिवाटदार असल्यामुळे  कुळाना हडप करता येत नसे. शेतीचे काम सुरू झाले की एखादा वेळ निमित्तापुरती आणि  येशा स्वत: काम करीत . बाकी  आपल्या बदली पैरे ( रोजंदार बाई ) द्यायची. 

                   पाच वर्षे मागे पडली. रोपट बागेचे चारशे रुपये  उत्पन्न यायला लागले. आताशी  म्हातारी खोतीण हळू हळू ताळ्यावर यायला लागली. तिचा  भ्रमिष्टपणा  कमी व्हायला लागला नी  स्मृती  जागृत व्यायला लागल्या. आपल्याला  फसवून वाड्याबाहेर काढले याचे तिला पुन्हा दु:ख व्हायला लागले. मात्र आता तिचा आक्रस्ताळेपणा पूर्ण बंद झाला होता. पण जसजसे तिचे गाडे  मूळ पदावर यायला लागले तसतसे  तिचे खाणे पिणे तुटले. ती विरड विरड जुन्या आठवणी काढून टिपे गाळीत राही. येणाऱ्या जाणाऱ्याला शंभूने  कसे फसवले ते सांगून हमसाहुमशी रडत राही. तिचे विपळाक बघून तेचे डोके फिरलेले होते ते परवडले असे सुनेला वाटे. खूप विचार करून तिला या दु:खातून बाहेर काढायचे तर इथून बाहेर पडायला हवे. नाहीतरी  आज ना उद्या इथून कधी बाहेर काढले जाईल याचा भरवसा नव्हताच. 

                  कलमांचा करार पुरा होवून अडीजशे रोपट कलमांची  दिवसे दिवस वाढते उत्पन्न देणारी बाग हाताशी आलेली होती. तिने नवर्‍याला सोबत समक्ष बापूराव गोगट्यांची भेट घेतली . त्याना सासवेची कथा सांगून तिथून बाहेर पडायचा आपला विचार बोलून दाखवला. त्यासाठी  बाग़ेचा करार करून येणाऱ्या रक्कमेतून मराठी शाळेजवळच्या आगरात लहानशी मठी बांधून  गोठ्यातून बाहेर पडायचा आपला विचार सांगितला. बापूना तिच्या सूज्ञ विचाराचे कौतुकच वाटले. आपण यावर विचार करून आठवडा भराने निर्‍णय देतो असे उत्तर दिले. आठवडा भराने  बापू  दात्यांच्या घरी  आले. त्यानी येशा नी त्याच्या बायकोला  बोलावून घेवून दात्यांचा समोर व्यवहार  मांडला. दहा वर्षे  सालिना  चारशे रुपये मालकाला रोख द्यायचे नी  शाळेजवळ  आगराला  दगडी  बांध घालून  चार खणी  घर  बांधून द्यायचे असा  न्याय्य  प्रस्ताव दिला. दात्याना तो मान्य झाला. त्यांच्या समोरच   तसा लेखी करार करून  एक सहीसूद प्रत येशाकडे दिली.  

                डिसेंबरात घराचे काम सुरू झाले.  चार खोल्यांचे घर उभे राहिले.  शिमगा झाल्यावर येशा सहीसामानासकट बाहेर पडून नवीन घरात रहायला लागला. घर प्रवेश नी सत्यनारायण करायचे ठरले. नवीन घरात आल्यावर थारे पालट झाल्यामुळे  म्हातारी सावरली. नवीन घरात  हौसेने मांडामांड करायच्या कामाला लागली. सुनेने देवाला हात जोडले. गृह प्रवेशाला कामतेकर बुवांचे कीर्तन करुया अशी इच्छा येशाने बोलून  दाखवली नी बायकोलाही ते पटले. बुवाना सांगायला येशा कोटकामत्याला गेला. सगळे ऐकल्यावर त्यानाही खूप आनंद झाला. ते म्हणाले, “ मी जरूर येईन पण माझी एक अट आहे, मला सव्वाअकरा रुपये बिदागी  द्यायची.....”  ठरल्या प्रमाणे  घरभरवणीचा कार्यक्रम झाला बापूराव गोगटे  पत्नीसह  दिवसभर हजर राहिलेले होते. रात्री गावातली मंडळी जमली. तीर्थ प्रसाद झाल्यावर  कीर्तन उभे राहिले. बुवानी  निरूपणा साठी  “जया देवतारी  तया कोण मारी ” हा अभंग घेतला. अभंगाचा मतितार्थ लक्षात आल्यावर बुवा निरूपणात येशा खोत नी शंभू देसाई  यांच्या संबढात काहीतरी  खोचक नी मार्मिक टिप्पणी करतील असा अंदाज जाणकाराना आला होता. पण संपूर्‍न कीर्तनात कामतेकर बुवानी  त्यासंदर्भात  अप्रत्यक्षपणेही काही टिप्पणी केली नाही.श्रोत्यानाही या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटले होते पण बुवा ख्यातकीर्त निरूपणकार होते. अशी काही अनुचित टीका टिपणी करून आपली  पातळी ते कशी  सोडतील?  पूर्वरंगात प्रल्हाद, गोऱ्या कुंभाराच्या  भट्टीत वाचलेली मांजरीची पिले यांचा दाखला दिला.  उत्तर रंगात कौरव पांडव युद्धात  हत्तीच्या गळ्यातून तुटून पडलेल्या घंटेखाली  वाचलेली साळुंखी आणि तिची हा कथाभाग सांगून उपोद्घात करताना येशा  खोताकडे  सुचक कटाक्ष टाकून, “आजही  आपल्या ओवती भोवती  देवाच्या कृपेने मोठ्या विपत्तींचा सामना करून तावून सुलाखून उर्जितावस्थेला  आलेल्या  माणसांची असंख्य उदाहरणे दिसतात, फक्त बघणारा  मर्मज्ञ  असावा लागतो ”  असे सांगून ‘हेची दान देगा देवा– म्हणत कीर्तन पूर्ण केले. ( समाप्त)