Humanity... Motherhood in Marathi Philosophy by Punam Bhagat books and stories PDF | माणुसकीचं... मातृत्व

Featured Books
Categories
Share

माणुसकीचं... मातृत्व

# मी हे का लिहिते...

कारण माझ्या जवळचे ह्या दुःखात होरपळू नयेत...

मी अगदी लहान असताना आई नसल्याचे दुःख किती आणि काय असते हे फील केले, जरी मला माझी आई आहे. पण समोरच्यांचं दुःख माझं का बनतं, हेच मला समजत नाही.

माझी एक मैत्रीण... अगदी मी आणि ती पहिलीत असतानापासून आम्ही सोबत होतो. तिला आई नव्हती आणि तिचं दुःख कसं दूर करू, यासाठी माझं मन जळत असायचं, अजूनही जळतं. तिला म्हणायचीही, "माझी आई ती तुझी आई." पण एवढं सोपं नसतं ते. मी तिला माझ्या घरी नेऊन ठेवू शकत नव्हते, की "तू माझ्याच घरी राहा."

माझी आई खूप छान आहे. अगदी आजही सर्वांवर खूप जीव लावते. स्वतःच्या मुलांपेक्षाही जास्त. पण प्रत्येकाला घराच्या मर्यादा असतात. माझी आई नक्कीच सर्वांची आई बनेलही, पण एवढा मोठा विश्वास समोरचा ठेवेल का?

तिला, माझ्या मैत्रिणीला, आई नसल्यामुळे घरचेही खूप त्रास देत. काळीज पिळवटून जायचं. का? कसं? का माणसं एकमेकांना माणूस समजत नाहीत? आई नसेल तर ते लेकरू नेहमी पोरकंच का?

काय बिघडतं, जर प्रत्येकाने जसं आपण आपल्या मुलांवर जीव लावतो, तसाच जगातल्या प्रत्येक मुलावर लावला तर? खरं मातृत्व का जगत नाही माणसं?

फक्त प्रेमळ दृष्टीने बघितलं तर जगात पोरकं कोणीच नसेल... अनाथही कोणीच नसेल.

**I am proud of my mother... always.**

मला कोणी आजही म्हटलं ना, "आई नाही," तर माझं हृदय बंद पडतं. डोळे नाही रडत, पण मी आणि माझं मन त्या माणसाचा संपूर्ण प्रवास जगून येते.

असंही हे सगळे अनुभव माझ्या आयुष्यात भरपूर आलेत. एक माझ्या कॉलेजमध्येही होता. तोही खूप emotional. रोज तो तेच बोलत होता. त्याचं ऐकत होते, त्याला समजावतही होते. पण तेव्हा क्लिक झालं की ह्याला भाऊ बनवू शकते. आणि नकळत तो भाऊसारखाच झाला. तेव्हा त्याला सांगितलंही, "बघ, ही तुझी आई. पुन्हा कधी म्हणू नकोस की आई नाही. इथे कधीही, केव्हाही ये."

पण त्याचं दुःख त्याचंच... प्रत्येकाला त्यातून बाहेर पडता यायलाच पाहिजे.

आई आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांची माहिती देत असताना त्यांना आई नव्हती, हे सांगायची. मग ते कसं घडलं, हाच प्रश्न माझा नेहमी असायचा. अगदी आतापर्यंत. पण समजून घेतलंच...

वाटतं, हे दुःख कधीच कोणालाच नको.

आईची किंमत मला माहीत आहे. आई असेल तर कोणत्याही घराची किंवा घराच्या छप्पराची गरजच नसते. जिथे आई, तिथेच ती मुलांना घर देऊ शकते.

खूप ठिकाणी बघितलं आहे... जेव्हा मुलं साधी काका-काकूंकडे जरी राहायला गेली किंवा त्यांना ठेवले, तरी ते आपलेच असणारे दुजाभाव करतात. हे अजिबात, कधीच पटत नाही.

आमची सर्व फॅमिली लांब असूनही, आईने सर्वांना तिच्याच मुलांसारखं नेहमी जपलं. अगदी माझ्या मैत्रिणीला सुद्धा,शेजारच्या मुलींना, सुनाला सुद्धा...अजूनही तेच करते...

माहित आहे, प्रत्येकाचे अश्रू कोणी एक नाही पुसू शकत. प्रत्येकाला त्यातून बाहेर पडायलाच पाहिजे. आई असती तर किती बरं झालं असतं... हो, झालं असतं. पण आपण आज जे घडत आहोत, कदाचित तेव्हा बनलोच नसतो. किंवा अजून चांगले बनलो असतो. पण आपल्या हातात आहे ते करायचं.

कधी कधी अशी माणसं आपल्याला मिळतात की ती आपल्याला समजून घेण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात. किंवा आपण थोडं कुठेतरी हलकं होऊ शकतो, काहीतरी आईसारखंच अनुभवू शकतो. पण घेणाऱ्याने ते घ्यावं लागतं.

माझं असं आहे, जगात मी कुठेही उभी राहिले तर त्या ठिकाणी मला आईची सावली भेटते आणि कुणाच्या तरी आयुष्यात मुलगी म्हणून जागा मिळते. हा अहंकार नाही. पण मला त्यांना तो सुकून, तो आनंद द्यायचा असतो की मी फक्त एकाच आईची मुलगी नाही. मुलगी म्हटलं की ती सर्वांचीच असते.

आणि मग माझ्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी आईची सावली, आई असते. आता तर स्वतःहून बऱ्याच जणींनी म्हटलं, "माझी मुलगी असतीस तर तू..." काही तर म्हणतात, "पुढच्या जन्मात माझी मुलगी हो." तेव्हा वाटतं, नात्यांना रक्ताची नाही, मायेची गरज असते.

सांगण्याचा तात्पर्य एवढाच की निसर्गालाही समतोल लागतो. फक्त प्रेमळपणा, आहे त्या व्यक्तींची किंमत, लहानांना प्रेम, मोठ्यांना आदर... हेच. प्रत्येक नातं मनाने जगावं, जपावं लागतं.

बरेच जण, "ह्या अशा कशा? ह्यांना महान बनायचं आहे," असं सुरुवातीला म्हणायचे. पण मी बदलले नाही. मात्र ते बदलले.

खरंतर ह्या सर्वांमागे असतो तो जगण्याचा, माणूस म्हणून बघण्याचा आणि माणसांच्या गरजा समजून घेण्याचा दृष्टिकोन. प्रत्येकाला फक्त प्रेम, आदर आणि ते आहेत त्यांचं स्थान देणं तेवढंच महत्त्वाचं असतं.

पैसा हा रक्ताच्या नात्यात लागतो; मनाच्या नात्यात नाही. मग प्रॅक्टिकल कुठे व्हावं, हेही कळलं पाहिजे.
प्रॅक्टिकल बना, काळानुसार बदला; पण माणुसकी, प्रेम आणि आपलेपणा जपायला हवा. फक्त प्रेम, करुणा आणि संयम ह्यानेच माणूस इतरांचीही मदत करू शकतो.

मागच्या वेळी खूप मुली माझ्या शेजारी राहत होत्या. खरं तर त्या बॅचलर म्हणून राहत होत्या. पण हेही एक दुःख आहेच — त्या मुलींबद्दल आणि त्यांच्या आईंबद्दल.

पण इथे मला त्या मुलींपेक्षा त्यांच्या आईंबद्दल जास्त दुःख वाटलं. कारण इथे या मुलींसाठी आम्ही  होतो, पण तिकडे त्यांच्या आई कशा राहत असतील? आजकाल मुलं आईला सोडून राहतात, पण आईलाच सतत मुलांची काळजी असते.

पण मुलांना घडवायचं, मोठं करायचं असेल तर आईला हे दुःख झेलावंच लागतं.

इथे या मुली खूप जीव लावायच्या. नातं कधी इतकं जिव्हाळ्याचं झालं, हे कळलंच नाही. सुरुवातीलाच एक मुलगी खूप आजारी पडली. तिला कॅन्सर असल्याचं सांगितलं होतं. तिची काळजी घेताना ती माझ्या मनाच्या इतकी जवळ आली, हे मलाही कळलं नाही.

पण मग त्यातच एक मुलगी... तिची काळजी घेतली की ती रडायची. नंतर कळलं की तिला तिच्या आईची खूप आठवण येते. तिला आईला जाऊन कित्येक वर्षे झाली होती.

मग एक रात्र ती माझ्याजवळ खूप रडली. तिला एवढंच सांगितलं, "आम्ही आहोत." पण तू ते स्वीकारणार का? कारण आपली तयारी असली तरी घेणाऱ्याचीही तयारी असावी लागते.

तरीही तिच्यासोबत नेहमी उभं राहण्याचा प्रयत्न केला. पण तिने स्वतःला दुःखात खूप कोंडून घेतलं होतं.

तिला एवढंच सांगितलं, "डोळे उघड. जिथे एक व्यक्ती निसर्ग घेऊन जातो, तिथे आपल्या आजूबाजूला बघ. काहींना दे आणि काहींकडून घे. जेवढं माणसाचं आयुष्य असतं, तेवढे ते क्षण आठव, जेव्हा आई सोबत होती. आणि आजही ती तुझ्यातच आहे. तिची आठवण दुःख बनवू नकोस, ताकद बनव."

तिथूनच ठरलं — फक्त कोणाची आई बनण्यापेक्षा त्यांना त्या परिस्थितीत उभं करायचं.

"तू चाल, मी सोबत आहेच. अगदी शेवटच्या माझ्या श्वासापर्यंत. कधीही, केव्हाही."

तेव्हापासून त्यांची ताकद त्यांनाच बनवायची, बस. दुःखात होरपळून काहीच उपयोग नसतो.

जिला कॅन्सर झाला होता तीही बरी झाली, आणि ही मुलगीसुद्धा.

त्यांनी मला मुली काय असतात,हे शिकवलं. कुठेतरी घराबाहेरच्या ठिकाणी "आपलं असं कोणी असावं" हाच उद्देश ठेवून मैत्री केली होती. पण भरभरून मिळालं सगळं.

देण्यातच खरं समाधान असतं. कधी कधी मनाच्या नात्यातही हक्काने खर्च करायला आवडतं.

मागे म्हटलं होतं की मनाच्या नात्यात पैशाची गरज नसते. पण वेळ आली, आणि त्यांना गरज असेल, तर तिथे उभं राहण्याची तयारी असावी. जास्त नाही, पण जेवढं जमेल तेवढं.

आजूबाजूला बघितलं ना, तर सगळे आपलेच आपल्यावर खुश असतात, आशीर्वाद देत असतात.

सांगायचं एवढंच की मी जसं जीवन जगते, तसं सर्वच जगू शकतात. पण माझा दृष्टिकोन काय आहे, हे तेवढं समजायला पाहिजे.

प्रत्येकालाच वाटतं, कोणी तरी असं असावं की जो स्वतःहून येईल, काही करेल, काही देईल. मग आपणच आपल्यापासून सुरुवात करावी.

काम सर्वांनाच असतात. प्रत्यक्ष वेगळी वेळ काढायची गरज नसते. आपण जिथे आहोत, जातो त्या प्रत्येक ठिकाणी, कुठेही, केव्हाही, या गोष्टी आपण देऊच शकतो.

फक्त थोडासा आपलेपणा, थोडं प्रेम, थोडा आधार आणि समोरच्याला माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी — कधी कधी एवढंच पुरेसं असतं.

कदाचित ह्यालाच...

# **माणुसकीचं... मातृत्व**